चालुक्यनगरी बदामी - भाग १ - ऐतिहासिक सहलीची सुरुवात

सव्वीस जानेवारीची पहाट. अर्धा तास उशिराने धावत असलेली सोलापूर सुपरफास्ट अखेरीस सोलापूर स्थानकात शिरली. आपली पुढची गाडी चुकणार नाही याची खात्री पटल्याने मी निर्धास्त झालो. अर्धवट झोपेतच मी गाडीतून उतरलो. वातावरणात कमालीचा गारठा होता. मात्र गाडीतल्या एसी पेक्षा हा काहीसा बोचणारा गारठाच जास्त आल्हाददायक वाटत होता. पलीकडे पाच नंबरवर हुबळी सुपरफास्ट लागली होती. मी लगबगीने जाऊन माझी जागा शोधली आणि गाडी सुटायची वाट बघत बसलो. सव्वीस जानेवारीच्या सुट्टीला जोडून आलेल्या वीकेंडमुळे चार दिवस सलग सुट्टी मिळाली होती. एवढी सुट्टी म्हणजे माझा जीव घरात रमणे अशक्य. मग कर्नाटकातल्या ऐतिहासिक जागांच्या सहलीचे नियोजन केले आणि निघालो. बदामी, पट्टदकल, आणि ऐहोळे यांसाठी दोन दिवस तर हम्पीसाठी दोन दिवस असा कार्यक्रम होता. या जागांविषयी बरेच ऐकले होते. आज प्रत्यक्ष भेट देण्याचा योग आला होता. सगळी जय्यत तयारी करून मी निघालो होतो. काहीतरी भन्नाट पहायला मिळणार आणि नेहमीच्या दिनचर्येतून चार दिवसांची सुटका होणार या भावनेने मी फारच उत्साहात होतो.

तेवढ्यात चहावाल्याच्या आवाजाने माझी तंद्री भंगली. बोचणाऱ्या थंडीवर उत्तम उतारा माझ्या समोर हजार होता. गरमागरम चहा घशाखाली गेल्यानंतर जरा तरतरी आली. नियोजित वेळेनुसार गाडीने प्रस्थान केले. एव्हाना उगवतीकडे तांबडं फुटू लागलं होतं. पाखरांची किलबिल सुरु झाली होती. बऱ्याच दिवसांनी सूर्योदयाचा प्रसन्न क्षण अनुभवत होतो. गाडीने जसा वेग पकडला तशी थंड हवा झोंबू लागली. मी मुकाट्याने खिडकी बंद करून झोपायचा प्रयत्न करू लागलो. गाडी तशी रिकामीच होती. समोरच्या सीटवर एक आजोबा अंगाचं मुटकुळं करून निवांत झोपले होते. मीही त्यांचा कित्ता गिरवत त्या मोकळ्या सीटवर आडवा पसरलो. भारतीय रेल्वेचा खडखडाट म्हणजे जणू बाळाचा पाळणाच! त्या हेलकाव्यांत छान झोप लागली. विजापूरला गाडीत गर्दी झाली. मग मात्र मला माझा सीटवरचा पसारा आवरता घ्यावा लागला. साधारण साडेअकराला बदामी स्टेशनवर उतरलो. बदामी हे कर्नाटक मधल्या बागलकोट जिल्ह्यातलं एक शहर. चालुक्यकालीन लेण्या आणि मंदिरे यांसाठी प्रसिद्ध. मी हॉटेलवर जाऊन आन्हिकं उरकली आणि शहर बघायला बाहेर पडलो.

शहर तसं लहानसंच होतं. जेमतेम २५००० लोकवस्ती असेल. सगळी प्रेक्षणीय स्थळं अगस्त्य तीर्थाच्या आसपास एकवटलेली आहेत. माझ्या हॉटेलपासून तिथलं अंतर साधारण २ किमी असेल. एरवी सहज चालून गेलो असतो. पण इथलं दुपारचं ऊन सहन होत नव्हतं. सोलापुरातला गारठा कुठच्या कुठे पळाला होता. शेवटी रिक्षा केली. शहरातल्या लहान-मोठ्या गल्ल्यांतून वाट काढत रिक्षा पुढे जाऊ लागली. त्या लहानशा रस्त्यावर फिरणारी गुरं, डुकरं, आणि कुत्री, मधेच खेळणारी लहान मुलं, आणि ये-जा करणारी लोकं एका टिपिकल भारतीय गावाचा अनुभव देत होती. या सगळ्या कोलाहलात ती प्राचीन मंदिरे कोणत्या अवस्थेत उभी असतील आणि त्यांचा कसा अनुभव येईल अशा विचारात मी होतो. तेवढ्यात ‘भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभाग - संरक्षित क्षेत्र, बदामी’ अशी पाटी दिसली आणि एका प्राचीन कमानीतून रिक्षा आत शिरली. आत शिरताच एका वेगळ्याच दुनियेत प्रवेश केल्याचा आभास झाला. उजवीकडे नितांतसुंदर असे अगस्त्य तीर्थ दिसत होते. तीर्थाच्या चहूबाजूंनी ताशीव कड्यांचे लाल पहाड रखवालदारांसारखे उभे होते. दक्षिणेकडच्या पहाडात बदामीची सुप्रसिद्ध गुंफा मंदिरे कोरलेली दिसत होती. शहराच्या बाजूने एक विस्तीर्ण घाट तीर्थात उतरत होता. त्याच्या समोरच्या बाजूला उभारलेले सुबक असे भूतनाथाचे मंदिर साऱ्या परिसराचे सौंदर्य एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवत होते. मी रिक्षातून उतरलो. तीर्थाच्या काठाशी एक प्रचंड वटवृक्ष आपल्या पारंब्या सावरत उभा होता. त्या रणरणत्या उन्हात थोड्याफार सावलीचा तोच एक आधार होता. मी तिथे थांबून आता काय बघू, कुठून सुरुवात करू याचा विचार करू लागलो. इतक्यात शेजारचे वस्तुसंग्रहालय नजरेस पडले.

बदामीचे सुप्रसिद्ध भूतनाथ मंदिर 

उन्हापासून तात्पुरती सुटका म्हणून मी त्या वस्तुसंग्रहालयात शिरलो. अपेक्षेपेक्षा आतली मांडणी फारच नेटकी होती. उत्खननात सापडलेले अनेक अवशेष तिथे मांडले होते. त्यांपैकी मयूरतोरण आणि लज्जागौरी ही शिल्पे विशेष उल्लेखनीय. एका दालनात चालुक्य साम्राज्याचा इतिहास चित्रात्मक पद्धतीने मांडला होता. कन्नड भाषेची सध्याची लिपी कशी उत्क्रांत झाली ती पक्रिया फारच आकर्षक पद्धतीने दाखवली होती. दुसऱ्या दालनात बदामी आणि परिसराची त्रिमितीय प्रतिकृती बनवलेली होती. दुर्भाग्याने आत फोटो काढायला मनाई होती. एकूण संग्रहालय लहानच होते. अर्ध्या तासात तिथून मी बाहेर पडलो. बाहेरच्या दुकानातून बदामीविषयी माहिती असलेले एक लहानसे पुस्तक विकत घेतले. युरोपातल्या प्रसिद्ध जागांविषयी जशी इत्थंभूत माहिती इंटरनेट वर मिळते तशी भारतातल्या जागांविषयी मिळत नाही. शिवाय तिथे कोणी मार्गदर्शक सोबत घ्यायचा तर त्यालाही कितपत माहिती असेल याची काय शाश्वती? त्यामुळे मी सरळ पुस्तक वाचून पुढचा मार्ग ठरवायचा निर्णय घेतला. एका तथाकथित प्रमाणित मार्गदर्शकाने लिहलेले ते पुस्तक तसे माहितीपर होते. व्याकरणाच्या अनेक चुका असल्या तरी आसपासची आवश्यक माहिती त्यात होती. मी त्या वटवृक्षाखाली विसावलो आणि पुस्तक चाळू लागलो.

बदामीचे मूळ नाव वातापी. प्राचीन काळापासून हे शहर एक महत्त्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. या नावामागची कथाही रंजक आहे. कोणे एके काळी इथल्या डोंगरांत वातापी आणि इल्वल असे दोघे असुरबंधू रहात होते. ते दाराशी येणाऱ्या पाहुण्यास भोजनासाठी आमंत्रित करत. मग इल्वल वातापीला मारून त्याच्या शरीरापासून बनलेले अन्न त्या पाहुण्यास खाऊ घाली. पाहुण्याने ते अन्न खाताच वातापी त्याचे पोट फाडून बाहेर येई. मग दोघे असुरबंधू त्या मृत पाहुण्यास गट्टम करत. एकदा योगायोगाने अगस्त्य ऋषी या परिसरातून जात होते. इल्वलाने त्यांना आमंत्रित केले व ठरल्याप्रमाणे वातापीच्या शरीरापासून बनलेले अन्न खाऊ घातले. मात्र अगस्त्य ऋषींनी असुरांचा डाव ओळखला व वातापी पोटात जिवंत व्हायच्या आधीच “वातापी जीर्णोSभव” असा मंत्र म्हणून ते अन्न पचवून टाकले. अशा प्रकारे वातापीचा त्याच्या भावाच्याच हस्ते मृत्यू झाला व लोकांची त्यांच्या जाचापासून सुटका झाली. अगस्त्य ऋषींनी घडवून आणलेल्या त्या वधामुळे त्या सरोवरास अगस्त्य  तीर्थ असे नाव मिळाले.

साधारण इसवी सनाच्या पाचव्या शतकात उदयास आलेले चालुक्य साम्राज्य दक्षिण भारतातले एक महत्त्वाचे साम्राज्य समजले जाते. बदामीचे भौगोलिक, आर्थिक, व सांस्कृतिक महत्त्व लक्षात घेऊन चालुक्य सम्राट पुलकेशीन-१ याने आपली राजधानी इथे वसवली. इथली गुंफा मंदिरे, इतर देवालये, आणि किल्ल्यांची उभारणी त्याच्याच काळात झाली. पुढे पुलकेशीन-२ याने आसपासच्या इतर राजवटींचा पराभव करून उत्तरेस नर्मदा नदीपर्यंत चालुक्य साम्राज्याचा विस्तार केला. सुमारे तीनशे वर्षं चालुक्य साम्राज्याने दक्षिण भारतावर आधिपत्य गाजवले. कालांतराने आठव्या शतकात अंतर्गत यादवी व फितुरी यांमुळे या साम्राज्याचा अस्त झाला. चालुक्य राजांनी आपल्या कार्यकाळात दक्षिण भारतातली मंदिरस्थापत्यकला भरभराटीस आणली. त्या काळात बांधली गेलेली एकापेक्षा एक अशी सुबक मंदिरे आजही त्या गतवैभवाच्या खुणा सांगत दिमाखाने उभी आहेत. 

त्या मंदिरांची भेट कधी एकदा घडतेय याची कमालीची उत्सुकता माझ्या मनात होती. 

क्रमशः 

No comments:

Post a Comment