अंधारबन Andharban trek

पावसाळ्याच्या दिवसांतली सह्याद्रीतली भटकंती म्हणजे निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणीच. एरवी रुक्ष वाटणारा इथला निसर्ग पर्जन्यऋतूचे आगमन होताच नव्या चैत्यनाने सळसळू लागतो. काळे-कभिन्न डोंगरकडे हळूच हिरवी शाल परिधान करतात. फेसाळणारे धबधबे आणि ताम्बुसराड ओहोळ वाट मिळेल तसे धावू लागतात. उंच डोंगरमाथे आणि कृष्णमेघ म्हणजे वर्षभराने भेटणारे बालसवंगडीच. त्यांची एकदा का गळाभेट झाली की चार महिन्यांसाठी रमीचा डाव रंगलाच म्हणून समजा. श्रावणात पावसाचा जोर ओसरला की घाटातली पठारे विविधरंगी रानफुलांनी बहरून जातात. गेली काही वर्षे परदेशात वास्तव्यास असल्याने या रम्य सोहळ्यास मी मुकलो होतो. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्याची फारच आतुरतेने वाट पाहत होतो. यथावकाश पाऊस अवतरला. आसपासच्या भूदृश्यावर हिरवी मखमल चढू लागली. पाऊस स्थिरावल्याचे पाहून मी सह्याद्रीतल्या भटकंतीचे आयोजन करू लागलो. एव्हाना सह्याद्रीतले बरेचसे गड-किल्ले पायाखालून गेले होते. नव्या ठिकाणांचा शोध सुरु होता. तेवढ्यात वाचनात आलं एक अपरिचित नाव – अंधारबन! फेसबुकवरील नोंदी पाहता हे ठिकाण बरेच लोकप्रिय होत चालल्याचे जाणवत होते. जुलै महिन्यातला एक सप्ताहांत निवडला आणि Trek Mates India या ग्रुपवर अंधारबन च्या ट्रेकची नोंदणी करून टाकली.

अंधारबन पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यात येतं. नावाप्रमाणेच हा ट्रेक घनदाट रानातून जातो. सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणजे भारतातल्या अति-जास्त पर्जन्यवृष्टी होणाऱ्या ठिकाणांपैकी एक. त्यामुळे या परिसरात घनदाट वृक्षराजी आढळते. ही सदाहरित वने त्यांतील वैविध्यपूर्ण जीवसंपदेसाठी प्रसिद्ध आहेत. अंधारबन चे अरण्य हे त्यातलेच एक संपन्न आणि अस्पर्शित अरण्य. पुण्याहून मुळशी जलाशयामार्गे कोकणात उतरणारा घाटरस्ता म्हणजे ताम्हिणी घाट. याच रस्त्यावरून ताम्हिणी गाव सोडलं की उजवीकडे थेट लोणावळ्याकडे जाणारा फाटा फुटतो. याच रस्त्यावर लागतं पिंप्री गाव. अंधारबनचा ट्रेक याच गावापासून सुरु होतो. मुंबईहून जाताना पाली मार्गे ताम्हिणी घाट गाठता येतो. आम्ही मुंबईहून मध्यरात्रीच्या सुमारास बसने निघालो. मजल-दरमजल करत पहाटे साडेपाचच्या सुमारास पिंप्री गावात पोहोचलो. गावात चहा-नाश्त्याची सोय केलेली होती. गावातलेच दोघे तरुण मार्गदर्शक म्हणून आमच्यासोबत येणार होते. ग्रुप मधल्या लोकांची ओळख परेड झाली, महत्त्वाच्या सूचना दिल्या गेल्या आणि आम्ही ट्रेक साठी सज्ज झालो.

अंधारबनाकडे जाणारी वाट 
गावाजवळच्या एका बंधाऱ्याजवळ ट्रेकचा आरंभ बिंदू आहे. आम्ही तिथे पोहोचलो तेव्हा नुकताच सूर्योदय झाला होता. दाट धुक्याचा एक पुंजका समोरच्या डोंगराला वेढा देऊन बसला होता. उगवत्या सूर्याचे कोवळे किरण उगाच ढगांमधून वाट काढायचा प्रयत्न करत होते. आसपासच्या हिरवळीला तर काही सीमाच नव्हती. गेले काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्यामुळे बंधाऱ्यामागचे पाणी संथपणे पलीकडच्या खडकांवर उतरत होते. वातावरणात एक विलक्षण प्रसन्नता जाणवत होती. आम्ही हर हर महादेव ची आरोळी ठोकली आणि ट्रेकला सुरुवात केली. या ट्रेकचे वैशिष्ट्य म्हणजे यात कुठेच चढाई करावी लागत नाही. ट्रेकचा जवळपास निम्म्याहून अधिक मार्ग सपाट पठारावरून जातो. तर उरलेला मार्ग टप्प्या-टप्प्याने थेट कोकणात उतरतो. मात्र चालायचे एकूण अंतर तब्बल १४ किमी भरते.

बंधाऱ्यावरून थोडं पुढे जाताच डाव्या हाताला खोल दरी दिसू लागली. दरीत दूरवर एक जलाशय दिसत होता. हेच ते कुंडलिका नदीचे खोरे. अंधारबनातल्या असंख्य ओहोळांची बनते कुंडलिका नदी. या नदीवर भिरा गावाजवळ एक छोटेसे धरण बांधले आहे. त्याचाच जलाशय घाटमाथ्यावरून दिसत होता. डोंगरकड्यांवरून सर्व बाजूंनी धबधबे दरीत उतरत होते. आसपासची हिरवीगार वनश्री दरीतल्या बेभान वाऱ्यावर सळसळत होती. त्या दृश्याचा आस्वाद घेत आम्ही काही वेळ स्थिरावलो. दोन-चार फोटो काढून होतायत तेवढ्यात धुक्याचे लोट दरीत उतरू लागले. बघता बघता सारी दरी धुक्याने भरून गेली. दरीतला जलाशय तर दूरच राहिला, काही मीटर अंतरावरचा माणूस दिसणेही अवघड होऊ लागले. धुकं अजून दाट झालं तर पुढची वाट सापडणं मुश्कील होईल म्हणून आम्ही चालण्याचा वेग वाढवला. दरीच्या काठाने जाणारी वाट आता रानात शिरली. दाट झाडीतून वाट काढत आम्ही पुढे सरकू लागलो. तेवढ्यात एक खळाळता ओढा मार्गात आला. त्याच्या वरच्या अंगाला एक लहानसा धबधबा तयार झाला होता. गर्द हिरव्या झाडीत वाहणारा तो धबधबा पाहून भिजण्याचा मोह कुणाला आवरेल? आपसूकच सगळ्यांची पावलं तिथे वळली. भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटून आम्ही पुढे निघालो.
कुंडलिका नदीचे खोरे आणि भिरा जलाशय 
घनदाट अरण्यातून जाणारी पायवाट 
यापुढची वाट घनदाट अरण्यातून जात होती. वाटेत पाण्याचे लहानसहान ओहोळ आडवे येत होते. लाल मातीच्या लिबलिबीत चिखलातून पचक-पचक आवाज करत आम्ही पुढे चाललो होतो. आधीच ढगांनी अडवलेला सूर्यप्रकाश या अरण्यातल्या दाट पर्णसंभारापुढे हार मानून अंग चोरून बसला होता. गडद धुकं रानात ठिय्या देऊन बसलं होतं. एकंदरीतच सारे वातावरण एखाद्या भयपटात शोभेल असे वाटत होते. या अरण्याला अंधारबन का म्हणत असावेत याची पुरेपूर प्रचीती येथे येत होती. रानात डासांनी उच्छाद मांडला होता. दोन क्षण जरी एका जागी उभं राहिलं तरी डासोपंतांची झुंड अंगावर हल्ला-बोल करत होती. डासांच्या चावण्यापेक्षा त्यांची चेहऱ्याभोवतीची गुणगुणच अधिक त्रासदायक वाटत होती. तेवढ्यात चिखलात काहीतरी वळवळताना दिसलं. पाहिलं तर साप! Checkered keelback जातीच्या बिनविषारी सापाचा हा लहानगा (juvenile) होता. मराठीत त्याला दिवड म्हणतात. संपूर्ण आशिया खंडात गोड्या पाण्याच्या स्रोतांजवळ ही सर्पजात आढळते. त्या छोट्या दिवडीपासून योग्य अंतर ठेवून आम्ही पुढे निघालो. जवळपास तासभर जंगल तुडवल्यानंतर आम्ही एका मोकळ्या जागेवर पोहोचलो. तिथेच खडकावर बसकण मारली आणि जेवणाचे डबे उघडले. भूक तर लागलीच होती. जेवणानंतर थोडा वेळ गप्पागोष्टी आणि फोटोसेशन करण्यात घालवला आणि पुढे निघालो.

कारवीच्या कळ्या 
पुढची वाट मोकळ्या पठारावरून जात होती. आता धुकं काहीसं निवळलं होतं. आजूबाजूला दिसणारी भाताची खाचरं एखादं गाव जवळ आल्याचे संकेत देत होती. तासाभराच्या पायपिटीनंतर आम्ही हिरडी गावात पोहोचलो. गाव कसलं, वीसेक घरांचा एक पाडाच होता तो. गावात फक्त म्हातारी माणसं दिसत होती. तरुण लोक आसपासच्या मोठ्या गावांत नोकरी-धंद्याच्या निमित्ताने स्थायिक झाले होते. आडवाटेवरच्या या एवढ्याशा पाड्यावर राहून करतील तरी काय? गावात पाचेक मिनिटं विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. इथून पुढची वाट उताराची होती. मोकळ्या पठारावरून आम्ही पुन्हा एकदा घनदाट अरण्यात दाखल झालो होतो. तसा उतार फार तीव्र नव्हता. मार्गात कारवीची जाळी लागली. कारवी ही पश्चिम घाटात आढळणारी एक प्रदेशनिष्ठ वनस्पती. जेमतेम १०-१२ फुट उंच आणि सरळसोट वाढणाऱ्या या वनस्पतीचे वैशिष्ट्य म्हणजे तिला आठ वर्षांतून एकदा येणारा बहर. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाची ही फुले एकदा फुलायला लागली की सगळी दऱ्या-खोरे रंगलेली दिसू लागतात. यंदाच्या वर्षी (२०१६) त्यांचा बहर अपेक्षित आहे. अंधारबनातल्या कारवीच्या झुडपांना इवल्याशा कळ्या लागलेल्या दिसत होत्या. महिन्याभरात त्या उमलतील तेव्हा इथले दृश्य पाहण्यासारखे असेल.

आता मार्गात मोठाले खडक दिसत होते. खडकांवरचे मखमली शैवाल आमच्या तोल सावरण्याच्या कौशल्याला खुले आव्हान देत होते. थोड्याच वेळात एक भलामोठा ओढा दृष्टीस पडला. घनदाट झाडीतून ओढ्याचे पाणी खळाळत होते. पाण्यात भिजण्याची ही शेवटची संधी म्हणून आम्ही सगळ्यांनी ओढ्याच्या पात्रात बसकण मारली. ते थंडगार पाणी अंगावरून जाताना सगळा शीण दूर करत होतं. ग्रुप मधल्या अनोळखी चेहऱ्यांशी एव्हाना चांगलीच मैत्री झाली होती. त्या नव्या-जुन्या सवंगड्यांसोबत यथेच्छ मस्ती करून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. ट्रेकचा हा शेवटचा टप्पा होता. तेवढ्यात अंधारून आलं आणि पावसाला सुरुवात झाली. संपूर्ण ट्रेक मध्ये हुलकावणी देणारा पाऊस या अखेरच्या टप्प्यात आमची साथ द्यायला आला होता. एका लयीत बरसणाऱ्या आषाढसरींना अंगावर झेलत आम्ही रानातली निसरडी पायवाट चालू लागलो. मध्येच तीव्र उतार, कधी मोकळे पठार, तर कधी भातशेती असे वळणा-वळणावर भूदृष्य पालटत होते. आकाशात दाटलेले कृष्णमेघ आणि मागे उभा ठाकलेला सह्यकडा मोठ्या कौतुकाने आम्हा पामरांची ट्रेक संपविण्याची लगबग बघत होते. प्रत्येक ट्रेक मध्ये एक असा क्षण येतो की त्यात आपण भोवतालच्या निसर्गाशी एकरूप होऊन जातो. अंगात कितीही थकवा असला, निसर्गाने कितीही रौद्र रूप धारण केलेले असले, तरी ती रानावनातली रग्गड वाट संपूच नये असे वाटत राहते. आपल्या मनात उपजतच असलेली निसर्गाबद्दलची अनिवार ओढ कदाचित उफाळून वर येत असावी. ट्रेकिंग सारख्या तंगडतोड साहसी प्रकाराकडे खेचून नेणारी हीच ओढ असेल काय?

मार्गात आलेला ओढा 
संपू नये वाटणारी ती वाट अखेरीस नागशेत गावाजवळ येऊन संपली. पावसानेही एव्हाना आपली खेळी आटोपती घेतली होती. आमची बस गावाजवळ तयारच होती. गावातल्याच एका घरात कपडे बदलून आम्ही बसमध्ये स्थानापन्न झालो. अंधारबनाला अलविदा करून बस निघाली. गार वाऱ्याच्या झुळुकीसोबत निद्रादेवी कधी अंगात शिरली ते कळलंच नाही. झोप कसली, बेशुद्धीच म्हणा ना! दोन तासांनी चहापानासाठी बस थांबली तेव्हा कुठे आम्ही भानावर आलो. रस्त्यातल्या एका उपहारगृहात पेटपूजा करून आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना झालो. शरीर जरी थकले असले तरी मन मात्र एका अगम्य तृप्तीने भरलेले होते.  
  
ट्रेक मध्ये जमलेला मस्त ग्रुप 
                          

10 places in and around Heidelberg to spend a Sunday afternoon

Heidelberg is a town located on the bank of the river Neckar in the state of Baden-Württemberg in South-West Germany. It is famous for its romantic cityscape and a beautiful baroque-style old town. Located at just one-hour driving distance from Frankfurt international airport, Heidelberg is very popular among international tourists. The town is also well-known for its university, which is ranked among top 10 universities in Germany. The university attracts a lot of international students from all over the world. I was fortunate to get accepted for a graduate program in Heidelberg university. During my residency of a few years in Heidelberg, I had a chance to explore some places off the beaten track. This blog post is about some known and some not-so-known places in and around Heidelberg. Don’t expect a palace with exciting historical tales and unexplored architectural splendors. These are small gateways where a Sunday afternoon. A short bike-ride to one of these places followed by a warm coffee or a glass of beer will certainly make your weekend more happening.

The beautiful cityscape of Heidelberg
1. Schloβgarten – The castle of Heidelberg is very well known. However, the core area of the castle requires you to buy a ticket. Although the core area offers excellent view of the old town and the river, the adjoining garden offers even better perspective without buying any ticket. To go to Schloβgarten, take a left turn from Kornmarkt and walk up the hill. This route goes around the main building of the castle and takes you directly to the garden. The garden is very spacious and well-maintained. The garden has a promenade facing the old town and the river. From here, you can see the ruins of the castle, the beautiful churches and streets of the old town, and the river Neckar flowing by the town. The route towards the garden, unlike the stairs, is a pleasant walk. In summer, the city administration of Heidelberg organizes a firework show (Schloβbeleuchtung). The garden promenade is the best place to watch the firework show. Make sure that you go there early enough to grab a place, from where the view is not obstructed by trees.


The garden and the castle (source: Internet)

The firework show as seen from the garden
2. Kӧningsüthl – It is a 568 m high hill located on the southern bank of Neckar, overlooking the city of Heidelberg. The summit of Kӧningsüthl is connected to the old town and the castle via a historic funicular railway called Heidelberger Bergbahn. However, the best way to reach the summit is by hiking up. The hiking trail begins from behind the castle and passes through the forest almost parallel to the tracks of the funicular railway. It is fun to watch the funicular railway riding up the hill while you walk through the forest. If you are not in the mood to hike, you can take bus number 39 from Bismarckplatz. From the summit of Kӧningsüthl, you can enjoy the fascinating view of Heidelberg and the surrounding area. At the summit, there is a small café where you can enjoy a warm coffee and some snacks. Besides the café, there is a small bird park. A falcon show is organized in this park every Sunday during the summer months. The forest behind the café is an ideal place for a picnic. 

The funicular railway
The backside of the cafe
3. Neckar cruise – Several companies offer a short boat ride in the river Neckar. The cruise departs from a tiny harbor in front of the city hall (stadthӓlle). The most popular route is from Heidelberg to Neckargemünd. As you travel upstream, the hills of Odenwald come closer to the river bank. At some locations the river makes a mighty turn in the valley, which makes the landscape photogenic. Tiny villages like Schlierbach and Ziegelhausen enhance the beauty of the landscape. The river bed is not exactly at the same level throughout the region. It is fascinating to see how the boat travels from the lower region to the higher region with the help of a special arrangement. You can enjoy a coffee, snacks, or even a beer while on this ride.

Neckar river cruise (source: Internet)
4. Thingstӓtte – It is a magnificent open-air theater, which is situated on the top of Heiligenberg, a hill on the opposite side of the old town. It was built in the first era of the Nazi regime, in the year 1935. After the second world war it was used for offering Easter service. The plans of using it for real theatrical performances have not been successful because of lack of electricity. Since 1980, the place is being used for the celebration of Walpurgis nacht. On the evening of 30th April, around 10000 students gather at Thingstӓtte and enjoy the performances of fire dancers and jugglers. This event is gaining popularity over the time. Apart from this event, the place is worth visiting on a sunny Sunday afternoon. Behind the theatre, there are some ruins from the Roman time. You can hike to Thingstӓtte from Philosophenweg or from Mühltalstraβe in Handschusheim.

Thingstatte
Heidelberg old town- as seen from Heiligenberg
5. Schwetzingen – It is a small town located 15 km southwest of Heidelberg. The town is famous for its magnificent baroque-style palace and the beautiful garden around the palace. The palace was built by the regional ruler in the mid-18th century on the basis of the palace of Versailles in France. The garden around the palace was developed by following a typical ‘English garden’ style. A section of the garden harbors a small forest of Japanese cherry trees, which bloom at the onset of Spring. It is mesmerizing to stroll among the Cherry trees when they are in full bloom. You can take a direct bus to Schwetzingen from Heidelberg train station. Alternatively, you can take a tram 22 until its final destination. From there, a connecting bus will drop you right at the entrance of the palace.

The Schwetzingen palace
The garden in Autumn
Cherry trees in full bloom
6. Speyer – This beautiful town is located 32 km southwest of Heidelberg. It is situated on the western bank of the river Rhine. You can reach Speyer by regional train via Mannheim in 40 minutes. The history of this town dates back to the Roman era. The most famous monument in the town is the cathedral. Built in the year 1030, the cathedral is today a UNESCO world heritage site. The medieval clock tower and the technical museum are some other sites worth visiting. The pedestrian area around the cathedral is a nice place to walk around and grab a coffee. If you walk a little further, you will reach the Rhine beach. Your excursion to Speyer is not complete without a walk on this beach.

Speyer cathedral and the city center (source: Internet)
7. Weinheim – This medieval town is located 15 km north of Heidelberg. You can reach Weinheim by S-bahn or tram number 5 from Bismarckplatz. The best way to go there is to ride a bike. Weinheim is known as ‘Zwei-burgen-stadt’ (two-castles-city), named after the two fortresses Windeck and Wachenburg, overlooking the city. The city-center is located in a valley, and is dotted by cozy cafés and restaurants. Slightly up on the hill, sits a small garden called Exotenwald. From here, you can hike further up into the forest and enjoy the beautiful landscape of Odenwald.
  
Weinheim city center (source: Internet)
8. Ladenburg – It is a tiny town located 10 km northwest of Heidelberg. You can reach there by S-bahn or by riding your own bike. The town has some ancient ruins from the Roman times. The most interesting place in the town is the huge garden on the bank of Neckar. This place is ideal for a Sunday afternoon stroll or a grill party. In the middle of the garden, there is a small gallery, from where you can enjoy the beautiful landscape. There is a ferry that takes you to the other side of the river.

Neckar in Ladenburg
The garden on the bank of Neckar in Ladenburg
9. Dossenheim Steinbrüche (stone quarries) – Dossenheim is a tiny suburb of Heidelberg, located 5 km north of the city center. Because of cheaper accommodation and good connectivity to the city center, it is popular among students as a place to live. Located at a 15-20 min walking distance from the tram station of Dossenheim are the stone quarries. These quarries, once operated by Leferenz were used for extracting stones until mid-1960’s. Today, the quarry is a small garden and an open museum. Some remains of the old mining equipment can be seen in this quarry. A small trail leads you to the upper section. Along the trail, written on the boards, you can find some information about the quarry, its history, mining equipment, and the geology of the place. At the end of the trail, there’s a small garden that overlooks the Neckar valley. This is absolutely a must-visit place on a summer evening to watch the sunset. 

Stone quarries at Dossenheim (source: Internet)

Weisser Stein tower

10. Weiβer Stein – Up in the hills, east of Dossenheim, is a place on the hill top called Weiβer Stein. Located at 548 m, it is one of the highest places in Odenwald. It takes approximately 30 minutes by car from Heidelberg. Unfortunately, there’s no public transport available to reach there. You can walk up through the forest from Dossenheim Steinburche, which is perhaps the best way to reach this place. On Weiβer Stein, there is a 20 m tall lookout tower, which was built by Odenwald Club in 1906. From the top of this tower you can enjoy the beautiful landscape of Odenwald. There is also a beer garden nearby.


The road that leads to Weisser Stein
Hope you enjoyed reading this post. Do visit these places and share your experience.      

नितांतसुंदर क्रोएशिया भाग ४ - चित्तवेधक डुब्रोवनिक

क्रोएशियाच्या दक्षिण टोकावरचे डुब्रोवनिक (Dubrovnik) हे एक महत्त्वाचे शहर. साधारण ४२००० लोकवस्ती असलेले हे शहर तेथील मध्ययुगीन स्थापत्यकलेसाठी प्रसिद्ध आहे. झदारमधील थरारक गुहावलोकन आटोपून दुपारी दीड वाजता मी डुब्रोवनिक कडे जाणारी बस पकडली. प्रवासाला एकूण १० तास लागणार होते. मी छानपैकी खिडकीची जागा पकडून विसावलो. झदार शहर मागे पडले आणि समुद्र आणि पर्वतरांगा यांच्या मध्यातून जाणारा प्रशस्त महामार्ग सुरु झाला. एव्हाना सकाळपासून ठिय्या देऊन राहिलेले पावसाळी ढग पसार झाले होते. दुपारची प्रखर सूर्यकिरणे युद्ध जिंकल्याच्या आविर्भावात मागे राहिलेल्या ढगांना हाकलू पहात होती. उजव्या बाजूने निळाशार एड्रियाटिक समुद्र दुपारच्या उन्हात चकाकत होता. तर डावीकडे निश्चल पर्वतरांगा त्यांच्या पायथ्याशी चाललेली वाहनांची लगबग न्याहाळत होत्या. मधेच दिसणाऱ्या लहानशा सपाट भूभागावर कौलारू छपरांची घरे दाटीवाटीने वसली होती. डोंगरांवर पाईन व ओक वृक्षांची गर्द वनराई दिसत होती. ते गोंडस दृश्य पाहता पाहता काही तास कसे गेले कळलेच नाही.

समुद्रकिनाऱ्यावर वसलेले डुब्रोवनिक शहर 
डुब्रोवनिक शहर क्रोएशियाच्या मुख्य भूमीपासून भू-राजकीय दृष्ट्या वेगळे आहे. हा मधला दहा किलोमीटर एवढा भूभाग बोस्निया-हर्जेगोविना या देशात येतो. हा देश शेंघेन समुदायाचा भाग नसल्याने येथे पासपोर्ट-व्हिसाची तपासणी होणार होती. त्यासाठी आम्ही बसमधले सर्व प्रवासी खाली उतरलो. तपासणी नंतर मी जवळच्याच कॅफेमध्ये शिरलो. कॅफेमधले लोक काहीशा वेगळ्याच नजरेने माझ्याकडे पाहत होते. जणू काही माझ्या डोक्यावर शिंगं आली असावीत किंवा मी काही विचित्र वेश परिधान केला असावा. मला हा प्रकार काही कळेनाच. मग लक्षात आलं, त्या बसमध्ये मी एकटाच भारतीय, किंबहुना युरोपियनेतर वंशाचा होतो. या देशातल्या लोकांनी गोरा नसलेला माणूस कधी फारसा पहिला नसावा. म्हणूनच सगळे टक लावून पाहत होते माझ्याकडे. आपल्या देशात गोऱ्या पर्यटकांकडे लोक जेव्हा टक लावून पाहतात तेव्हा त्यांना कसं वाटत असेल याचा अनुभव मला तेव्हा आला. मी नुसते स्मितहास्य केले आणि खाण्यासाठी काही शाकाहारी पदार्थ आहे का असे विचारू लागलो. पण इथे इंग्रजीचे अवाक्षरही कोणाला काळात नव्हते. त्यात माझे भारतीय अवरोहाचे इंग्रजी म्हणजे तर काही समजण्याची शक्यताच नाही. शेवटी हातवारे करून मी एक केक विकत घेतला आणि बसमध्ये जाऊन बसलो. आत्तापर्यत युरोपात असा अनुभव कधीच आला नव्हता. शामवर्णीयांच्या देशात गोरा माणूस exotic असेल तर गोऱ्या लोकांच्या देशात शामवर्णीय exotic असणारच! असो.

अखेरीस रात्री अकरा वाजता डुब्रोवनिकला पोहोचलो. शहराच्या जुन्या मध्यवर्ती भागात एक bed and breakfast सुविधा असलेली खोली आरक्षित केली होती. तिथला घरमालक अगदीच आगत्यशील होता. मोठ्या उत्साहाने त्याने त्याच्या बायकोची आणि मुलीची, आणि शिवाय मांजराची ओळख करून दिली. शहराचे नकाशे व माहितीपुस्तिका तर दिलीच, शिवाय स्वस्त आणि मस्त अशा उपहारगृहांची एक यादीसुद्धा दिली. आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीतून तो त्याच्या घरातल्या सुविधांविषयी भरभरून सांगत होता. एरवी जेवढ्यास तेवढं बोलणाऱ्या पश्चिम युरोपियन लोकांच्या तुलनेत इथले आदरातिथ्य फारच सुखावह होते. एव्हाना फारच उशीर झाला होता. यजमानाला शुभरात्री म्हणून मी निद्राधीन झालो.

मध्यवर्ती मार्गिका आणि घड्याळी मनोरा 
दुसरा दिवस उजाडला तो काळे ढग घेऊनच. मी आन्हिकं आवरेपर्यंत पावसाला सुरुवातही झाली. तसा युरोपातला पाऊस म्हणजे नुसतीच रिमझिम. पण इथला पाऊस अगदी मुंबईतल्या मान्सूनच्या पावसाची आठवण करून देत होता. आपण पश्चिम युरोपपासून बरेच लांब आलो आहोत याची जाणीव पदोपदी होत होती. पावसाचा जोर ओसरेपर्यंत मी खोलीवरच थांबायचं ठरवलं. बसल्या बसल्या उद्योग म्हणून यजमानाने दिलेली माहितीपुस्तिका चाळू लागलो. डुब्रोवनिक शहराला फारच रंजक इतिहास लाभला आहे. या शहराची मुहूर्तमेढ इसवी सनाच्या सातव्या शतकात रोवली गेली. त्या वेळी क्रोएशियाचा भूभाग रोमन समाज्र्याचा भाग होता. त्यातील एका शहरावर रानटी टोळ्यांचा हल्ला झाला आणि हजारो नागरिकांना परागंदा व्हावे लागले. त्या निर्वासितांनी मुख्य भूमीपासून जवळच असलेल्या एका लाउस नामक खडकाळ बेटावर आश्रय घेतला. पुढे त्याच्या शेजारील बेटावर स्लाव वंशीय लोकांनी वस्ती केली. तत्कालीन क्रोट भाषेत डूब्रावा चा अर्थ होता ओक वृक्षांची वनराई. त्या बेटाच्या आसपास दाटीने वाढलेल्या ओक वृक्षांमुळे शहराला नाव पडले डुब्रोवनिक. कालांतराने या दोन बेटांच्या मधली पाणथळ जागा बुजवण्यात आली व त्यावर शहरातली मध्यवर्ती मार्गिका उभारण्यात आली. हीच ती सुप्रसिद्ध स्त्रादन मार्गिका (Stradon street). क्रोएशियन साहित्यातील अनेक कलाकृतींमध्ये या घटनेचा उल्लेख आहे. मध्ययुगीन व्यापार मार्गांच्या मधोमध असलेले भौगोलिक स्थान, ओक वृक्षांच्या उत्तम लाकडाची उपलब्धता व त्यामुळे भरभराटीस आलेला जहाजबांधणी उद्योग, आणि येथील राज्यकर्त्यांची मुत्सद्देगिरी यांमुळे १३ व्या शतकात डुब्रोवनिकचे रगुसा प्रजासत्ताक (Republic of Ragusa) एक समृद्ध व्यापारी केंद्र बनले. या शहरात क्रोएशियन कला आणि साहित्य यांचाही विकास झाला. पुढे अनेक सत्तांतरे झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर युगोस्लाव्हिया देश प्रस्थापित झाला व डुब्रोवनिक त्यातील एक महत्त्वाचे शहर बनले. मात्र १९९९ मध्ये युगोस्लाव्हियाचे विघटन होऊन क्रोएशिया हा स्वतंत्र देश अस्तित्त्वात आला. सद्यस्थितीत डुब्रोवनिक हे क्रोएशियाचे अत्यंत महत्त्वाचे राजकीय, आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे.

रेक्टरचा महाल (Rector's palace)
दुपारनंतर पावसाचा जोर ओसरला. तरीही रिमझिम सुरूच होती. भले-थोरले काळे ढग आकाशात जणू दबा धरून बसले होते. थोडक्यात, बाहेर फिरण्यासाठी आजची ग्रहस्थिती काही अनुकूल नव्हती. त्यामुळे आजचा दिवस मी वस्तुसंग्रहालय पाहण्यासाठी ठरवला. डुब्रोवनिक मधील रेक्टरचा महाल (Rector’s palace) बराच प्रसिद्ध आहे. डुब्रोवनिकच्या प्रजासत्ताकाचा प्रशासक येथून आपला कारभार चालवत असे. मुळात गॉथिक (Gothic) शैलीमध्ये बांधलेल्या या महालाच्या रचनेत काही बारोक (Baroque) व प्रबोधनकालीन (Renaissance) शैलींचे बेमालूम मिश्रण केलेले आहे. या महालाचे सध्या सांस्कृतिक वस्तुसंग्रहालय बनवले गेले आहे. नशिबाने तिकिटासाठी फारशी रांग नव्हती. आतमधले मध्ययुगीन बांधकाम फारच सुंदर प्रकारे जतन केलेले होते. आतील दालनांमध्ये डुब्रोवनिकचा इतिहास अतिशय कल्पकतेने मांडला होता. तिथून बाहेर पडलो आणि पावसाची पर्वा न करता सरळ मुख्य चौकाकडे वळलो. इथला घड्याळी मनोरा (Clock tower) डुब्रोवनिकचे एक प्रमुख आकर्षण आहे. मुख्य चौकाच्या पश्चिम टोकावर दिमाखात उभा असलेला हा मनोरा १५५६ मध्ये बांधला गेला. त्याच्यावरच्या घंटेशेजारी मारो आणि बारो नावाचे दोन घंटावादकांचे कांस्यपुतळे उभारण्यात आले. कालांतराने समुद्रावरच्या खाऱ्या वाऱ्यामुळे हे पुतळे हिरवे पडले आणि त्यांना झेलेंची (Zelenci – green twins) असे संबोधण्यात येऊ लागले. काळाच्या ओघात या मनोऱ्याची बरीच पडझड झाली. मात्र आज त्याचा पूर्ण जीर्णोद्धार करण्यात आला आहे. त्याच्यावरचे कांस्यपुतळे वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवले आहेत.
ऐतिहासिक तटबंदी

दुपारनंतर पाऊस कमी झाल्याचे दिसताच मी डुब्रोवनिकची सुप्रसिद्ध तटबंदी (city wall) बघायला निघालो. ही तटबंदी इसवी सनाच्या नवव्या शतकात बांधली गेली. उत्तरोत्तर त्यात सुधारणा करत ती अधिक भक्कम बनवण्यात आली. तिचे आजचे स्वरूप हे सोळाव्या शतकात तुर्की आक्रमकांपासून संरक्षणासाठी केल्या गेलेल्या योजनेचा भाग आहे. २ किमी परीघ आणि २५ मीटर पर्यंत उंच असलेल्या या तटबंदीवरून फिरणे हे डुब्रोवनिक मधले सर्वात लोकप्रिय आकर्षण आहे. मी कॅमेरा सरसावून तटबंदीवर चढलो. नुकताच पाऊस पडून गेल्याने वातावरणात एक सुखद गारवा होता. इतक्या उंचीवरून शहरातली घरे, रस्ते, चर्च, घड्याळी मनोरा वगैरे सारे फारच मोहक दिसत होते. मी निर्देशित मार्गावरून पुढे जायला लागलो. काही अंतरावरच एक बुरुजवजा सज्जा दिसला. तिथून संपूर्ण शहराचे, समुद्राचे आणि लोवरीयेनाक किल्ल्याचे  (Lovrijenac fortress) अवर्णनीय दृश्य दिसत होते. व्हेनिसच्या आक्रमकांना प्रत्युत्तर देण्यासाठी बांधलेल्या या किल्ल्याचे ऐतिहासिक महत्त्व वादातीत आहे. आज या किल्ल्याचा वापर नाट्यगृह म्हणून केला जातो. जगभरात प्रसिद्ध असलेल्या Game of Thrones या मालिकेचे चित्रीकरण या किल्ल्याच्या आसपास झाले आहे. शहराचे आणि समुद्राचे वेगवेगळ्या दृष्टिक्षेपातून फोटो काढत मी तटबंदीवरची प्रदक्षिणा पूर्ण केली.

टेकडीच्या माथ्यावरून दिसणारे
विहंगम दृश्य 
तिथून जवळच डुब्रोवनिकच्या सुप्रसिद्ध रोप-वे चे स्थानक होते. हा रोप-वे शहराला लागून असलेल्या एका टेकडीवर घेऊन जातो. उंचीवरच्या जागांचे मुळातच आकर्षण असल्याने मी मोठ्या उत्साहात रोप-वे ने वर गेलो. संध्याकाळची वेळ आणि पावसाची शक्यता यांमुळे वर जास्त गर्दी नव्हती. तिथे एक लहानसे उपहारगृह आणि बसण्यासाठी एक सज्जा बांधला होता. मी एक कॉफी घेतली आणि सज्जावर बसून समोरच्या नितांतसुंदर दृश्याचा आस्वाद घेऊ लागलो. शहराभोवतालची तटबंदी इथून एका बारीक रेघेसारखी दिसत होती. त्या खडकाळ किनाऱ्यावर पिवळसर दगडात बांधलेले टुमदार डुब्रोवनिक फारच सुंदर दिसत होते. किनाऱ्यालगतची इतर बेटे आणि लहानमोठी गावे डुब्रोवनिकचे राजस रूप मोठ्या कौतुकाने पाहत होती. टेकडीमागचे डोंगर घनदाट वनराईने नटले होते. आकाशात कृष्णमेघांची वर्दळ पुन्हा सुरु झाली होती. समुद्रावरचा वारा जणू काही त्या ढगांना पुन्हा कामाला लागायची आज्ञा देत होता. आता थोड्याच वेळात पाऊस कोसळणार याचा अंदाज बांधून मी रोप-वे ने खाली आलो.

एव्हाना अंधार पडत आला होता. माझ्या यजमानाने दिलेल्या यादीतून एक छानसे भोजनालय मी निवडले आणि रात्रीचे जेवण उरकून खोलीवर परतलो. दुसऱ्या दिवशी पहाटे परतीचे विमान होते. एक अनोखा अनुभव देणाऱ्या क्रोएशिया देशाला मनोमन अलविदा करून मी निद्रधीन झालो. 


तटबंदीवरून दिसणारे रम्य दृश्य - लोवरीयेनाक किल्ला आणि फेसाळता समुद्र  
अधिक फोटोंसाठी येथे क्लिक करा. 

नितांतसुंदर क्रोएशिया भाग ३ - मोड्रिक गुहेतील थरारक सफर

कोर्नाती बेटांची नयनरम्य सहल आणि झदारच्या किनाऱ्यावरून दिसलेला अविस्मरणीय सूर्यास्त याची सुरस कथा हॉस्टेल मधल्या सहवाशांना सांगत आणि तिथले फोटो दाखवत मी हॉस्टेलच्या स्वागत कक्षात सुस्तावलो होतो. पुढचा दिवस इस्टर संडे चा होता. त्यामुळे जीवनावश्यक सोई-सुविधा वगळता बाकी सारेच बंद राहणार होते. नशिबाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालू राहणार होती. त्यामुळे तो दिवस मी झदार ते डुब्रोवनिक या १० तासांच्या प्रवासासाठी राखून ठेवला होता. क्रोएशियामध्ये रेल्वे नाही. त्यामुळे देशांतर्गत प्रवास बसने किंवा वैयक्तिक वाहनाने चालतो. रस्तेही यथा-तथाच आहेत. झदार ते डुब्रोवनिक या जेमतेम ३५० किमी अंतरासाठी तिथली बस १० तास लावते. हे गणितही पश्चिम युरोपच्या तुलनेत जरा आश्चर्यकारक होते. असो. माझी बस दुपारी दीडची होती. त्यामुळे सकाळचा वेळ मोकळाच होता. या वेळेचा विनियोग कसा करता येईल याच विवंचनेत मी होतो. तेवढ्यात माझी नजर हॉस्टेलच्या फलकावरील एका पत्रकावर पडली. Explore Modric cave with Zara Adventures असे काहीसे शीर्षक होते. ही कंपनी जवळच्याच एका गुहेत घेऊन जाणार होती. सफरीची एकूण वेळ ३ तासांची होती. चौकशी करायला फोन लावला. अनपेक्षितपणे ही कंपनी इस्टर संडेला चालू होती. कंपनी कसली, मारयान नामक एक साहसी क्रीडाप्रकार-तज्ञ ही गुहा-सफर आयोजित करत होता. मी लगेचच सकाळी ८ ची वेळ ठरवली. हॉस्टेल मधला आणखी एक भारतीय मुलगा, धर्मेश, सोबत येण्यास तयार झाला.

रविवारचा दिवस उजाडला तोच पावसाळी हवेने. त्यात हॉस्टेल मधली वीज गायब! स्वागतकक्षात कोणीच उपलब्ध नव्हते. एकंदरीत परिस्थिती बघता गुहा-सफर आज होईल की नाही याची खात्री मला वाटेनाशी झाली. मात्र ठरल्या वेळेनुसार मारयान गाडी घेऊन हजार झाला. सगळी तयारी करून आम्ही निघालो. आत्तापर्यंत ट्रेकिंग बरेच झाले होते. त्यामुळे गिर्यारोहण आणि त्याच्याशी निगडीत क्रीडाप्रकार यांची बऱ्यापैकी तोंड-ओळख होती. मात्र caving शी कधी संबंध आला नव्हता. भारतात नैसर्गिक गुहा फारशा नाहीत. ईशान्येकडील मेघालय आणि मिझोराम राज्यांत काही गुहा आहेत. मात्र त्यांचाही सखोल अभ्यास अजून झालेला नाही. त्यामुळे caving हा प्रकार भारतात अजून तितकासा प्रचलित नाही. त्यास मराठीत आपण गुहावलोकन म्हणू. हा जरी साहसी क्रीडाप्रकार असला तरी यात गुहेतील परिसंस्थेचा शास्त्रशुद्ध अभ्यासही अंतर्भूत आहे. मी मोठ्या उत्साहाने माझ्या पहिल्या-वहिल्या गुहावलोकन-अनुभवाची वाट बघत होतो.

झदारमधल्या पॅक्लेन्शिया नॅशनल पार्कमध्ये (Paklencia National Park) मोड्रिक गावाजवळ ही गुहा (Modric cave) आहे. अर्ध्या तासातच आम्ही गावाजवळ पोहोचलो. मारयान हा एक प्रशिक्षित आणि अनुभवी गुहावलोकन तज्ञ होता. त्याने आम्हाला गुहेत जाण्यासाठीचे कपडे आणि उंच बूट दिले. शिवाय हेल्मेट, एक मजबूत दोरी वगैरे साधने दिली. हेल्मेटवर पुढच्या भागात एक छोटी ज्योत तेवत होती. हा होता आमचा हेड-लॅम्प! बाजारात स्वस्तात मिळणारे LED दिवे म्हणजे मारयानसाठी चेष्टेचा विषय होता. ज्योतीमुळे पडणारा पिवळसर प्रकाश गुहेत जो अनुभव देतो त्याची मजा LED दिव्याने येत नाही असं त्याचं मत होतं. ज्योत तेवत ठेवण्यासाठी लागणारं इंधन एका सिलिंडर मध्ये भरून आमच्या खांद्यावर अडकवलं होतं. एकंदरीतच हॉलीवूड सिनेमातल्या दुर्गम प्रदेशात खजिना शोधायला निघालेल्या नायकाप्रमाणे आमचा अवतार दिसत होता. मारयानने गुहेसंबंधी सर्व आवश्यक माहिती दिली. हेल्मेटवरची ज्योत आपला हात भाजू न देता चालू-बंद कशी करायची याचे प्रात्यक्षिकही आमच्याकडून करून घेतले. अखेरीस आमची वारी गुहेकडे निघाली.

मोड्रिक गुहेचे प्रवेशद्वार
रानातून थोडे अंतर जाताच एका माळरानावर आम्ही पोहचलो. तिथल्या एका उंचवट्याखाली एक गुहा दिसत होती. आत जायचा मार्ग लोखंडी जाळीने बंद केला होता. मारयानने त्याच्याजवळील चावीने ती जाळी उघडली आणि आम्ही आत शिरलो. आतमध्ये साधारण १० X १२ फूट आकाराची जागा होती. त्यातही नुसते खडक, चिखल आणि शेवाळे दिसत होते. ही एवढीच गुहा? आमच्या चेहऱ्यावरचे प्रश्नार्थक भाव पाहून मारयान हसू लागला आणि त्याने गुहेच्या एका कोपऱ्याकडे बोट दाखवले. जेमतेम दीडेक फूट लांबी-रुंदीचे एक भोक लोखंडी जाळीने बंद केलेले दिसले. ‘हा आहे गुहेत जाण्याचा रस्ता!’ मारयान हसत हसत म्हणाला. मला क्षणभर धडकीच भरली. उगीचच Sanctum चित्रपटातली नको ती दृश्ये आठवू लागली. धीर देत मारयान म्हणाला, ‘don’t worry, just follow my instructions’. ते भोक म्हणजे जेमतेम एक माणूस सरपटत जाऊ शकेल एवढा एक बोगदाच होता. मारयानच्या सूचनेप्रमाणे आम्ही रांगत रांगत त्या बोगद्यात शिरलो. दोनेक मिनिटांतच पलीकडच्या बाजूने बाहेर पडलो.
गुहेच्या आत घेऊन जाणारा बोगदा 
पहावं तर काय, एखाद्या सभागृहाएवढी प्रशस्त जागा इथे होती. आतमध्ये मिट्ट काळोख होता. केवळ आमच्या हेल्मेटवरील ज्योतींचा मिणमिणता प्रकाश त्या अंधाराला चिरत जात होता. तापमान १५ अंश सेल्सियसच्या आसपास असावं. एक कोंदट वास येत होता. गुहेच्या भिंती ओलसर आणि खडबडीत होत्या. सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे भिंतींवर विशिष्ट आकार तयार झाले होते. गुहेच्या छतावरून आणि जमिनीवरून असंख्य लवणस्तंभ तयार झालेले दिसत होते. एका वेगळ्याच दुनियेत आपण आलो आहोत असे वाटत होते. गुहेत झिरपणारे पाणी मातीतल्या अनेक क्षारांनी युक्त असते. असे क्षारयुक्त पाणी जेव्हा एकाच जागेवरून संथपणे ठिपकत राहते तेव्हा त्यातील कॅलशियमचे स्तंभ तयार होतात. छतावरून खालच्या दिशेने वाढणाऱ्या स्तंभांना stalacites तर जमिनीवर खालून वर वाढणाऱ्या स्तंभांना stalagmites असे संबोधले जाते. या स्तंभांच्या वाढीचा वेग सरासरी वर्षाला ०.१३ मिमी एवढा असतो. पाण्याचा प्रवाह-वेग, त्यातले क्षार, गुहेचे तापमान असे अनेक घटक त्यास कारणीभूत असतात. आत्तापर्यंत केवळ भूगोलाच्या पुस्तकात वाचलेल्या या गोष्टी मी पहिल्यांदाच प्रत्यक्षात बघत होतो. सूर्यप्रकाशाचा अभाव, कमी प्रमाणात असलेला प्राणवायू आणि थंड तापमान अशा परिस्थितीतही गुहांमध्ये काही सजीव सापडतात. सूर्यप्रकाशावर अवलंबून नसणारे काही जीवाणू, बुरशीच्या काही जाती, कीटक व सरीसृप असे वैविध्यपूर्ण प्राणीजीवन तिथे आढळते. त्यांचा अभ्यास हा जीवशास्त्राच्या दृष्टीने फार महत्त्वाचा आहे. 

गुहेतील लवणस्तंभ
गुहावलोकन पोशाख आणि
हेल्मेटवरील ज्योत

मारयान हळूहळू पुढे घेऊन जात होता. कधी प्रशस्त खोल्या तर कधी चिंचोळी पायवाट, कधी खडी चढण तर कधी हलकासा उतार असे गुहेचे अंतरंग सतत बदलत होते. मार्गात दिसणारे लवणस्तंभांचे चित्र-विचित्र आकार मारयान दाखवत होता. एका स्तंभाचा आकार जेलीफिश सारखा तर एकाचा आकार फुलदाणीसारखा होता. काही अगदी लहान स्तंभांच्या टोकाशी पांढऱ्या रंगाचे नव-निर्मित स्तंभ दिसत होते. गुहेतल्या एका सपाट मोकळ्या जागी आम्ही थांबलो. तिथे छताचा आकार एखाद्या घुमटासारखा भासत होता. लहानग्या लवणस्तंभांनी त्यावर सुरेख नक्षीकाम केले होते. त्याच्या बरोबर खाली एक सपाट दगड बसायच्या बाकासारखा वाटत होता. “ही जागा माझ्यासाठी खास महत्त्वाची आहे” मारयान म्हणाला. “माझे लग्न इथे झाले होते.” आम्ही आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागलो. विमानात, डोंगरमाथ्यावर, बोटीवर वगैरे लग्न करणाऱ्या लोकांविषयी ऐकले होते. पण गुहेत? ते पण अशा गुहेत जिथे सरपटत आत यावे लागते? आमचा विश्वास बसत नाही हे पाहून मारयानने खिशातून एक फोटोच काढून दाखवला. खरोखर त्या सपाट दगडावर बसलेले वधू-वर आणि इतर काही मंडळी त्यात दिसत होती. मग त्याच्या लग्ना-दरम्यान घडलेल्या गमती-जमती सांगून मारयानने आमचे चांगलेच मनोरंजन केले. बिचारी त्याची बायको, लग्नाचा सुंदर पांढरा पोशाख घालून इथे कशी आली असेल याचा विचार करत आम्हीही हसत होतो.

जेलीफिशसारखे दिसणारे
लवणस्तंभ 



एव्हाना आम्ही गुहेच्या बरेच आत आलो होतो. गुहेची एकूण लांबी ८५० मीटर होती. पण अंधार आणि खडकाळ वाट यांमुळे ते अंतर बरेच जास्त वाटत होते. पुढचा टप्पा जरा अवघड होता. एका अरुंद भेगेतून हळूहळू सरकत पुढे जायचे होते. मारयानच्या सूचनेप्रमाणे आधी हात, मग डोके, आणि मग पाय त्या भेगेतून बाहेर काढत आम्ही पुढच्या भागात पोहोचलो. हा गुहेचा शेवटचा भाग होता. तिथे आम्ही थोडा वेळ विसावलो. मारयान म्हणाला, ‘तुमच्या ज्योती विझवा’. आम्ही ज्योती विझवाताच तिथला मिट्ट काळोख जणू अंगावरच धावून आला. डोळे उघडले काय नि मिटले काय काही फरकच कळत नव्हता. असा काळोख कधीच अनुभवला नव्हता. त्या काळोखाची काही क्षण अनुभूती घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. गुहेतून बाहेर पडताच एका प्रचंड दडपणातून बाहेर पडल्यासारखे वाटले. अशा थरारक अनुभवासाठी मारयान चे आभार मानून आम्ही हॉस्टेल वर परतलो.

अधिक फोटोंसाठी येथे क्लिक करा.