जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ५ - मृत समुद्र

मदाबा आणि माउंट नेबो इथल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक अनुभवानंतर आता आमची वारी एका भैगोलिक आश्चर्याकडे निघाली होती. ते आश्चर्य म्हणजे मृत समुद्र (Dead Sea). शाळेत असताना भूगोलाच्या परीक्षेत कायम एक प्रश्न असायचा – मृत समुद्राची क्षारता सर्वाधिक आहे, भौगोलिक कारणे द्या. तेव्हा नुसती घोकलेली ती भौगोलिक कारणे आज प्रत्यक्षात अनुभवास येत होती. पश्चिम आशियाच्या शुष्क वाळवंटी प्रदेशात, जॉर्डन आणि इस्रायल यांच्या सीमारेषेवर मृत समुद्र स्थित आहे. या समुद्राला मिळणारा गोड्या पाण्याचा एकमेव मोठा स्रोत म्हणजे जॉर्डन नदी. त्याशिवाय आसपासचे अनेक लहान-मोठे झरे या समुद्रात मिसळतात. मात्र मुळातच पर्जन्यमान कमी असल्याने त्यातून होणारा गोड्या पाण्याचा पुरवठा नगण्य असतो. जवळपास वर्षभर असणारे उष्ण हवामान व सूर्याची प्रखर किरणे यांमुळे बाष्पीभवनाचा वेगही जास्त. या सर्व कारणांमुळे मृत समुद्राची क्षारता सुमारे ३५% आहे. हे प्रमाण सरासरी समुद्रक्षारतेच्या ९ पट आहे! इतक्या प्रचंड क्षारतेमुळे या समुद्रात कोणतेच जीव जगू शकत नाहीत. म्हणूनच यास मृत समुद्र असे म्हणतात.

मृत समुद्राचे स्थान
गॅलिलीचा समुद्र, जॉर्डन नदी आणि मृत समुद्र हे सारे जलस्रोत एकाच रिफ्ट व्हॅलीमध्ये येतात. भूगर्भशास्त्रज्ञांच्या मते लक्षावधी वर्षांपूर्वी ही सारी रिफ्ट व्हॅली पाण्याने भरलेली होती. यातून भूमध्य समुद्रातले पाणी अकाबाच्या आखाताद्वारे लाल समुद्रात मिसळत असे. कालांतराने क्षार-निक्षेपण व भूगर्भीय हालचाल यांमुळे रिफ्ट व्हॅलीतील पाण्याचा समुद्राशी असलेला संबंध तुटला. उरलेले पाणी बाष्पीभवनाने आक्रसत गेले व त्याचाच मृत समुद्र निर्माण झाला. असा हा मृत समुद्र म्हणजे निश्चितच एक भौगोलिक आश्चर्य आहे.

साधारण साडेतीनच्या सुमारास आम्ही मृत समुद्राच्या अम्मान बीचवर पोहोचलो. मृत समुद्राच्या किनाऱ्यावरची बहुतांश जागा मोठमोठ्या हॉटेल मालकांनी विकत घेऊन त्यांच्या ग्राहकांकरता बंदिस्त बीच बनवले आहेत. समुद्रकिनाऱ्यासारखी जागा ही कोणाची वैयक्तिक मालमत्ता कशी होऊ शकते असा प्रश्न मला पडला. पण बहुतेक सगळ्याच पश्चिम आशियाई देशांत हा प्रकार सर्रास दिसतो. थोडक्यात, अम्मान बीच ही एकच जागा सामान्य पर्यटकांना उपलब्ध होती. असो. गाडीतून उतरलो आणि जाणवलं की अम्मानमध्ये हुडहुडी भरवणारी थंडी आता कुठच्या कुठे पळून गेली होती. तिची जागा ऊबदार व दमट हवेने घेतली होती. अम्मान बीच हा अनेक सोई-सुविधांनी युक्त होता. पर्यटकांसाठी वैयक्तिक लॉकर, स्नानगृहे, खाण्या-पिण्याची दुकाने वगैरे सुविधा तेथे नाममात्र दरात उपलब्ध होत्या. तिकीट काढून आत शिरलो आणि निळ्याशार पाण्याचा मृत समुद्र दृष्टीस पडला. मृत समुद्र म्हटल्यावर डोळ्यांसमोर जे चित्र उभं राहतं त्याला समोरचं दृश्य बेचिराख करत होतं. बीचवर फारशी गर्दी नव्हती. किनाऱ्यावर काही लोक अंगाला चिखल फासून बसले होते. इथल्या पाण्यात आणि मातीत औषधी गुणधर्म आहेत म्हणे. भरतीरेषेच्या आसपास शुभ्र मिठाचे थर जमले होते. आजू-बाजूच्या शुष्क टेकड्या समुद्रात पडलेल्या प्रतिबिंबात आपलं रुपडं न्याहाळत होत्या. हिरवळीचे लोभस दागिने आपल्या कधी नशिबातच नाहीत अशी तक्रार करत असाव्या. बीचवरची पिवळसर काळी माती, त्यावरचे मिठाचे लहान-मोठे डोंगर आणि त्यांना हळूच गुदगुल्या करणारी एखादी लाट, सारे काही कलत्या उन्हात चकाकत होते.

अम्मान बीचवरून दिसणारा निळाशार मृत समुद्र 

किनाऱ्यावर जमलेले मिठाचे थर 
मला पाण्यात उतरण्याचा मोह अनावर होत होता. पण त्यासाठीचे काहीच साहित्य मी सोबत आणले नव्हते. पण तेवढ्यासाठी मृत समुद्रात उतरायची संधी का सोडावी? शेवटी मी जवळच्याच एका दुकानातून टॉवेल आणि पोहायची चड्डी विकत घेतली आणि पाण्यात उतरलो. इथले वैशिष्ट्य म्हणजे मृत समुद्रात माणूस कधीच बुडत नाही. या पाण्याची घनता मानवी शरीराच्या घनतेपेक्षा जास्त असल्याने आपण पाण्यावर सहज तरंगू शकतो. अनेक पर्यटक पाण्यावर तरंगण्याच्या अद्भुत प्रकाराचा आनंद घेत होते. मी साधारण कमरेएवढ्या पाण्यात शिरलो आणि गादीवर पडावे तसे स्वतःला झोकून दिले. त्या जडशील पाण्याने मला सहज तोलून धरले व मी पाण्यावर तरंगू लागलो. फारच मजा येत होती. इथे घ्यायची विशेष काळजी म्हणजे उताणे न होणे. आपल्या शरीराच्या वरच्या भागाचे वजन जास्त असते. त्यामुळे पाठीवर तरंगताना वरचा भाग काहीसा पाण्याच्या खाली राहतो व पाय वर राहतात. उताणे झाले तर डोके पाण्याखाली जाऊन नाका-तोंडात पाणी जायची शक्यता असते. शिवाय त्या जड पाण्यात हातपाय मारून स्वतःला सावरणेही कठीण असते. त्यामुळे अगदी पट्टीचा पोहणारा सुद्धा इथे पाण्यात ‘बुडू’ शकतो. त्यासंदर्भातल्या सूचना तिथे स्पष्टपणे लिहल्या होत्या. एक सुरक्षारक्षकही तैनात होता. इथला अजून एक धोका म्हणजे तळाशी जमलेले क्षारांचे स्फटिक. काही स्फटिकांना तीव्र धार असते. त्यावर पाय पडला तर कापला जायची भीती असते. ३५% क्षारता असलेल्या पाण्यात एखादी जखम होणे किती वेदनादायक असेल! या सगळ्या धोक्यांचा विचार करून मी अतिशय सावधपणे तरंगत होतो.

मृत समुद्रात तरंगणारे पर्यटक
थोड्याच वेळात अंग चरचरू लागले. अतिक्षारयुक्त पाणी त्वचेतली आर्द्रता शोषून घेत होते. सहज म्हणून मी पाण्याची चव घेण्याचा प्रयत्न केला. पाण्याची चव खारट कमी नि कडवट जास्त होती. त्या भयंकर चवीने मला मळमळल्यासारखे वाटू लागले. योगायोगाने मी त्या दिवशी सकाळीच दाढी केली होती. त्यामुळे चेहऱ्याला पाण्याचा स्पर्श होताच अशी काही आग आग झाली की विचारू नका. जखमेवर मीठ चोळणे या वाक्प्रचाराचा मी शब्दशः अनुभव घेत होतो. तेवढ्यात पाण्याचा एक थेंब डोळ्यात गेला. आता तर तिथे थांबणे अशक्यच होते. मी ताबडतोब बाहेर पडलो आणि गोड्या पाण्याच्या शॉवरखाली उभा राहिलो. तिथली शॉवरची सुविधा म्हणजे त्या क्षणी जगातली सर्वोत्तम सुविधा वाटत होती. माझी ती गम्मत पाहून दास कुटुंबीय हसत होते. पण एकंदरीतच मृत समुद्रात तरंगण्याचा अनुभव भारी होता.

मृत समुद्रावरचा रम्य सूर्यास्त 
आता सूर्यास्ताची वेळ जवळ येत होती. मी कपडे वगैरे आवरून एक मस्त कॉफी मागवली. अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या केशरी प्रकाशात थोडेफार छायाचित्रण केले आणि गाडीकडे निघालो. एक आयुष्यभर स्मरणात राहील असा अनुभव मिळाल्याच्या आनंदात मी होतो. पुढच्या दिवसाची रूपरेषा ठरवून आम्ही अम्मानला हॉटेल वर परतलो.

क्रमशः

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ४ - मोझॅक सिटी मदाबा आणि माउंट नेबो

पुढच्या दिवशी ठरलेल्या वेळेप्रमाणे सालेह गाडी घेऊन हॉटेलवर हजर झाला. दास कुटुंबियांना त्यांच्या हॉटेलवरून पिक-अप करून आम्ही मदाबाच्या दिशेने निघालो. मदाबा हे अम्मानच्या नैऋत्येकडे ३० किमीवर वसलेले एक ऐतिहासिक शहर. हे शहर रोमन साम्राज्याच्या काळात वसवले गेले. जॉर्डनमधील नबातिअन साम्राज्याला शह देण्यासाठी या शहराचा लष्करी उपयोग होत असे. ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराचेही हे एक प्रमुख केंद्र होते. आज हे शहर प्रसिद्ध आहे ते तिथल्या मोझॅक चित्रकृतींसाठी. मोझॅक म्हणजे रंगीत दगडांचे तुकडे विशिष्ट पद्धतीने मांडून बनवलेली चित्रकृती. मदाबामध्ये ईसवी सनाच्या दुसऱ्या ते सातव्या शतकादरम्यान अशा असंख्य चित्रकृती घडवल्या गेल्या. काळाच्या ओघात त्या चित्रकृती गाडल्या गेल्या. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात काही घरांचे बांधकाम करताना मदाबाच्या उत्तर भागात पहिला मोझॅक सापडला. त्यानंतर असंख्य मोझॅक सापडत गेले. या मोझॅकच्या माध्यमातून इतिहासकारांना तत्कालीन जीवनाबद्दल बरीच उपयुक्त माहिती ज्ञात झाली.

जेरुसलेमचा नकाशा दाखवणारा मोझॅक
या असंख्य मोझॅकपैकी सर्वात महत्त्वाचा मोझॅक म्हणजे जेरुसलेमचा नकाशा. रंगीत दगडांचे तुकडे जमिनीवर लावून हा नकाशा बनवण्यात आला. जेरुसलेमच्या पवित्र भूमीच्या आसपासचे डोंगर, नद्या, गावे, व्यापारी मार्ग अशा महत्त्वाच्या भौगोलिक व सांस्कृतिक खुणा त्यात चितारलेल्या आहेत. याच नकाशावरून संशोधकांनी जेरुसलेमच्या तत्कालीन रचनेचे प्रारूप बनवले. आज अर्धा-अधिक नष्ट झालेला हा नकाशा त्याच्याभोवती चर्च बांधून संरक्षित केला आहे. या चर्चला ‘चर्च ऑफ द मॅप’ असे म्हणतात. मदाबाला पोहोचताच आही पहिली भेट या चर्चला दिली. स्थानिक पुरातत्त्व विभागाने मोठ्या कसोशीने त्या चर्चमधील नकाशाचे जतन केले आहे. शहरात इतरत्र सापडलेले मोझॅक एका वस्तुसंग्रहालयात जतन करून ठेवले आहेत. हे मोझॅक मुख्यत्वे पाना-फुलांची नक्षी, प्राणी, बायबलमधील घटना, व तत्कालीन दैनंदिन जीवनातले प्रसंग दर्शवतात. हे संग्रहालय बघणे म्हणजे एक पर्वणीच होती. हजारो वर्षांपूर्वी बनवलेल्या या कलाकृती तिथल्या गतवैभवाची साक्ष देत होत्या. असे म्हणतात की मदाबातल्या अनेक घरांमध्ये तळघरात असे असंख्य मोझॅक आहेत. लोकांनी ते पुरातत्त्व विभागापासून लपवून ठेवले आहेत. आपले वडिलोपार्जित घर सरकारच्या हवाली करण्याची त्यांची अजिबात तयारी नाही.
वस्तुसंग्रहालयात असलेले विविधरंगी मोझॅक - नक्षीकाम 

वस्तुसंग्रहालयात असलेले विविधरंगी मोझॅक - दैनंदिन जीवन 

वस्तुसंग्रहालयात असलेले विविधरंगी मोझॅक - भूमितीय रचना   
मदाबा शहरापासून जवळच एक मोझॅक निर्मिती प्रशिक्षण केंद्र आहे. त्याच्या शेजारीच एक वस्तुसंग्रहालयही आहे. सालेह आम्हाला तिथे घेऊन गेला. ती वास्तू आधुनिक पद्धतीने बांधलेली होती. संग्रहालयात जॉर्डनचा इतिहास, संस्कृती, जीवनपद्धती वगैरे विषयांवर दालने होती. एका दालनात जॉर्डनमध्ये प्राचीन काळी समाजजीवन कसे होते यासंबंधी सेट उभारले होते. वंशपरंपरेने ठराविक व्यवसाय करणारे लोकसमूह त्यात दाखवले होते. ते लोकसमूह आपसांत रोटी-बेटी व्यवहार करत नसत व आपल्या व्यवसायाचा आणि समूहाचा त्यांना अभिमान असे. आजही असे काही समूह जॉर्डनमध्ये आढळतात. तिथली मार्गदर्शक तरुणी मोठ्या उत्साहाने माहिती सांगत होती. काहीतरी सुपरिचित असे ऐकल्यासारखे वाटत होते. आमची त्यावर काहीच प्रतिक्रिया नाही याचे त्या तरुणीला आश्चर्य वाटले. मी मनात म्हटले, अशा लहान-सहान गोष्टींचे अप्रूप वाटायला आम्ही काही शे-दोनशे वर्षांचा इतिहास असलेल्या देशातून आलेलो नाही! असो.

मोझॅक निर्मिती कार्यशाळा 
लवकरच ती तरुणी आम्हाला मोझॅक-निर्मिती कार्यशाळेत घेऊन गेली. ही कार्यशाळा फारच रोचक होती. मोझॅक-निर्मितीच्या प्राचीन कलेला आधुनिकतेचा साज देऊन तिचे जतन करण्याचा कौतुकासाद उपक्रम तिथे चालला होता. अनेक स्थानिक तरुण-तरुणी संगणकाचा वापर करून मोझॅकसाठी लागणारे डिझाईन बनवत होते. विशिष्ट प्रकारच्या वालुकाश्माला विविध रंगांनी रंगवले जात होते. त्याचे एका मशीनने वेगवेगळ्या आकारात तुकडे पाडून डिझाईनवर लावले जात होते. केवळ सपाट पृष्ठभागच नव्हे, तर मग, फुलदाणी, हंडा अशा गोलाकार वस्तूंवरही मोझॅक बनवले जात होते. त्यांनी बनवलेल्या चित्रकृती अत्यंत सुबक दिसत होत्या. त्यांपैकी एखादा लहानसा मोझॅक विकत घेण्याचा मोह मला आवरला नाही. ऑलिव्हच्या झाडाचे चित्र असलेला एक मोझॅक मी विकत घेतला.


याच कार्यशाळेच्या प्रांगणात तीन दशलक्ष तुकड्यांनी बनवलेला महाकाय मोझॅक बनवण्याचे काम सुरु होते. पुढच्या काही वर्षांत हा मोझॅक हायवेवर मोक्याच्या जागी बसवला जाणार होता. येणाऱ्या प्रत्येक पर्यटकास आपले नाव दगडाच्या एका तुकड्यावर लिहण्याचे आवाहन तिथले विद्यार्थी करत होते. मी मोठ्या उत्साहाने माझे नाव एका तुकड्यावर लिहले व तो मोझॅकच्या डिझाईन वर लावला. काही वर्षांनी तिथे पुन्हा जायची संधी मिळाली तर आपल्या नावाचा तो तुकडा शोधणे अगदी मनोरंजक ठरेल.






मदाबामधले मोझॅक पाहून झाल्यावर सालेहने आमची गाडी माउंट नेबोच्या दिशेने वळवली. जॉर्डनच्या पश्चिम सीमेवर, जॉर्डन नदीच्या पूर्व काठाने एक डोंगररांग दक्षिणोत्तर पसरली आहे. यातलाच एक डोंगर म्हणजे माउंट नेबो. यहुदी आणि ख्रिस्ती धर्मीयांमध्ये या ठिकाणास विशेष महत्त्व आहे. इथूनच मोझेसला ‘प्रॉमिस्ड लॅंड’ दिसली होती अशी आख्यायिका प्रचलित आहे.

मोझेस हा अब्राहामिक धर्मांमधला एक महत्त्वाचा प्रेषित. त्याचा जन्म इजिप्तमध्ये एका हिब्रू भाषक महिलेच्या पोटी झाला. प्राचीन काळी इजिप्तच्या साम्राज्यात अनेक हिब्रू भाषक गुलामासारखे जगत होते. त्यांची संख्या उत्तरोत्तर वाढत होती. अधिक मनुष्यबळ जमवून त्यांनी उठाव करू नये म्हणून इजिप्शियन फॅरोहने सर्व हिब्रू भाषक लहान मुलांची कत्तल करायचे ठरवले. त्या दरम्यान मोझेसला त्याच्या आईने लपवून ठेवले व तो बचावला. काही दिवसांतच फॅरोहच्या मुलीला मोझेस नाईल नदीमध्ये एका टोपलीत ठेवलेला आढळला. तिने त्याचा सांभाळ केला. राजपुत्रासारख्या वाढलेल्या मोझेसला आपल्या हिब्रू कुळाविषयी कसे कळले याबाबत धर्मग्रंथांमध्ये एकवाक्यता नाही. मात्र मोठं झाल्यावर मोझेसने एका इजिप्शियन अधिकाऱ्याची हिब्रू गुलामांशी जुलमाने वागत असल्याचे पाहून हत्या केली आणि तो वाळवंटात पळून गेला. तिथे त्याचा देवाशी संवाद झाला व आपल्या हिब्रू बांधवांना मुक्त कर अशी आज्ञा देवाने त्यास केली. त्यानुसार आपल्या भावाच्या मदतीने त्याने इजिप्तमधील हिब्रू बांधवांना मुक्त केले व त्यांना घेऊन लाल समुद्र पार करून तो सिनाई पर्वताच्या प्रदेशात आला. तेथील वाळवंटात बराच काळ भटकल्यानंतर अखेरीस माउंट नेबो वरून त्याला राहण्यास उपयुक्त अशी जमीन दिसली. मात्र तेथेच त्याचा अंत झाला. त्याला त्याच परिसरात दफन करण्यात आले. या कथेची ऐतिसाहिक सत्यासत्यता वादग्रस्त आहे. मात्र एक आख्यायिका म्हणून ती यहुदी आणि ख्रिस्ती लोकांसाठी महत्त्वाची आहे.

माउंट नेबो वरून दिसणारे जॉर्डन नदीचे खोरे 

'प्रॉमिस्ड लँड'
तर अशा या माउंट नेबो वर आम्ही पोहोचलो तेव्हा उन्हं माथ्यावर आली होती. हवेत गारवा असला तरी कडक उन अंगाला टोचत होतं. समुद्रसपाटीपासून ८५० मीटर उंचीच्या त्या डोंगरमाथ्यावर एक सुरेख चर्च बांधले आहे. तिथे पुनरुज्जीवनाचे काम सुरु होते. चर्चच्या मागच्या बाजूने जॉर्डन नदीच्या खोऱ्याचा विस्तीर्ण प्रदेश दिसत होता. उघड्या-बोडक्या डोंगरांवर मधूनच हिरवे पुंजके उगवलेले दिसत होते. दूर क्षितिजाजवळ काही घरे दिसत होती. हीच ती पॅलेस्टाईनची भूमी. तिथे थोडा वेळ छायाचित्रण करून आम्ही गाडीकडे परतलो.

क्रमशः

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ३ - पूर्वेकडचे पॉम्पेई : जेराश

जॉर्डनच्या भूमीला समृद्ध असा इतिहास लाभला आहे. या देशाला जॉर्डन हे नाव जॉर्डन नदीवरून पडले. जॉर्डनच्या वायव्य सीमेवरील गॅलिली समुद्रातून उगम पावणारी ही नदी दक्षिणेकडे वाहत मृत समुद्राला मिळते. प्रागैतिहासिक काळापासून या नदीच्या खोऱ्यात मानवी संस्कृती नांदत होती. आज ही नदी इस्रायल आणि जॉर्डन मधली सीमारेषा आहे. ईसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात या प्रदेशात नबातिअन टोळ्यांचे राज्य होते. पेट्रा ही त्यांची राजधानी होती. सिकंदराच्या स्वारीनंतर हा प्रदेश ग्रीक साम्राज्याच्या अधिपत्याखाली आला. त्याच दरम्यान येथे अनेक नगरे बांधली गेली. अम्मानचे पूर्व स्वरूप – फिलाडेल्फिया आणि जेराश ही त्याच काळात वसवली गेलेली शहरे. कालांतराने जॉर्डनची भूमी पूर्व रोमन साम्राज्याला जोडली गेली. पूर्व रोमन साम्राज्याच्या पाडावानंतर काही मुस्लीम सत्ताधीशांनी येथे राज्य केले. कृसेड्स च्या काळात यांनीच मुस्लिमांचे प्रतिनिधित्व केले. त्यानंतर ऑटोमन साम्राज्याचा अंमल येथे काही दशके राहिला. पहिल्या महायुद्धानंतर ब्रिटिशांच्या नेतृत्त्वाखाली येथे ‘हशेमाईत किंग्डम ऑफ जॉर्डन’ ची स्थापना झाली. जॉर्डनचे हे आधुनिक रूप म्हणजे संवैधानिक राजेशाही आहे.

जेराशमध्ये सापडलेले भग्नावशेष 
इतिहासात नांदलेल्या विभिन्न संस्कृतींचा ठसा जॉर्डनच्या संस्कृतीवर दिसतो. ग्रीक साम्राज्याच्या अधिपत्याखाली असताना जेराश हे महत्वाचे व्यापारी केंद्र होते. ईसवी सन ७४९ मध्ये झालेल्या एका भूकंपात या शहराचा बराचसा भाग उद्ध्वस्त झाला. त्यानंतरच्या छोट्या-मोठ्या भूकंपांत आणि परकीय आक्रमणांत या शहराची मोठी हानी झाली. कालांतराने सारे शहर जमिनीखाली गाडले गेले. ईसवी सन १८०६ मध्ये एका जर्मन इतिहासकाराला इथे काही अवशेष सापडले. त्यानंतर केल्या गेलेल्या उत्खननात भग्नावस्थेतले संपूर्ण शहरच प्राप्त झाले. उत्खननाचे काम आजही सुरु असून संशोधकांची उत्कंठा वाढवणारे अवशेष सतत प्राप्त होत आहेत. इथे मिळालेल्या अवशेषांचे प्रमाण आणि स्वरूप इटलीमधील पॉम्पेई या शहरातील अवशेषांशी मिळते-जुळते असल्याने जेराशला ‘पॉम्पेई ऑफ द ईस्ट’ असेही म्हटले जाते.

उत्खननात सापडलेले असंख्य खांब 
जेराशचे हे प्राचीन शहर एका बाजूला तर आधुनिक शहर दुसऱ्या बाजूला अशी आजची रचना आहे. प्राचीन शहराच्या प्रवेशद्वारापाशी पोहोचलो तेव्हा दुपारचे चार वाजत आले होते. प्रवेश बंद होण्यास जेमतेम १५ मिनिटे बाकी होती. वेळेत पोहोचवल्याबद्दल सालेहचे आभार मानले आणि आत शिरलो. सारे अवशेष बघायला माझ्याकडे दीडेक तास होता. तिकीट काढून आत शिरतोय तेवढ्यात कानावर काही बंगाली संवाद पडले. भारतीय पर्यटक? आणि इथे? वळून पाहिले तर नवरा-बायको आणि त्यांचा १२-१३ वर्षांचा मुलगा असे कुटुंब दृष्टीस पडले. ओळख-पाळख झाली. अमित व निलांजना दास आणि त्यांचा मुलगा असे ते कोलकात्याचे कुटुंब होते. मात्र कामानिमित्त ते इजिप्तमध्ये कैरो येथे स्थायिक होते. नाताळच्या सुट्टीनिमित्त सारे जॉर्डनच्या सहलीला आले होते. नीलादी आणि अमितदा अशी खास बंगाली वळणाची संबोधनं मी त्यांच्यासाठी ठरवून टाकली. माझं बंगाली भाषेचं (जुजबी का असेना) ज्ञान पाहून दोघेही चांगलेच प्रभावित झाले होते. नीलादींनी नुकताच डिजिटल SLR कॅमेरा विकत घेतला होता. पण त्याची सगळी functions काही त्यांना ठाऊक नव्हती. माझ्याकडे तसाच कॅमेरा असल्याचे पाहून त्यांना फारच आनंद झाला. मग जेराशमधल्या ऐतिहासिक अवशेषांत आमचा फोटोग्राफी क्रॅश कोर्स सुरु झाला. त्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता. मीही जमेल तसं त्यांना सांगत होतो.

आर्च ऑफ हेड्रीयन
आर्च ऑफ हेड्रीयन वरील सुरेख कोरीवकाम 
जेराशमधली प्राचीन शहराची ती जागा तशी बरीच मोठी होती. आत शिरताच समोर दिसलेली वास्तू होती ‘आर्च ऑफ हेड्रीयन’. ईसवी सन १२९ मध्ये हेड्रीयन नामक ग्रीक सम्राटाच्या स्वागतासाठी ही वास्तू बांधली गेली. ही वास्तू पाहून रोममधल्या कोलोसियमच्या बाहेर स्थित असलेल्या प्रवेशद्वाराची आठवण झाली. एकंदरीत स्थापत्यशैलीमध्ये बरेच साधर्म्य होते. पिवळसर वालुकाश्माने बांधलेली ती वास्तू फारच मोहक दिसत होती. त्यावरचे बारीक कोरीवकामही अप्रतिम होते. इथून पुढे जाताच हिपोड्रोम चे विशाल मैदान नजरेस पडले. हिपोड्रोम म्हणजे घोड्यांच्या शर्यतीसाठीचे मैदान. तिथली वैशिष्ट्यपूर्ण आसनव्यवस्था पाहून आम्ही पुढे निघालो. शहराच्या मध्यवर्ती भागात एक प्रचंड लंबवर्तुळाकृती मैदान होते. त्याच्या कडेने सुंदर कोरीवकाम केलेले खांब होते. या जागेस ओवल फोरम म्हणतात. इथून पुढे शहरातला मुख्य रस्ता सुरु होत होता. या मार्गाच्या दोन्ही बाजूंना जवळपास १० मीटर उंच असे खांब होते. खांबांच्या टोकांवर पाना-फुलांची नक्षी कोरलेली होती. एकसारख्या उंचीचे व रचनेचे ते खांब त्या मार्गिकेला राजेशाही साज चढवत होते. असे शेकडो खांब उत्खननात सापडले होते. कदाचित शहरातली प्रत्येक इमारत अशा खांबांच्या आधाराने उभारलेली असावी. हजार वर्षांपूर्वी हे शहर कसे दिसले असेल याचे कल्पनाचित्र रंगवण्यात मी दंग झालो होतो. कलत्या उन्हाच्या सोनेरी प्रकाशात ते सारेच भूदृश्य विलक्षण सुंदर दिसत होते. माझ्या कॅमेराला जराही उसंत नव्हती.

ओवल फोरम 
त्या प्रशस्त मार्गिकेच्या डाव्या अंगाला ग्रीक देवतांची मंदिरे होती. तर दक्षिणेकडच्या बाजूला एक सभागृह होते. अम्मानमध्ये पाहिलेल्या सभागृहाचाच लहान अवतार इथे बघायला मिळाला. सभागृहाच्या व्यासपीठावर पारंपरिक पोशाखातले काही तरुण वाद्यवादन करत होते. कोणत्याही ध्वनीक्षेपकाशिवाय त्या सभागृहाच्या प्रत्येक कोपऱ्यात त्यांचा आवाज सुस्पष्ट ऐकू येत होता. प्राचीन काळातील स्थापत्यविशारदांची आवाजाबद्दलची समज किती उत्तम असावी! अवशेषांच्या बाजूने बरेच उत्खनन चालले होते. काही ठिकाणी इमारतींचे पुनरुज्जीवन सुरु होते. अवशेषांच्या पलीकडच्या बाजूला आधुनिक जेराश दिसत होते. चिंचोळ्या रस्त्यांवरून गाड्या धावत होत्या. कोणत्याही सौंदर्यदृष्टीचा अभाव असलेली घरे दाटीवाटीने उभी होती. शहरातले लोक आपल्या दैनंदिन कामांमध्ये व्यग्र होते. मोठ्या प्रमाणावर निर्वासितांनी वस्ती केल्याने शहराला काहीसे बकाल स्वरूप आले होते. गेल्या हजार वर्षांतील मानवी संस्कृतीचे संक्रमण या एका जागी अनुभवता येत होते. मानवी संस्कृतीचा हा प्रवाह नक्की कोणत्या दिशेने चालला आहे असा प्रश्न मला क्षणभर पडला. तितक्यात तिथला सुरक्षारक्षक बाहेर पडायची वेळ झाली म्हणून सांगायला आला. मी कॅमरा बंद केला आणि माघारी फिरलो.

शहरातली प्रशस्त मार्गिका व बाजूचे खांब 
खांबांवरील पाना-फुलांची नक्षी  
नीलादी आणि अमितदा यांच्यासोबत बोलताना जाणवलं की त्यांचा आणि माझा पुढच्या काही दिवसांचा बेत सारखाच आहे. मग आम्ही सालेहची गाडी घेऊन एकत्रच फिरायचे ठरवले. आपल्या मर्जीनुसार फिरता येणार आणि खर्चही वाटला जाणार हे पाहून मला फारच आनंद झाला. पुढच्या दिवसाची रूपरेषा ठरवून आम्ही एकमेकांचा निरोप घेतला.

प्राचीन शहराच्या पार्श्वभूमीवर दिसणारे आधुनिक शहर 
 क्रमशः

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग २ - अम्मान शहर आणि अजलूनची बर्फाच्छादित वाट

जाग आली तेव्हा पावणे अकरा वाजले होते. विमानप्रवासाचा ताण आणि दोन तासांनी पुढे सरकलेले घड्याळ यांची छान युती जमली होती. आन्हिकं आवरून आज काय पहायचे आहे याचा विचार करू लागलो. सहज खिडकी उघडली आणि समोरच्या दृश्याने स्तब्धच झालो. अम्मान शहरातील सुप्रसिद्ध रोमन थिएटर समोरच दिसत होते. याच ‘व्यू’ साठी मी ते हॉटेल निवडले होते. पण हॉटेलच्या अंतर्गत सुविधांनी एकदमच भ्रमनिरास झाला होता. असो. मी लगेचच रोमन थिएटर  बघायला बाहेर पडलो. तीन टप्प्यांमध्ये विभागलेली त्याची भारदास्त, अर्धवर्तुळाकृती रचना अम्मानच्या गतवैभवाची साक्ष देत होती. टेकडीच्या नैसर्गिक उताराचा उपयोग करून बांधलेल्या या सभागृहामध्ये ६००० लोक बसू शकतील एवढी आसनक्षमता आहे. जवळच एक वस्तुसंग्रहालयही उभारले आहे. जिथे प्राचीन काळी ग्लॅडिएटर्सची झुंज होत असे त्या ठिकाणी एक छानसे उद्यान विकसित केलेले होते. अम्मानमधले नागरिक तिथे सहज भटकायला म्हणून आले होते. हवेत गारवा असला तरी स्वच्छ सूर्यप्रकाश आणि निरभ्र आकाश यांमुळे वातावरण प्रसन्न वाटत होते. हे सभागृह ईसवी सनाच्या दुसऱ्या शतकात बांधले गेले. त्या काळी अम्मानचे नाव फिलाडेल्फिया असे होते. जॉर्डनचा हा भाग ग्रीक समाज्र्याचा भाग होता. त्या काळातील अनेक लहान-मोठे अवशेष शहरात विखुरलेले आहेत. थोडा वेळ त्या परिसरात फिरून मी हॉटेलवर परतलो.
अम्मानमधील रोमन थिएटर - फोटो आंतरजालावरून साभार  
माझ्या आधी ठरलेल्या रूपरेषेप्रमाणे आजचा दिवस अजलून आणि जेराश या जॉर्डनच्या उत्तर भागातील ठिकाणांसाठी ठरवलेला होता. चौकशी केल्यावर कळले की त्या दिशेने जाणारी बस ११ वाजताच गेली होती. पुढची बस संध्याकाळी ४ वाजता होती. पुढचा-मागचा विचार न करता मी सरळ सालेहला फोन लावला आणि जेराशला घेऊन जाशील का म्हणून विचारले. नशिबाने तो उपलब्ध होता. त्याच्या कालच्या ऑफर बद्दल मी अजून काही निर्णय घेतला नव्हता. संपूर्ण ५ दिवसांसाठी एकट्याने गाडी आणि ड्रायव्हर भाड्यावर घेणे फार महाग पडेल असे वाटत होते. मात्र जेराशला जाण्यासाठी दुसरा काही पर्याय नव्हता. यथावकाश सालेह गाडी घेऊन हॉटेल वर आला. जेराशच्या आधी अजलूनचा किल्ला पाहणे अधिक सोयीस्कर ठरेल असे सालेहने सुचवले. मी संमती दर्शवली आणि आम्ही अजलूनच्या दिशेने निघालो.

अम्मान शहरातील एक रस्ता 
माझे हॉटेल शहराच्या अगदी मध्यवर्ती भागात होते. तिथल्या चिंचोळ्या, चढ-उतारांच्या रस्त्यांवरून गाडी धावत होती. अम्मान शहर हे सरासरी ७०० मीटर उंचीच्या १६ टेकड्यांवर वसलेले आहे. त्यामुळे सतत चढ-उतार असणे स्वाभाविक होते. अम्मानचा चेहरामोहरा भारतातल्या एखाद्या मध्यम आकाराच्या शहरासारखा वाटत होता. कुठे अस्ताव्यस्त वाढलेली वस्ती तर कुठे आकर्षक पद्धतीने बांधलेल्या उंच इमारती. एखादा भाग एकदम स्वच्छ आणि चकचकीत तर पलीकडच्याच चौकात झोपडपट्टी. एक वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या इमारती वाळूच्या विविध छटांमध्ये रंगवलेल्या होत्या. भूदृश्याशी मिळती-जुळती रंगसंगती असल्याने इथल्या इमारती भूदृश्याचाच एक भाग वाटत होत्या. जशी गाडी धावू लागली तशा सालेहच्या गप्पा सुरु झाल्या. अम्मान आणि जॉर्डनच्या उत्तर भागात काही दिवसांपूर्वीच विक्रमी हिमवर्षाव झाला होता. शहरातल्या उंच भागांत अजूनही बर्फ साचलेले दिसत होते. इथे हिमवर्षाव म्हणजे अगदीच दुर्मिळ घटना. त्यामुळे इथली व्यवस्था हिमवर्षावाला सामोरी जाण्यास सक्षम नाही. त्यात मागच्या आठवड्यातला हिमवर्षाव म्हणजे काही गेल्या काही दशकांमधला सर्वात मोठा हिमवर्षाव होता. शहरातल्या काही भागांत तब्बल ५ फुट बर्फ साचलं होतं. त्यादरम्यान इथली सगळी व्यवस्था पार कोलमडून पडली होती. साचलेल्या बर्फामुळे सालेहला त्याची गाडी बाहेरच काढता आली नव्हती. मागच्या आठवड्यात त्याचा काहीच धंदा झाला नव्हता. हळूहळू बर्फ वितळल्यानंतर सारी काही पूर्वपदावर येत होते. मी अशा नैसर्गिक आपत्तीत सापडलो नाही याबद्दल मी नशिबाचे आभार मानले.

अम्मानचा शहरी भाग मागे टाकून गाडी आता मोकळ्या हायवेवरून धावू लागली. जॉर्डनचा उत्तर भाग डोंगराळ आहे. इथे कडक उन्हाळा आणि ऊबदार, पण पावसाळी हिवाळा असे भूमध्य सागरी प्रकारचे हवामान आढळते. इटली आणि स्पेनप्रमाणे हाही प्रदेश ऑलिव्हच्या झाडांसाठी अनुकूल आहे. रस्त्याच्या कडेने असंख्य ऑलिव्हच्या बागा दिसत होत्या. व्हिनेगरमध्ये मुरवलेली ऑलिव्हफळे विकणारे विक्रेते जागोजागी दिसत होते. गाडी जसजशी डोंगरावर चढू लागली तसतसा आजूबाजूला प्रचंड बर्फ दिसू लागला. काही ठिकाणी तर मी जॉर्डनमध्ये आहे की जर्मनीमध्ये अशी शंका यावी इतका बर्फ होता. आसपासच्या शहरांमधली मंडळी बर्फात खेळण्याचा मनसोक्त आनंद लुटत होती. राजस्थानात अचानक रोहतांग पास अवतरावा अशी गमतीदार परिस्थिती दिसत होती. खाली उतरून काही फोटो काढण्याचा मोह मलाही आवरला नाही.

अजलूनच्या वाटेवर साचलेला बर्फ 

किल्ल्यावरचा निरीक्षण मनोरा 
यथावकाश मी अजलूनला पोहोचलो. गावाजवळच्या एका डोंगरावर अजलूनचा सुप्रसिद्ध किल्ला आहे. हा किल्ला १२ व्या शतकात बांधला गेला. दमास्कस ते दक्षिण जॉर्डन आणि त्यापुढे इजिप्तपर्यंत जाणाऱ्या व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी हा किल्ला उपयोगात येई. किल्ल्याकडे जाणारा रस्ता नुकताच मोकळा केला गेला होता. किल्ल्याच्या अंतर्गत भागात अजूनही बर्फ आणि चिखल होता. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ फारशी नव्हती. किल्ल्याचा आकार काही फार मोठा नव्हता. इथली स्थापत्यशैली वेगळीच वाटत होती. किल्ल्याच्या एका अंगाला असलेला, आता अर्धा-अधिक ढासळलेला निरीक्षण मनोरा लक्ष वेधून घेत होता. बाह्यांगाची बरीच पडझड झालेली असली तरी अंतर्गत भाग बऱ्यापैकी शाबूत होता. आतमधल्या खोल्या पिवळसर दिव्यांच्या प्रकाशाने उजळल्या होत्या. किल्ल्याच्या पुरातन सौंदर्याला बाधा येऊ न देता केलेली प्रकाशयोजना निश्चितच कौतुकास्पद होती. मला दोन क्षण सह्याद्रीतल्या किल्ल्यांची अवस्था आठवली. उगीच सात्विक संतापाने मूड खराब होऊ नये म्हणून मी तो विचार झटकून टाकला. इतक्यात किल्ल्याच्या सज्ज्यावर दोन गुबगुबीत मांजरी बसलेल्या दिसल्या. पर्यटकांशी लडिवाळपणे वागून काहीतरी अन्न पदरात पाडून घेणे हा त्यांचा नित्यक्रमच असावा. असो. सज्ज्यावरून आसपासचा परिसर न्याहाळता येत होता. डोंगरमाथ्यावरचे बर्फ, उतारावरच्या ऑलिव्हच्या बागा, आणि मधूनच दिसणारी लहान-सहान गावे असे ते दृष्य फारच मोहक वाटत होते. तिथे थोडा वेळ छायाचित्रण करून मी गाडीकडे परतलो.


अजलूनच्या किल्ल्यातील प्रकाशयोजना

अजलूनच्या किल्ल्याचे ढासळलेले बाह्यांग 
आता भूक लागली होती. खाण्याच्या शोधार्थ आम्ही अजलून गावात गाडी वळवली. हे गाव म्हणजे भारतातल्या एखाद्या गावासारखंच वाटत होतं. आपल्याकडे जिथे-तिथे उंडारणाऱ्या गाई मात्र इथे दिसत नव्हत्या. विशेष म्हणजे रस्त्यावर किंवा बाजारात महिला अगदीच तुरळक होत्या. सगळीकडे फक्त पुरुष. घराच्या चौकटीत अडकलेल्या तिथल्या महिलांबद्दल वाईट वाटलं. पण सालेहला मात्र त्याबद्दल काही वैषम्य वाटलेलं जाणवलं नाही. असो. गावातलेच एक उपहारगृह त्याने माझ्यासाठी शोधले. शाकाहारी असणं म्हणजे काय हे इथल्या लोकांना समजावता येईल का याच्या चिंतेत मी होतो. पण सालेहने माझे काम अगदीच सोपे करून टाकले. जगभरातल्या पर्यटकांना फिरवल्यामुळे त्याचे लोकांच्या आहारविषयक सवयींचे ज्ञान पक्के होते. त्याने माझ्यासाठी गरमागरम फलाफल आणि हम्मस मागवला. सोबत पिटा ब्रेड, अरेबिक पद्धतीची कोशिंबीर, आणि आयरान (ताक) सुद्धा मागवले. पश्चिम आशियाई प्रकारचे अन्न याआधी जर्मनीत बऱ्याचदा खाल्ले होते. पण जॉर्डन मधल्या फलाफलची चवच न्यारी होती. जेवण उरकून आम्ही जेराशच्या दिशेने निघालो.

किल्ल्याच्या सज्ज्यावरून दिसणारे दृश्य 
सज्ज्यावर ऊन खात बसलेले मांजर 
क्रमशः

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग १ - सहलीचा पहिला दिवस


जॉर्डन – पश्चिम आशियातल्या धगधगत्या वाळवंटी प्रदेशात शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवलेला एक चिमुकला देश. उत्तरेकडे सिरीया, पश्चिमेकडे इस्रायल व पॅलेस्टाईन, दक्षिणेकडे सौदी अरेबिया, तर पूर्वेकडे इराक अशा सतत ‘चर्चेत’ असणाऱ्या देशांच्या मध्ये राहून जॉर्डनने मोठ्या हिमतीने एक सुस्थिर राष्ट्र निर्माण केले आहे. जर्मनीहून भारताकडे येताना एकदा एजंटने रॉयल जॉर्डानियन या विमान कंपनीची तिकिटे हातात ठेवली. नाताळच्या सुट्टीमुळे विमानाची तिकिटे महागच होती. त्यातल्या त्यात याच कंपनीची तिकिटे जरा परवडणाऱ्या दरात मिळत होती. मात्र अम्मान (जॉर्डन ची राजधानी) येथे १३ तासांचा स्टॉप-ओवर होता. आता एवढा वेळ विमानतळावर बसून करायचे तरी काय? सहज म्हणून आसपास काही बघण्यासारखे आहे का याचा शोध घेऊ लागलो. जसजसे गुगल महाशय एकेक पान उघडून जॉर्डन विषयीची माहिती समोर आणू लागले तसतशी माझी उत्कंठा वाढू लागली. निसर्ग, इतिहास, स्थापत्यकला, खाद्यसंस्कृती या सगळ्यांनी भरगच्च असा खजिनाच माझ्या हाती सापडला होता.

आपण भारतीय मंडळी परदेशसहल म्हटल्यावर युरोप, अमेरिका, दुबई, सिंगापूर, फार तर फार ऑस्ट्रेलिया किंवा दक्षिण आफ्रिका, यांच्या पलीकडे फारसा विचार करत नाही. पण हे जग प्रचंड मोठं आहे. पृथ्वीवरचा प्रत्येक देश आपापला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा अभिमानाने मिरवतो आहे. त्याचा आस्वाद घ्यायचा तर थोडं चाकोरीबाहेर जायलाच हवं. पश्चिम आशियात दुबई वगळता अजून काही फिरण्यासारखे असेल असे वाटले नव्हते. अनायासेच जॉर्डन चा ‘शोध’ लागला होता. आता अम्मान मध्ये उतरतोच आहोत तर या देशाला एक धावती भेट द्यायलाच हवी असं ठरवून मी अम्मान ते मुंबई हा विमानप्रवास ५ दिवसांनी पुढे ढकलला. योगायोगाने भारतीय पासपोर्ट धारकांसाठी जॉर्डन चा व्हिसा on arrival उपलब्ध होता. सगळं जुळून येतंय हे पाहून मी अत्यानंदाने मनातल्या मनात एक टुणकन उडी मारली आणि फेसबुक वर feeling excited चा स्टेटसही टाकला!

जॉर्डनचे स्थान व त्याचे शेजारी 

तिकिटे आरक्षित झाल्यावर मी जॉर्डन मधले पाच दिवस कुठे कुठे भटकायचे ते ठरवू लागलो. जॉर्डन मध्ये रेल्वे सेवा नाही. देशांतर्गत प्रवास हा बसने किंवा वैयक्तिक वाहनानेच चालतो. त्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था यथा-तथाच. त्यामुळे देशांतर्गत प्रवासाचे आगाऊ आरक्षण शक्यच नव्हते. शिवाय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला किती वेळ लागेल याचा धड अंदाजही येत नव्हता. त्यामुळे स्थलदर्शनाची फारशी काटेकोर रूपरेषा मी ठरवलीच नाही. पहिल्यांदाच युरोपबाहेरच्या देशात जात होतो. तोही एकटा. थोडीशी धाकधूक मनात होतीच. पण काहीतरी भन्नाट करायला जातो आहे, मज्जा येईल अशा विचारांनी मला स्फुरण चढत होतं. अखेर तो दिवस उजाडला. फ्रँकफर्टवरून ठरलेल्या वेळेनुसार विमानाने उड्डाण केले. विमानातली सेवा अपेक्षेपेक्षा फारच चांगली होती. समोरच्या स्क्रीनवर जॉर्डनमधल्या पर्यटनस्थळांचे सतत मार्केटिंग सुरु होते. त्यामुळे माझी उत्कंठा अधिकच ताणली जात होती. अम्मानमध्ये विमान उतरले तेव्हा स्थानिक वेळेनुसार रात्रीचे पावणेबारा वाजले होते. सामान लगेचच मिळाले. व्हिसासाठी तिथल्या अधिकाऱ्यांनी काही जुजबी प्रश्न विचारले आणि पासपोर्टवर शिक्का मारला. भारतीय पासपोर्टधारक एखाद्या देशात इतक्या सहज प्रवेश मिळवू शकतो याचं मला आश्चर्यच वाटत होतं. बाहेर पडलो तर थंडगार वारं अंगाला झोंबू लागलं. जर्मनीतून निघताना आता काही दिवस हिवाळी जॅकेटपासून सुटका मिळेल अशी स्वप्नं बघत होतो. पण इथे तर अपेक्षेपेक्षा जास्तच थंडी होती. मी गुमानपणे अंगावर जॅकेट चढवलं आणि टॅक्सीवाला कुठे दिसतोय ते शोधू लागलो.

मध्यरात्रीची वेळ असल्याने मी विमानतळापासून हॉटेल पर्यंतची टॅक्सी आधीच आरक्षित करून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे एक टॅक्सीचालक माझ्या नावाचा फलक हातात घेऊन उभा होता. साडेसहा फूट उंची, रुंद बांधा, वाढवलेली दाढी असे त्याचे रूप पाहून मला ‘जाणता राजा’ मधल्या अफझलखानची आठवण झाली. मी जरा दबकूनच त्याच्याशी हस्तांदोलन केले. त्याचे नाव होते सालेह. आपल्या मोडक्या-तोडक्या इंग्रजीत त्याने माझे स्वागत केले. थोड्याच वेळात आमची टॅक्सी एका प्रशस्त महामार्गावरून धावू लागली. रस्त्यावर गर्दी तुरळकच होती. मिट्ट काळोखात आजूबाजूचे काहीच दिसत नव्हते. बहुधा वाळवंट असावे. विमानप्रवासाच्या थकव्याने मी थोड्याच वेळात पेंगू लागलो. इतक्यात सालेहने गाडी बाजूला घेऊन थांबवली व मला म्हणू लागला ‘मी तुला एक जादू दाखवतो.’ आता या एकाकी, निर्जन रस्त्यावर, मध्यरात्रीच्या वेळी हा कसली जादू दाखवतोय? अरब देशांमध्ये निर्जन वाळवंटी प्रदेशात पर्यटकांचे होणारे अपहरण, लुटालूट यांविषयी वाचलेल्या बातम्या माझ्या मनात चुकचुकू लागल्या. पण सालेहने चेहऱ्यावर छान स्मितहास्य ठेवत गाडीच्या खणातून दोन डायरीवजा वह्या काढल्या. त्याने आजतागायत फिरवलेल्या पर्यटकांचे त्याच्या सेवेविषयीचे अभिप्राय त्यात होते. जगाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या पर्यटकांनी आपापल्या भाषेत सालेहविषयी कौतुकोद्गार लिहले होते. त्यात काही भारतीय लोकांचे अभिप्रायही दिसत होते. थोडक्यात, हा पठ्ठ्या नुसता टॅक्सीचालक नसून एक खाजगी सहलसंयोजक होता. सालेह मोठ्या अभिमानाने त्याच्या गेल्या १५ वर्षांच्या करिअरचा वृत्तांत कथन करत होता. मी झोपेला आवर घालून त्याचं ऐकत होतो. शेवटी तो मुद्द्यावर आला. मी पुढच्या पाच दिवसांच्या जॉर्डनसहलीसाठी त्याची गाडी आरक्षित करावी अशी गळ तो घालू लागला. मार्केटिंगची ही पद्धत एकदम भारी होती. पण मी काही विचार करून निर्णय घेण्याच्या स्थितीत नव्हतो. मला केवळ हॉटेलची खोली आणि तिथला पलंग दिसत होता. मी सालेहचे कार्ड घेतले आणि उद्या फोन करेन असे सांगत मला हॉटेलवर सोडण्याची विनंती केली.
    

हॉटेलवर पोहोचलो तेव्हा रात्रीचे २ वाजले होते. पाच मिनिटं दार वाजवल्यावर आतला माणूस आळोखे-पिळोखे देत दार उघडायला आला. त्याचे इंग्रजी तर अगदीच प्राथमिक होते. चेक-इन चे सोपस्कार पूर्ण करून मी खोलीमध्ये प्रवेशलो. खोली तशी कोंदटच वाटत होती. हलकासा सिगारेटच्या धुराचा वास येत होता. आधीच्या पाहुण्याने यथेच्छ धूम्रपान केले असावे. मी सहज म्हणून खिडकी उघडली तर बाहेरच्या थंडगार हवेचा झोत आतमध्ये आला. खोलीमध्ये हीटरची सुविधाही नव्हती. एकंदरीतच हॉटेलची निवड चुकल्याचे माझ्या ध्यानात आले. पण आता काही इलाज नव्हता. पुढच्या ३ रात्रींचे पैसे आगाऊ भरले होते. आता झोप अनावर होत होती. शेवटी तिथे होत्या तेवढ्या रजया अंगावर घेतल्या नि झोपी गेलो.

क्रमशः