ऱ्हाईन नदीकाठाने सायकल सफर - भाग ३ - लोरेली भेट आणि ऱ्हाईन खोऱ्याचे विहंगम दृष्य

लोरेली पहाड - फोटो आंतरजालावरून साभार 

काही वेळातच सांक्त गोआर गाव आले. या गावाजवळ एक जेट्टी होती. इथून पलीकडच्या किनाऱ्यावर जाण्यासाठी एक फेरी बोट ये-जा करत होती. बोटीवरून वाहनेही नेता येत होती. निव्वळ २.५० युरोच्या नाममात्र दरात मी पलीकडे पोहोचलो. हे गाव प्रसिद्ध आहे ‘लोरेली’ च्या दंतकथेसाठी. या गावाजवळ एक खडा पहाड आहे. या कथेनुसार लोरेली नामक सुंदर मुलीने तिच्या प्रियकराने केलेल्या विश्वासघातामुळे या पहाडावरून नदीत उडी मारून जीव दिला. तेव्हापासून लोकांना ती पहाडावर बसून गाणे गुणगुणताना दिसते. तिच्या रुपामुळे आणि गाण्यामुळे लक्ष विचलित होऊन अनेक खलाशांना अपघातग्रस्त व्हावे लागले आहे. त्यामुळे हा पहाड लोरेली पहाड अशा नावाने ओळखला जातो. विकिपीडियाच्या माहितीनुसार ही दंतकथा म्हणजे १९व्या शतकात लिहिल्या गेलेल्या काही कथा-कवितांमधून निर्माण झालेले आधुनिक पुराण आहे. कथेचा स्रोत काही का असेना, या कथेमुळेच हे ठिकाण पर्यटकांमध्ये अतिशय लोकप्रिय आहे. नदीतल्या एका बेटावर लोरेलीचा पुतळाही उभारण्यात आला आहे. आसपासच्या शहरांतून खास लोरेली दर्शनाच्या सहली निघतात. थोडक्यात, या गावातल्या लोकांच्या अर्थार्जनाची लोरेली च्या निर्मात्यांनी चांगलीच सोय करून ठेवली आहे. असो.

लोरेली चा पुतळा आणि दंतकथा सांगणारी कविता -
फोटो आंतरजालावरून साभार  
तर अशा या लोरेलीचे दर्शन घेऊन मी पुढे निघालो. एव्हाना पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. जवळच एक बिअरगार्डन दिसले. तिथे थोडी पेटपूजा करून मी मार्गस्थ झालो. अचानक ‘इथून पुढे सायकल मार्ग बंद आहे, वळणमार्गाचा वापर करा’ अशी पाटी दिसली. पुढे रस्त्याचे काम सुरु असल्याने ही पर्यायी मार्गाची सोय केली होती. मी निर्देशित मार्गाने सायकल चालवू लागलो. थोड्या वेळातच ती वाट डोंगरावर चढू लागली. आत्तापर्यंतची वाट सपाट असल्यामुळे ही चढण जरा अनपेक्षितच होती. भरल्या पोटी चढाई करावी लागल्याने मी जरा वैतागलोच होतो. आता किती अंतर चढाई करावी लागणार या विचारात मी सायकल रेटू लागलो. खडी चढण आणि कच्चा रस्ता यांमुळे जास्तच दमछाक होत होती. अखेरीस चढण संपली. जरा विश्रांती घ्यायला म्हणून मी थांबलो. पाहतो तर काय,  मी डोंगरामाथ्यावरच्या द्राक्षमळ्यात येऊन पोहोचलो होतो. तिथून वळणे घेत जाणारी ऱ्हाईन नदी विलक्षण सुंदर दिसत होती. दूरवरचे डोंगरमाथ्यावरचे किल्ले आता एका नजरेच्या टप्प्यात आले होते. सूर्य पश्चिमेकडे कलल्याने त्याच्या तिरप्या किरणांत ते दृश्य अजूनच उठून दिसत होते. मंद वाहणारा वारा आणि नीरव शांतता यांमुळे एक वेगळीच अनुभूती होत होती. एका वळणमार्गाने मला या सुंदर जागी आणून ठेवलं होतं. प्रवासात मिळणारे असे अनपेक्षित सुखद क्षण कायमचे स्मरणात राहतात. तिथलं दृश्य मनात साठवून आणि कॅमेरात बंदिस्त करून मी पुढे निघालो.


वळणमार्गावरून दिसलेले विहंगम दृश्य 
अखेरीस रुदल्सहाईम (Rüdelsheim) या बिंगेनच्या समोरच्या काठावरील शहरात पोहोचलो. इथून बोटीने नदी पार करून बिंगेनला पोहोचलो. एव्हाना संध्याकाळचे आठ वाजले होते. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. सूर्यास्तापूर्वी ही सायकल भ्रमंती पूर्ण करण्यात मी यशस्वी झालो होतो. नशिबाने येताना इंटरसिटी ट्रेन मध्ये तुरळकच गर्दी होती. त्यामुळे सायकल घेऊन थेट मानहाईम पर्यंत तासाभरात पोहोचलो. तिथून घरी जाण्याचा मार्ग तर नेहमीचाच होता. एकूण ६५ किमी सायकलिंग झाले होते. आता पाय बोलत होते. मात्र एक अविस्मरणीय अनुभव गाठीशी बांधल्याचे समाधान मनात होते.                                     

No comments:

Post a Comment