विविधरंगी बस्तर - भाग ३ - मेंद्री घुमड धबधबा आणि बस्तरचे पारंपरिक भोजन

चित्रकोट धबधब्याचे रौद्रसौंदर्य अनुभवून आम्ही आसपासच्या काही जागा बघायला बाहेर पडलो. बस्तर जिल्हा वनसंपदेसोबतच अनेक लहानमोठ्या धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. आमच्या यादीतली पहिली जागा होती मेंद्री घुमड धबधबा. चित्रकोटवरून बस निघाली आणि बस्तरच्या अनवट रांगड्या प्रदेशातून आमचा प्रवास सुरु झाला. सगळीकडे भातशेती डवरलेली दिसत होती. रोपांची पाती दुपारच्या उन्हात चमकत होती. त्या नाजूक पोपटी रोपांमध्ये जणू अवघ्या विश्वाची क्षुधातृप्ती सामावली होती. आकाशात एखाद-दुसरा काळा ढग उगीच वाट चुकल्यागत रेंगाळलेला दिसत होता. 

डवरलेली भातशेती 

अर्ध्या तासातच आम्ही एका पठारावर येऊन पोहोचलो. तिथे इतरही काही गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. पण धबधबा काही कुठे दिसत नव्हता. लांब कुठेतरी लोकं जमलेली दिसत होती. त्यापुढे दरी आणि तिथेच धबधबा असावा बहुतेक. आम्ही त्या दिशेने चालत पुढे निघालो. थोडं अंतर जाताच वाऱ्याचा वेग वाढलेला जाणवला. हा नक्कीच दरीतून उसळून वर येणारा वारा. आता उत्सुकता अजूनच ताणली जात होती. पाचेक मिनिटं पुढे गेलो आणि एक विस्तीर्ण दरी नजरेस पडली. नजर जाईल तिथपर्यंत घनदाट झाडीने ती दरी व्यापलेली होती. दरीच्या डाव्या कोपऱ्यातून एक पांढरीशुभ धार खाली कोसळताना दिसत होती. पठाराच्या खडकाचा तांबूस रंग आणि दाट वनश्रीचा गडद हिरवा रंग त्या शुभ्र फेसाळत्या धारेला उठाव देत होते. वाऱ्याच्या वेगाने मधेच ती धार विस्कळत आणि हेंदकाळत होती. जणू धारेतले ते थेंब वाऱ्याच्या मदतीने रोलरकोस्टर राईडचा अनुभव घेत होते. कोसळणारे पाणी, मग ते कोणत्याही स्वरूपात असो, मनाला एक वेगळाच आनंद देते. कुठे चित्रकोट प्रपाताचा एखाद्या तपस्वीच्या मुखातून निघालेल्या ओंकारागत भासणारा प्रचंड ध्रोंकार, तर कुठे लहानग्या मुलीने मांडलेल्या भातुकलीच्या खेळासारखा वाटणारा मेंद्री घुमडचा प्रवाह. रूप वेगळे, आकार वेगळा, पण मनात उमटणारे तरंग तेच! वाहते पाणी बघून मेंदूत काही ठराविक संप्रेरके निर्माण होत असावीत कदाचित. असो. त्या जागी निवांत बसावं आणि नुसता निसर्गाचा अवखळ खेळ पहात रहावं असं वाटत होतं. पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच असावं बहुतेक. आतापर्यंत वाट चुकून रेंगाळलेले वाटणारे काळे ढग आता मेंढरांच्या कळपासारखे आकाशात गर्दी करू लागले. दरीतून घोंघावणारा वारा त्यांना अजूनच प्रोत्साहन देऊ लागला. वातावरणाचा बदलता नूर पाहून आम्ही घाईघाईत तिथे दोन-चार फोटो काढले आणि बसच्या दिशेने धावलो.

मेंद्री घुमड धबधबा 
धबधब्यासमोरची विस्तीर्ण दरी 

बाजारातले भाज्यांचे ठेले 
रस्त्यात एका ठिकाणी बाजार भरलेला दिसला. दसऱ्याचा दिवस असल्याने बाजार चांगलाच फुललेला दिसत होता. जरा चक्कर मारू म्हणून खाली उतरलो. पाऊस भुरभुरत होता. पण भिजण्याइतका जोर नव्हता. बरेच भज्यांचे ठेले होते. गरमागरम भज्यांचा वास भूक चाळवत होता. एकीकडे सुक्या मासळीचे ठेले होते. तर पलीकडे रानभाज्या विकायला ठेवल्या होत्या. फळफलावळ आणि नेहमीच्या भाज्या वगैरे होत्याच. इथल्या रानातले मुख्य उत्पन्न म्हणजे तेंदूपत्ता आणि महुआ. महुआच्या फुलांपासून दारूही बनवतात. मात्र त्याचा सीझन उन्हाळ्यात असतो. एका ठेल्यावर वाळवलेली महुआची फुलेही दिसत होती. खजूर किंवा मनुकांसारखी त्यांची चव होती. एका कोपऱ्यात काही लोक मोठ्या हंड्यांमध्ये काहीतरी पिण्याचा पदार्थ विकत होते. बघतो तर ती होती सल्फी – म्हणजे ताडाच्या पानांपासून बनवलेली दारू. उत्सुकतेपोटी थोडी चव घेऊन पाहिली. आंबट-गोड आणि थोडीशी झणझणीत अशी काहीशी चव होती. विदेशी मद्याला सरावलेल्या आपल्या जिभेला ही स्थानिक चव रुचण्याची शक्यता तशी कमीच. पलीकडच्या एका बाईकडे भातापासून बनवलेली बियर होती. हा तर प्रकार अजूनच विचित्र होता. आंबट दह्यामध्ये भाताची पेज मिसळावी तशी काहीशी त्याची चव होती. याने पोट एकदम साफ होतं म्हणे. पोट साफ करण्यासाठी जिभेवर एवढे अत्याचार करायची आमची अजिबातच इच्छा नव्हती. एकंदरीत, स्थानिक अपेयपान आम्हा कोणालाच फारसे रुचले नाही. बाजारात एका ठिकाणी काही तरुण कसलासा पारंपरिक कार्यक्रम सादर करत होते. ते बघत आम्ही थोडा वेळ रेंगाळलो आणि बसकडे निघालो.   

बस्तरच्या पारंपारिक भोजनाचा आस्वाद घेताना 

कॅम्पसाईटवर परतलो तेव्हा दोन वाजत आले होते. जेवण तयारच होते. पारंपरिक पद्धतीचे भोजन अनुभवायला आम्ही फारच उत्सुक होतो. सगळेजण मनोऱ्याच्या गच्चीवर जमलो. स्थानिक आचारी पानांच्या द्रोणातून एक-एक पदार्थ वाढू लागले. बस्तर मधला आहार हा मुख्यत्वे मांसाहारी आहे. स्थानिक आदिवासींना रानातला कोणताही प्राणी व्यर्ज नाही. थोडीफार भात आणि काही इतर धान्यांची शेती होते. त्यावर आधारीत काही पदार्थ त्यांच्या आहारात बघायला मिळतात. आजच्या मेनूमध्ये बांबूच्या मोडांची करी, पालकाची भाजी, डाळ, आणि भात असे त्यातल्या त्यात शहरी लोकांना खायला जमतील असे पदार्थ होते. शिवाय एक चिंचेची आंबट-गोड चटणीही होती. आम्ही जेवणावर मस्त ताव मारला. सगळेच पदार्थ चविष्ट होते. बांबूच्या मोडांची करी तर फारच छान होती. थोड्या वेळात एक मुलगी एक लाल रंगाची अजून एक चटणी घेऊन आली. हीच ती बस्तर मधली प्रसिद्ध लाल मुंग्यांची चटणी. सुरुवातीला माझा विश्वासच बसेना. मग जीतने चक्क रानातून शोधून आणलेले मुंग्यांचे घरटेच दाखवले. असंख्य मुंग्या आणि त्यांची अंडी एका पानावर उन्हात वाळवत स्वयंपाकघराच्या मागच्या बाजूस ठेवलेली होती. ती संध्याकाळच्या चटणीची पूर्वतयारी असावी. शाकाहारी असल्याने मी चटणी खाऊन बघण्याचा प्रश्नच नव्हता. इतरांनी मात्र मनसोक्त आस्वाद घेतला.

वाळवायला ठेवलेल्या लाल मुंग्या 
जेवण झाल्यावर आम्ही थोडा वेळ विसावलो. मग आवरून जगदालपूरकडे निघालो. पुढचा कार्यक्रम होता बस्तर मधला पारंपरिक दसरा बघणे. 

क्रमश: 

विविधरंगी बस्तर - भाग २ - चित्रकोट जलप्रपात

पक्ष्यांच्या किलबिलाटाने पहाटे पावणेसहालाच जाग आली. पहाटेचा गारवा आल्हाददायक वाटत होता. तंबूच्या बाहेर आलो आणि थबकलोच. तो महाकाय चित्रकोट धबधबा थेट समोरच कोसळत होता. रात्रीच्या अंधारात त्याचा केवळ आवाज ऐकू येत होता. आता पहाटेच्या मंद प्रकाशात त्याचे महाकाय रूप डोळ्यांसमोर उभे होते. दोन क्षण स्तब्धपणे मी निव्वळ समोरचे दृश्य पहात उभा राहिलो. जवळपास दीड किमी रुंदीचे इरावती नदीचे पात्र, त्याला आलेला काहीसा अंतर्वक्र आकार, आणि त्यावरून धबाबा कोसळणारे फेसाळते पाणी. मंद धुक्यातून पूर्व क्षितिजावर उगवलेला सहस्ररश्मी, त्याच्या केशरी प्रभेत न्हालेला आसमंत, पहाटेची निश्चल शांतता, आणि तिला पुरून उरणारा त्या प्रपाताचा ध्रोंकार! सारे विलक्षणच होते. मी ताबडतोब कॅमेरा काढला आणि तो क्षण बंदिस्त केला. अर्थात, कॅमेऱ्याच्या सेन्सरवर उमटलेले ते चित्र आणि त्या क्षणाची अनुभूती यात जमीन-अस्मानाचे अंतर होते. असो. 

पहाटेच्या केशरी प्रकाशात चित्रकोट धबधबा 

कॅम्पसाईटच्या बाजूलाच एक निरीक्षण मनोरा उभारलेला होता. त्याच्या खाली दोन-चार खोल्या, स्वच्छतागृह आणि स्वयंपाकाची व्यवस्था उपलब्ध होती. खालच्या खोल्या मुक्कामासाठी उपलब्ध व्हायला अजून वेळ होता. मुख्य म्हणजे अजून विजेची व्यवस्था झालेली नव्हती. जीतने मोठ्या कल्पकतेने ती जागा कॅम्पसाईट साठी निवडली होती. मनोऱ्याच्या गच्चीवरून तर धबधब्याचे दृश्य अधिकच मोहक दिसत होते. एक-एक करत सारी मंडळी उठली. तेवढ्यात चहा आलाच. गच्चीवरून धबधबा न्याहाळत आम्ही गरम चहाचा आस्वाद घेत होतो. एकीकडे जीत बस्तरची आणि लोकजीवनाची माहिती देत होता. जीत मूळचा जगदालपूरचा. उच्च शिक्षण, मग मोठ्या शहरात नोकरी, आणि देशभर भटकंती करून तो आपल्या मूळ शहरात परतला होता. बस्तरचे अनवट सौंदर्य जगासमोर आणण्यासाठी त्याने Unexplored Bastar नामक कंपनी सुरु केली. पर्यटकांना त्यांचा पसंतीनुसार रूपरेषा बनवून देण्यासोबतच स्थानिक लोकांना रोजगार, त्यांच्या संस्कृतीचे जतन, आणि पर्यावरण संवर्धन असा व्यापक हेतू डोळ्यांसमोर ठेऊन तो काम करतो. सध्या तरी सुरुवातीचे दिवस आहेत. पण एकंदरीत मिळणारा प्रतिसाद उत्तम आहे. त्याच्या धाडसाचे आणि ध्येयासक्तीचे आम्हा सगळ्यांनाच फार कौतुक वाटले. एव्हाना आठ वाजत आले होते. नाश्ता तयार व्हायला थोडा वेळ लागणार होता. त्यामुळे आधीच धबधब्यावर जाऊन यायचे आम्ही ठरवले. 

मनोऱ्याच्या गच्चीवर

मनोऱ्याच्या मागच्या बाजूने एक वाट खाली उतरत होती. वाट कसली, चांगला बांधलेला जिनाच होता तो. तिथून खाली उतरून आम्ही नदीच्या पात्राजवळ पोहोचलो. काठाने वाढलेल्या झाडीतून वाट काढत प्रवाहाच्या डाव्या अंगाने धबधब्याजवळ जाऊ लागलो. पाण्याचा प्रवाह कमी असतो तेव्हा त्या वाटेने चक्क मुख्य धबधब्याच्या मागे जाता येते. मात्र सध्या प्रवाह चांगलाच तेजीत होता. शिवाय पुढचे दगड निसरडे झाले होते. त्यामुळे ठराविक अंतरापर्यंतच जायला मुभा होती. झाडीतून बाहेर पडलो तसे नदीचे पात्र नजरेस पडले. तिथे एक स्थानिक तरुण लहानशी होडी घेऊन उभा होता. होडीतून पात्राच्या मध्यात जाऊन समोरासमोर धबधबा पाहण्यासाठी आम्ही सारेच उत्सुक होतो. सगळ्यांनी लगेचच त्याच्यासमोर रांग लावली. तिथे गर्दी झालेली बघून आम्ही दोन-तीन जणांनी थोडे आसपास फिरून यायचे ठरवले. त्याच वाटेने आम्ही पुढे निघालो. 

धबधब्याच्या समोर घेऊन जाणारा नावाडी 

चिंचोळी वाट 
आता डावीकडे उंच कडा आणि उजवीकडे नदीचे पात्र अशा चिंचोळ्या पट्ट्यातून ती वाट जात होती. कड्याच्या पोटात काही गुहा खोदलेल्या दिसत होत्या. त्यात काही शिवलिंगे आणि कोरीव मूर्तीही दिसत होत्या. कधी काळी इथे एखादे मंदिर असावे. काही अंतरातच ती वाट प्रचंड शिळांच्या ढिगाऱ्यात हरवली. पुढे जाणे धोकादायक होते. आम्ही तिथेच थांबलो. धबधब्याचा ध्रोंकार आता कानांवर आदळत होता. प्रवाहाची एक लहानशी धार कुठूनतरी वेगळी होऊन डावीकडच्या कड्यावरून समोरच्या दगडावर कोसळत होती. त्याचे तुषार अंगावर उडत होते. त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या शिळा, बाजूला विखुरलेले कोरीव भग्नावशेष, आणि समोरचा तो महाकाय जलप्रपात त्या जागेला एक अद्भुत आयाम देत होते. तिथे थोडेफार फोटो काढून मी काही क्षण ती जागा अनुभवत शांत उभा राहिलो. समोर कोसळणारी ती धार खुणावत होती. फार विचार न करता मी सरळ त्या धारेखाली जाऊन बसलो. थंड पाणी मस्तकावर आदळले आणि एक शिरशिरी देहात जाणवली. क्षणभर कुडकुडलो, पण लगेचच त्या तापमानाला शरीर सरावले, आणि मन त्या प्रवाहाशी जणू एकरूप झाले. ब्रह्मानंद म्हणतात तो हाच का? 

अद्भुतरम्य जागा 
किती वेळ मी तिथे बसलो होतो देव जाणे! माझी तंद्री भंगली तेव्हा कळले की सोबतचे दोघे कधीच मागे गेले होते आणि कोणीतरी लांबून मला हाका मारत होते. चरफडतच मी उठलो आणि कॅम्पसाईटवर परतलो. नाश्ता तयार होता. खास बस्तर पद्धतीचा दालवडा आणि चटणी यांवर आम्ही ताव मारला. सोबतीला चहाची अजून एक फेरी होतीच. आता उन्हं वर आली होती. धबधब्याच्या बाजूने काहीसे फिकट इंद्रधनुष्य तयार झाले होते. दिवसाच्या प्रत्येक वेळी तो धबधबा आपल्या सौंदर्याची वेगळी छटा दाखवत होता. त्याचे किती फोटो काढू आणि किती नको असे होत होते. अखेरीस जीत म्हणाला, अजून तीन-चार धबधबे बाकी आहेत बघायचे. कॅमेऱ्याची बॅटरी आणि मनाचा उत्साह जपून ठेवा! तरी मी अजून थोडे फोटो काढलेच. सगळ्यांचा नाश्ता आणि आन्हिकं उरकल्यावर आम्ही आसपासच्या इतर काही जागा पाहण्यासाठी बाहेर पडलो.  



उन्हं वर आल्यावर चकाकणारे धबधब्याचे पाणी 
क्रमश: 

विविधरंगी बस्तर - भाग १ - बस्तरची तोंडओळख

काही दिवसांपूर्वीच “न्यूटन” चित्रपट पाहिला होता. त्यातली नाट्यमयता आणि कलाकारांचा अभिनय अप्रतिमच. पण त्याहूनही मनात भरलं होतं ते छत्तीसगढ मधल्या दुर्गम प्रदेशातलं अरण्य. रानावनाची ओढ पहिल्यापासूनच. त्यात फारसा परिचित नसलेला प्रदेश आणि अनवट निसर्गासोबत तोंडी लावायला मिळणारं अद्भुत लोकजीवन पाहून मी मोठ्या उत्सुकतेने छत्तीसगढला जाण्यासाठी माहिती शोधू लागलो. गुगलवर तर माओवाद्यांनी केलेले हल्ले आणि त्यात मारले गेलेले पोलीस किंवा नागरिक याव्यतिरिक्त काही दिसतच नव्हतं. आधीच दुर्गम प्रदेश आणि त्यात असे असुरक्षित वातावरण. त्यामुळे एकट्याने प्रवास करणे जरा अवघडच होणार होते. योगायोगाने एका माहितीतल्या ग्रुपने पुढच्याच महिन्यात चार दिवसांची बस्तर ट्रीप आयोजित केली असल्याचे फेसबुकवर वाचनात आले. सुट्टीचं आणि पैशाचं गणित जुळतंय हे बघून मी ताबडतोब ट्रीप बुक करून टाकली.

बस्तर जिल्ह्याचे स्थान 
बस्तर म्हणजे दक्षिण-पूर्व छत्तीसगढमधला ओदिशाच्या सीमेला लागून असलेला जिल्हा. दख्खनचे पठार आणि पूर्व घाट यांच्या सीमेवर असलेला बस्तर जिल्हा समुद्रसपाटीपासून सुमारे ६०० मीटर उंचीवर वसलेला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात हे एक संस्थान होते. सध्याचे बस्तर, दांतेवाडा आणि कांकड असे तीन जिल्हे मिळून या संस्थानाचा पसारा होता. साधारण १५०००० लोकवस्ती असलेले जगदालपूर आज जिल्ह्याचे मुख्यालय आहे. जिल्ह्यातली ७०% लोकसंख्या आदिवासी असून गोंड, भरता, आणि मारिया या त्यांपैकी मुख्य जमाती होत. बऱ्याच जमाती अजूनही सुदूर घनदाट अरण्यांत राहतात आणि बाहेरील लोकांशी फारशा मिसळत नाहीत. पूर्वापार चालत आलेल्या त्यांच्या प्रथा-परंपरा अजूनही टिकून आहेत. बस्तरमध्ये दसऱ्याच्या दिवशी होणारा लोकोत्सव हा सुप्रसिद्ध आहे. आमची ट्रीप दसऱ्याच्या सुमारासच आयोजित केलेली होती. या वर्षीचा परतीचा पाऊस रेंगाळला होता. नवरात्र सुरु झाले तरी अधूनमधून सरी येत होत्या. त्यामुळे कोसळणारे धबधबे आणि हिरव्यागार वनराईसोबत एक वेगळा सांस्कृतिक अनुभव मिळणार या विचाराने मी भलत्याच उत्साहात होतो. 

यथावकाश प्रवासाचा दिवस उजाडला. संध्याकाळी साडेआठला सुटणाऱ्या समरसता एक्स्प्रेसचे आरक्षण होते. यावेळी ग्रुप केवळ दहा जणांचा होता. सगळ्यांशी ओळखी-पाळखी झाल्या आणि आमचा प्रवास सुरु झाला. मुंबई ते रायपूर म्हणजे सुमारे अठरा तासांचा प्रवास. एवढा प्रवास, तोही स्लीपर कोचमधून करायचा म्हणजे मी थोडा धास्तावलोच होतो. पण ऑफ सिझन असल्याने गाडीला विशेष गर्दी नव्हती. दिवसभरच्या दगदगीने मी शिणलो होतो. बर्थ मिळताच आडवा झालो. स्लीपर कोच मधल्या कोलाहलातली झोप म्हणजे यथा-तथाच. थोडाफार वेळ डोळा लागला तरी खूप. म्हणता म्हणता गाडी रायपूरला पोहोचली. भारतीय रेल्वेच्या वक्तशीरपणाचा मान राखत गाडीने चांगला दीडेक तास उशीर केला होता. लांबच्या प्रवासाने आम्ही सगळेच कंटाळले होतो. त्यात पावसाची चिन्हं दिसत होती. त्या उष्ण आणि दमट हवेत जीव नकोसा होत होता. इथून पुढे बस्तरमधली एक स्थानिक पर्यटन कंपनी आमची व्यवस्था बघणार होती. त्या कंपनीचे प्रतिनिधी पार्किंगच्या जागेत आमची वाट बघत थांबले होते. आम्ही येताच त्यांनी गळ्यात हार आणि कपाळाला गंध लावून आमचे जंगी स्वागत केले. इतक्या प्रसन्न स्वागताने आमचा शिणवटा कुठच्या कुठे पळाला! मोठ्या उत्साहात आम्ही बसमध्ये बसलो. 

रायपूरमध्ये झालेले जंगी स्वागत 

आमचा पहिला मुक्काम होता चित्रकोट धबधबा. रायपूरहून तिथले अंतर होते सात तासांचे! थोडक्यात प्रवास अजून संपला नव्हताच! मजा-मस्ती करत आमची गाडी चित्रकोटकडे निघाली. वाटेत थोडा वेळ जेवणासाठी थांबून आम्ही पुढे रवाना झालो. अंधार पडल्याने आजूबाजूचा निसर्ग काही अनुभवता येत नव्हता. मी गुमान कानात हेडफोन घालून झोपायचा प्रयत्न करू लागलो. निद्रादेवी काही प्रसन्न होत नव्हती. अखेरीस रात्री एकच्या सुमारास आम्ही चित्रकोट धबधब्याला पोहोचलो. बसमधून उतरलो आणि एक ओलसर गारवा अंगाला जाणवला. दूर कुठेतरी पाण्याचा प्रचंड आवाज घुमत होता. अंधारात चाचपडत आम्ही कॅम्पिंग साईटवर पोहोचलो. कंपनीचा संचालक जीत सिंग तिथे स्वागताला हजर होता. तिथल्या आदिवासी सहाय्यकांनी ढोल वाजवून आणि हातात रानफुले देऊन सगळ्यांचे स्वागत केले. इथल्या लोकांनी “अतिथी देवो भव” फारच मनावर घेतलेले दिसत होते. त्यांच्या स्वागताच्या पद्धती कितीही छान असल्या तरी त्यांना छान म्हणण्याइतकेही त्राण आता अंगात उरले नव्हते. आता मात्र झोप अनावर होत होती. एकदाची तंबूत बॅग टाकली आणि निद्राधीन झालो.            
क्रमशः 

तांबडी सुर्ला ट्रेक - भाग २ - धबधबा आणि महादेव मंदिर

आता चढ सुरु झाला. सकाळी हवाहवासा वाटणारा ओलसर गारवा आता नकोशा दमट उष्म्यात बदलला होता. चार पावलांवर दम लागत होता. चढण फार तीव्र नव्हती. आजूबाजूची गर्द वनराई ती चढण जरा सुसह्य करत होती. आधीच ढगाळ हवा, त्यात उंच झाडांचा विस्तारलेला पर्णसंभार. त्यामुळे रानात अगदीच अंधारलेले होते. सह्याद्रीतल्या अंधारबन ट्रेकची आठवण होत होती. थोड्या वेळातच प्रचंड पाण्याचा घुमणारा आवाज कानावर येऊ लागला. धबधब्याच्या जवळ पोहोचल्याची ती खूण होती. उजवीकडच्या दरी झाडांच्या गर्दीतून वेगाने वाहणारे पाणी अधेमध्ये दृष्टीस पडत होते. आता मात्र कधी एकदा धबधब्याचे दर्शन होतेय असे झाले होते. एक वळण पार केले आणि अचानक दोन झाडांच्या मधून एक फेसाळता पांढरा पडदा दृष्टीस पडला. क्षणभर कळेचना हे पाणी आहे की ढग आहेत! थोडे अजून वर चढलो आणि त्या अखंड जलप्रपाताचे दर्शन झाले. गर्द वनराई नेसलेल्या त्या उंच पहाडावरून पाणी घोंघावत खाली कोसळत होते. पडता पडता त्याच्या अनेक शाखा-उपशाखा बनत होत्या. कातळ-कपाऱ्यांत खेळून त्या पुन्हा मुख्य प्रवाहास बिलगत होत्या. पाण्याचे ते रूप पाहून मी क्षणभर स्तब्धच झालो. सारा थकवा क्षणार्धात दूर झाला. थोडा वेळ ते सारे दृश्य नजरेत सामावून मी कॅमेरा बाहेर काढला. त्या जागेवरून फोटो फेसबुक डीपी काढण्यात आम्ही सारेच मग्न झालो. डाव्या बाजूने एक वाट थोडी खाली उतरत धबधब्याच्या दिशेने जात होती. प्रवाहाच्या थोडं जवळ जाता यावं म्हणून तिथून खाली उतरलो. 

गर्द झाडीतून दिसणारा तांबडी सुर्ला धबधबा 

ती जागा एखाद्या कुंडासारखी होती. तिन्ही बाजूंनी डोंगर होते. समोरच्या डोंगरावरून कोसळणारा धबधबा उजवीकडे दरीत झेपावत होता. इथून पाण्याचा प्रवाह अगदी ढेंगभर अंतरावर होता. बाजूला एक लहानसे डबकेसुद्धा तयार झाले होते. जणू निसर्गाने आमची पाण्यात डुंबायची सोयच करून ठेवली होती. पण पाण्याचा प्रवाह खूपच जास्त होता. शिवाय वाटही निसरडी झाली होती. एक घसरलेले पाउल म्हणजे कपाळमोक्षच! त्यामुळे आम्ही फार पुढे न जाण्याचा निर्णय घेतला. तिथल्या दगडावर बसल्या-बसल्या तो धबधबा अनुभवणे म्हणजे अक्षरशः शब्दातीत होते. मुख्य म्हणजे त्या जागी आम्ही सहा जण वगळता बाकी कोणीच नव्हते! मुंबईजवळच्या प्रसिद्ध धबधब्यांजवळ दिसणारी गर्दी आणि गोंगाट इथे नव्हते. अशा शांततेत निसर्ग अनुभवणे आजकाल अप्राप्यच झाले आहे. ती शांतता उपभोगण्यासाठी मी त्या दगडावरच काही मिनिटे ध्यानस्थ झालो. समर्थ रामदासांनी शिवथर घळीचे वर्णन करताना लिहलेल्या ओळी मनात घुमत होत्या - गिरीचे मस्तकी गंगा तेथुनी चालली बळे | धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे || प्रत्येक श्वासागणिक त्या धबधब आवाजाचा ताल मी अनुभवत होतो. तेवढ्यात बारीक पाऊस सुरु झाला. धबधब्याचे उडणारे तुषार भिजवत होतेच. आता पाउसही त्यात सामील झाला. पावसाबरोबर आलेल्या गार हवेच्या झोताने आता हुडहुडी भरू लागली. जेमतेम अर्ध्या तासापूर्वी दमट हवेत घामाघूम झालेले आम्ही आता त्या प्रपाताच्या शेजारी कुडकुडत उभे होतो. निसर्गाची किमया म्हणजे अजबच! इथे कॅमेरा काढायला मात्र काही वाव नव्हता. मनसोक्त धबधबा अनुभवून आम्ही तिथून निघालो.


येतानाची उताराची वाट अपेक्षेपेक्षा लवकरच संपली. खालच्या ओढ्याजवळ फोटो काढायला थोडा वेळ थांबलो. पावसाने भिजवले होतेच. त्यामुळे आता ओढ्यात डुंबायची इच्छा होत नव्हती. शिवाय मंदिरातही जायचे होते. लवकरच आम्ही मंदिराबाहेरच्या दुकानांजवळ पोहोचलो. मंदिराचा परिसर भारतीय पुरातत्व विभागाने संरक्षित केला आहे. मंदिरात तुरळक गर्दी होती. प्रवेशद्वारातून आत शिरलो आणि समोरच काळ्या बेसाल्ट पाषाणामध्ये घडवलेले सुबक मंदिर नजरेस पडले. आजूबाजूच्या गर्द हिरव्या रानाच्या पार्श्वभूमीवर ते काळ्या पाषाणातले मंदिर फारच उठून दिसत होते. हे मंदिर बाराव्या शतकात कदंब राजवटीत बांधले गेले. मंदिरासाठी वापरला गेलेला दगड हा त्या परिसरात सापडणाऱ्या लाल खडकाशी मिळता-जुळता नाही. त्यामुळे तो घाटमाथ्यावरून आणला गेला असावा असा कयास आहे. या पूर्वाभिमुखी मंदिराची शैली कर्नाटकातील ऐहोळे येथील मंदिरांवर बेतलेली असून कळस अर्धवट बांधलेला आहे. या शैलीतले गोव्यातले हे एकमेव मंदिर आहे. घनदाट रानात बांधलेले असल्याने हे मंदिर परकीय आक्रमणांपासून सुरक्षित राहिले. मंदिरातले शिवलिंग अजूनही पूजेत आहे. 


तांबडी सुर्ला येथील महादेव मंदिर 

आम्ही बूट काढून आत शिरलो. मंदिराच्या पायऱ्या चढताना पायांवर ट्रेकचा परिणाम जाणवत होता. गोव्यातल्या इतर मंदिरांपेक्षा हे तसे लहानसेच होते. मात्र त्यावरची कोरीवकला फारच सुरेख होती. मंडपातले स्तंभ साधेच होते; मात्र भौमितिक आकारांनी त्यांचे साधेपण खुलून दिसत होते. छतावारचे पानाफुलांचे कोरीवकाम फारच सुरेख होते. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गर्भगृहाच्या बाहेर असलेले नागांचे शिल्प. साधारण दीड फूट उंचीचे, नागांचे शिल्प कोरलेले दोन आयताकृती दगड गर्भगृहाच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन बाजूंना ठेवलेले होते. जणू देवाचे द्वारपाल. आतमध्ये शिवलिंगासमोर निरांजन तेवत होते. दोन-चार फुले वाहलेली दिसत होती. त्या निरांजनाच्या मंद प्रकाशात ते गर्भगृह काहीसे गूढ मात्र तरीही प्रसन्न वाटत होते. दर्शनानंतर आम्ही मंदिराबाहेर पडलो. मंदिराच्या बाहेरील भिंतींवरचे कोरीवकाम अजूनच सुंदर होते. तिथे थोडीफार फोटोग्राफी करून आम्ही परतीच्या वाटेला लागलो. 


छतावरील सुरेख कोरीवकाम  

द्वारपालांसदृश वाटणारी नागशिल्पे  

रिसॉर्टवर परत आलो तेव्हा सुग्रास भोजन स्वागताला हजर होतेच. आम्ही लगेचच आवरून जेवणावर ताव मारला. जेवता-जेवता सहज माझं पायाकडे लक्ष गेलं आणि पाहतो तर काय, पायावर रक्ताचे ओघळ! ना काही वेदना ना काही जळजळ. हे म्हणजे हमखास जळूचे काम. पश्चिम घाटातली जंगले म्हटली की जळवा आल्याच. आता या ट्रेकमध्ये कोणत्या जागी जळू माझ्यावर पायावर चढली देव जाणे! तिच्या चाव्याने वाहू लागलेलं रक्त काही थांबत नव्हतं. जळवेच्या लाळेत हिपॅरीन नामक पदार्थ असतो जो रक्त गोठण्याची प्रक्रिया थांबवतो. मी दर दहा मिनिटाला रक्त पुसत होतो. शेवटी दोनेक तासांनी रक्त वहायचे थांबले. आश्चर्य म्हणजे केवळ मलाच हा जळवांचा अनुभव आला होता. असो. रिसॉर्टच्या मागच्या बाजूने एक नदी वाहत होती. परतीच्या प्रवासाला अजून वेळ होता. नदीकाठी थोडा वेळ घालवला आणि चहापान करून सामान आवरायला घेतले.  

ट्रेकमध्ये जमलेला धमाल ग्रुप 

पाचच्या सुमारास आम्ही रिसॉर्टवरून निघालो. कुळें स्टेशनवरून मडगाव आणि तिथून मत्स्यगंधा एक्स्प्रेसने मुंबई असा बेत होता. ट्रेक संपल्याची हुरहूर मनात होती. पण गोव्यातले एक फारसे परिचित नसलेले ठिकाण अनुभवल्याचे समाधान मनात होते.                       

तांबडी सुर्ला ट्रेक - भाग १ - घनदाट अरण्यातली पाऊलवाट

गोवा म्हटलं की डोळ्यासमोर येतात नयनरम्य समुद्रकिनारे, देशी-विदेशी पर्यटकांची गर्दी, सळसळतं नाईटलाईफ, आणि एकूणच मस्तीभरा माहोल! पण याच गोव्याची फारशी परिचित नसलेली एक बाजूही आहे. ती म्हणजे पश्चिम घाटातले धबधबे, पुरातन मंदिरे, आणि वन्यजीवन. गेल्या काही वर्षांत चेन्नई एक्सप्रेस चित्रपटातल्या दृश्यामुळे दूधसागर धबधबा नको तितक्या प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. पण त्याच्याच आजूबाजूचे इतर धबधबे मात्र अजूनही त्यांचे रांगडेपण जपून आहेत. असाच एक धबधबा म्हणजे तांबडी सुर्ला. तिथलं घनदाट अरण्य, गर्द वृक्षराजीत लपलेला धबधबा, आणि पायथ्याचं प्राचीन शिवमंदिर याविषयी ट्रेकिंग समुदायाकडून बरेच काही ऐकून होतो. बरेच दिवस ती जागा to-do list वर होती. यंदाच्या पावसाळ्यातले ट्रेक ठरवताना अचानक एका परिचित ग्रुपच्या शेड्युलवर तांबडी सुर्ला ट्रेक दिसला. वेळेचं गणित जुळून येतंय असं दिसताच ट्रेक बुक करून टाकला. 

तांबडी सुर्ला ट्रेक फोटो कोलाज 

ठरलेल्या वेळेप्रमाणे पुणे स्टेशनवर ग्रुप लीडर आणि इतर मेम्बर्सना भेटलो. शनिवारी साधारण साडेचारच्या सुमारास आमचा गोवा एक्सप्रेस ने प्रवास सुरु झाला. वाटेतल्या हरएक स्टेशनात थांबत डुगडुगत जाणारी ती गाडी गोव्याला पोहोचायला तब्बल १२ तास घेते! पण थेट कुळें स्टेशन गाठायचे असेल तर हाच एकमेव पर्याय आहे. असो. गाडीत दूधसागरला जाणारा तब्बल ६० जणांचा ग्रुप होता. आणि तांबडी सुर्लाला जाणारे आम्ही फक्त पाच! अश्विनी, अपर्णा, प्रिया, आणि स्मिता अशा मुंबईच्या चार मैत्रिणी एकत्र आल्या होत्या. ट्रेक लीडर म्हणून पुण्याचा हरपाल होता. सगळ्या ग्रुपसोबत लगेचच मैत्री झाली आणि गप्पांचा फड रंगला. मग ट्रेकिंग मधले किस्से, भुता-खेताच्या गोष्टी, आणि काय नि काय. ट्रेनमधल्या गप्पांना विषयांचा कधी अंतच नसतो. कुळें स्टेशन पहाटे साडेचारला येणार होतं. साडेदहाच्या आसपास गप्पा आणि जेवण आवरून आम्ही झोपायच्या तयारीला लागलो. पण एकतर स्लीपर क्लास, त्यात सगळ्या कुडमुड्या स्टेशनांवर थांबणारी गाडी, आणि दूधसागर वाला ६० जणांचा ग्रुप, यांमुळे आज झोप काही नशिबात नाही हे लवकरच कळून चुकले! जरा वेळ डोळा लागतोय तर कुठले तरी स्टेशन हजर! त्यात दूधसागर ट्रेकला जाणाऱ्यांना पहाटे साडेतीनच्या सुमारास धबधब्याजवळच्या कुठल्याशा अडनिड्या स्टेशनावर उतरायचे होते. त्यामुळे त्यांची तर दोन वाजल्यापासूनच खुडबुड सुरु झाली होती. 

तांबडी सुर्ला मंदिराचे स्थान 

गाडी तासभर उशिराने धावत होती. पहाटे पाचच्या सुमारास अर्धवट झोपेतच आम्ही कुळें स्टेशनवर उतरलो. जवळच्याच एका जंगल रिसॉर्टवर एका दिवसाची राहण्या-जेवण्याची सोय केलेली होती. दहा मिनिटांतच आम्ही तिथे पोहोचलो. सात वाजता नाश्ता वगैरे करून ट्रेकला निघायचे असे ठरवून आम्ही आन्हिकं उरकायला रूमवर गेलो. रूममधला पलंग पाहून वाटलं जरा वेळ डुलकी काढूया. तसाही चार मुलींना आवरायला किती वेळ लागेल हे काही सांगता येत नाही. असे म्हणून मी आणि हरपाल जरा पहुडलो. रात्रभर अर्धवट झोप झाल्याने पटकन डोळा लागला. दारावरची थाप ऐकून खडबडून जाग आली आणि घड्याळात पाहतो तर काय, सव्वासात!! या चौघी जणी सगळं आवरून-सावरून घुश्शातच बाहेर उभ्या होत्या. त्यात नाश्त्याची तर ऑर्डरपण दिलेली नव्हती. बाहेर ड्रायव्हर ताटकळत उभा होता! पाच मिनिटांची डुलकी फारच महागात पडली होती. आम्ही लगेचच नाश्त्याची ऑर्डर दिली आणि घाईघाईत आवरायला लागलो. सगळं होईस्तोवर आठ वाजले. तसा संपूर्ण दिवस हाताशी होता. त्यामुळे तासभर उशीर म्हणजे काही फार काळजीचं कारण नव्हतं. 

भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य प्रवेशद्वार 

एकदाची आमची वरात निघाली. वातावरण प्रसन्न होतं. ऑगस्ट महिना असला तरी पावसाचा जोर फार नव्हता. रात्री कधीतरी एखादी सर येऊन गेलेली असावी. हवेतला तो ओलसर गारवा हवाहवासा वाटत होता. चिंब वनराई आळोखे-पिळोखे देत होती. गर्द झाडीतून जाणारा तो तुळतुळीत डांबरी रस्ता अजूनही झोपल्यागतच वाटत होता. मधेच उतरत्या छपराची, भलामोठा सोपा असलेली टुमदार घरे दिसत होती. अगदी तळकोकणात असावे असे वाटत होते. पश्चिम घाटाच्या पायथ्याशी असलेले गोव्यातले जिल्हे म्हणजे एक वेगळीच दुनिया! पोर्तुगीजांच्या प्रभावाखाली फारसा न आलेला हा भाग गोव्याच्या मूळ संस्कृतीचे दर्शन घडवतो. त्यामुळेच या भागाचे कोकणाशी असलेले साधर्म्य अगदी उठून दिसत होते. हळूहळू घरे मागे पडली आणि घनदाट अरण्य सुरु झाले. इतक्यात ‘भगवान महावीर वन्यजीव अभयारण्य’ असा फलक दिसला. तिथून पुढे निघालो आणि आजूबाजूचे रान अजूनच दाट झाल्यासारखे भासू लागले. अर्ध्या तासातच आम्ही तांबडी सुर्ला महादेव मंदिरापाशी पोहोचलो. इथूनच ट्रेक सुरु होतो. सकाळची वेळ असल्याने परिसर अगदी शांत होता. मंदिराबाहेरचे दुकानदार नुकतेच दुकान उघडून चहाचा घोट घेत बसले होते. आम्ही लगेचच ट्रेक सुरु केला.

घनदाट रानातली पाऊलवाट   

मंदिराच्या बाहेरून रानात शिरणारी ती तांबूसराड वाट आम्ही धरली आणि मोठ्या उत्साहात पुढे निघालो. पाचेक मिनिटातच गर्द रानाच्या मध्यात पोहोचलो. रानाचा तो विशिष्ट वास आसमंतात भरून राहिला होता. बाजूनेच एक ओढा खळाळत होता. मी लगेचच कॅमेरा बाहेर काढला. नशिबाने पाऊस नव्हता. इकडे-तिकडे फोटो काढत आमचा ट्रेक सुरु होता. पावसाळी ट्रेकिंग मध्ये वाटेत येणारे ओढे पार करणे म्हणजे एक वेगळेच प्रकरण असते. विशिष्ट दगडांवर पाय टाकत, तोल सावरत, कमीत कमी ओले होत पुढे जायचा उगीच प्रयत्न करायचा. मग शेवटी थोडा भिजलोच आहे अजून भिजूया असे म्हणून पाण्यातच बसकण मारायची! इथला ओढा काही त्याला अपवाद नव्हता. पण आज भिजण्यासाठी धबधब्यावर जायचे होते. म्हणून ओढ्याचा मोह टाळून आम्ही पुढे निघालो. आता वाट लहान-मोठ्या चढ-उतारावरून जात होती. रानातल्या दमट उष्म्यामुळे घामाच्या धारा लागल्या होत्या. हवेतली आर्द्रता एवढी होती की चष्म्यावर सतत बाष्प जमा होत होते. अशी आर्द्रता कॅमेराला फारच मारक. मी मुकाट्याने कॅमेरा आत टाकला. 

हिरवंगार रान आणि खळाळणारा ओढा   

क्रमशः 

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ७ - शेवटचा दिस गोड व्हावा!

पाथार नचुनीच्या कॅम्प साईटवरची ती पहाट जरा आळसावलेलीच होती. गेल्या दोन दिवसांतल्या तंगडतोडीने थकलेल्या गात्रांना आता घरची ओढ लागली होती. काश teleportation शक्य असते. पण रूपकुंड काही इतक्या सहजासहजी घरी पोहोचू देणार नव्हते. ज्या वाटेने चढायला तीन दिवस लागले होते ती वाट आज एका दिवसात उतरून जायची होती. एकूण अंतर होते १७ किमी! पण वाट उताराची होती. शिवाय ऑक्सिजनचे प्रमाण वाढत जाणार होते. त्यामुळे अंतराचे फारसे भय नव्हते. नाश्त्याला आज आलू पराठ्यांचा बेत होता. इतक्या सगळ्या लोकांसाठी पराठे लाटून होईपर्यंत आठ वाजले. पण यावेळी पराठे मात्र फक्कड जमले होते. गरमागरम पराठे ओरपून आम्ही खाली उतरायला सज्ज झालो. 

वातावरण फोटोग्राफीसाठी एकदम अनुकूल होते

ट्रेकमध्ये कायम मागे असणारा मी यावेळी पुढे सरसावलो होतो. वातावरण स्वच्छ होते. उताराच्या दिशेने चालताना ती अजगर-वाट अगदीच सौम्य वाटत होती. कालच्या गारांचा चिखल अधूनमधून त्या भयंकर गारपिटीची आठवण करून देत होता. मधेच ढगांचे पुंजके त्या वाटेला हलकासा स्पर्श करून जात होते. पलीकडे दिसणारी शिखरे त्याच स्थितप्रज्ञतेने सारा निसर्ग न्याहाळत होती. फोटोग्राफीसाठी आज उत्तम वातावरण होते. गेल्या दोन दिवसांतले रौद्र सौंदर्य मनसोक्त कॅमेऱ्यात टिपता न आल्याची थोडी खंत वाटत होती. आज ती कसर भरून काढायचे ठरवले. ग्रुपमधली मंडळी पण एकदम सेल्फी मूडमध्ये होती. रमत-गमत आम्ही बेदिनी बुग्यालपर्यंत पोहोचलो. इथून पुढे रस्ता वेगळा होता. चढताना अली बुग्याल आणि डिडना मार्गे आलो होतो. पण उतरताना मात्र घरोली पाताळ आणि नीलगंगा मार्गे वाण गावात उतरणार होतो. वाट वेगळी असल्याने तिथल्या भूदृश्याबाबत मनात उत्सुकता होती. 

बेदिनी बुग्यालचा पठारी प्रदेश संपून तीव्र उतार सुरु झाला 

हळूहळू रानात उतरणारी वाट 
हळूहळू बुग्यालचा सपाट प्रदेश मागे पडला. तीव्र उतार सुरु झाला. म्हणता म्हणता वाट सरळ गच्च रानात शिरली. त्या उंच झाडांतून निळ्या आभाळाचे लहान-सहान तुकडे मिचमिचताना दिसत होते. वातावरणातली आर्द्रता जाणवत होती. इथे ऱ्होडोडेंड्रॉनची झाडे मुबलक दिसत होती. पण कदाचित या भागातला फुलांचा बहर येऊन गेला होता. फांद्यांच्या टोकांवर फुटलेली हिरवीगार पालवी मोहक दिसत होती. उंच आणि धिप्पाड असे देवदार वृक्ष उतारावर घट्ट मुळे रोवून खंबीरपणे उभे होते. उद्या प्रलय होऊन जग उलटे-पालटे झाले तरी हे वृक्ष जागचे हलणार नाहीत असा दृढ विश्वास त्यांच्या नुसत्या अस्तित्वातून प्रतीत होत होता. या वाटेने चढणे नक्कीच अली बुग्यालच्या वाटेपेक्षा जास्त कठीण होते. इथून चढणारे ट्रेकर्स अजून किती चढायचे आहे असे केविलवाण्या चेहऱ्याने विचारत होते. तसेही ट्रेकिंगमध्ये या प्रश्नाचे उत्तर कधीही “तुम्ही जवळपास पोहोचलातच” असेच द्यायचे असते! आम्हीही तोच कित्ता गिरवत होतो. वर चाललेल्या ट्रेकर्सना शुभेच्छा देत आम्ही खाली उतरत होतो. 

घनदाट रानात वसलेली घरोली पाताळ ची कॅम्प साईट 

अचल देवदार 
दोनेक तासांच्या उतरणीनंतर घरोली पाताळची कॅम्प साईट दिसू लागली. घनदाट रानाच्या मध्यात एका लहानशा पठारावर ती कॅम्प साईट वसली होती. इथली उंची होती २४०० मीटर. ऑक्सिजन पातळीच्या दृष्टीने आम्ही आता ‘सेफ झोन’ मध्ये आलो होतो. थोडावेळ तिथे विश्रांती घेऊन आम्ही पुढे निघालो. दूरवरून वाहत्या पाण्याचा खळखळ आवाज येऊ लागला. नीलगंगा जवळ येत असल्याची ती खूण होती. आम्ही पावलांचा वेग वाढवला. नागमोडी वळणांना छेद देत उतारावरून घसरगुंडी करत खाली उतरण्यात मजा येत होती. आता खोल दरीतला पाण्याचा प्रवाह दिसू लागला. नदीच्या काठावर एक तात्पुरती शेड उभारलेली दिसत होती. आमची जेवायची सोय  इथेच होती. एकदाचे तिथे पोहोचलो. त्या अरुंद दरीतून नीलगंगेचा अवखळ प्रवाह खळखळ करत पुढे चालला होता. आजूबाजूचे डोंगर आणि वृक्षराजी त्या प्रवाहात आपले रुपडे पाहण्यात गुंतले होते. आतापर्यंत अनुभवलेल्या रौद निसर्गरुपांपुढे हे शांत आणि लोभस रूप मानला एक वेगळाच आनंद देत होते. बूट काढून नदीच्या पाण्यात पाय बुडवले. थंडगार पाण्याचा पायांना स्पर्श होताच सारा थकवा दूर झाल्यासारखे वाटले. काश त्या पाण्यात यथेच्छ डुंबता आले असते. पण अजून एक चतुर्थांश अंतर बाकी होते. नाईलाजानेच पाण्याबाहेर आलो. गरमागरम राजमा चावल तयारच होते. जेवण होतंय ना होतंय तेवढ्यात ढग दाटून आले आणि पावसाच्या सरी सुरु झाल्या. हा पाऊस काही आमचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. ट्रेकमधल्या प्रत्येक दिवशी साधारण दुपारच्या वेळी वेळापत्रक ठरल्यागत तो हजेरी लावत होता. आता शेवटचे एक चतुर्थांश अंतर पावसात पार करणे अगदी जीवावर आले होते. पण दुसरा पर्याय काय? रेनकोट घातले आणि चालायला सुरुवात केली. 


खोल दरीत दिसणारा नीलगंगेचा प्रवाह 
नदीवरच्या अरुंद पुलावरून पलीकडे गेलो आणि पाहतो तर काय, वाट सरळ समोरच्या टेकडीवर चढत होती! ट्रेकचा उरलासुरला भाग, त्यात पाऊस, आणि परत चढण? आता मात्र हद्द झाली! कधी संपणार हा ट्रेक? स्वखुशीने तर आलो आपण ट्रेकला. ना कोणी जबरदस्ती केली होती ना कोणी बक्षीस देणार होतं ट्रेक पूर्ण केल्याचं. मग कशाला आलो आपण इथे तंगडतोड करायला? प्रत्येक ट्रेक मध्ये कोणत्या ना कोणत्या क्षणी हे असे विचार मनात येतातच. आता पुन्हा असले उपद्व्याप नाही असं कुठेतरी मन ठरवूनही टाकतं. पण पुन्हा दोन-चार महिन्यांनी गिरीशिखरांचे वेध लागू लागतात. त्या अनवट निसर्गाचा उपभोग घेण्यासाठी जीव झुरू लागतो. आणि पुन्हा कधीतरी मी असा पावसा-पाण्यात, निसरड्या वाटेवर, ‘अजून किती चढायचं आहे’ असं विचारत चढू लागलेला असतो. व्यसन म्हणावं तर यालाच का? त्या तांबूसराड वाटेवरून हळूहळू वर चढताना मन ट्रेकिंग करण्यामागच्या मूलभूत प्रेरणेचा शोध घेत होतं. स्वतःला निसर्गाच्या हवाली करण्यात एक अध्यात्मिक आनंद आहे. शरीराच्या कितीही अपेष्टा होत असल्या तरी मनाला मिळणारे समाधान शब्दातीत आहे. प्रत्येक ट्रेक काहीतरी नवीन शिकवून जातो. नवे सवंगडी मिळवून देतो. ट्रेकमधले ते भले-बुरे क्षण आठवणींच्या गाठोड्यात मुरत जातात आणि आयुष्याची चव उत्तरोत्तर अधिक रुचकर करत जातात.

वाण  गावातला बऱ्याच दिवसांनी दिसलेला पक्का गाडी रस्ता 

चढण संपता संपता एक गाव लागलं. आम्ही ट्रेकर्स दिसताच गावातली लहान-सहान पोरं गलका करत जमा झाली. आपल्या गोड आवाजात ती पोरं सगळ्यांना नमस्ते म्हणत होती. ट्रेकच्या या शेवटच्या दिवशी पोरांमध्ये वाटायलाही काही उरलं नव्हतं. पाऊस आता थांबला होता. गावाशेजारी एक हॉटेल होतं. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही पुढे निघालो. लहान-मोठ्या वस्त्यांमधून ती वाट पुढे जात होती. काही वेळातच थोडे मोठे गाव दिसू लागले. वाण गावच्या मुख्य चौकात उतरणारी ती शेवटची पायरी आम्ही उतरलो आणि अत्यानंदाने एकमेकांना टाळ्या दिल्या. ट्रेक संपल्याचा तो क्षण म्हणजे अवर्णनीय असाच होता. गावातल्याच एका दुकानात चहा पिऊन आम्ही तो ट्रेकांत साजरा केला. इथून पुढे जीपने लोहाजुंगच्या बेस कॅम्प वर जायची सोय केलेली होती. लोहाजुंगला पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे सहा वाजले होते. झोपायला गादी आणि पांघरायला दुलई म्हणजे ऐषाराम वाटत होता. सगळ्यांनी एकत्र जमून रघू, विकी, आणि विजयेंद्रजी यांचे मनःपूर्वक आभार मानले. विकीला त्याच्या करियरसाठी शुभेच्छा दिल्या. कुंडदर्शन हुकल्याची काहीशी रुखरुख मनाला जाणवत होती. आयुष्यात परत कधी योग आला तर कुंडदर्शनासाठी नक्की येईन असे मनाशी ठरवून ‘ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड’ या न्यायाने गोड मानलेल्या रूपकुंडला मनोमन अलविदा केले आणि अंगावर दुलई ओढून झोपी गेलो.                                                                     

समाप्त 

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ६ - हुकलेले कुंडदर्शन

काळू विनायकाच्या शेजारील हॉटेलातून बाहेर पडलो तेव्हा गारपीट नुकतीच थांबली होती. गारांचा वर्षाव करणारा तो काळाकुट्ट ढग आता दरीच्या दिशेने पांगला होता. त्या आलेदार चहाने थोडीफार हुशारी वाटत होती. डोकं ठणकत होतंच. पण भग्वबासाचा कॅम्प समोरच दिसत होता. त्यामुळे सगळ्या शरीराच्या अपेष्टांकडे दुर्लक्ष करून मी पुढे चाललो होतो. वाट तर सपाटच होती. पण संपूर्ण वाटेवर गारांचा खच पडला होता. त्यामुळे वाट फारच निसरडी झाली होती. काळजीपूर्वक एकेक पाउल टाकत आमची वरात चालली होती. तेवढ्यात होते-नव्हते ते सारे ढग कुठेतरी गायब झाले आणि सूर्याची प्रखर किरणे त्या भूदृश्यावर झेपावली. अंधाऱ्या बोगद्यातून दीर्घकाळ चाललेली ट्रेन अचानक बाहेर यावी आणि बाहेरच्या प्रकाशाने डोळे दिपून जावेत तसेच काहीसे झाले. त्या प्रखर प्रकाशात त्या वाटेवर पडलेल्या गारा आणि आजूबाजूच्या डोंगरावर पडलेले बर्फ अक्षरशः तळपू लागले. दहा मिनिटांपूर्वी गारांच्या तडाख्यातून बाहेर पडलेले आम्ही आता बॅगेत गॉगल शोधू लागलो. खड्या चढणीवर लागलेली गारपीट, त्याच्या नंतरचा आल्याचा चहा, आणि आता समोर उभे ठाकलेले हे अवर्णनीय दृश्य! हिमालयातला ट्रेक तुम्हाला निसर्गाची विविधरंगी रूपे कधी आणि कोणत्या क्रमाने दाखवेल याचा काहीएक नेम नसतो. ही अनिश्चितताच हिमालयातल्या ट्रेकचे व्यसन लावते.   

भग्वबासा कॅम्प साईट  

त्या तळपत्या बर्फाळ वाटेवरून आम्ही सावकाश पुढे निघालो होतो. डावीकडच्या डोंगररांगेच्या मागे त्रिशूल आणि नंदा घुंटी ही शिखरं दिमाखात उभी होती. त्यांच्यावरची बर्फाची चादर थोडी जास्त जाड झाल्यासारखी वाटत होती. उजवीकडचा बोडका डोंगरही बर्फाने माखला होता. कॅम्पसाईटच्या मागच्या रांगेच्या खोबणीत कुठेतरी रूपकुंड वसले होते. त्याकडे जाणारी वाट एका पुसट रेघेसारखी दिसत होती. उद्या याच वाटेने आपल्याला कुंडाच्या दर्शनासाठी जायचे आहे अशी मनातल्या मनात मी तयारी करत होतो. कधी एकदा कॅम्प साईटवर पोहोचतोय असे झाले होते. म्हणता म्हणता ती वाट संपली. त्या प्रचंड बर्फाळ पठारावर वसलेल्या कॅम्प साईट वर आम्ही एकदाचे पोहोचलो. ही कॅम्प साईट म्हणजे जणू एक लहान गावच होते. जवळपास शंभर-दोनशे तंबू तिथे लागले होते. त्या जोडीने हॉटेल्स, खेचरांसाठी बांधलेल्या शेड्स, या सर्व सोई पुरवणाऱ्या लोकांचे तंबू वगैरे होतेच. रूपकुंडची लोकप्रियता आता कुठे जाणवत होती. थोडा वेळ तंबूमध्ये विश्रांती घेऊन मी आजूबाजूला भटकायला बाहेर पडलो. निसरड्या बर्फामुळे फार लांब कुठे जाता येत नव्हतं. शिवाय दर दोन पावलांवर दम लागत होता. इथली उंची होती ४३०० मीटर! ऑक्सिजनची कमतरता चांगलीच जाणवत होती. ग्रुपमधले ४ जण अर्ध्या वाटेतच पाथार नचुनीला परत गेले होते. त्यामुळे आता इथे जेमतेम १५ जण उरलो होतो. उद्याच्या अंतिम टप्प्याबद्दल मनात हुरहूर दाटून आली होती. 

४३०० मीटर उंचीवर बर्फात लागलेले तंबू 

संध्याकाळचे सूप घेऊन रघू आला. पुढच्या दिवशीच्या महत्त्वाच्या सूचनांसाठी त्याने सगळ्यांना एकत्र बोलावले. कुंडाकडे जाण्यासाठी पहाटे २ वाजता निघायचे होते. त्यासाठी बर्फावर चालायचे काटेरी बूट आम्हाला मिळणार होते. बूट वाटण्याआधी त्याने सगळ्यांची ऑक्सिजन पातळी तपासली. साधारण ८० च्या वर ऑक्सिजन असलेल्यांनाच कुंडाकडे जाण्यास परवानगी होती. माझ्या बोटाला ते यंत्र लावले आणि आकडा आला ६५! मी धास्तावलोच! इतका कमी कसा असेल ऑक्सिजन? मला डोकेदुखी वगळता बाकी काहीच होत नव्हतं. रघू म्हणाला, AMS (acute mountain sickness) काही सांगून येत नाही. कोणतीही पूर्वलक्षणे न दिसताही त्या उंचीवर माणूस अचानक आजारी पडू शकतो. आजार बळावला तर त्याला खाली आणण्याशिवाय गत्यंतर नसते. आणि वेळेत खाली आणता नाही आले, तर मृत्यूही ओढावू शकतो. या सगळ्या शक्यतांची मला ऐकून-वाचून माहिती होती. पण त्या परिस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव आत्ता पहिल्यांदाच येत होता. उगीच विषाची परीक्षा कशाला? कोण बक्षीस देणार आहे मला कुंडापर्यंत गेल्याचं? जे करतोय ते निव्वळ निसर्गप्रेमासाठी आणि त्यातून मिळणाऱ्या आत्मिक समाधानासाठी. मग उगीच जीव कशाला धोक्यात घालायचा? मी मनोमन वर न जाण्याचा निर्णय घेतला. सोबतच्या बऱ्याच जणांची ऑक्सिजन पातळी कमी होती. त्यांपैकीही कोणीच वर जाणार नव्हते. जेमतेम ८-१० जणांनी वर जायची तयारी दाखवली. त्यांना आवश्यक त्या सूचना आणि बर्फावर चालायचे प्रात्यक्षिक दाखवून रघू रात्रीच्या जेवणाची तयारी करायला निघून गेला. 

रूपकुंड कडे जाणारी वाट 

अंधार पडू लागला तशी थंडी वाढू लागली. आता बाहेर थांबणे काही शक्य होत नव्हते. पटापट जेवण उरकून आम्ही तंबूमध्ये येऊन विसावलो. काही वेळातच गडद ढगांच्या दुलईत कॅम्प साईट हरवून गेली. होते नव्हते ते सारे कपडे अंगावर चढवले. स्लीपिंग बॅगमध्ये शिरलो आणि झोपायचा प्रयत्न करू लागलो. झोप कसली लागतेय! एका कुशीवरून दुसऱ्या कुशीवर वळतानासुद्धा दम लागत होता. त्यात थंडीने हुडहुडी भरत होती. तशात उठून मूत्रविसर्जनासाठी बाहेर जाणं म्हणजे तर दिव्यच! आयुष्यात अशी परिस्थिती कधी आली नसेल की निव्वळ शरीरधर्म उरकणे म्हणजे मोठे संकट वाटावे! तासाभराने पुन्हा रघू ऑक्सिजन पातळी तपासायला आला. अजूनही आकडा ६० च्या पुढेमागेच दिसत होता. मला आता काळजी वाटू लागली. पण या उंचीवर ऑक्सिजनचे हे प्रमाण तसे नॉर्मल होते. अजून जास्त उंचीवर जाणे किंवा कोणतीही दम लागू शकेल अशी हालचाल करणे मात्र योग्य नव्हते. मी शांतपणे पडून प्राणायम करताना घेतात तसे दीर्घ श्वास घेऊ लागलो. वर न जाण्याचा माझा निर्णय योग्यच होता. कधीतरी डोळा लागला. पहाटे तीनला कुंडावर जाणाऱ्यांची लगबग सुरु झाली तशी झोप उडाली. वर जाणाऱ्या मंडळींना बसल्या जागेवरून शुभेच्छा देऊन मी पुन्हा झोपायचा प्रयत्न करू लागलो. 

सकाळी सातच्या सुमारास विकी सगळ्यांना उठवायला आला. डोकं प्रचंड ठणकत होतं. कसाबसा आवरून तंबूच्या बाहेर पडलो. उपचारापुरता नाश्ता केला. कुंडाकडे गेलेल्या लोकांसोबत रघू गेला होता. विकी आणि विजयेंद्रजी खाली थांबलेल्या आम्हा लोकांना पाथार नचुनी पर्यंत घेऊन जाणार होते. तब्येतीच्या अवघड अवस्थेतून बाहेर येण्यास खाली उतरणे हा एकमेव मार्ग होता. नशिबाने रस्ता उताराचा होता. स्वच्छ ऊन पडलं होतं. लवकरच आम्ही पाथार नचुनीच्या मार्गाला लागलो. कुंडाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ट्रेकर्सची रांग दिसत होती. आजूबाजूची शिखरे अजूनही ढगांच्या दुलईतून बाहेर पडली नव्हती. वाटेवरचे बर्फ रात्रीच्या थंडीमुळे गोठलेले दिसत होते. अर्ध्या तासातच आम्ही काळू विनायकापाशी पोहोचलो. काल ढगात हरवलेले ते मंदिर आज मोकळ्या वातावरणात फारच विलोभनीय दिसत होते. हा विनायक म्हणजे रूपकुंडचा रक्षणकर्ता. जोपर्यंत त्याची कृपा आहे तोवर सारे काही सुरळीत राहील अशी स्थानिकांची श्रद्धा. अनिश्चित आणि अस्थिर निसर्गापुढे टिकून राहण्यासाठी श्रद्धेचे बळ किती महत्वाचे आहे हे अशा ठिकाणी गेल्यावर कळते. इथे ना होता कोणी पुजारी, ना होते नवस-सायास करायला ठराविक दिवशी चेंगराचेंगरी करत येणारे भक्तगण. होते ते केवळ त्याच्या अस्तित्वाचे एक प्रतीक! त्या रौद्रभीषण निसर्गापुढे जगण्याची उभारी देणारा एक आधार. देवत्व असे शुद्ध अवस्थेत फार कमी ठिकाणी बघायला मिळते. कठोर नास्तिक असलेले माझे मन त्या ठिकाणी, का कोण जाणे, थोडेसे हळवे झाले.                           

काळू विनायक मंदिर (फोटो सौजन्य - सौरभ ताम्हनकर)

आता तीव्र उताराची वाट सुरु झाली. काल जिथे गारांनी झोडपलं होतं त्या जागी आज चिखलातून वाट काढत, न घसरता, न पडता खाली उतरणं हे मोठं आव्हान होतं. हळूहळू आम्ही खाली उतरलो. पाथार नचुनीच्या कॅम्पवर  पोहोचलो तेव्हा कुठे जीवात जीव आला. आम्ही तंबूत शिरलो आणि तेवढ्यात कालच्यापेक्षाही जोरदार अशी गारपीट सुरु झाली. थोडक्यात बचावलो म्हणून हायसे वाटले. मी एक क्रोसिनची गोळी घेतली आणि थोडा वेळ विश्रांती घेतली. डोकेदुखी आता बऱ्यापैकी कमी झाली होती. आजची रात्र इथेच काढायची होती. संध्याकाळी गप्पा-टप्पा करून लवकरच झोपी गेलो.

क्रमशः 

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ५ - रूपकुंडच्या पायथ्यावर

लेमन टी चा वास आणि रघूची हाक म्हणजे आमचा ट्रेकमधला घड्याळाचा गजरच होऊन गेला होता. चहाचे दोन घोट घेऊन आळोखे-पिळोखे देत मी तंबूमधून बाहेर आलो. कालचा थकवा आज कुठच्या कुठे पळून गेला होता. पहाटेची ती थंड, ओलसर हवा मनाला प्रफुल्लित करत होती. नुकताच सूर्योदय झाला होता. आजूबाजूच्या उंच शिखरांतून वाट काढत सोनेरी किरणे बेदिनी बुग्यालवरच्या गवताला हळूच गुदगुल्या करत होती. आभाळात विखुरलेले राखाडी ढग कळपामागे रेंगाळत चालणाऱ्या कोकरांसारखे दुडक्या चालीने पुढे सरकत होते. दूरवर दिसणारे त्रिशूल शिखर निस्तब्धपणे सूर्यकिरणांचा आणि ढगांचा खेळ निरखत होते. त्याने न जाणे असे कित्येक खेळ पाहिले असतील. अशी रम्य पहाट अनुभवायला मी कितीही अजगर-वाटा चढून यायला तयार आहे असे मनोमन वाटत होते. एक-एक करत सगळे जण उठून आवरायला लागले तसा मी माझ्या निसर्ग-आराधनेतून बाहेर आलो. नाश्ता तयार होता. आन्हिकं उरकून आम्ही सगळे पुढच्या मुक्कामाकडे कूच करायला तयार झालो. आज कालच्यापेक्षा जास्त चढाई होती. कालच्या अनुभवातून शहाणा होत मी एका लहान बॅगेत केवळ पिण्याचे पाणी आणि इतर काही आवश्यक सामान घेतले आणि मोठी बॅग पोर्टर कडे दिली. कॅम्पमधल्या इतर सामानासोबत ती बॅग एका खेचराच्या पाठीवर विसावली तेव्हा मला अगदी हायसे वाटले. रघूने आवश्यक अशा सूचना दिल्या. आजच्या दिवशीची चढण ही ट्रेकमधली सगळ्यात खडतर अशी चढण होती. वाढती उंची, त्यानुसार घटत जाणारे ऑक्सिजनचे प्रमाण, आणि लहरी हवामान यांच्याशी सामना करत आम्हाला पुढचा मुक्काम गाठायचा होता. हर हर महादेव म्हणून आम्ही ट्रेक सुरु केला. 

बेदिनी बुग्यालवरची रम्य पहाट 

पाथार नचुनीच्या वाटेवर  
आभाळातले रेंगाळलेले ढग आता दूर पसार झाले होते. त्रिशूल शिखराच्या मागून वर आलेले सूर्यबिंब तेजाने तळपत होते. बुग्यालमधल्या गारव्यात त्या तेजाची ऊब हवीहवीशी वाटत होती. एक लहानशी चढण पार करून आम्ही कालच्याच डोंगरधारेवर येऊन पोहोचलो. तीच अजगर-वाट आणखी काही वेटोळे घेत अजून वर जात होती. आम्ही हळूहळू त्या वाटेने वर चढू लागलो. बॅगेचे ओझे नसल्याने तीच वाट आज अनेक पटींनी सोपी वाटत होती. चढण मंद होती. पण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे दम लागत होता. तासाभरात त्या डोंगरधारेच्या माथ्यावर पोहोचलो. बेदिनी बुग्यालची कॅम्पसाईट आता नजरेआड झाली होती. डोंगरधारेच्या पलीकडच्या बाजूची खोल दरी समोर आ वासून उभी होती. दरीतून घोंघावत वर येणारा वारा उन्हातून मिळणाऱ्या उबेला नेस्तनाबूत करत होता. शिखराच्या दिशेने पाहिले तर समोरचे दृश्य धडकी भरवणारे होते. थोडे अंतर सपाट असणारी ती वाट एका झटक्यात समोरच्या अजस्र पर्वतावर चढताना दिसत होती. मुंगीएवढे दिसणारे ट्रेकर्स आणि त्यांचे सामान वाहणारे खेचरांचे कळप हळूहळू त्या वाटेने वर चढताना दिसत होते. आपल्याला जमेल की नाही या भीतीने पोटात गोळा आला. कालच्या वाटेवर झालेली अवस्था आठवू लागली. पण इथपर्यंत आलो आहोत तर असेच आल्यापावली परत जाणेही मनाला पटत नव्हते. फार त्रास झालाच तर मागे फिरू असे ठरवून मी पुढे निघालो. 

वाटेवरून दिसणारे त्रिशूल शिखर 
पुढच्या तासाभरात आम्ही पाथार नचुनी या कॅम्पसाईटवर पोहोचलो. त्या अजस्र पर्वताच्या पायथ्याला बिलगून ही कॅम्पसाईट वसली आहे. चार-पाच हॉटेल्स, एक खेचरांचा निवारा, आणि आजूबाजूला लागलेले तंबू एवढीच काय ती कॅम्पसाईट. आम्ही तिथे दुपारच्या जेवणासाठी थांबलो. आमच्याआधीच वर गेलेल्या आचाऱ्यांनी खिचडी रांधून ठेवली होती. पण या वेळेस बेत काही जमला नव्हता. खिचडी व्यवस्थित शिजली नव्हती. शिवाय मसालेही प्रमाणात पडले नव्हते. त्यात अति उंचीमुळे थोडेसे गरगरल्यासारखे होत होते. त्यामुळे घशाखाली घास जात नव्हता. मात्र पुढचा पर्वत चढायचा तर थोडीफार उर्जा आवश्यक होती. अशा दुर्गम जागी काहीतरी गरम खायला मिळते आहे यातच समाधान मानून आम्ही उपचारापुरते थोडेफार खाऊन घेतले. अर्धकच्चे खाऊन पोट बिघडायची भीती होतीच. थोडा वेळ विश्रांती घेऊन आम्ही पुढे जायला निघालो. ग्रुपमधल्या दोघांचे समोरचा पर्वत बघून आधीच अवसान गळाले होते. त्यांनी तिथेच थांबायचा निर्णय घेतला. पंचवीसपैकी आता वीस जण राहिले होतो. रघूचा उत्साह तरीही कायम होता. आपल्या हसतमुख चेहऱ्याने तो सगळ्यांना वर चढण्यास प्रोत्साहित करत होता. मी माझ्या गतीने पुढे चाललो होतो. थोड्याच वेळात ती सपाट डोंगरधार मागे पडली आणि खडी चढण सुरु झाली.  
     
हळूहळू वर चढत जाणारी अजगर-वाट 

बेदिनी बुग्यालचे रम्य दृश्य 

वाट जसजशी वर चढू लागली तसे आजूबाजूचे लुसलुशीत गवत कमी होऊ लागले. रुक्ष खडकाळ प्रदेश सुरु झाला. अधून मधून खडकांच्या खोबणीत पांढरे शुभ्र बर्फ साचलेले दिसू लागले. आतापर्यंत हिरवागार दिसणारा भूप्रदेश आता राखाडी दिसू लागला. आम्ही हळूहळू हिमरेषेच्या जवळ जात असल्याची ती खूण होती. आता वाट अगदी अरुंद झाली होती. एका बाजूला होती खोल दरी आणि दुसऱ्या बाजूला त्या अजस्र पर्वताचे अंग. मधूनच येणारे खेचरांचे कळप वाट अडवत होते. खेचरे जवळ येऊ लागली की त्यांच्या गळ्यातल्या घंटांचा आवाज तीव्र होऊ लागे. मग सगळ्यात पुढचा माणूस मागच्यांना सावध करी. मग आम्ही सगळे पर्वताच्या अंगाला बिलगून खेचरे जाईपर्यंत थांबून राहू. हे असे संपूर्ण वाटेत दर दहा-एक पावलांवर चालू होते. त्या पर्वताच्या अंगाला वाट अशी काही बिलगली होती की तिथून ना पायथा दिसत होता ना माथा. दिसत होती ती फक्त न संपणारी नागमोडी वळणे! एवढ्यात ढगांचा एक मोठाला पुंजका एका बाजूने खाली उतरताना दिसला. बघता बघता त्याने सारी वाट व्यापून टाकली. आता तर चार पावलांवरचेही दिसेना! म्हणता म्हणता पाण्याचे टपोरे थेंब अंगावर पडू लागले. थेंब कसले, त्या होत्या साबुदाण्याएवढ्या गारा! एरवी गारांचा पाऊस बघताच टुणकन उडी मारूबाहेर बाहेर पडणारा मी त्या क्षणी मात्र चिंताग्रस्त झालो. पाऊस झाला, वारा झाला, आता हेच काय ते पहायचं राहिलं होतं! हळूहळू गारांचा आकार आणि जोर वाढू लागला. गारांच्या सोबत आता वाराही बेभानपणे वाहू लागला. त्या वाटेला कसलाच आडोसा नव्हता. सतत चालणारी खेचरांची ये-जा बघता एका जागी थांबणेही सोईचे नव्हते. आम्ही पुढे जात राहिलो. रघू अगदी मागे राहिलेल्यांना वर आणत होता. विजयेंद्रजी सगळ्यात पुढे होते. ते मस्तपैकी गारांच्या पावसात एका गुहेसारख्या खोलगट जागी विडी शिलगावून बसले होते. “ऐसी बारीश तो आम बात है” असा काहीसा आविर्भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता. काही क्षण त्यांच्याविषयी असूया वाटली. अशा दुर्गम प्रदेशातले वातावरणाचे कदाचित याहून भयंकर प्रकार त्यांनी अनुभवले असतील. ठरलेली लोकल भलत्याच फलाटावर येणे म्हणजे किती मोठे संकट हे रंगवून सांगणारे आम्ही मुंबईकर हिमालयातल्या त्या गारपिटीपुढे हतबल झालो होतो. 

जोपर्यंत उन होते तोपर्यंत सेल्फी काढता येत होते 
जवळपास तासभर गारपीट चालू राहिली. इवल्याशा साबुदाण्याएवढ्या बर्फकणांचा त्या वाटेवर खच जमा झाला होता. पाय पडताक्षणी ते नाजूक मणी विरघळून चिखलात समरसत होते. पांढऱ्या शुभ्र मोत्यांचा जमिनीवर पडताना होणारा नाजूक आवाज, पडताक्षणी बदलणारा रंग, क्षणार्धात विरघळत जाणारा आकार, सारे काही पहात रहावे असे होते. निसर्गाच्या त्या रुद्रावतारात मी उगीच कवित्व शोधण्याचा प्रयत्न करत होतो.  ती चढण काही संपता संपत नव्हती. उलट्या दिशेने येणाऱ्या ट्रेकर्सना आम्ही उगीच किती चढायचे आहे असे विचारू लागलो होतो. उंचीमुळे डोकं प्रचंड ठणकत होतं. शरीराचा गियर न्यूनतम पातळीवर कधीच येऊन पोहोचला होता. तितक्यात काळू विनायकाचे मंदिर नजरेच्या टप्प्यात आले. तिथून पुढे वाट सपाट होणार होती. मोठ्या जिकिरीने ती शेवटची चार वळणे पार केली आणि मंदिराजवळ पोहोचलो. मंदिर कसले, दगडांच्या चौथऱ्यावर बसवलेली एक मूर्ती आणि बाजूने दगडांचीच केलेली कळससदृश रचना, एवढेच काय ते बांधकाम त्या डोंगरमाथ्यावर होते. पोतडीतून गारा घेऊन आलेल्या त्या ढगोबाने आजूबाजूचा सारा आसमंत व्यापला होता. 

बाजूलाच एक हॉटेल होते. जसजशी उंची वाढत होती तसतसा हॉटेलांचा आकार कमी होत होता आणि “मेनूकार्ड” वरच्या किमती वाढत चालल्या होत्या. इथले हॉटेल म्हणजे दिव्यच होते. रचलेले काही दगड आणि बांबूच्या दोन काठ्या यांच्या आधाराने एक ताडपत्री अंथरलेली होती. त्यात एक स्टोव्ह पेटवून दोन-चार तरुण पोरं बसली होती. आजूबाजूला आलं-लिंबांपासून मॅगीच्या पाकीटांपर्यंत सारे काही विखुरलेले होते. स्टोव्हवर चहाचे आधण धगधगत होते. त्यात नुकत्याच टाकलेल्या आल्यामुळे तो उग्र-तिखट वास साऱ्या वातावरणात पसरला होता. कसेबसे तिथपर्यंत पोहोचलेले आम्ही आडोशासाठी त्या हॉटेलच्या ताडपत्रीखाली शिरलो. साचलेल्या गारांच्या वजनाने ती ताडपत्री पार खाली झुकली होती. आम्ही सात-आठ जण माना वाकवून कसेतरी आत सामावलो. न मागताच हातात चहाचा कप आला. चहा कसला, आल्याचा काढाच म्हणा हवं तर! पण ते दोन घोट घशाखाली गेले तेव्हा अक्षरशः अमृत प्यायल्यागत वाटले. भूक लागली होती पण डोकेदुखी आणि  मळमळ यांमुळे काही खावेसे वाटत नव्हते. थोडा वेळ आम्ही तिथे विसावलो. गारपीट आता सौम्य झाली होती.
  
गारपीट थांबली आणि काळ्या ढगांचा पुंजका क्षणार्धात दूर झाला
 
              
गारांचा आवाज थांबल्यासारखा वाटला तेव्हा तिथून बाहेर पडलो. एक वळण पार केले आणि दूरवर भग्वबासाचा कॅम्प नजरेस पडला. आजची लढाई तर जिंकलो असे म्हणून जीवात जीव आलेले आम्ही ते शेवटचे दीड किलोमीटर अंतर चालू लागलो.

क्रमशः 

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ४ - अली बुग्याल ते बेदिनी बुग्याल : एक न संपणारी डोंगरवाट

अली बुग्यालच्या मध्यावर असलेल्या त्या हॉटेलमध्ये जेवण आणि चहा घेऊन आम्ही पुढच्या वाटेला लागलो. पुढचा कॅम्प बेदिनी बुग्याल ला होता. जवळपास निम्मे अंतर अजून बाकी होते. पण वाट मात्र बरीचशी सपाट होती. शिवाय हिरव्यागार कुरणाचे नितांतसुंदर दृश्य सोबत होतेच. आभाळात उन-पावसाचा खेळ चालला होता. आता आम्ही जवळपास ३५०० मीटर उंचीवरून चाललो होतो. ऑक्सिजनची कमतरता जाणवत होती. सपाट वाटेवरून चालतानाही दम लागत होता. जेवणाच्या ब्रेकनंतर माझा वेग अगदीच मंदावला होता. मी आणि इतर दोघे असे बरेच मागे पडलो होतो. आमच्यासोबत विकी होता. मागे पडलेल्या लोकांना ग्रुपसोबत घेऊन येण्याची अवघड जबाबदारी रघुने त्याच्यावर टाकली होती. माझी फोटोग्राफी सुरु होतीच. कॅमेरा पाहून विकी कुतूहलाने बरेच प्रश्न विचारत होता. त्याला कळेल अशा भाषेत उत्तरे देणे जरा आव्हानात्मक होते. पण तरी त्यातही मजा येत होती. 

बेदिनी बुग्यालच्या वाटेवर 

अली बुग्यालचा सपाट पठारी प्रदेश आता संपत आला होता. दोन्ही बाजूंना दरी आणि समोर एक टेकाड अशा त्रिकोणी जागेवर आम्ही येऊन पोहोचलो. टेकाडाच्या पायथ्याशी एक हॉटेल होते. उजव्या बाजूला, थोडे खाली काही तंबू लागलेले दिसत होते. हाच आपला कॅम्प असावा अशा आशेने मी एकदम उत्साहित झालो. पण विकीने केवळ नकारार्थी मान हलवली. समोरचे टेकाड चढून पलीकडे जायचे आहे हे कळल्यावर तर मी एकदमच हताश झालो. शरीरातली उर्जा संपल्यागत वाटत होती. अति उंचीमुळे थोडेसे गरगरल्यासारखे वाटत होते. शिवाय थंडी-वाऱ्यामुळे अंगात थोडीशी कणकणही वाटत होती. आता पुढे कसे जायचे या विचाराने मी चिंताग्रस्त झालो. वातावरण क्षणोक्षणी बदलत होते. कोणत्या क्षणी पुन्हा पाऊस सुरु होईल याची काहीही शाश्वती नव्हती. त्यामुळे विकी घाई करू लागला होता. सोबतच्या दोघांना हळूहळू पुढे जाण्यास सांगून मी तिथल्या हॉटेलपाशी थांबलो. दहा मिनिटं विश्रांती घेऊन अंगातले उरलेसुरले त्राण एकत्र करून पुढे निघालो. काही पावलांतच टेकाडाची चढण सुरु झाली. नागमोडी वळणं घेत ती वाट टेकाडावर चढत होती. नुकत्याच येऊन गेलेल्या पावसाने वाटेवर राडा झाला होता. त्यात खेचरांचे शेण मिसळून वाट अगदीच निसरडी झाली होती. लोकांच्या चालण्याने एका जागेवरचा चिखल इतरत्र पसरला होता. अक्षरशः दर चार पावलांवर मी थांबत होतो. विकी बिचारा माझ्या गतीने, मला पुढे चालण्यास प्रोत्साहित करत सोबत चालला होता. दर वळणावर अजून किती जायचे आहे या प्रश्नाने मी त्याला हैराण करत होतो. ट्रेक लीड करण्याचा त्याच्याकडे कितपत अनुभव होता देव जाणे, पण त्याचा पेशन्स मात्र वाखाणण्याजोगा होता.

अली बुग्यालचा सपाट प्रदेश 

ट्रेकिंगमध्ये एक असतो शरीराचा गियर आणि एक असतो मनाचा गियर. पहिला गियर सुदृढ असावा लागतोच, पण दुसरा त्याहून मजबूत. दुसरा गियर जर ढासळू लागला तर ट्रेक संपलाच म्हणून समजा. त्या नागमोडी वाटेवर माझ्या शरीराचा गियर न्यूनतम पातळीवर चालला होता. सगळी उर्जा संपल्यागत होती. पण मनाचा गियर मात्र अजून सुदृढ होता. त्या जागेवरून मागे वळणे हा पर्यायच उपलब्ध नव्हता. कारण डिडनापासून बरेच  अंतर आम्ही पुढे आलो होतो. त्यामुळे मनाला कितीही वाटलं, इथेच थांबावं, तरी तो काही व्यवहार्य पर्याय नव्हता. त्यामुळे मी स्वतःला पुढे रेटायचा निर्णय घेतला. दहा पावले चालणे आणि दोन मिनिटे थांबणे अशा तालात मी पुढे चाललो होतो. माझ्या थोडं पुढे असलेल्यांची काही वेगळी परिस्थिती नव्हती. हिमालयाच्या उंचीने सगळ्यांना चांगलाच इंगा दाखवला होता. म्हणता म्हणता ती नागमोडी चढण संपली. त्या टेकाडाच्या पायथ्याशी असलेले छोटेखानी हॉटेल इवलेसे दिसत होते. त्याच्या मागचे अली बुग्याल ढगांच्या दुलईत हरवून गेले होते. आणि समोर बघतो तर काय, नजर जाईल तिथपर्यंत, नाही कदाचित अनंत अंतरापर्यंत डोंगराच्या एका अंगाने जाणारी वाट दिसत होती! पुढच्या कॅम्पसाईटचा कुठे मागमूसही दिसत नव्हता! ते टेकाड म्हणजे खरे तर एका लांबलचक डोंगरधारेची एक बाजू होते! आता मात्र पुरे झालं! अजून पुढे काही जमणार नाही. ती न संपणारी वाट बघून माझ्या मनाचा गियर धाडकन खाली कोसळला. 

माझी अवस्था विकीच्या लक्षात येत होती. तो म्हणाला १०-१५ मिनिटं थांबू. मी एका दगडाला टेकून डोळे मिटले. किती वेळ झोपलो देव जाणे, पण डोळे उघडले तेव्हा चिंताग्रस्त चेहऱ्याचा विकी समोरच्या दगडावर बसलेला दिसला. पलीकडच्या बाजूला विजयेंद्रजी आणि पुढे गेलेले ट्रेकमधले दोघे मेम्बर उभे होते. मी असा अचानक झोपलेला पाहून विकी घाबरला होता आणि त्याने पुढे गेलेल्या विजयेंद्रजींना बोलावून आणले होते. त्यांनी माझी नाडी तपासली. ऑक्सीमीटर बोटाला लावून ऑक्सिजन तपासला. सारे काही नॉर्मल होते. काही त्रास होतोय का वगैरे विचारलं. इथून मागे जायचे आहे का असेही विचारले. मला त्रास तसा काहीच होत नव्हता. जरा डोकं दुखत होतं आणि अंगात कणकण होती. फार गंभीर असं काहीच नव्हतं. जे काही होतं ते निव्वळ exhaustion होतं. त्या दगडावरच्या शीघ्र निद्रेने आता थोडीफार उर्जा शरीरात एकवटली होती. तिथपर्यंत येऊन मागे फिरण्यात मला काहीच अर्थ वाटत नव्हता. आता मला पुढच्या कॅम्पपर्यंत घेऊन येण्याची जबाबदारी विजयेंद्रजींनी घेतली होती. सारे बळ एकवटून मी एकदाचा उठलो. हर हर महादेव म्हटले आणि पुढे चालू लागलो. नशिबाने आता चढण मंद झाली होती. त्या डोंगरधारेच्या अंगाखांद्याने वेटोळे घेत घेत एखाद्या सुस्तावलेल्या अजगरासारखी पहुडलेली ती वाट पार करणे म्हणजे माझ्यासमोरचे आव्हान होते.

टेकडावरून दिसणारे अली बुग्याल 

विजयेंद्रजी म्हणजे एक भलतेच रसायन होते. पन्नाशीचा हा काटक माणूस त्या डोंगरांत, रानात, नी कुरणात लोणच्यासारखा मुरला होता. कोण ट्रेक पूर्ण करू शकेल आणि कोण अर्ध्यात सोडेल याचा अंदाज त्यांना पहिल्याच दिवसात आला होता. “सरजी, आप ट्रेक छोडनेवालोंमेंसे नही हो, हम ये पुरे विश्वासके साथ बता सकते हैं” असे म्हणत म्हणत ते मला पुढे रेटत होते. कदाचित मागे पडलेल्या लोकांना प्रोत्साहित करण्याची ही त्यांची एक पद्धत असावी. काही का असेना, मी पुढे जात होतो खरा! मग त्यांनी त्यांच्या अनुभवातले रंजक किस्से सांगायला सुरुवात केली. मग त्यात बुग्यालवर उगवणाऱ्या जडीबुटी पासून तिथल्या देव-देवतांच्या वास्तव्यापर्यंत सारे काही होते. त्या सगळ्या गप्पा ऐकता ऐकता त्या अजगर-वाटेवरचे एकेक वळण मागे पडत होते. जवळपास तासभर चालल्यानंतर एकदाचा बेदिनी बुग्याल चा कॅम्प नजरेच्या टप्प्यात आला. ट्रेकिंगमधला हा क्षण म्हणजे आयुष्यातल्या कोणत्याच गोष्टीशी तुलना करता येणार नाही असा असतो! आपले लक्ष्य समोर दिसत असल्याचा आनंद, वाट संपत आल्याचा आनंद, वाट यशस्वीरित्या पार केल्याचा आनंद, त्या जागेचे सौंदर्य असे कित्येक कंगोरे त्या क्षणाला असतात. मोठ्या उत्साहात आम्ही कॅम्पसाईट कडे निघालो.  

कॅम्पसाईट नजरेच्या टप्प्यात आली ती जागा 

बेदिनी बुग्यालच्या विस्तीर्ण कुरणात आमचे तंबू लागले होते. अली बुग्यालपेक्षा बेदिनी बरेच मोठे आणि विस्तीर्ण होते. कुरणाच्या एका कोपऱ्यात बेदिनी कुंड दिसत होते. पावसाळ्यात या कुंडात पाणी साठून एक लहानसा तलाव बनतो. शेजारच्या त्रिशूल आणि नंदा घुंटी शिखरांचे मनोहारी प्रतिबिंब त्यात पहायला मिळते. अनेक रानफुले, औषधी वनस्पती, आणि पशु-पक्ष्यांचे हे निवासस्थान आहे. भारतीय संस्कृतीत मानाचे स्थान असलेले ब्रह्मकमळ (Sassurea oblavata) येथे आढळते. तीन बाजूंनी डोंगर आणि एका बाजूने तीव्र उतार व उताराला बिलगलेले घनदाट रान अशी बेदिनी बुग्यालची भौगोलिक रचना आहे. कॅम्पसाईटवर पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे चार वाजत आले होते. सगळ्यात शेवटी पोहोचणाऱ्या आम्हा लोकांचे एकदम जंगी स्वागत झाले. गरमागरम चहा हजर होताच. चहा पिऊन एक क्रोसिनची गोळी घेऊन मी तंबूमध्ये जरा वेळ विसावलो. आल्या आल्या झोपायला सक्त मनाई होती. जेवढे मोकळ्या हवेत फिराल तेवढे वातावरणाला लवकर जुळवून घ्याल, असे सगळे ट्रेक लीडर सांगत होते. तासाभरात अंगातली कणकण कमी झाली आणि मी उत्साहाने बेदिनी बुग्यालवर भटकायला बाहेर पडलो.          

बेदिनी बुग्याल मधली कॅम्पसाईट आणि मागे दिसणारे त्रिशूल शिखर 
क्रमश: 

अविस्मरणीय रूपकुंड - भाग ३ - अली बुग्याल : डोंगरमाथ्यावरचे हिरवे कुरण

डिडनामधल्या त्या उबदार लाकडी घरात झक्कास झोप लागली होती. बाहेरचा गारवा रजईतून बाहेर पडू देत नव्हता. आदल्या दिवशीच्या ट्रेकचा परिणाम शरीरावर जाणवत होता. जरा पाय हलवून पाहिले आणि एक वेदनेची लाट मेंदूपर्यंत झणझणत गेली. म्हणायला वेदना असली तरी ती कुठेतरी सुखावह वाटत होती. कधीही न वापरलेले स्नायू आणि सांधे कसे अगदी मोकळे-मोकळे वाटत होते. टोकाच्या शारीरिक हालचालीनंतर शरीरात एनडोर्फीन्स फिरू लागतात. त्याचाच हा परिणाम असावा. शरीरातल्या सगळ्या स्नायूंनी जणू पुनर्जन्मच घेतला असावा असे वाटत होते. जाग आली असूनही बाहेर काही हालचाल दिसत नाही म्हणून मी लोळत पडलो होतो. इतक्यात ट्रेक लीडर रघूची हाक ऐकू आलीच. त्याबरोबर लेमन टीचा सुगंधही आला. रघू सगळ्यांना झोपेतून उठवून बेड टी पाजत फिरत होता. दिवसाची सुरुवात असावी तर अशी! गरमागरम चहाचे दोन घोट घशाखाली घातले आणि मुकाट्याने उठून तयारीला लागलो. आजची चढाई म्हणजे ट्रेकमधला सगळ्यात जास्त altitude gain होता. 

डिडना मधले उबदार लाकडी घर 

सातच्या सुमारास आम्ही सगळं आवरून तयार झालो. रघू, विकी, आणि विजयेंद्रजी असे तिघे लीडर आमच्यासोबत होते. विजयेंद्रजी साधारण पन्नाशीचे असतील. गेल्या तीसेक वर्षांचा ट्रेकिंगचा अनुभव त्यांच्याकडे होता. विकी साधारण १७ वर्षांचा असेल. त्याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. आयुष्यात कधी समुद्र न पाहिलेल्या या मुलाला नेव्ही मध्ये जायचं होतं. त्यासाठीच्या परिक्षेचा फॉर्मही त्याने भरला होता. सुट्टीतला उद्योग म्हणून ट्रेक लीडरचे काम करत होता. मला उनाडक्या करण्यात घालवलेली माझी बारावीनंतरची सुट्टी आठवली. असो. रघू म्हणजे या ट्रेकिंग ग्रुपचा मुख्य व्यवस्थापक. साडेसहा फूट उंची आणि देखणे व्यक्तिमत्व. सगळ्यांशी अदबीने वागणारा त्याचा स्वभाव. सगळ्यांचं हवं-नको बघणारा, मागे पडलेल्या लोकांना motivate करून पुढे घेऊन येणारा, सकाळ-सकाळी लेमन टी पाजणारा रघू दोनच दिवसांत सगळ्यांच्या आवडीचा झाला होता. अशा या तीन शिलेदारांवर आमची जबाबदारी होती. सगळ्या महत्वाच्या सूचना देऊन झाल्या आणि हर हर महादेव ची घोषणा करून आमची वरात पुढे निघाली. 

गर्द रानातून जाणारी वाट 
गाव मागे पडलं आणि चढण सुरु झाली. फारसे आढेवेढे न घेता ती वाट सरळ रानातच शिरली. कालच्या पावसाचा पचपचीत चिखल चुकवत आम्ही पुढे चाललो होतो. हळूहळू वर येणाऱ्या सूर्याची किरणे संथपणे दरीत झिरपत होती. डोंगरमाथ्यावरचं धुकं हळूहळू निवळत होतं. थोडं अंतर वर चढून गेलो आणि पहिला विश्रांतीचा टप्पा आला. इतक्यात मागून एक जण वर चढत येताना दिसला. पुढे लहान आणि मागे एक मोठी बॅग लावून धापा टाकत वर चढत होता. आम्ही थांबलेले पाहून तोही थांबला. एखाद्या पुढे गेलेल्या ग्रुपचा मागे राहिलेला मेम्बर असावा म्हणून आम्ही त्याला ग्रुप कोणता ते विचारले. ऐकतो तर काय, पठ्ठ्या एकटाच रूपकुंड ट्रेक साठी आला होता! इंटरनेटवरून माहिती काढून, तंबू आणि खाण्या-पिण्यासकट सगळी तयारी करून तो इथपर्यंत पोहोचला होता. त्यावर कळस म्हणजे त्याने आतापर्यंत आयुष्यात कधीही ट्रेकिंग केले नव्हते! आमच्या ग्रुपमधले दर्दी ट्रेकर्सही त्याचं धाडस बघून अचंबित झाले. हिमालयातले ट्रेकिंग म्हणजे इंटरनेटवर माहिती वाचून करण्याचा प्रकार नाही हे एव्हाना त्याला कळून चुकले होते. योगायोगाने आमचा ग्रुप त्याला भेटला होता. रघूने त्याला आम्हाला सामील होण्याचे सुचवले. तोही आनंदाने तयार झाला. नव्या पाहुण्याचे म्हणजेच अनिर्बनचे स्वागत करून आम्ही तिथून पुढे निघालो. 

रानातला सेल्फी 

इथून पुढे वाट बिकट होत होती. सरळसोट वाढलेल्या झाडांत किती चालतो आहोत याचा अंदाज येत नव्हता. आता सगळा ग्रुप विखुरला होता. चालण्याच्या वेगानुसार लोकांचे गट पडले होते. सगळ्यात मागे पडलेल्या लोकांना गोड बोलून रघू वर चढवत होता. ट्रेक लीडरची ही मोठी कसोटी असते. रघू त्याच्या परीने सगळ्यांना वर चढण्यास प्रोत्साहित करत होता. मात्र एका बाईंची तब्येत बिघडली. एखादी उलटी वगैरे झाली आणि बाईंनी परत जायचा निर्णय घेतला. त्यांच्यासोबत त्यांचे यजमानही परत जायला निघाले. दोन मेम्बर इथेच गळाले. सुरुवातीला अगदी पुढे असणारा मी आता मात्र बराच मागे पडलो होतो. खांद्यावरचं वजन पावलागणिक वाढत असल्यासारखं वाटत होतं. मात्र तरीही मी स्वतःला पुढे रेटत होतो. अर्ध्या तासानंतर वाट बरीचशी सपाट होणार आहे या आशेने एकेक पाउल पुढे टाकत होतो. 

क्षणभर विश्रांती 

अखेरीस ती तीव्र चढण संपली. त्या लहानशा सपाट जागेवर आम्ही जरा वेळ विसावलो. या जागेची उंची होती ३५०० मीटर. डिडनापासून इथपर्यंत आम्ही जवळपास ८०० मीटर चढाई केली होती. अजून २०० मीटरचा पल्ला गाठायचा होता. पण यापुढची वाट मंद चढाची आणि कुरणांमधून जाणारी होती. थोडा वेळ विश्रांती घेऊन आही पुढे निघालो. आजूबाजूचे रान आता विरळ होऊ लागले होते. ज्या पहाडाच्या एका अंगाने वर चढाई करत होतो त्याचा माथा आता नजरेच्या टप्प्यात दिसत होता. बेभान वारं सुटलं होतं. डाव्या हाताला दूरवर कुठेतरी लोहाजुंगमधली इवलीशी घरं दिसत होती. दरीतल्या रानात डिडना कुठेतरी दडून बसलं होतं. आता चढण तशी मंद झाली होती. मात्र तरीही उंचीमुळे एक-एक पाउल पुढे टाकणं जिकरीचं वाटत होतं. इतक्यात बेभान वाऱ्याने एक काळाकुट्ट ढग आमच्यासमोर आणून ठेवला. एवढी चढण यशस्वीपणे पार केल्याबद्दलचे बक्षीसच जणू! काही मिनिटांचा अवकाश आणि टपोरे थेंब गळायला सुरुवात झाली. आतापर्यंत सुखावह वाटणारा वारा आता मात्र अंगात कापरं भरवत होता. आम्ही लगबगीने रेनकोट वगैरे परिधान केले आणि पुढे चालायला सुरुवात केली. 

अली बुग्याल! 

काही वेळातच डोंगरमाथ्यावर पोहोचलो. माथ्यावरच्या पठारावर लुसलुशीत हिरवे गवत चहूबाजूंना पसरलेले होते. मधेच एखादा खडक त्या गालिच्याची राखण करत उभा होता. चहूबाजूंनी हिमालायची अत्युच्च शिखरे ढगांची दुलई पांघरून स्वस्थ बसली होती. हे पठार म्हणजे अली बुग्याल. पहाडी भाषेत बुग्याल म्हणजे कुरण. हिमालयात साधारण ३५०० मीटर उंचीवर वृक्षरेषा आणि ४००० मीटरच्या आसपास हिमरेषा दिसून येते. याच्या मधल्या टप्प्यात विस्तीर्ण कुरणे आढळून येतात. वेगवेगळ्या प्रदेशांत या भूभागास वेगवेगळी नावे आहेत. जसे काश्मीरमध्ये त्याला मर्ग म्हणतात. सोनमर्ग आणि गुलमर्ग ही प्रसिद्ध ठिकाणे अशाच विस्तीर्ण कुरणांमध्ये वसलेली आहेत. उत्तराखंडमधली बुग्याल ही दुर्गमतेमुळे कायमस्वरूपी मानवी वस्तीसाठी अनुकूल नाहीत. आसपासच्या गावांतले लोक गुरेचराईसाठी या कुरणांचा पुरेपूर उपयोग करून घेतात. थंडीच्या दिवसांत बर्फाखाली असलेली ही कुरणे वसंत ऋतूत ताजीतवानी होतात आणि नानाविध रानफुलांनी बहरून जातात. मग उन्हाळ्यात कुराणांना हिरवं तेज चढतं. उत्तराखंड मधले प्रसिद्ध ट्रेकिंगचे मार्ग या नयनरम्य बुग्यालमधून जातात. रूपकुंडच्या मार्गातील अली बुग्याल आणि बेदिनी बुग्याल ही कुरणे ट्रेकिंग समुदायात प्रचंड लोकप्रिय आहेत.

अली बुग्याल वरून दिसणारे नयनरम्य दृश्य 

आज त्यातलेच एक कुरण म्हणजे अली बुग्याल अनुभवण्याची संधी मिळाली होती. अली बुग्यालच्या मध्यावर पोहोचलो तेव्हा दुपारचे बारा वाजत आले होते. मघाशी डोक्यावर आलेला काळा ढग चार थेंब भुरभुरवून दूर कुठेतरी पसार झाला होता. धुक्यातून तिरपे उतरलेले सूर्यकिरण त्या हिरव्या गालिच्यावर मनसोक्त लोळण घेत होते. त्या उबदार किरणांनी सुखावलेले कुरण काहीशा वेगळ्याच छटेत चमकत होते. त्या स्वर्गीय दृश्याचा आस्वाद जितका घेऊ तितका कमीच होता. कुरणाच्या एका कडेला एक छोटेखानी हॉटेल होते. आम्ही तिथे जरा वेळ विसावलो. सोबत दिले गेलेले पॅक लंच काढले. इतकं दमल्यानंतर तहान-भूक वगैरे कशाची जाणीव होत नव्हती. इच्छा होत नसली तरी काहीतरी खाणं आवश्यक होतं. चार घास घशाखाली घातले आणि हॉटेल मधला चहा घेतला. आता पुढची वाट कितीही अवघड असली तरी नयनरम्य दृश्य सोबत असणार या जाणीवेने हायसे वाटत होते.   


क्रमशः