चालुक्यनगरी बदामी - भाग २ - शिवालये आणि गुंफा मंदिरे

उच्च शिवालयाकडे जाणारी वाट 
एव्हाना चार वाजत आले होते. उन्हं कलती व्हायला लागली होती. उत्तर शिवालयांकडे जाणारा मार्ग समोरच दिसत होता. हर हर महादेव म्हणून मी पायऱ्या चढायला सुरुवात केली. वाट तशी खड्या चढणीची होती. काही अंतर चढून जाताच ती वाट डोंगरांच्या मधल्या घळईत शिरली. इथे वेगळाच प्रसन्न गारवा जाणवत होता. पहाडाच्या भिंतींवर काही अर्धवट कोरलेली शिल्पे दिसत होती. मधेच एखादे पिंपळाचे रोप त्या पहाडाच्या अन्तःपुरातल्या पाण्याच्या आधारावर वाढलेले दिसत होते. त्याची अस्ताव्यस्त पसरलेली मुळे त्या पहाडाला एखाद्या जटाधारी मुनीचे रूप देत होती. त्या घळईतून बाहेर पडलो आणि डाव्या हाताला निम्न शिवालय दिसले. पहाडावरच्या पठारावर ते सुबक शिवालय फारच खुलून दिसत होते. त्या पठारावरून एका बाजूला अगस्त्य तीर्थ तर दुसरीकडे बदामी शहर असे विहंगम दृश्य दिसत होते. मंदिर तसे लहानसेच होते. मात्र त्यावरचे कोरीवकाम तत्कालीन स्थापत्यविशारदांच्या कौशल्याची दाद देत होते. मंदिराच्या मागच्या अंगाने वर पाहिले असता पाठीमागचा पहाड आणि त्यावरचे उच्च शिवालय नजरेच्या एका टप्प्यात दिसत होते. तांबूस रंगाचा ओबडधोबड पहाड ते अद्भुतरम्य शिवमंदिर आपल्या छातीवर अभिमानाने मिरवत होता. काही क्षणांसाठी आयन रँडच्या कादंबरीतला हॉवर्ड रॉर्क आठवला. रॉर्क एक निष्णात स्थापत्यविशारद एका विलक्षण दृष्टीकोनातून स्थापत्यकलेची जोपासना करतो. तो म्हणतो, एखाद्या भूभागात कशा प्रकारची वास्तू बांधायची याची प्रेरणा तिथला निसर्गच देत असतो. स्थापत्यविशारदाची भूमिका एवढीच की त्याने त्या मूळ प्रेरणेशी प्रामाणिक राहून वास्तू बांधावी. ती प्रेरणा अचूक ओळखणे हेच त्या विशारदाचे कौशल्य. बदामीतल्या स्थापत्यविशारदांना ती प्रेरणा हुबेहूब समजली होती. इथला दगड अन् दगड जणू त्यांना सांगत होता, माझ्यापासून शिल्पे घडवा, कळस बांधा, अलंकृत खांब उभारा! 

एका दृष्टीकोनातून दिसणारी शिवालये 
काहीशा गूढ प्रेरणेने मी त्या उच्च शिवालयाकडे निघालो. आता चढण फारशी तीव्र नव्हती. निम्न शिवालयापेक्षा काहीसे मोठे असे ते शिवालय एखाद्या ध्यानमग्न ऋषीस्तव त्या पहाडावर विराजले होते. जणू काही साऱ्या संसाराची तिथून स्थितप्रज्ञतेने पाहणी करत असावे. तिथून निम्न शिवालय करंगळीएवढे भासत होते. त्याखालचे बदामी शहर म्हणजे जणू अस्ताव्यस्त पसरलेला पाचोळा. मंदिरावरच्या कोरीव मूर्ती पुढे सरकणारा काळ एखादा सिनेमा पहावा तशा स्तब्धतेने पाहत होत्या. काळाची असंख्य कडू-गोड आवर्तनं पाहून त्यांनाही विरक्ती आली असेल एव्हाना. मंदिराच्या गाभाऱ्यात शिरलो तर एक अनामिक गारवा जाणवू लागला. बाहेरचं कडक उन त्या पाषाणमंदिराच्या भिंतींनी जणू पिऊन टाकलं होतं. तिथली गूढ शांतता कमालीची प्रसन्न वाटत होती. मंदिर म्हणजे देवाशी संवाद साधण्याची जागा. पण त्यासाठी आधी स्वतःशी निःसंदिग्ध संवाद हवा. तो साधण्यासाठी आवश्यक ती वातावरण निर्मिती करणे हा मंदिराचा मूळ उद्देश. एखाद्या नास्तिकाला जरी त्या शिवालयात नेलं तरी तो अंतर्मुख होईल असे वातावरण त्या शिवालयात अनुभवास येत होते. तिथे थोडा वेळ घालवून मी मंदिराच्या बाहेर पडलो. शिवालये असलेल्या या पहाडावर काही बुरुज आणि तटबंदी आहे. तिथे काही वेळ छायाचित्रण करून मी खाली उतरलो. समोरच्या गुंफा खुणावत होत्या.

शिवालयाच्या बाजूने दिसणारे विहंगम दृश्य 

अगस्त्य तीर्थाच्या काठाकाठाने चालत मी पलीकडच्या बाजूला पोहोचलो. गुंफांकडे जाणारा रस्ता समोर दिसत होता. साधारण पावणेपाच वाजले होते. सहा वाजता गुंफा बंद होणार होत्या. तासाभरात सगळं बघून होईल की नाही याच्या विचारात मी होतो. पण उद्याचा दिवस पट्टदकल आणि ऐहोळे यांसाठी ठरवलेला असल्याने इथे पुन्हा यायला मिळेल की नाही याची खात्री वाटत नव्हती. शेवटी जेवढं होईल तेवढं बघू असा विचार करून मी तिकीट काढलं आणि पायऱ्या चढू लागलो. तो सगळा परिसर गर्दीने फुलून गेला होता. सव्वीस जानेवारीची सुट्टी असल्याने जवळपासचे लोक मोठ्या प्रमाणावर तिथे आले होते. कोण्या एका शाळेची सहलही आली होती. त्या शंभर-एक पोरांचा कलकलाट सगळीकडे भरून राहिला होता. त्या गुंफांमध्ये लपंडाव खेळणाऱ्या पोरांना त्यांचे शिक्षक मोठमोठ्याने हाका मारून बसकडे पिटाळत होते. एकूणच माझा इकडे येण्याचा दिवस चुकला होता. पण आता काही इलाज नव्हता. त्या सगळ्या गोंगाटाकडे दुर्लक्ष करून मी वर चढू लागलो. सुरुवात शेवटच्या गुंफेपासून करावी आणि एक-एक गुंफा बघत खाली यावे असा विचार करून मी थेट शेवटच्या गुंफेपाशी गेलो. इथे एकूण चार गुंफा आहेत. त्यांपैकी पहिली शंकराला, दुसरी व तिसरी विष्णूला, तर चौथी जैन तीर्थंकरांना समर्पित आहे. 

गुंफा मंदिर क्रमांक चार 


बाहुबली 

चौथ्या गुंफेबाहेरच्या प्रांगणात जरा शांतता होती. अगस्त्य तीर्थ आणि पलीकडचे भूतनाथ मंदिर इथून फारच विलोभनीय दिसत होते. मी गुंफेत शिरलो. अखंड पहाडातून कोरून बनवलेली ती गुंफा तशी प्रशस्त होती. आतल्या खांबांवर, छतावर, सगळीकडे नाजूक कोरीवकाम केलेले होते. मंडपातून आत शिरताच डाव्या बाजूला नजरेस पडली तेविसावे तीर्थंकर पार्श्वनाथ यांची मूर्ती. मूर्तीच्या डोक्यावर पंचमुखी आदिशेष दिसत होता. त्याच्याच समोरच्या बाजूला निर्वाणावस्था प्राप्त झालेला बाहुबली दिसत होता. गुंफेच्या गर्भगृहात चोविसावे तीर्थंकर वर्धमान महावीर ध्यानमग्न अवस्थेत दिसत होते. गुंफेतल्या भिंतींवर इतर तीर्थंकरांच्या आकृती दिसत होत्या. या गुंफेत जैन धर्मीय कदाचित निवास करत असावेत. एकंदरीतच गुंफेची रचना एखाद्या मंदिराच्या अंतर्गत रचनेसारखी होती. म्हणूनच या गुंफांना गुंफा मंदिरे म्हटले जात असावे. तिथून खाली उतरून मी तिसऱ्या गुंफेपाशी आलो. तिसरी गुंफा चौथ्या गुंफेपेक्षा जास्त मोठी होती. या गुंफेस महाविष्णू गुंफा म्हटले जाते. आत शिरल्या बरोबर अलंकृत खांब नजरेस पडले. समांतर उभ्या रेषांनी त्या खांबांना बहुमितीय आकार दिला होता. त्यांच्या वरच्या भागात देव-देवतांची शिल्पे कोरलेली होती. डाव्या हाताला महाविष्णूची विलोभनीय मूर्ती विराजमान झालेली दिसत होती. पंचमुखी आदिशेषाने याही मूर्तीच्या वर छत्र धरले होते. बाजूला गरुड आणि लक्ष्मी यांच्या आकृती दिसत होत्या. त्याच्याच समोरच्या बाजूला विजय नरसिंहाची मूर्ती आवेशात उभी होती. हिरण्यकपशूचा वाढ केल्यानंतरचा विजयी उन्माद त्याच्या चेहऱ्यावर दिसत होता. याच गुंफेत प्रणयाराधानेत मग्न जोडप्यांच्या काही मूर्ती दिसत होत्या. त्यांचे पोशाख, अलंकार, भावमुद्रा सारे काही त्या लाल पाषाणातून हुबेहूब साकारले होते. 


वराह अवतार 
दुसऱ्या गुंफेत विष्णूचे काही अवतार आणि त्यांच्या संदर्भातल्या कथा साकारल्या होत्या. बळीराजाच्या मस्तकावर पाय ठेवणारा वामन हे त्यातले लक्षवेधी शिल्प होते. त्यासोबत वराह अवतारही साकारला होता. या गुंफेत मुख्य मूर्ती मात्र नव्हती. पहिल्या गुंफेपर्यंत पोहोचलो आणि सुरक्षारक्षकाने शिटी वाजवत सगळ्यांना बाहेर काढायला  सुरुवात केली. गुंफा बंद व्हायची वेळ झाली होती. जमेल तेवढे पाहून घेण्याच्या उद्देशाने मी आत शिरलो. ही गुंफा शंकराला समर्पित होती. सर्वात जुनी आणि सगळ्यात मोठी असलेली ही गुंफा गर्भगृह, सभा मंडप, आणि मुखमंडप अशा तीन भागांमध्ये विभागलेली होती. एका बाजूला तांडवनृत्य करणारा अठरा हातांचा शंकर पाषाणातून घडवलेला होता. त्याच्या मागील दोन हातांत एक नाग, तर इतर हातांत डमरू आणि इतर वाद्ये होती. त्याच्या शेजारी गणेश व इतर वादक दिसत होते. नृत्यमग्न शंकराची ती मूर्ती नटराज म्हणून ओळखली जाते. अत्यंत कौशल्याने घडवलेली ही मूर्ती भारतीय अश्म-छेद स्थापत्यकलेचा उत्तम नमुना समजली जाते. याच गुंफेत महिषासुरमर्दिनी, अर्धनारीश्वर, आणि गजवृषभ अशी इतर शिल्पेही होती. आता अंधार पडू लागला होता. आधीच अंधारलेल्या त्या गुंफामध्ये अजून गडद अंधार हळूहळू उतरत होता. त्यामुळे फोटो काढता येणे अशक्य झाले होते. बाहेरचा गलका वाढतच चालला होता. शेवटी मी गुंफांची भेट आवरती घेतली आणि खाली उतरलो. बदामीतल्या सगळ्यात महत्त्वाच्या जागेला पूर्ण न्याय देऊ शकलो नाही याची काहीशी हुरहूर मनात दाटली होती. मात्र पाषाणात कोरलेल्या एवढ्या सुंदर मूर्ती पाहून नजर संपृक्त झाली होती. उद्या जमलं तर परत येईन असा विचार करून मी हॉटेलवर परतलो.


वामनावतार  
क्रमशः 

चालुक्यनगरी बदामी - भाग १ - ऐतिहासिक सहलीची सुरुवात

सव्वीस जानेवारीची पहाट. अर्धा तास उशिराने धावत असलेली सोलापूर सुपरफास्ट अखेरीस सोलापूर स्थानकात शिरली. आपली पुढची गाडी चुकणार नाही याची खात्री पटल्याने मी निर्धास्त झालो. अर्धवट झोपेतच मी गाडीतून उतरलो. वातावरणात कमालीचा गारठा होता. मात्र गाडीतल्या एसी पेक्षा हा काहीसा बोचणारा गारठाच जास्त आल्हाददायक वाटत होता. पलीकडे पाच नंबरवर हुबळी सुपरफास्ट लागली होती. मी लगबगीने जाऊन माझी जागा शोधली आणि गाडी सुटायची वाट बघत बसलो. सव्वीस जानेवारीच्या सुट्टीला जोडून आलेल्या वीकेंडमुळे चार दिवस सलग सुट्टी मिळाली होती. एवढी सुट्टी म्हणजे माझा जीव घरात रमणे अशक्य. मग कर्नाटकातल्या ऐतिहासिक जागांच्या सहलीचे नियोजन केले आणि निघालो. बदामी, पट्टदकल, आणि ऐहोळे यांसाठी दोन दिवस तर हम्पीसाठी दोन दिवस असा कार्यक्रम होता. या जागांविषयी बरेच ऐकले होते. आज प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला होता. सगळी जय्यत तयारी करून मी निघालो होतो. काहीतरी भन्नाट पहायला मिळणार आणि नेहमीच्या दिनचर्येतून चार दिवसांची सुटका होणार या भावनेने मी फारच उत्साहात होतो.

तेवढ्यात चहावाल्याच्या आवाजाने माझी तंद्री भंगली. बोचणाऱ्या थंडीवर उत्तम उतारा माझ्या समोर हजार होता. गरमागरम चहा घशाखाली गेल्यानंतर जरा तरतरी आली. नियोजित वेळेनुसार गाडीने प्रस्थान केले. एव्हाना उगवतीकडे तांबडं फुटू लागलं होतं. पाखरांची किलबिल सुरु झाली होती. बऱ्याच दिवसांनी सूर्योदयाचा प्रसन्न क्षण अनुभवत होतो. गाडीने जसा वेग पकडला तशी थंड हवा झोंबू लागली. मी मुकाट्याने खिडकी बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागलो. गाडी तशी रिकामीच होती. समोरच्या सीटवर एक आजोबा अंगाचं मुटकुळं करून निवांत झोपले होते. मीही त्यांचा कित्ता गिरवत त्या मोकळ्या सीटवर आडवा पसरलो. भारतीय रेल्वेचा खडखडाट म्हणजे जणू बाळाचा पाळणाच! त्या हेलकाव्यांत छान झोप लागली. विजापूरला गाडीत गर्दी झाली. मग मात्र मला माझा सीटवरचा पसारा आवरता घ्यावा लागला. साधारण साडेअकराला बदामी स्टेशनवर उतरलो. बदामी हे कर्नाटक मधल्या बागलकोट जिल्ह्यातलं एक शहर. चालुक्यकालीन लेण्या आणि मंदिरे यांसाठी प्रसिद्ध. मी हॉटेलवर जाऊन आन्हिकं उरकली आणि शहर बघायला बाहेर पडलो.

शहर तसं लहानसंच होतं. जेमतेम २५००० लोकवस्ती असेल. सगळी प्रेक्षणीय स्थळं अगस्त्य तीर्थाच्या आसपास एकवटलेली आहेत. माझ्या हॉटेलपासून तिथलं अंतर साधारण २ किमी असेल. एरवी सहज चालून गेलो असतो. पण इथलं दुपारचं ऊन सहन होत नव्हतं. सोलापुरातला गारठा कुठच्या कुठे पळाला होता. शेवटी रिक्षा केली. शहरातल्या लहान-मोठ्या गल्ल्यांतून वाट काढत रिक्षा पुढे जाऊ लागली. त्या लहानशा रस्त्यावर फिरणारी गुरं, डुकरं, आणि कुत्री, मधेच खेळणारी लहान मुलं, आणि ये-जा करणारी लोकं एका टिपिकल भारतीय गावाचा अनुभव देत होती. या सगळ्या कोलाहलात ती प्राचीन मंदिरे कोणत्या अवस्थेत उभी असतील आणि त्यांचा कसा अनुभव येईल अशा विचारात मी होतो. तेवढ्यात ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग - संरक्षित क्षेत्र, बदामी’ अशी पाटी दिसली आणि एका प्राचीन कमानीतून रिक्षा आत शिरली. आत शिरताच एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्याचा आभास झाला. उजवीकडे नितांतसुंदर असे अगस्त्य तीर्थ दिसत होते. तीर्थाच्या चहूबाजूंनी ताशीव कड्यांचे लाल पहाड रखवालदारांसारखे उभे होते. दक्षिणेकडच्या पहाडात बदामीची सुप्रसिद्ध गुंफा मंदिरे कोरलेली दिसत होती. शहराच्या बाजूने एक विस्तीर्ण घाट तीर्थात उतरत होता. त्याच्या समोरच्या बाजूला उभारलेले सुबक असे भूतनाथाचे मंदिर साऱ्या परिसराचे सौंदर्य एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत होते. मी रिक्षातून उतरलो. तीर्थाच्या काठाशी एक प्रचंड वटवृक्ष आपल्या पारंब्या सावरत उभा होता. त्या रणरणत्या उन्हात थोड्याफार सावलीचा तोच एक आधार होता. मी तिथे थांबून आता काय बघू, कुठून सुरुवात करू याचा विचार करू लागलो. इतक्यात शेजारचे वस्तुसंग्रहालय नजरेस पडले.

बदामीचे सुप्रसिद्ध भूतनाथ मंदिर 

उन्हापासून तात्पुरती सुटका म्हणून मी त्या वस्तुसंग्रहालयात शिरलो. अपेक्षेपेक्षा आतली मांडणी फारच नेटकी होती. उत्खननात सापडलेले अनेक अवशेष तिथे मांडले होते. त्यांपैकी मयूरतोरण आणि लज्जागौरी ही शिल्पे विशेष उल्लेखनीय. एका दालनात चालुक्य साम्राज्याचा इतिहास चित्रात्मक पद्धतीने मांडला होता. कन्नड भाषेची सध्याची लिपी कशी उत्क्रांत झाली ती पक्रिया फारच आकर्षक पद्धतीने दाखवली होती. दुसऱ्या दालनात बदामी आणि परिसराची त्रिमितीय प्रतिकृती बनवलेली होती. दुर्भाग्याने आत फोटो काढायला मनाई होती. एकूण संग्रहालय लहानच होते. अर्ध्या तासात तिथून मी बाहेर पडलो. बाहेरच्या दुकानातून बदामीविषयी माहिती असलेले एक लहानसे पुस्तक विकत घेतले. युरोपातल्या प्रसिद्ध जागांविषयी जशी इत्थंभूत माहिती इंटरनेट वर मिळते तशी भारतातल्या जागांविषयी मिळत नाही. शिवाय तिथे कोणी मार्गदर्शक सोबत घ्यायचा तर त्यालाही कितपत माहिती असेल याची काय शाश्वती? त्यामुळे मी सरळ पुस्तक वाचून पुढचा मार्ग ठरवायचा निर्णय घेतला. एका तथाकथित प्रमाणित मार्गदर्शकाने लिहलेले ते पुस्तक तसे माहितीपर होते. व्याकरणाच्या अनेक चुका असल्या तरी आसपासची आवश्यक माहिती त्यात होती. मी त्या वटवृक्षाखाली विसावलो आणि पुस्तक चाळू लागलो.

बदामीचे मूळ नाव वातापी. प्राचीन काळापासून हे शहर एक महत्त्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. या नावामागची कथाही रंजक आहे. कोणे एके काळी इथल्या डोंगरांत वातापी आणि इल्वल असे दोघे असुरबंधू रहात होते. ते दाराशी येणाऱ्या पाहुण्यास भोजनासाठी आमंत्रित करत. मग इल्वल वातापीला मारून त्याच्या शरीरापासून बनलेले अन्न त्या पाहुण्यास खाऊ घाली. पाहुण्याने ते अन्न खाताच वातापी त्याचे पोट फाडून बाहेर येई. मग दोघे असुरबंधू त्या मृत पाहुण्यास गट्टम करत. एकदा योगायोगाने अगस्त्य ऋषी या परिसरातून जात होते. इल्वलाने त्यांना आमंत्रित केले व ठरल्याप्रमाणे वातापीच्या शरीरापासून बनलेले अन्न खाऊ घातले. मात्र अगस्त्य ऋषींनी असुरांचा डाव ओळखला व वातापी पोटात जिवंत व्हायच्या आधीच “वातापी जीर्णोSभव” असा मंत्र म्हणून ते अन्न पचवून टाकले. अशा प्रकारे वातापीचा त्याच्या भावाच्याच हस्ते मृत्यू झाला व लोकांची त्यांच्या जाचापासून सुटका झाली. अगस्त्य ऋषींनी घडवून आणलेल्या त्या वधामुळे त्या सरोवरास अगस्त्य  तीर्थ असे नाव मिळाले.

साधारण इसवी सनाच्या पाचव्या शतकात उदयास आलेले चालुक्य साम्राज्य दक्षिण भारतातले एक महत्त्वाचे साम्राज्य समजले जाते. बदामीचे भौगोलिक, आर्थिक, व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन चालुक्य सम्राट पुलकेशीन-१ याने आपली राजधानी इथे वसवली. इथली गुंफा मंदिरे, इतर देवालये, आणि किल्ल्यांची उभारणी त्याच्याच काळात झाली. पुढे पुलकेशीन-२ याने आसपासच्या इतर राजवटींचा पराभव करून उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत चालुक्य साम्राज्याचा विस्तार केला. सुमारे तीनशे वर्षं चालुक्य साम्राज्याने दक्षिण भारतावर आधिपत्य गाजवले. कालांतराने आठव्या शतकात अंतर्गत यादवी व फितुरी यांमुळे या साम्राज्याचा अस्त झाला. चालुक्य राजांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण भारतातली मंदिरस्थापत्यकला भरभराटीस आणली. त्या काळात बांधली गेलेली एकापेक्षा एक अशी सुबक मंदिरे आजही त्या गतवैभवाच्या खुणा सांगत दिमाखाने उभी आहेत. 

त्या मंदिरांची भेट कधी एकदा घडतेय याची कमालीची उत्सुकता माझ्या मनात होती. 

क्रमशः 

बर्फाळलेले आईसलँड - भाग ५ - आईसलँडचे सुवर्ण वर्तुळ

काल ठरलेल्या बेताप्रमाणे मी, फिलीप, क्लारा आणि मॅगी सकाळी बरोब्बर ७ वाजता हॉस्टेलमधून बाहेर पडलो. जवळच्याच एका कार रेंटल सेंटरवर गेलो आणि एक गाडी भाड्याने घेतली. मॅगीचे ड्रायव्हिंग उत्तमच होते. पण आम्ही मुख्य रस्त्यावर आलो आणि अचानक एक गाडी थेट समोरून मोठ्याने होर्न वाजवत येऊ लागली. आम्हाला काही कळेनाच! तेवढ्यात फिलीप ओरडला, “we are on the wrong side of the road!!” मॅगीचा ड्रायव्हिंग अनुभव ब्रिटनमधला असल्याने सवयीनुसार तिने गाडी रस्त्याचा डाव्या बाजूने चालवायला घेतली होती. पुढे बसलेली क्लाराही ब्रिटीश असल्याने तिलाही त्यात काही वावगे वाटले नव्हते. अखेरीस तिने पटकन गाडी थांबवली आणि रिवर्स घेऊन उजव्या बाजूला घेतली. आमचा तर अगदी जीवच भांड्यात पडला. त्या रस्त्यावर फार वर्दळ नव्हती म्हणून नशीब. नाहीतर आमची ट्रीप थेट पोलीस स्टेशनमध्ये संपवावी लागली असती! मॅगीने गाडी सुरु केली की तिला रस्त्याच्या उजव्या बाजूकडे नेण्याची सूचना करायची असा अघोषित नियमच मग बनून गेला.

सुवर्ण वर्तुळ - थिंगवेलीर, गल्फोस, आणि गेसीर 
थोड्या वेळातच आम्ही मुख्य हायवेवर आलो. रस्ता तसा मोकळाच होता. थिंगवेलीर नॅशनल पार्क, गल्फोस धबधबा, आणि गेसीर येथील गरम पाण्याचे झरे अशी तीन ठिकाणं आज आमच्या यादीमध्ये होती. ही सारी ठिकाणं रिकयाविक पासून साधारण ६०-७० किमीच्या परिघात असून एका दिवसाच्या वर्तुळाकार फेरीत बघता येतात. म्हणूनच या ठिकाणांना मिळून सुवर्ण वर्तुळ असे संबोधले जाते. या सगळ्या जागा उत्तम रस्त्यांनी रिकयाविकला जोडलेल्या आहेत. आमचा पहिला मुक्काम होता थिंगवेलीर नॅशनल पार्क. वर-खाली होणाऱ्या भूप्रदेशातून सुरेख वळणं घेत रस्ता पुढे सरकत होता. दूरवर दिसणारी पर्वतराजी, आजूबाजूची हिरवी कुरणे, आणि त्यातली ल्युपिनची फुले त्या रस्त्याचे सौंदर्य अजूनच खुलवत होती. आकाश ढगाळलेलेच होते. या देशातल्या मुक्कामाच्या पहिल्या दिवशी सूर्यास्ताच्या वेळी सूर्य पहिला होता. त्यानंतर पुढचे तीन दिवस काही सूर्यदर्शन झाले नव्हते. आजचे वातावरण पाहता तशी अपेक्षाही करण्यात काही अर्थ नव्हता. अशाच राखाडी वातावरणात आजचे  स्थलदर्शन होणार अशी मनाची समजूत घालून मी आजूबाजूच्या निसर्गाचा आस्वाद घेऊ लागलो.

रम्य महामार्ग 
आता दूरवर एक भलामोठा तलाव दिसू लागला. थिंगवेलीरच्या जवळ आल्याची ती खूण होती. Thingvallavatn या नावाने ओळखला जाणारा हा तलाव आईसलँडमधला सर्वात मोठा तलाव आहे. आम्ही गाडी थांबवून खाली उतरलो. या तलावाच्या काठी अनेक कॅम्पसाईट्स आहेत. स्कुबा डायविंग आणि स्नोर्केलिंग साठी हा तलाव प्रसिद्ध आहे. तलावाच्या काठी थोडा वेळ फोटोग्राफी करून आम्ही पुढे निघालो. थोड्याच वेळात थिंगवेलीरच्या मुख्य पार्किंग जागेवर आम्ही गाडी पार्क केली आणि आतमध्ये शिरलो. तसे ते पार्क बरेच मोठे आहे. मात्र त्यातले प्रमुख आकर्षण म्हणजे मिड-अटलांटिक रिज. अटलांटिक समुद्राच्या बरोब्बर मध्यात दक्षिणोत्तर पसरलेली ही रांग उत्तर अमेरिकन आणि युरेशियन भूप्रतालांना विभाजित करते. ही रांग बहुतांश पाण्याखाली असली तरी या रांगेची काही उंच शिखरे काही बेटांवर पाहता येतात. आईसलँड हे त्यातलेच एक बेट. आईसलँडमध्ये ही रांग अगदी सहज जाता येईल अशा भूप्रदेशात असल्याने त्याला विशेष महत्त्व आहे. थिंगवेलीर मध्ये ही पर्वतरांग आणि दोन भूप्रतलांमधली दरी अगदी स्पष्टपणे पाहता येते. भूवैज्ञानिकांसाठी तर ही जागा म्हणजे पर्वणीच! निर्देशित मार्गावरून आम्ही जाऊ लागलो. म्हणायला पर्वतरांग असली तरी इथे तर एका रेषेत जाणाऱ्या दोन टेकड्या दिसत होत्या. एक छोटी वाट त्यांच्या मधल्या दरीतून जात होती. तसे ते भूदृष्य अगदीच सामान्य होते. पण त्यामागचे भूवैज्ञानिक सत्य तितकेच रोमांचक होते. डाव्या बाजूची टेकडी ही उत्तर अमेरिकन तर उजव्या बाजूची टेकडी युरेशियन भूप्रतलाचे प्रतिनिधित्व करत होती. आणि या दोन टेकड्यांच्या मधून चालणारे आम्ही चक्क दोन महाप्रतलांच्या मधून चालत होतो. इथला एक अन् एक दगड लाखो वर्षांपूर्वी घडलेल्या भूप्रतलांच्या हालचालींची गाथा सांगत होता. किंबहुना त्या हालचाली आजही घडत आहेत. ही दरी वर्षाला २.५ सेमी या वेगाने रुंदावते आहे. कदाचित पुढच्या काही लाख वर्षांनी ही जागा आज आहे तशी नसेल. अचंबित करणाऱ्या निसर्गापुढे मानवी आयुष्याच्या क्षुद्रतेची पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणीव झाली. थिंगवेलीरचे महत्त्व नुसतेच भौगोलिक नाही तर ऐतहासिकही आहे. इसवी सनाच्या दहाव्या शतकात जसजशी इथे लोकवस्ती वाढू लागली तसतशी एका स्थिर राजकीय व्यवस्थेची गरज भासू लागली. इसवी सन ९३० मध्ये थिंगवेलीर येथे पहिली संसद भरली. त्यास Althing असे म्हणतात. ही घटना म्हणजे आईसलँडच्या राष्ट्रीय अस्मितेचा उगम मानली जाते. कालांतराने ही संसद आईसलँडमधली सर्वोच्च राजकीय व विधीय संस्था बनली. थिंगवेलीरचा हा परिसर त्या साऱ्या घटनांचा मूक साक्षीदार आहे.

मिड अटलांटिक रिज 
आता पोटात कावळे ओरडू लागले होते. हॉस्टेलमधला नाश्ता सात वाजता तयार नसल्याने काही न खाता पिताच निघालो होतो. आता मात्र एका गरमागरम कॉफीची तीव्र इच्छा होत होती. दरीतले तत्त्वचिंतन आटोपते घेऊन मी पार्किंगच्या जागेवर परतलो. इथे केवळ छोट्या मशीनमधली कडवट कॉफी उपलब्ध होती. खायला तर काहीच नव्हते. एवढी सुप्रसिद्ध जागा आणि खाण्या-पिण्याची सोय नाही? मला जरा आश्चर्यच वाटले. पण आता शरीराला उर्जा हवी होती. मी मुकाट्याने एक कुकीजचा पुडा आणि कॉफी घेतले आणि घशाखाली उतरवले. युरोपियन लोकांची खाद्यसंस्कृती एव्हाना माझ्या अंगवळणी पडली होती. पण प्रचंड भूक लागलेली असताना मनासारखे खायला नाही मिळाले कि होणारी चिडचिड काही थांबवता येत नाही. आपण भारतीय लोक एकंदरीतच अन्नग्रहण हा प्रकार जरा जास्तच मनावर घेतो. इथे युरोपात लोकं काहीही खाऊन भूक भागवतात. या विषयावर कदाचित अजून एक लेख लिहता येईल. असो.

दरीत अदृश्य होणारा पाण्याचा प्रवाह 
आमचा पुढचा मुक्काम होता गल्फोस धबधबा. सुवर्ण वर्तुळातले हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ. थिंगवेलीर वरून साधारण अर्ध्या तासात आम्ही गल्फोसला पोहोचलो. स्कोगाफोस सारखा हा धबधबा काही सहज दृष्टीस पडणारा नव्हता. मात्र दूरवरून येणारा पाण्याचा प्रचंड आवाज आणि हवेतली विलक्षण आर्द्रता धबधब्याचे सानिध्य सूचित करत होती. पार्किंग च्या जागेपासून धबधब्यापर्यंत जायला लहानशी वाट बांधली होती. आम्ही त्यावरून धबधब्याकडे जाऊ लागलो. थोड्या वेळातच दूरवरून वाहत येणारा नदीचा प्रवास दिसू लागला. आम्ही चालत होतो ती जागा थोडीशी उंचावर असल्याने आजूबाजूचा बराच परिसर दृष्टीक्षेपात येत होता. पण नदीचा पुढे जाणारा प्रवाह काही दिसत नव्हता. एका जागी तो प्रचंड जलप्रवाह जणू काही धरणीच्या उदरात लुप्त होत होता! थोडं पुढे जाताच समोरची खोल दरी दिसू लागली. दरीत घुमणारा कोसळणाऱ्या पाण्याचा प्रचंड आवाज कानांवर आदळत होता. गुरुत्वाकर्षणाच्या बंधनातून मुक्त होऊन असंख्य जलकणांनी आसमंतात फेर धरला होता. जेमतेम तीसेक मीटर रुंद असणारी ती दरी नदीच्या प्रवाहाला नव्वद अंशांच्या कोनात छेदत होती. अशा वैशिष्ट्यपूर्ण भूरचनेमुळे आम्ही जेथे उभे होतो तिथून तो धबधबा दिसतच नव्हता. केवळ त्याचा आवाज त्याचे अस्तित्व जाणवून देत होता. दरीच्या काठाकाठाने जाणारी ती वाट धबधबा दिसेल अशा ठिकाणी जात होती. त्या प्रचंड उर्जास्रोताला डोळे भरून पाहता यावं एवढाच ध्यास आता लागला होता. निसरड्या वाटेवरून तोल सावरत एकदाचे त्या दरीमध्ये डोकावणाऱ्या दरडीवर जाऊन पोहोचलो. पुढचे दृश्य तर डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. फेसाळलेले पाणी स्वतःला दरीमध्ये झोकून देत होते. पाण्याच्या प्रवाहापुढे एवढीशी वाटणारी ती दरी त्या उर्जेला मोठ्या ताकदीने स्वतःमध्ये सामावून घेत होती. काश  मनातल्या विचारांचं काहूर ताब्यात घेणारी अशी एखादी दरी असती. काही क्षण तिथे शांत उभं राहून मनातले यादृच्छिक विचार त्या प्रवाहासारखे एखाद्या दरीत विसर्जित करता येतात का ते पाहू लागलो. पण असे सहजासहजी विसर्जित होतील ते विचार कसले! तितक्यात कोणाचातरी कॅमेरा हातातून सटकला आणि धबधब्यात विसर्जित झाला. बिचाऱ्या पर्यटकाचा किती हिरमोड झाला असेल याची कल्पना करून मलाच फार वाईट वाटायला लागलं. आपला कॅमेरा सुरक्षित आहे ना याची उगाच खातरजमा केली आणि तिथून पार्किंगच्या जागेकडे परत यायला निघालो.

गल्फोस धबधबा 
आता आम्ही गाडी वळवली गेसीर गावाकडे. मॅगीला आता रस्त्याचा उजव्या बाजूने गाडी चालवणे बऱ्यापैकी अंगवळणी पडले होते. मधूनच तिचा डावा हात खिडकीवर आपटत होता. त्यावर आमची मस्करीपण सुरु होती. मी आणि फिलीप जगातल्या उत्तमोत्तम ट्रेकिंगच्या जागांविषयी चर्चा करत होतो. मी त्याला हिमालयातल्या आणि सह्याद्रीतल्या ट्रेकिंगविषयी अगदी भरभरून सांगत होतो. मेक्सिकोमधल्या काही अप्रतिम जागांविषयी माझ्या ज्ञानात भर पडत होती. क्लारा आणि मॅगी त्यांच्या पुढच्या सहलीविषयी चर्चा करण्यात गुंतल्या होत्या. एवढ्यात गेसीर आलंच. हे गाव इथल्या ज्वालामुखीय गरम पाण्याच्या झऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. जमिनीवरचे पाणी झिरपत खोलवर जाते आणि तप्त खडकांच्या व मॅग्माच्या संपर्कात येते. तिथे प्रचंड तापलेले पाणी आणि वाफ वाट मिळेल तसे वर सरकू लागतात. एखाद्या ठिकाणी नैसर्गिक पोकळी सापडली की त्यातून हे पाणी वाफेसकट प्रचंड वेगाने वर उसळी घेते. जमिनीखालचा पाण्याचा प्रवाह सतत वाहता असेल तर ठराविक वेळेच्या अंतराने वर उसळणारे असे कारंजे बघायला मिळते. साधारणपणे जिथे ज्वालामुखीय हालचाली जास्त असतात तिथे अशा प्रकारची गरम पाण्याची कारंजी बघायला मिळतात. उत्तर अमेरीकेतील येलोस्टोन नॅशनल पार्क यासाठी प्रसिद्ध आहे. गेसीरमध्ये असणाऱ्या या झऱ्यांमुळेच या झऱ्यांना इंग्रजीमध्ये गीझर हा शब्द रूढ झाला. किंबहुना आज आपल्या स्नानगृहात आढळणाऱ्या पाणी तापवणाऱ्या यंत्राला गीझर म्हटले जाते त्याची व्युत्पत्ती याच ठिकाणाशी निगडीत आहे!

गेसीरमधला वाफाळलेला परिसर 
गेसीर मधली कारंजी अगदी रस्त्यातून दिसतील अशा अंतरावर होती. आम्ही गाडी पार्क करून तिथे जायला निघालो. नशीबाने आकाशातले ढगांचे आवरण थोडे विरळ झाले होते. ढगांच्या फटीतून वाट काढत जमिनीकडे झेपावणारी सूर्यकिरणे वातावरणात एक वेगळाच उत्साह निर्माण करत होती. त्या भागात एकूण चार कुंडे होती. प्रत्येक कुंडाच्या शेजारी त्यातल्या पाण्याचे तापमान एका फलकावर लिहले होते. कुठे ८० अंश सेल्सियस तर कुठे ९५ असे ते फलक होते. कुठेही पाण्यात हात घालू नये अशा स्पष्ट  सूचना लिहलेल्या होत्या. त्या सगळ्या परिसरातूनच वाफा बाहेर पडत होत्या. उसळणाऱ्या कारंज्यांची वारंवारिता सतत बदलत असते. जमिनीखालचा पाण्याचा प्रवास बदलला तर एखादे कारंज उसळणे बंद होऊ शकते. तसेच नवी कारंजी निर्माणही होऊ शकतात. तिथल्या मुख्य कारंज्याची वारंवारिता ४ ते ५ मिनिटाला एकदा अशी होती. आम्ही त्याच्यापुढे जाऊन कारंज्याची वाट पाहू लागलो. मी कॅमेरा तयार ठेवला. काही मिनिटातच त्या कुंडातून वाफा यायला सुरुवात झाली. आणि क्षणार्धातच पाण्याचा एक स्तंभ उंच झेपावला. काही सेकंद ते कारंज फुत्कारत राहिले आणि शेवटी शांत झाले. निसर्गाचा तो चमत्कार पाहून सारे पर्यटक भारावून गेले होते. त्या कारंज्याकडे पाहता पाहता मला फोटो काढायचे भानच उरले नव्हते. मी आणखी ५ मिनिटे थांबून पुढच्या कारंज्याचे मनसोक्त फोटो काढले. थोडा वेळ त्या परिसरात फेरफटका मारून आम्ही गाडीकडे परतलो. 

गरम पाणी वाफ यांचे कारंजे 
एव्हाना संध्याकाळचे चार वाजत आले होते. तासाभरात आम्ही रिक्याविकला पोहोचलो. फिलीपचे विमान रात्री अकराचे होते. तर माझे दुसऱ्या दिवशी पहाटे सहाचे. क्लारा आणि मॅगी आईसलँडमध्ये अजून काही दिवस राहणार होत्या, मात्र रिकयाविकमधला त्यांचा शेवटचा दिवस होता. या नवीन  दोस्तांना फेसबुकवर अॅड करून आणि अलविदा करून मी हॉस्टेलवर परतलो. जवळच्याच पिझ्झेरीयामध्ये जाऊन एक छान पिझ्झा मागवला. पेटपूजा करून थोडा वेळ शहरात एक फेरफटका मारला. आता घरी परतायचे वेध लागले होते. जर्मनीमध्ये तापमान ३५ अंश सेल्सियसच्या वर गेल्याच्या बातम्या वाचनात आल्या होत्या. त्यामुळे होणाऱ्या तापमानबदलाची मनाशी तयारी करत मी सामानाची बांधाबांध करू लागलो. थोडा वेळ झोप काढून मी पहाटे चारच्या सुमारास विमानतळाकडे जायला निघालो. आज मी निघायच्या दिवशी लख्ख उन पडलं होतं. त्या ‘कोवळ्या’ उन्हात सुस्तावलेल्या रिकयाविकचा मी विमानाच्या इवलाश्या खिडकीतून मी निरोप घेतला. निसर्गाचे आणि मानवी संस्कृतीचे एक अनोखे रूप आठवणींच्या गुलदस्त्यात कायमचे बंदिस्त झाले होते. 

गेसीरच्या आसपासचा रम्य परिसर 

समाप्त