अविस्मरणीय रूपकुंड - भाग २ - लोहाजुंग ते डिडना : रूपकुंडची रंगीत तालीम

पहाटे साडेपाचच्या सुमारास आपोआप जाग आली. एरवी साडेसातचा गजर खणखणतो तेव्हा कुठे मुश्किलीने डोळे उघडतात. इथे मात्र कोंबडं आरवताच चुटकीसरशी झोप गायब! निसर्गाच्या जवळ गेलेलं शरीराला बिनचूक कसं काय कळतं कुणास ठाऊक? आपोआप शरीरातल्या सगळ्या क्रिया निसर्गाच्या तालाशी एकरूप होऊ लागतात. तशी बाहेर लोकांची लगबग सुरु झालीच होती. मी उत्साहाने उठलो आणि आवरायला लागलो. ट्रेकला न लागणारे सामान एका वेगळ्या बॅगेत भरून ठेवले. आता खांद्यावरच्या बॅगेचे वजन काहीसे कमी झाले होते. बऱ्याच जणांनी त्यांच्या बॅगा पोर्टरकडे दिल्या होत्या. मलाही वाटत होते पोर्टरकडे बॅग द्यावी म्हणून. पण आधीचे ट्रेक तरी बॅग घेऊन यशस्वीपणे पार केले होते. आताही होऊन जाईल असे म्हणून मी बॅग स्वतःजवळच ठेवली. चहा-नाश्ता करून एकदाचे आम्ही ट्रेक सुरु करायला सज्ज झालो. 

ट्रेकची सुरुवात 
लोहाजुंग म्हणजे रूपकुंड ट्रेकचा बेस कॅम्प. तसा रूपकुंड ट्रेक बराच लोकप्रिय असल्याने इथे ट्रेकर्सची बरीच गर्दी होती. लवकर आवरून झालेले आम्ही तीन-चार जण गावात फेरफटका मारायला बाहेर पडलो. वातावरण स्वच्छ होतं. त्या प्रसन्न गारव्यात कोवळं ऊन फारच सुखावह वाटत होतं. एका टपरीवर चहाला थांबलो. चहावाल्याशी उगीच हवा-पाण्याच्या गप्पा सुरु केल्या. गेले काही दिवस रोज दुपारनंतर पाऊस पडत असल्याचे त्याच्याकडून  कळले. ट्रेकिंग सकाळी लवकर सुरु करून शक्य तितक्या लवकर पुढच्या कॅम्पवर पोहोचण्याचा अनाहूत सल्लाही त्याने दिला. तेवढ्यात ट्रेक लीडरची हाक ऐकू आली. आम्ही लगेचच बॅगा घेऊन सज्ज झालो. हर हर महादेवची आरोळी ठोकली आणि आम्ही ट्रेकला सुरुवात केली. वाट मुख्य रस्त्याच्या उजव्या बाजूने खाली उतरत होती. ट्रेकचा पहिला एक चतुर्थांश भाग उताराचा होता. एका अर्थाने चांगलंच होतं. Acclimatization साठी अशी सोपी सुरुवात असणं नेहमीच चांगलं. काही वेळातच गाव मागे पडलं आणि घनदाट अरण्य सुरु झालं. दूरवर नंदा घुंटी शिखर दिसत होतं. आम्हा ट्रेकर्सची लगबग मिश्कीलपणे पाहत होतं. मधेच एखाद्या सपाट जागी थोडीफार वस्ती आणि शेती दिसत होती. कधी गर्द झाडीतून मंद खळखळ करत वाहणारे झरे लागत होते. रानात अधेमध्ये ऱ्होडोडेंड्रॉन ची लालभडक फुले फुललेली दिसत होती. वाटेत एका वस्तीजवळ जरा वेळ विसावलो. त्या जागेवरून दूरवर डिडना गाव दिसत होते. लोहाजुंगवरून जेवढे खाली उतरलो होतो तेवढेच किंवा त्यापेक्षा किंचित जास्त वर चढायचे होते. आत्तापर्यंत रमत गमत चाललेला ट्रेक आता खरा इंगा दाखवणार होता. मनाची तयारी करून आम्ही चढणीच्या वाटेला लागलो.

गर्द झाडीतून जाणारी वाट 

ऱ्होडोडेंड्रॉनची  लालभडक  फुले 
हळूहळू चढण तीव्र होऊ लागली. एकेका वळणावर पावले दम खायला अडखळू लागली. एरवी सह्याद्रीत एवढी चढण तासाभरात सहज पार केली असती. पण इथे त्यालाच दोन-अडीच तास लागत होते. वाटेत एक लहानसे हॉटेल लागले. हॉटेल कसले, तीन बाजूंनी दगडांची भिंत रचून त्यावर अंथरलेली ताडपत्री. पण तिथे शीतपेये, चहा-कॉफी, मॅगी, ओम्लेट, पराठे वगैरे सगळ्या गोष्टींची सोय. थकल्या-भागल्या ट्रेकर्ससाठी असे आडवाटेवरचे हॉटेल म्हणजे एक हक्काचा विसावा. आम्ही तिथे थोडा वेळ थांबलो. गरम चहाचे दोन घोट घशाखाली घातले आणि पुढे निघालो. इतक्यात हिमालयातल्या लहरी वातावरणाने त्याचे बदलते रंग दाखवायला सुरुवात केली. इतका वेळ निळंभोर दिसणारं आकाश अचानक काळ्या ढगांनी दाटून गेलं. डिडना यायला अजून किमान अर्धा तास होता. आम्ही चालायचा वेग वाढवला. नशिबाने आता चढण आता फार तीव्र राहिली नव्हती. गावातली घरं लांबून दिसत होती. म्हणता म्हणता भरलेलं आभाळ गळू लागलं. थंडगार थेंब अंगावर पडू लागले. घामाने आधीच भिजल्या अंगावर थंडगार पाणी पडू लागल्याने हुडहुडी भरू लागली. आम्ही जवळपास पळत पळतच गाव गाठले. एकदाचे मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचलो आणि सुटकेचा निश्वास टाकला. सकाळी चहावाल्याने सांगितलेला वातावरणाचा अंदाज खरा ठरताना दिसत होता. पुढचे सगळे दिवसही असाच अवचित पाऊस कोसळणार की काय या भीतीने आम्ही थोडे धास्तावलो होतो. पण हिमालय म्हटल्यावर असे काहीतरी घडायचेच असे म्हणून जे होईल त्याला सामोरे जायची तयारी ठेवा अशी मनाची समजूत घातली.   

इथून पुढे चढण तीव्र होऊ लागली 
विसाव्याची जागा 

गावातल्या एका टुमदार दुमजली घरात आमचा मुक्काम होता. हिमालयातल्या ट्रेकमध्ये पक्क्या घरात अंथरूण-पांघरूण घेऊन झोपायची सोय म्हणजे तर ऐषआराम! मुक्कामाची सोय बघून आम्ही सगळे एकदमच खुश झालो. ओले कपडे बदलून जरा वेळ विश्रांती घेतली. तोपर्यंत जेवण तयार झालेच होते. त्या थंड पावसाळी वातावरणात गरमागरम राजमा-चावल स्वर्गीय वाटत होते. जेवणानंतर मस्त गप्पांचा फड रंगला. ग्रुपमधले बहुतांश सगळे दर्दी ट्रेकर्स होते. ट्रेकिंगमधले अनुभव एकमेकांसोबत शेअर करण्यात जो आनंद असतो तो दुसऱ्या कशात नसावा. एव्हाना तर ग्रुपमधल्या लोकांची टोपणनावंही तयार झाली होती. चेष्टा-मस्करी आणि गप्पांमध्ये ती संध्याकाळ छानच गेली. सातच्या सुमारास रात्रीचे जेवण आटोपून सगळेजण निद्राधीन झालो. 

डिडना गाव आणि तिथले रम्य वातावरण   

क्रमशः 

अविस्मरणीय रूपकुंड - भाग १ - ट्रेकचा श्रीगणेशा

हिमालयातले गिरीभ्रमण म्हणजे एक व्यसनच. एकदा का त्याची चटक लागली की किमान वर्षातून एकदा हिमालयाशी गळाभेट झाल्याशिवाय रहावत नाही. मुंबईतला असह्य उन्हाळा (खरे तर घामाळा!) सुरु झाला की हिमालयातल्या थंडगार जागांचे वेध लागतात. त्याच सुमारास हिमालयातले बर्फ वितळू लागते आणि ट्रेक्स सुरु होतात. एव्हाना हिमाचल प्रदेशातले दोन ट्रेक झाले होते. उत्तराखंड मधील हिमालय अजून पाहिला नव्हता. उत्तराखंड मधील रूपकुंड, हर कि दून, रुपीन पास, पिंडारी ग्लेशियर अशा अनेक ट्रेक्सविषयी ऐकले होते. विशेषतः रूपकुंड या जागेविषयी आणि तिथल्या मानवी हाडांविषयी बरेच काही ऐकले आणि वाचले होते. त्यामुळे या वर्षीची हिमालय भेट म्हणजे रूपकुंड असे ठरवून मी एका प्रस्थापित ट्रेकिंग ग्रुप कडे ट्रेकचे बुकिंग केले आणि ट्रेकच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहू लागलो. 

रूपकुंडचा नयनरम्य देखावा. फोटो आंतरजालावरून साभार. 


रूपकुंड म्हणजे उत्तराखंड मधील चमोली जिल्ह्यातील सुमारे ५००० मीटर उंचीवरील एक लहानसे हिम-सरोवर. त्रिशूल आणि नंदा घुंटी या दोन शिखरांच्या मध्ये वसलेले हे सरोवर उत्तराखंड मधले एक लोकप्रिय ट्रेकिंग स्थळ आहे. ट्रेकिंग चा बराचसा मार्ग अति उंचीवरील असल्याने तशी शारीरिक क्षमता असणे आवश्यक होते. त्यामुळे मी महिनाभर आधीपासून तयारी सुरु केली. जिम मध्ये पायांच्या व्यायामावर जास्त भर द्यायला सुरुवात केली. रोजच्या गडबडीत जिमला नियमित जाणे शक्य होत नव्हते. म्हणून ऑफिसमधून येताना किमान ५ किमी चालत यायला सुरुवात केली. मुंबईतला दमट उकाडा आणि चार पावलं चालल्यावर लागणाऱ्या घामाच्या धारा असह्य होत होत्या. कधी एकदा थंडगार जागी जातोय असं वाटत होतं. अखेरीस तो दिवस उजाडला. मुंबईहून विमानाने दिल्लीला उतरलो. दिल्लीतली कोरडी आणि गरम हवा अगदी नकोशी वाटत होती. मुंबईहून आलेले ग्रुपमधले इतर काही ट्रेकर्स दिल्लीत भेटले. ओळख-पाळख झाली. ट्रेकिंगला जाणाऱ्या लोकांची एक विशिष्ट वेव्हलेन्थ असते. किंवा ट्रेकिंगचा मूडच असा असतो की लोकं वेगळ्या वेव्हलेन्थने विचार करू लागतात. त्यामुळे नवीन लोकांशी मैत्री व्हायला फार वेळ लागत नाही. तीच लोकं जर इतर कुठे भेटली तर कदाचित मैत्रीच्या तारा जुळणार नाहीत. पण ट्रेकिंगमध्ये त्या नक्की जुळतात. असो. नव्याने मैत्री झालेल्या चमू सोबत बसने रात्रीचा प्रवास करून काठगोदामला पोहोचलो. काठगोदाम म्हणजे उत्तराखंड मधले शेवटचे ट्रेन स्टेशन. इथून पुढे हिमालयाच्या उंच पर्वतरांगा सुरु होतात. आमची यापुढची सगळी व्यवस्था ट्रेकिंग ग्रुप तर्फे होती. ठरल्याप्रमाणे गाडीचालक भेटला आणि आमचा लोहाजुंगच्या दिशेने प्रवास सुरु झाला. 

थोड्याच वेळात तीव्र वळणांचा घाट सुरु झाला. एक-एक वळण घेत गाडी वर चढू लागली. तासाभरातच आम्ही सुमारे १४०० मीटर उंचीवर पोहोचलो. वातावरणातला बदल एकदम जाणवू लागला. थंड आणि प्रसन्न हवेची झुळूक आली आणि वाटलं, याच साठी केला होता अट्टहास! एका छानशा ढाब्यावर नाश्त्याला थांबलो. गरमागरम आलूपराठे गट्टम करून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो. भरल्या पोटी थंड हवेवर छान डुलकी लागली होती. इतक्यात चालकाने करकचून ब्रेक दाबला आणि मी तर जवळपास आपटलोच! पाहतो तर काय, समोर मेंढ्यांचा भला मोठा कळप भर रस्त्यातून चालला होता. त्यांचा मेंढपाळ जवळच्याच दगडावर विडी फुकत, मध्येच एखाद्या मेंढीला हाकत, निवांतपणे बसला होता. दोन्हीकडची वाहतूक जवळपास थांबली होती. आपण हिमालयात पोहोचलो आहोत ही भावना आता कुठे sync in होत होती. पाच-दहा मिनिटात मेंढ्या त्यांच्या मार्गाला लागल्या आणि आमचा लोहाजुंगकडचा प्रवास पुन्हा सुरु झाला. 


लोहाजुंगच्या वाटेवरील कौसानी येथील रम्य दृश्य 


अल्मोडा मागे पडले आणि निसर्गाचे रूपही बदलू लागले. खोल दऱ्या, त्यांतून रोरावत वाहणाऱ्या नद्या, उतारावर सरळसोट वाढलेले सूचीपर्णी वृक्ष, मध्येच एखाद्या वळणावर दृष्टीस पडणारी हिमशिखरे असे ते लोभस दृश्य फारच सुखावह वाटत होते. प्रवासाचे एकूण अंतर होते साधारण २७० किमी. पण अरुंद घाटरस्ता, मध्येच येणारे प्राण्यांचे कळप, कधी रस्त्याचे चालू असलेले काम अशा काही कारणांनी या प्रवासाला १० तास लागतात. भोवतालचा निसर्ग कितीही सुंदर असला तरी काही वेळानंतर सततच्या वळणांचा आणि गाडीच्या घरघरीचा त्रास होऊ लागतो. आमच्यातल्या एक-दोघांच्या उलट्या करून झाल्या होत्या. मलाही मळमळत होते. पण नशीबाने जास्त त्रास झाला नाही. एकदाचे संध्याकाळी ५ च्या सुमारास आम्ही लोहाजुंगला पोहोचलो. इथे एका डॉर्ममध्ये राहण्याची सोय होती. हवेत कमालीचा गारवा होता. ट्रेकलीडर सोबत ओळख झाली. त्याने काही महत्वाच्या सूचना दिल्या. पुढच्या दिवशी ट्रेक सुरु होणार होता. इथे ग्रुप मधले इतरही काही जण भेटले. एकंदरीत २५ जणांचा ग्रुप होता. बहुतांश सगळे मुंबईचेच होते. या नव्या दोस्तांसोबत थोडा वेळ गप्पा रंगल्या. प्रवासाचा शीण जाणवत होता. शिवाय दुसऱ्या दिवशी सुरु होणाऱ्या आव्हानासाठी उर्जा बचत करायची होती. फार वेळ गप्पांमध्ये न दवडता सगळे जण जेवण वगैरे आटोपून झोपी गेलो.


लोहाजुंग (उंची - २४०० मीटर)


क्रमशः