अद्भुतरम्य टेनेरीफं - भाग १ - टेनेरीफं ची तोंडओळख


आजकाल मराठीतून होणारे ब्लॉगिंग एकदमच तेजीत आहे. एकीकडे मराठी साहित्याचा होणारा ऱ्हास वगैरे निराशाजनक चर्चा सुरु असताना तरुण पिढी या नव्या माध्यमातून व्यक्त होताना पाहणे हे नुसतेच दिलासादायक नाही तर प्रेरणादायीही आहे. असेच काही मित्रमंडळींचे आंतरजालावरील मुक्त प्रकटन पाहून मीही लिहिते व्हायचे ठरवले. पण सांगण्यासारखं वेगळं काहीतरी असायला हवं ना! युरोपातल्या गेल्या साडेचार वर्षांतल्या मुकामात केलेली भटकंती हाच माझ्या अनुभव विश्वातला सर्वात मोठा भाग. त्यामुळे लिहायचं तर याच विषयावर हे नक्की केलं. मात्र युरोपातली नेहमीची पर्यटन स्थळं, तिथले मजेशीर किस्से यांबद्दल मराठीत चिक्कार लिहले गेले आहे. म्हणून ठरवलं, आपण लिहायचं ते फारशा माहित नसलेल्या स्थळांविषयी.


कॅनरी आयलंड्स (Canary islands) हा तसा भारतीयांसाठी अपरिचित प्रदेश. निदान रविवारच्या पुरवणीत पर्यटन विषयक सदरात तरी याचा उल्लेख कुठे वाचला नव्हता. जर्मनीमध्ये रहायला आल्यानंतर पहिलीच ओळख झाली ती  एका स्पॅनिश सहकाऱ्याशी. तो स्वतःची ओळख करून देताना कायम म्हणायचा, I am from Spain, but exactly from Canary Islands. एवढं ठासून सांगण्यासारखं आहे काय या प्रदेशात? मग गुगल महाशयांना प्रश्न विचाराला. उत्तरादाखल समोर आलेल्या छायाचित्रांकडे बघून मी तर या प्रदेशाच्या प्रेमातच पडलो. लवकरच इथे भेट द्यायची असं ठरवून मी अधिक माहिती शोधू लागलो. 

कॅनरी बेटे ही भू-राजकीयदृष्ट्या स्पेन चा भाग असली तरी त्यांचे स्थान मात्र स्पेनच्या मुख्य भूमीपासून बरेच दूर आहे. म्हणजे आपली अंदमान निकोबार बेटे आहेत तसे. मोरोक्कोच्या किनाऱ्यापासून जवळपास १०० किमी पश्चिमेकडे, अटलांटिक महासागरात हा द्वीपसमूह आहे. टेनेरीफं (Tenerife), फ्वेर्तेवेन्तुरा (Fuerteventura), ग्रान कनारीया (Gran Canaria), ला पाल्मा (La Palma), ला गोमेरा (La Gomera), आणि एल् हिएरो (El Hierro) अशी सात मुख्य बेटे आणि इतर काही लहान बेटे असा हा समुदाय आहे. यांपैकी टेनेरीफं आणि ग्रान कनारीया या दोन बेटांवर ७-८ लाख लोकवस्ती आहे. टेनेरीफं हे बेट निसर्ग पर्यटन आणि साहसी क्रीडाप्रकार यांच्यासाठी प्रसिद्ध, तर ग्रान कनारीया वर shopping आणि partying करणाऱ्यांची गर्दी. माझं लक्ष अर्थातच टेनेरीफं कडे वळलं. हवामानाच्या दृष्टीने ही बेटे उपोष्ण कटिबंधात (subtropical climate) येतात. तसे इथे वर्षभर तापमान सारखेच असते. विशेषतः हिवाळ्याच्या महिन्यांत तर इथले वातावरण अत्यंत सुखद असते. त्याच हिवाळ्यातल्या महिन्यांत पश्चिम युरोपातल्या देशांत फारच निराशाजनक वातावरण असतं. जेमतेम सहा-सात तासांचा दिवस, कमालीची थंडी, ढगाळ वातावरण, सतत भुरभुरणारा पाऊस या सगळ्यांचा विलक्षण वैताग येतो. त्यामुळेच नाताळाच्या सुट्टीत तमाम युरोपियन लोकांची पावले वळतात कॅनरी बेटांकडे. त्यात ब्रिटीश आणि जर्मन लोकांचा भरणा जास्त. या स्थळाची लोकप्रियता आणि सुट्टीचे दिवस यांमुळे विमनाची तिकिटे आवाक्याबाहेर असतील अशीच भीती वाटत होती. मात्र Low-cost airlines अंतर्गत स्पर्धेमुळे चक्क नाताळाच्या पूर्वसंध्येची तिकिटे अपेक्षेपेक्षा फारच स्वस्तात मिळाली. हॉस्टेल बुकिंग आणि स्थलदर्शनाची रूपरेषा ठरवून, अंगावर हिवाळी कपडे आणि बॅगेत उन्हाळी कपडे असा जामानिमा करून मी निघालो.

कॅनरी बेटांचे स्थान - नकाशा आंतरजालावरून साभार 

टेनेरीफंच्या दक्षिण विमानतळावर उतरल्या उतरल्या ऊबदार हवा, स्वच्छ सूर्यप्रकाश, आणि निळाशार समुद्र बघून मन हरखून गेले. या बेटाची भौगोलिक रचना अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहे. साधारण त्रिकोणी आकाराच्या या बेटावर मध्याभागी ३७०० मीटर उंचीचा एक सुप्त ज्वालामुखी आहे. त्याचं नाव टेईडं (Teide). या महाकाय पर्वतामुळे या बेटाचे हवामानदृष्ट्या दोन भाग पडतात. उत्तर-पश्चिम भागात भूमध्य सागरी प्रदेशासारखे हवामान, तर दक्षिण-पूर्वेकडे वाळवंटी प्रदेशासारखे शुष्क हवामान. या विभागणीमुळे तिथल्या वनस्पती, पीकपाणी, लोकजीवन या सगळ्याच बाबतींत वैविध्य आढळते. उत्तर-पश्चिमेकडचा प्रदेश वर्षभर हिरवागार असतो. हिवाळ्याच्या दिवसांत इथे १०-१५ अंश सेल्सियस तापमान असते आणि अधूनमधून पाऊसही भुरभुरत असतो. दक्षिणेकडे मात्र २५ अंश सेल्सियस तापमान असते. पाऊस कधीतरी अवचित. कधी वारे आफ्रिकेकडून वाहायला लागले की सारा आसमंत धुळीने भरून जातो. त्यामुळे दक्षिणेकडचा भूभाग ओसाड आहे. थोडीफार काटेरी झुडुपे आणि कॅक्टससदृश वनस्पती एवढेच काय ते वनस्पतीजीवन. शुष्क प्रदेशात टिकून राहणारी बरीच परदेशी झाडे इथे लावण्यात आली आहेत. आपला गुलमोहरही दिसतो अधूनमधून. कितीही ओसाड असला तरी या दक्षिण भागाचे वेगळेच सौंदर्य आहे. रम्य समुद्रकिनारे, उत्तरेकडे दिसणाऱ्या ज्वालामुखीय पर्वतरांगा, आणि त्यातून डोकावणारे टेईडं विवर असे मोहक भूदृष्य येथे दिसते.

टेनेरीफंचा दक्षिण भूप्रदेश

माझ्याकडे ६ दिवस होते. ३ दिवस दक्षिणेकडे तर ३ दिवस उत्तरेकडे अशी रूपरेषा मी ठरवली. मुक्कामाच्या पहिल्याच दिवशी नाताळची सुट्टी होतीबहुतांश दुकाने बंद होती आणि बसही नेहमीपेक्षा कमी प्रमाणात धावत होत्या. त्यामुळे हा दिवस मी रहात होतो त्या एल् मेदानो गावाच्या आजूबाजूलाच भटकायचं असं ठरवलं. एल् मेदानो हे टेनेरीफंच्या दक्षिण किनाऱ्यावरचं एक छोटसं गाव. इथला समुद्रकिनारा सर्फिंग साठी प्रसिद्ध आहे. गावाच्या जवळच मोन्टाना रोजा नामक एक रक्तवर्णी पहाड आहे. लक्षावधी वर्षांपूर्वी झालेल्या ज्वालामुखी उद्रेकातून या पहाडाची निर्मिती झालेली आहे. एक छोटीशी पायवाट आपल्याला पहाडावर घेऊन जाते. अर्ध्या तासाच्या खड्या चढणीनंतर मी माथ्यावर पोहोचलो. इथला खडक आपल्या कोकणातल्या सड्यांवरच्या खडकाळ जमिनीची आठवण करून देत होता. माथ्यावरून एल् मेदानो आणि आसपासचे समुद्रकिनारे यांचा नयनरम्य देखावा दिसत होता. इथे थोडेफार छायाचित्रण करून मी दुसऱ्या बाजूच्या पायवाटेने खाली उतरलो. पलीकडच्या बाजूचा किनारा फारच सुंदर होता. मोन्टाना रोजा पहाडाचा आकार इथून जरा वेगळाच दिसत होता. अंतर्वक्र आकाराचा किनारा आणि त्याच्या मागे उगवलेला हा ओभडधोबड लालसर पहाड असे वेगळेच भूदृष्य इथून दिसत होते. या किनाऱ्यावर जरा विश्रांती घेऊन मी हॉस्टेलवर परतलो.


मोन्टाना रोजा वरून दिसणारे एल मेदानो गाव आणि समुद्र किनारा 

एल मेदानो गावाचा समुद्रकिनारा 
 अधिक फोटोंसाठी क्लिक करा 

1 comment: