जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ७ - मंगळभूमी वादी रम

पेट्राच्या अद्भुतनगरीचा अनुभव घेतल्यानंतर माझ्या जॉर्डनच्या सहलीचा पुढचा आणि शेवटचा टप्पा होता वादी रम. पेट्राच्या दक्षिणेकडे असलेले, लाल-पिवळ्या वालुकाश्माच्या डोंगरांसाठी प्रसिद्ध असलेले वाळवंट म्हणजे वादी रम. ‘डेझर्ट कॅम्पिंग’ साठी ही जागा प्रसिद्ध आहे. इथल्या एका कॅम्प मध्ये मी डेझर्ट सफारी आणि एका रात्रीच्या मुक्कामाचे आरक्षण केले होते. मुथूचा त्या दिवसाचा ठरलेला असा काही कार्यक्रम नव्हता. तोही माझ्यासोबत यायला तयार झाला. दास कुटुंबीय मात्र या वेळी माझ्यासोबत नव्हते. पेट्रा मधेच आणखी एक दिवस घालवायचे त्यांनी आधीच ठरवले होते. मग मी आणि मुथू सालेहच्या गाडीतून वादी रमकडे निघालो. 

वादी रमचे विलोभनीय भूदृष्य 
पेट्राचा काहीसा उंचावरचा भाग उतरून आमची गाडी पुन्हा सपाट वाळवंटी प्रदेशात आली. लाल वालुकाश्माचे डोंगर अधून-मधून दिसत होतेच. वातावरण प्रसन्न होते. मधूनच येणाऱ्या वाऱ्याच्या झोतावर लाल वाळूचे लोट हवेत झेपावत होते. खडकांच्या आश्रयाने उगवलेली खुरटी झुडपे त्या वाळूच्या लोटांकडे बघत कुत्सितपणे हसत होती. अशी कित्येक वाळूची वादळे त्या झुडपांनी झेलली असतील. हे किरकोळ लोट म्हणजे वाळवंटाच्या बाललीलाच! वादी रमचा हा परिसर तिथल्या वैशिष्ट्यपूर्ण भू-रचनेमुळे संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित केलेला आहे. प्राचीन काळापासून इथे बेड्यूईन लोकांचे वास्तव्य आहे. हे लोक भटकी आणि विमुक्त जीवनशैली जगतात. या भागातील वाढत्या पर्यटनामुळे बरेचसे बेड्यूईन लोक मुख्य प्रवाहात येत आहेत. वादी रमची सारी पर्यटनव्यवस्था बेड्यूईन लोक चालवतात. इथे डेझर्ट कॅम्पिंग आणि सफारी व्यतिरिक्त प्रस्तरारोहण, आकाश निरीक्षण, बलून सफारी असे अन्य उपक्रमही चालतात. सालेहने आम्हाला वादी रमच्या संरक्षित क्षेत्राच्या प्रवेशद्वाराजवळ सोडले. तिथून पुढे जाण्यासाठी कॅम्पचा संचालक जीप घेऊन आला होता. वादी रमच्या वाळवंटी प्रदेशात साधी गाडी चालवता येणे अशक्यच. तिथे प्रवास करायला कणखर अशी जीपच हवी. कॅम्पच्या कार्यालयात नोंदणी वगैरे करून आम्ही डेझर्ट सफारीसाठी रवाना झालो.

मंगळभूमीवर प्रवेश 

वाळवंटातली धूळवाट 

वादी रमच्या ओबडधोबड रस्त्यांवरून खडखड आवाज करत आमची जीप चालली होती. रस्ता कसला? जीपच्या जाण्या-येण्याने तयार झालेली धूळवाटच म्हणा ना! आजूबाजूला वालुकाश्माचे लाल डोंगर पहारेकऱ्यांसारखे स्थितप्रज्ञपणे उभे होते. लाल वाळूतून धुरळा उडवत आमची जीप पुढे चालली होती. जसा जीपने वेग घेतला तसा हवेतला गारवा अंगाला झोंबू लागला. मी मुकाट्याने विंटर जॅकेट अंगावर चढवले. एखाद्या वाळवंटात विंटर जॅकेट घालून फिरावे लागेल असे कधी स्वप्नातही वाटले नव्हते. पण वाळू जेवढी जलद तापते तेवढीच जलद थंडही होते, हे भौगोलिक सत्य तिथे अंगाला बोचत होते. तेवढ्यात जीपच्या चालकाने गाडी एका पहाडाजवळ थांबवली. हा चालकच आजच्या दिवसासाठी आमचा मार्गदर्शक होता. कामचलाऊ का असेना, पण इंग्रजी बोलण्याचा त्यांचा प्रयत्न मला कौतुकास्पद वाटला. त्याच्याकडे होत्या तेवढ्या शब्दसंपत्तीचा उपयोग करून तो आम्हाला डोंगरातून वाहणारा एक झरा आणि त्याचे पाणी साठवण्यासाठी केलेली रचना दाखवत होता. पेट्रामध्ये पाहिली होती तशीच काहीशी रचना होती ती. त्यात मुबलक पाणी साठले होते. स्थानिक लोक हेच पाणी पिण्यासाठी वापरतात हे ऐकून मीही त्या पाण्याची चव घेऊन बघितली. पाण्याला येणारा मातीचा गंध घरच्या माठातल्या पाण्याची आठवण करून देत होता. चवीला मात्र ते फारच मचूळ होते.

तिथून पुढे आम्ही थांबलो एका बारीक रेतीच्या टेकडीपाशी. इथे वाळूत पाय ठेवताच घोट्यापर्यंत खाली रुतत होता. त्या मऊ आणि भुसभुशीत वाळूवर काही लोक सँड बोर्डिंग करत होते. सँड बोर्डिंग म्हणजे स्नो बोर्डिंगसारखाच, पण वाळूवर केला जाणारा क्रीडाप्रकार. हा प्रकार म्हणजे आपल्या तोल सावरण्याच्या क्षमतेची कमाल कसोटी असते. माझ्या स्कीईंगच्या पूर्वानुभवावरून मी सँड बोर्डिंग पासून दूरच रहायचे ठरवले. सफारीमधल्या इतरांना सँड बोर्डिंग करताना पाहणे हे एक भारीच मनोरंजन होते. तिथून पुढे आम्ही वालुकाश्माच्या एका अद्भुत आकाराजवळ थांबलो. वाऱ्यामुळे झीज होऊन त्या पहाडामध्ये एक भलेमोठे भोक तयार झाले होते. त्यामुळे भोकाच्या वरचा भाग एका पुलासारखा दिसत होता. हा अश्मसेतू म्हणजे वादी रम मधले एक प्रमुख आकर्षण होते. इथे येताच हे ठिकाण कुठेतरी पाहिल्यासारखे वाटू लागले. त्यावर हसत मुथूने त्याच्या फोनवर एका बॉलीवूड गाण्याची चित्रफित चालू केली. पाहतो तर काय, नुकत्याच प्रदर्शित झालेल्या क्रिश ३ चित्रपटातील ‘दिल तू ही बता’ गाण्याचे चित्रीकरण याच जागी झाले होते. जगाच्या एखाद्या कोपऱ्यात भारतीय पर्यटक कधी गेले नसतील, पण बॉलीवूडचे दिग्दर्शक मात्र नक्कीच पोहोचले असतील! त्या अश्मसेतूवर चढून फोटो काढण्यात आम्ही थोडा वेळ घालवला आणि पुढे निघालो.

बारीक रेतीची टेकडी 

अश्मसेतू 
वादी रमच्या वाळवंटातले इतर काही वैशिष्ट्यपूर्ण पहाड बघून आम्ही पाच वाजेपर्यंत कॅम्पवर पोहोचलो. डोंगरकड्याच्या आश्रयाने, एका खोलगट भागात तो कॅम्प उभारला होता. राहण्या-जेवण्याच्या सर्व आवश्यक त्या सुविधा तिथे उपलब्ध होत्या. सामान-सुमान तंबूमध्ये टाकून आम्ही कॅम्पच्या बाहेर सूर्यास्त बघायला म्हणून येऊन थांबलो. जसजसे सूर्यबिंब क्षितिजावर सरकू लागले तसतसा आजूबाजूच्या डोंगरकड्यांचा रंग बदलू लागला. लालबुंद झालेल्या सूर्याच्या प्रभेने ते डोंगर आणि त्याखालची वाळू अक्षरशः चमकू लागली. त्या काही क्षणांसाठी तिथले भूदृश्य म्हणजे मंगळाचा पृष्ठभाग वाटत होता. मंत्रमुग्ध होऊन आम्ही सारे निसर्गाची किमया पाहत होतो. माझ्या कॅमेराला तर जराही उसंत नव्हती. काही मिनिटांतच तो निसर्गाचा अद्भुत खेळ संपला आणि मिट्ट काळोखाने सारा आसमंत आपल्या कवेत घेतला. इवल्याशा चांदण्या आपणच सूर्याला पळवून लावल्याच्या आविर्भावात मिणमिण करू लागल्या. तितक्यात वाऱ्याला चेव चढला आणि त्याने आमचे उघड्यावर बसणेच नकोसे करून टाकले. 

वादी रम मधला अविस्मरणीय सूर्यास्त 

अस्ताला जाणाऱ्या सूर्याच्या प्रभेत तळपणारे डोंगर 
कॅम्पवर गरमागरम चहा स्वागताला हजर होता. दुधाशिवाय चहा घेण्याची एव्हाना सवय झाली होती. किंबहुना, दूध न घालताच चहाचा खरा स्वाद कळतो हे मनोमन पटले होते. पश्चिम आशियाई देशांत चहात चवीला लवंग आणि दालचिनी घालतात. त्यात पाव चमचा साखर घातली की मिळणारा स्वाद म्हणजे अमृततुल्यच! चहापान चालू असतानाच कॅम्पचा मुख्य संचालक तिथे आला. अस्खलित इंग्रजीतून त्याने आम्हा सर्वांचे स्वागत केले. त्या कॅम्पविषयी, वादी रमविषयी, तसेच स्थानिक संस्कृतीविषयी बरीच माहिती त्याने दिली. त्यांनतर तिथले खास वाळूखालचे ओव्हन दाखवण्यात आले. वाळूत खड्डा खणून त्यात पेटते निखारे ठेवले जातात. त्यावर लोखंडी जाळीच्या आधारे भाज्या किंवा मांस ठेवले जाते. मग सारे अन्न खोलगट झाकणाने झाकून त्यावर पुन्हा वाळू ओतली जाते. निखाऱ्यांच्या उष्णतेने सगळी वाळू तापते, व त्या उष्णतेवर अन्न शिजते. तिथल्या वाळूची आणि निखाऱ्यांची विशिष्ट चव अन्नाला येते. स्थानिकांची ही स्वयंपाकाची अभिनव पद्धत बघून आम्ही हरखून गेलो होतो.

कॅम्पमधली रम्य संध्याकाळ 

वाळूतला ओव्हन 

तेवढ्यात काही स्थानिक लोक तुणतुण्यासारखे वाद्य घेऊन तिथे आले व तिथले लोकसंगीत पेश करू लागले. त्या वाद्याच्या सुरावटीवर आम्ही सगळ्यांनीच ठेका धरला. तासभर गाणे-बजावणे झाल्यावर सारे जेवणासाठी सज्ज झालो. आश्चर्य म्हणजे खास शाकाहारी लोकांसाठी राजम्याचा पदार्थ केला होता. त्याबरोबर हम्मस, पिटा ब्रेड वगैरे नेहमीचे पदार्थ होतेच. शिवाय वाळूच्या ओव्हनमध्ये शिजलेल्या भाज्याही होत्या. जॉर्डनच्या सहलीतल्या शेवटच्या रात्री इतके चविष्ट भोजन मिळाल्याने मी खुश होतो. जेवण झाल्यानंतर शतपावली म्हणून थोडे बाहेर पडलो. बाहेरची थंडी मी म्हणत होती. अंगणात प्राजक्ताचा सडा पडावा तसे आकाश असंख्य प्रकाश-पुंजक्यांनी भरून गेले होते. इतके प्रकाशमान नभोमंडळ मी पहिल्यांदाच पाहत होतो. मी आणि मुथू रात्रीच्या आकाशाचे फोटो काढायचा प्रयत्न करू लागलो. पण बोचऱ्या वाऱ्यापुढे आम्ही हार मानली आणि कॅम्पवर परतलो. तंबूमध्ये प्रत्येकाला गादीएवढ्या जाड अशा २ रजया दिलेल्या होत्या. त्या बघून हायसं वाटलं. दिवसभराच्या थकव्याने झोप कधी लागली कळलंच नाही.

सकाळी साडेसातच्या सुमारास नाश्ता वगैरे करून आम्ही कॅम्प सोडला. वादी रमच्या प्रवेशद्वारापाशी सालेह गाडी घेऊन हजरच होता. हा जॉर्डन मधला शेवटचा दिवस होता. सहल संपत आली याचे दुःख तर होतेच, पण घरी जायची ओढही लागली होती. वाटेत पेट्रामध्ये दास कुटुंबियांना पिक-अप केले आणि विमानतळाच्या दिशेने प्रस्थान केले. जेराश, पेट्रा, आणि मदाबामधले ऐतिहासिक अवशेष, मृत समुद्र आणि वादी रममधली भौगोलिक आश्चर्ये, एका वेगळ्या संस्कृतीशी जवळून झालेला परिचय, अनपेक्षितपणे भेटलेले लोक आणि त्यांच्याशी जुळलेले मैत्रीचे बंध अशा अनोख्या अनुभवांनी भरलेली जॉर्डनची सहल निश्चितच एक अविस्मरणीय ठेवा आहे. दुनियादारी करण्यात काही नशा असेल तर ती हीच!

अशा रौद्र सौंदर्याला अलविदा करताना मन भरून आले होते 

समाप्त

जॉर्डनच्या वाळवंटात - भाग ६ - अद्भुतनगरी पेट्रा

जॉर्डनमधील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ म्हणजे पेट्रा. जॉर्डनच्या नैऋत्य भागातील जाबाल-अल-मदबाह या डोंगररांगेत स्थित असलेले हे प्राचीन शहर rock-cut architecture चा उत्तम नमुना आहे. अखंड वालुकाश्माच्या पहाडात कोरून बनवलेल्या गुहा, मंदिरे, आणि थडगी म्हणजे एक अद्भुत विश्व आहे. ईसवी सन पूर्व तिसऱ्या शतकात नबातिअन साम्राज्याच्या काळात हे शहर वसवले गेले. नबातिअन लोक म्हणजे एक भटकी जमात होती. दमास्कस ते गिझा या व्यापारी मार्गावर त्यांची अर्थव्यवस्था अवलंबून होती. पेट्राचे स्थान या मार्गावर अतिशय मोक्याच्या ठिकाणी होते. तेथील वालुकाश्मात पाणी साठवण्याची अभिनव पद्धत विकसित करून नबातिअन लोकांनी पेट्रा शहर नावारूपास आणले. नबातिअन साम्राज्याच्या पाडावानंतर हे शहर ग्रीक व कालांतराने रोमन साम्राज्याच्या अधिपत्याखाली आले. ईसवी सन ३६३ मध्ये एका मोठ्या भूकंपात या शहराची बरीच पडझड झाली. त्यात जलसंधारणाच्या महत्त्वाच्या सोई नष्ट झाल्याने इथली लोकवस्ती उत्तरोत्तर कमी होत गेली. दुर्गम वाळवंटात दडून राहिलेले या शहराचे अवशेष १८१२ साली एका स्विस अभ्यासकाला सापडले. त्यानंतर झालेल्या संशोधनात पेट्रा विषयी बरीच उपयुक्त माहिती जगाला ज्ञात झाली. या जागेचे एकूण ऐतिहासिक महत्त्व लक्षात घेऊन १९८५ साली युनेस्कोने त्यास जागतिक वारसा स्थळाचा दर्जा बहाल केला. ‘मानवाच्या सांस्कृतिक इतिहासातील सर्वाधिक महत्त्वपूर्ण जागांपैकी एक’ असे युनेस्कोने पेट्राचे वर्णन केले आहे.

पेट्रामधील भग्नावशेष 
अम्मान ते पेट्रा अंतर आहे सुमारे ३०० किमी. पहाटे सहालाच आम्ही अम्मान सोडले. दिवस उजाडायच्या आत आमची गाडी शहराच्या बाहेर पडली होती. फारशी वळणे नसलेला तो हायवे विस्तीर्ण वाळवंटी प्रदेशातून जात होता. मधेच एखादे गाव लागे. तेवढ्यापुरती हिरवळ आणि लोकवस्ती. पुढे पुन्हा वाळवंट सुरु. इतक्या रुक्ष प्रदेशात हे लोक कसे आणि का राहत असतील याचा प्रश्न मला पडला होता. जसजसे पेट्रा जवळ येऊ लागले तसतसे आजूबाजूला लाल वालुकाश्माचे पहाड दिसू लागले. गाडी आता घाट चढू लागली. वाळवंटाची जागा आता ओबडधोबड पहाड आणि खोल दऱ्या यांनी घेतली होती. साधारण १० च्या सुमारास आम्ही पेट्रा ला पोहोचलो. प्राचीन शहराच्या बाहेरच वादी मुसा हे आधुनिक शहर आहे. जागोजागी हॉटेल्स, स्मरणिका विक्रेते, उपहारगृहे, आणि उत्साही पर्यटक असे वादी मुसाचे रूप होते. हॉटेलवर सामान टाकून आम्ही पेट्राच्या दिशेने निघालो.

'सिक' 
प्रवेशद्वारातून आत शिरताच एका वेगळ्याच दुनियेत आल्याची जाणीव झाली. पायवाटेच्या दोन्ही बाजूंनी कमी-अधिक उंचीचे पहाड दिसत होते. काही पहाडांत अर्धवट खोदलेल्या गुहा दिसत होत्या. काही अंतर पुढे जाताच ती पायवाट एका अरुंद खिंडारात शिरली. या वाटेस ‘सिक’ असे म्हणतात. सुरुवातीला प्रशस्त वाटणारे ते खिंडार हळूहळू आक्रसताना दिसू लागले. घराच्या भिंतीसारख्या वाटणाऱ्या त्या सरळसोट उभ्या कड्यांवर काही पडझड झालेली शिल्पे दिसत होती. काही ठिकाणी पाणी साठवण्याची व्यवस्था दिसत होती. बाहेर तळपते उन असले तरी आतमध्ये मात्र सुखद गारवा होता. एका ठिकाणी पायवाट जरा अधिकच अरुंद झाली. जणू एखाद्या बोगद्यात असावे तसे वाटत होते. काही पावले पुढे जाताच त्या खिंडीच्या कपारीतून ‘अल खजनेह’ (the treasury) या पेट्रामधील सर्वात विलक्षण अशा वास्तूचे एक अंग दृष्टीस पडले. जसजसे पुढे जाऊ तसतसा त्या भव्य वस्तूचा आवाका लक्षात येऊ लागला. एखाद्या रंगमंचावरचा पडदा अलगद उलगडत जावा आणि व्यासपीठावरच्या नेपथ्याने डोळे दिपून जावेत असे वाटत होते. ‘सिक’ मधून बाहेर पडून आम्ही आता ‘अल खजनेह’ च्या समोरील लहानशा मैदानात उभे राहून त्या वस्तूच्या सौंदर्याचा आस्वाद घेत होतो. ‘अल खजनेह’ म्हणजे अखंड वालुकाश्मात कोरलेला एक मकबरा आहे. त्याचे प्रवेशद्वार सुंदर कोरीवकामाने सजवलेले आहे. ग्रीकांच्या अमलाखाली ईसवी सनाच्या पहिल्या शतकात या वस्तूची निर्मिती झाली. नबातिअन लोकांचे वालुकाश्म खोदून स्थापत्यशिल्पे घडवण्याचे कौशल्य आणि ग्रीक लोकांची सौंदर्यदृष्टी यांचा सुरेख संगम या वास्तूमध्ये दिसून येतो. तीन बाजूंनी डोंगरांनी वेढलेले स्थान असल्याने ‘अल खजनेह’ अजूनही बऱ्यापैकी सुस्थितीत आहे. ‘अल खजनेह’ च्या प्रवेशद्वारावरील दुसऱ्या स्तराच्या मधोमध एक कलशसदृश रचना दिसते. प्राचीन काळातले चोर लुटारू त्या कलशात आपली लूट लपवत असत अशी आख्यायिका बराच काळ प्रचलित होती. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला स्थानिक लोकांनी बंदुकीच्या गोळ्या झाडून तो कलश फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो कलश भरीव असल्याचे लक्षात येताच सगळ्यांची निराशा झाली. त्या बंदुकीच्या गोळ्यांच्या खुणा आजही त्या कलशावर दिसतात.

'सिक' च्या कपारीतून दिसलेले दृश्य 
‘अल खजनेह’ च्या भव्य वास्तूचे छायाचित्रण करून आम्ही पुढे निघालो. नीलादी आणि त्यांचा कॅमेरा हे उत्साही सोबती होतेच. भारतातली ऐतिहासिक स्मारके आणि त्यांची अवस्था यावर आमची चर्चा सुरु होती. इतक्यात एक तरुण दक्षिण भारतीय उच्चाराच्या इंग्रजीत फोटो काढण्याची विनंती करत आमच्यासमोर आला. फोटो काढता-काढता ओळख-पाळख झाली. मूळचा बंगलोरचा असलेला, मात्र सध्या दुबईत स्थायिक असलेला मुथू क्रिष्णा त्याचा भलामोठा कॅमेरा आणि ट्रायपॉड घेऊन पेट्राच्या अवशेषांत छायाचित्रण करायला आला होता. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या मुथूसोबत माझी चांगली मैत्री झाली. नीलादीसुद्धा आणखी एक फोटोग्राफर भेटल्याने खुश झाल्या. मग मी, नीलादी, आणि मुथू असे तीन वेगवेगळ्या कौशल्यपातळीवरचे, मात्र एकसमान उत्सुकता-पातळीवरचे भारतीय फोटोग्राफर पेट्राच्या अद्भुतनगरीत फिरू लागलो.'अल खजनेह' च्या प्रवेशद्वारावरील कोरीवकाम   
पेट्रामधले पुढचे महत्त्वाचे स्थान म्हणजे ग्रीक शैलीत बांधलेले मंदिर. या मंदिराचे खांब जेराशमध्ये सापडलेल्या खांबांसारखे दिसत होते. मंदिराची मात्र बरीच पडझड झाली होती. मंदिराच्या जवळच उताराचा उपयोग करून घेत रोमन शैलीत बांधलेले सभागृहही दिसत होते. त्याच्या समोरच वालुकाश्मात कोरलेल्या असंख्य गुहा दिसत होत्या. त्यांची प्रवेशद्वारे ‘अल खजनेह’ च्या प्रवेशद्वाराचा लहान अवतार वाटत होती. या गुहा म्हणजे काही कमी श्रीमंत अशा लोकांची थडगी होती. त्यांपैकी काही गुहांमध्ये जाऊन आही थोडेफार छायाचित्रण केले. आता सूर्य मावळतीकडे झुकू लागला होता. त्याच्या सोनेरी किरणांत पेट्रा मधला वालुकाश्म फारच मोहक दिसत होता. तिथे किती फोटो काढू आणि किती नको असे होत होते. अखेरीस तिथल्या सुरक्षारक्षकाने हाकलायला सुरुवात केल्यावर आम्ही छायाचित्रण आटोपते घेतले व हॉटेलवर परतलो.

ग्रीक मंदिराचे भग्नावशेष 
क्रमशः