पहाटे साडेसहाला ट्रेन खजुराहोला पोहोचली. अर्धवट झोपेतच मी खाली उतरलो. हवेत चांगलाच गारठा होता. हलकं धुकं पसरलं होतं. रिक्षाने शहरात पोहोचलो. झोस्टेल नामक हॉस्टेल वर आधीच बुकिंग केलेलं होतं. युरोपातल्या हॉस्टेल्सच्या धर्तीवर भारतातल्या लोकप्रिय पर्यटनाच्या जागी ही हॉस्टेल्स बांधण्यात आली आहेत. एकट्याने फिरणाऱ्या बॅकपॅकर तरुणांसाठी ही हॉस्टेल्स म्हणजे अगदी सोयीची. इथे वाजवी किमतीत दर्जेदार सेवा तर मिळतेच. शिवाय समविचारी पर्यटकांशी संवादही साधता येतो. हॉस्टेलवर जाऊन थोडा वेळ विश्रांती घेतली. मग आवरून नाश्ता करायला बाहेर पडलो.
खजुराहो मध्ये स्थानिक पर्यटकांपेक्षा परदेशी पर्यटकांचीच वर्दळ जास्त दिसत होती. त्यामुळे इथल्या उपहारगृहांतला मेनूही परदेशी लोकांना मानवेल असा दिसत होता. आणि त्यांचे दरही चढे होते. युरोपात बाहेर मोकळ्या हवेत बसून खाण्याची पद्धत आहे. इथेही त्याच पद्धतीने बाहेर टेबल खुर्च्या मांडल्या होत्या. मधेच एखादा रुफ-टॉप कॅफे दिसत होता. चायनीज, जापनीज, रशियन वगैरे भाषांत लिहलेले फलक दिसत होते. साधा आलू पराठा देणारी जागा मात्र कुठेच दिसत नव्हती. आपल्याच देशात आपल्याच पद्धतीचं खाणं शोधावं लागणं यापेक्षा दुर्दैव ते काय? खरे तर स्थानिक बुंदेली पदार्थ जगासमोर मांडायची ही एक उत्तम संधी आहे. पण लक्षात कोण घेतो? असो. शेवटी एका आडबाजूला समोसा-जिलेबी-पोहे वगैरे विकणारे लहानसे दुकान दिसले. तिथे पोहे खाता-खाता दिवसभर कुठे-कुठे फिरायचे त्याची आखणी करू लागलो.
पार्श्वनाथ मंदिराचा प्रचंड आकार
खजुराहो मध्ये एकूण ८५ मंदिरे होती. किंबहुना, ८५ मंदिरांच्या अस्तित्वाचे पुरावे उपलब्ध आहेत. त्यांपैकी आज केवळ २२ मंदिरे उभी आहेत. या मंदिरांचे तीन मुख्य समूह आहेत – पूर्व, पश्चिम, आणि दक्षिण. पश्चिम समूह हा मुख्य समूह समजला जातो. इथली ११ मंदिरे ASI ने संरक्षक भिंत आणि सभोवती उद्यान वगैरे उभारून जतन केली आहेत. हा समूह हॉस्टेलच्या समोरच होता. इथे संध्याकाळी लाईट अँड साउंड शो असतो. त्यामुळे हा समूह संध्याकाळी बघायचा आणि तसेच शो बघायला जायचे असे मी ठरवले. पूर्व समूह हा खजुराहो गावाच्या पूर्वेकडे, साधारण ५ किमी अंतरावर आहे. ही मंदिरे काहीशी विखुरलेली आहेत. मी आधी ती मंदिरे बघायचे ठरवले. जवळच एक सायकलीचे दुकान दिसले. तिथून एक सायकल भाड्याने घेतली आणि निघालो. कॅमेरा आणि बॅग सांभाळत सायकल चालवणे म्हणजे कसरतच होती. जमवलं एकदाचं. वातावरण तसे ढगाळ होते. गारठा तर होताच. सायकलीवरून जाताना गार हवा अंगाला झोंबत होती.
आदिनाथ मंदिर
छतावरचे सुरेख कोरीवकाम
अर्ध्या तासातच जैन मंदिरांपाशी पोहोचलो. या समुहात आदिनाथ, पार्श्वनाथ, आणि शांतीनाथ अशी तीन मंदिरे आहेत. आत शिरल्यावर पहिले दिसते ते शांतीनाथ मंदिर. दहाव्या शतकातल्या काही मंदिरांच्या अवशेषांना एकत्र करून १८७० मध्ये हे मंदिर बांधले गेले. गाभारा आणि मंडपातले काही खांब वगळता बाकी सारे बांधकाम नवीन होते. मंदिरातली शांतीनाथांची चौदा फूट उंच मूर्ती शांत आणि प्रसन्न वाटत होती. मंदिर नित्य पूजेत असल्याचे दिसत होते. तिथे थोडा वेळ थांबून मी बाहेर पडलो. समोरच होते पार्श्वनाथ मंदिर. मंदिराचा प्रचंड विस्तार बघून क्षणभर स्तंभित झालो. सुबक मूर्तींनी सजलेल्या भिंती आणि आकाशाला भिडू पाहणारे कळस कॅमेऱ्याच्या फ्रेम मध्ये मावत नव्हते. तेवढ्यात एक जण गाईड हवा का म्हणून विचारायला आला. खजुराहोसारख्या ठिकाणी नुसती मंदिरे पाहण्यात काहीच अर्थ नाही. त्यांचा इतिहास, शिल्पांचे अर्थ समजून घ्यायचे असतील तर मार्गदर्शक हवाच. मग त्याच्यासोबत मंदिर फिरू लागलो.
पायातला काटा काढणारी अप्सरा
आयलायनर लावणारी अप्सरा
वीणावादन करणारी सरस्वती
मंदिर एका मोठ्या चौथऱ्यावर उभारलेले होते. अर्धमंडपाचे खांब आणि छत अत्यंत नाजूक कोरीवकामाने सजवलेले होते. इथल्या शिल्पांमध्ये जैन आणि वैष्णव देवतांचे मिश्रण आढळते. गाभाऱ्याच्या प्रवेशद्वारावर गंगा-यमुना कोरलेल्या होत्या. वरच्या भागावर विष्णू दशावतार होते. तर बाजूने आतमध्ये काळ्या पाषाणात घडवलेली पार्श्वनाथांची मूर्ती दिसत होती. हे मंदिर आधी आदिनाथांचे होते असे म्हणतात. सध्याची मूर्ती इथे १८६० मध्ये स्थापली गेली. गाभाऱ्यातून बाहेर पडून आम्ही प्रदक्षिणा मार्गाने फिरू लागलो. इथे अप्सरांच्या काही सुबक मूर्ती होत्या. हातात आरसा धरून कपाळावर कुंकू लावणारी, पायात शिरलेला काटा काढणारी, लहान मूल हातात घेतलेली, पत्र लिहणारी, आयलायनर लावणारी, पाठमोरी वळून शृंगार करणारी, अशा अनेक पोझेस तिथे पाषाणातून घडवलेल्या होत्या. वरच्या बाजूला काही मैथुनशिल्पे होती. शिवाय काही देव-देवतांच्या मूर्तीही होत्या. तिथून बाहेर पडून मग आम्ही बाहेरची शिल्पे बघू लागलो. अप्सरांच्या तशाच काही मूर्ती इथेही होत्या. त्याव्यतिरिक्त अष्टदिक्पाल दिसत होते. राम-लक्ष्मण-सीता, लक्ष्मी-विष्णू, सरस्वती, श्रीकृष्ण यांच्याही मूर्ती होत्या. सर्व मूर्तींचे शरीरसौष्ठव उत्तम पद्धतीने साकारलेले होते. त्यांनी नेसलेली वस्त्रे, अलंकार, इत्यादींचे केलेले अत्यंत नाजूक चित्रण अचंबित करणारे होते. मला तर किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते. तिथून आम्ही आदिनाथ मंदिराकडे वळलो. हे मंदिर थोडे लहान होते. मात्र एकंदर रचना सारखीच होती. इथेही बाहेरच्या बाजूने अप्सरा आणि देवतांच्या मूर्ती होत्या. गाईड प्रत्येक मूर्तीचे वैशिष्ट्य सांगत होता आणि मी ऐकता ऐकता फोटो काढत होतो. साधारण दीडेक तास तिथे घालवल्यानंतर मी पूर्व समुहातल्या इतर मंदिरांकडे वळलो.
अप्सरा आणि देवतांच्या मूर्ती
वामन मंदिर, जवारी मंदिर आणि ब्रह्मा मंदिर अशी तीन मंदिरे खजुराहो गावाच्या पुढे, नरोरा तलावाच्या आसपास होती. पहिले दृष्टीस पडले वामन मंदिर. याची रचना काहीशी बसकी होती. शिखराच्या रेषा भिंतींशी सलग होत्या आणि शिखरावर इतर उपघटक नव्हते. बाजूने नेहमीची अप्सरांची आणि देवतांची शिल्पे होती. गाभाऱ्यात वामनाची चतुर्भुज मूर्ती होती. मूर्ती दुर्दैवाने भंगलेल्या अवस्थेत होती. अर्ध मंडपाच्या वरच्या बाजूला कोपऱ्यांमध्ये सुबक अशी गजशिल्पे दिसत होती. इथे थोडे फोटो काढून मी जवारी मंदिराकडे वळलो. हे मंदिर काहीसे उभट आकाराचे होते. अर्धमंडप, मुखमंडप, आणि गाभारा अशी रचना होती. बाहेरच्या बाजूने शिल्पांचे तीन स्तर होते. मुख्य शिखर इतर उपशिखरांनी वेढलेले होते. वामन मंदिराप्रमाणेच या मंदिराला अंतर्गत प्रदक्षिणा मार्ग नव्हता. गाभाऱ्यात विष्णूची चतुर्भुज मूर्ती होती. दुर्दैवाने हीही मूर्ती भंगलेली होती. आकार लहान असल्याने नजरेच्या एका टप्प्यात मंदिराचे स्थापत्यसौंदर्य अनुभवता येत होते. समोरच होते ब्रह्मा मंदिर. नरोरा तलावाच्या काठावर अगदी मोक्याच्या जागी हे मंदिर बांधले होते. मंदिराचा गाभारा वगळता इतर भाग शिल्लक नाहीत. गाभाऱ्यात चतुर्मुखी ब्रह्मदेवाची मूर्ती होती. बाकी रचना अत्यंत साधी होती. दारावरील मोजकी शिल्पे वगळता इतर काही कोरीवकाम नव्हते. मात्र चौथऱ्यावरून मागच्या तलावाचे विलोभनीय दृश्य दिसत होते. इथे मी जरा वेळ विसावलो. तेवढ्यात पावसाचे बारीक थेंब पडू लागले. पाऊस अजून वाढायच्या आत परतावे म्हणून मी लगेच निघालो.
बसक्या आकाराचे वामन मंदिर आणि कोपऱ्यातली गजशिल्पे
भंगलेली वामन मूर्ती
जवारी मंदिर
जवारी मंदिरातली विष्णू मूर्ती
नरोरा तलावाच्या काठावरचे ब्रह्मा मंदिर
एव्हाना दुपारचे साडेबारा वाजे होते. जवळच्या हॉटेलवर जेवण उरकले आणि विश्रांतीसाठी हॉस्टेलवर परतलो.
“चाचा थोडा तेज चलो प्लीझ...” मी अगदी हतबलपणे रिक्षावाल्या काकांना विनंती वजा आर्जव करत होतो. नवी दिल्लीच्या प्रशस्त पण वर्दळीच्या रस्त्यांवरून रिक्षा निजामुद्दीन स्टेशनकडे धावत होती. नेहमीप्रमाणे मी घाईत होतो. ट्रेन सुटायला जेमतेम अर्धा तास बाकी होता. आणि गुगलबाई पोहोचण्यास लागणारा अपेक्षित वेळ २५ मिनिटे दाखवत होती. माझा जीव वर-खाली होत होता. त्यात रिक्षा चालवणारे काका जरा वयस्करच दिसत होते. ते बिचारे मला वेळेत पोहोचवण्यासाठी जीवाचा आटापिटा करत होते. मी मनोमन ईंडी-गो कंपनीला विमानाला उशीर केल्याबद्दल शिव्या घालत होतो. ट्रेन जर चुकलीच तर काय करायचे याची जुळवाजुळव एकीकडे चालली होती. फेब्रुवारी महिन्यातला दिल्लीतला गारठा अंगाला झोंबत होता. शेवटी एकदाची रिक्षा स्टेशनच्या परिसरात शिरली. काकांच्या हातात पाचशेची नोट कोंबून मी फलाटाकडे धावत सुटलो. सुदैवाने अजून ७ मिनिटे बाकी होती गाडी सुटायला. मी पुलावरून बघतो तर काय, फलाट तुडुंब गर्दीने भरलेला! यूपी संपर्क क्रांती नामक ही गाडी भलतीच लोकप्रिय होती तर. गाडीचे दरवाजे नुकतेच उघडलेले असावेत. सगळी गर्दी प्रचंड कोलाहल करत गाडीत घुसायचा प्रयत्न करत होती. क्षणभर मला धडकीच भरली. आता या गर्दीत मी एसी-२ चा डबा कसा काय शोधू?? आधीच उशीर झालेला. त्यात या गर्दीची भर! दुष्काळात तेरावा महिना! मी उगीच चरफडत फलाटावर डब्यांचे नंबर लावलेले दिसतायत का ते बघू लागलो.
मध्य प्रदेश सहलीची रूपरेषा
तेवढ्यात टीसी दिसला. शेवटी त्याच्या मदतीने मी योग्य डब्यापर्यंत पोहोचलो. इथे तर फलाट मोकळाच दिसत होता. अगदी जनरलच्या डब्यातही तुरळकच गर्दी दिसत होती. हा काय प्रकार आहे काही समजत नव्हतं. जाऊदे म्हणून मी बर्थवर सामान टाकलं आणि सुस्तावलो. पुढच्याच मिनिटात गाडी सुटली. मी एक सुटकेचा निश्वास टाकला. मनोमन त्या रिक्षावाल्या काकांना धन्यवाद दिले. मग सहप्रवाशाशी बोलता बोलता कळलं की ही एक गाडी नसून एकमेकाला जोडलेल्या दोन गाड्या आहेत. एक भाग उत्तर प्रदेशातल्या माणिकपूरकडे जाणार होता तर दुसरा खजुराहो कडे. आता कुठे त्या गर्दीच्या विषम विभाजनाचं रहस्य उलगडलं! मी पुन्हा एकदा आपण योग्य डब्यात बसलोय की नाही याची खातरजमा करून घेतली. प्रवास रात्रीचा असल्याने बाहेरचं काही दिसणार नव्हतं. मी मस्तपैकी कानात इयरफोन लावून गाणी ऐकत पहुडलो. खजुराहो शेवटचं स्थानक असल्याने मी निश्चिंत होतो.
फलाटावरची गर्दी
खजुराहो – दहाव्या शतकातल्या मंदिरांसाठी सुप्रसिद्ध असलेली जागा. त्याहून प्रसिद्ध म्हणजे इथली गूढ मैथुनशिल्पे! परदेशात असताना बरेच जण विचारायचे त्याबद्दल. किंबहुना खजुराहो पाहून आलेले लोक मला भारतापेक्षा परदेशातच जास्त भेटले असतील! तर अशी जगप्रसिद्ध जागा बऱ्याच वर्षांपासून बकेटलिस्ट वर होती. त्या जोडीने ओरछा आणि ग्वालियरविषयीही ऐकून होतो. शेवटी एकदा सुट्टीचा योग जुळवून आणला आणि खजुराहो – ओरछा – ग्वालियर अशी सहा दिवसांची सहल ठरवली. प्रत्येक जागेसाठी साधारण दीड ते दोन दिवस ठरवले. अंतर्गत फिरण्यासाठी थोडा जास्तीचा वेळ ठेवला. सगळी रूपरेषा ठरवून तिकिटे बुक करायला वळलो. मुंबईहून खजुराहोला पोहोचणं म्हणजे एक दिव्य होतं. एकतर थेट ट्रेन उपलब्ध नाही. थेट विमानसेवाही नाही. सतना किंवा झांसी मार्गे जायचं तर कमीतकमी चोवीस तासांचा प्रवास. त्यात आरक्षित तिकीट मिळण्याची मारामार. थोडं अजून शोधल्यावर कळलं की दिल्लीहून खजुराहोसाठी थेट ट्रेन आहे, तीसुद्धा एका रात्रीत जाणारी. मग सरळ मुंबई ते दिल्ली विमानाचं तिकीट काढलं आणि दिल्लीहून खजुराहोपर्यंत ट्रेनचं. नाही म्हटलं तरी प्रवासाचे आठ-दहा तास वाचणार होते. आणि मुंबई-दिल्ली विमान काही फार महाग नव्हतं. असो.
मथुरा आलं तसं जेवण वगैरे उरकलं आणि बर्थवर पसरलो. गाडीची धडधड छान अंगाई म्हणत होती. दिवसभरच्या धावपळीत जीव थकला होता. झोप कधी लागली ते कळलंच नाही.
मुसळधार पावसातून आम्ही मुलोडीच्या दिशेने उतरत होतो. उतरतानाची वाट म्हणजे वाट कमी आणि ओहोळवाट जास्त वाटत होती. रस्त्यात लागणारे झरे आता कमरेपर्यंत फुगले होते. एकमेकांचे हात धरत, तोल सावरत, आम्ही ते पार करत होतो. सगळी झाडं-झुडुपंं, डोंगर-टेकड्या, गवत-फुलं त्या पावसापुढे नतमस्तक होऊन त्याचा मारा झेलत होते. त्या सगळ्यांसाठी निसर्गाचा आशीर्वादच होता तो पाऊस. पुढचे आठ-दहा महिने काही एवढं विपुल जलामृत मिळणार नव्हतं त्या रानाला. म्हणून आता हवं तितकं जलामृत पिऊन घेत होतं ते रान. सततच्या पावसाने आमची मात्र अवस्था बिकट झाली होती. ओल्या-कच्च कपड्यांतून अंगात हुडहुडी भरत होती. चष्म्याच्या काचा थेंबांनी धूसर झाल्या होत्या. शरीरातले सगळे स्नायू बोलत होते. पाय थरथरत होते. कधी एकदा कोरडे होऊन उबदार जागी रजई घेऊन बसतोय असं झालं होतं. ते चित्र डोळ्यांसमोर ठेऊन आम्ही स्वतःला पुढे रेटत होतो. ती वाट काही संपता संपत नव्हती.
भिजून तृप्त झालेलं रान
हात धरून ओहोळ पार करताना
दोन-तीन तासांच्या पायपिटीनंतर आम्ही त्या वन विभागाच्या चेकपोस्टपाशी पोहोचलो. सकाळी जाताना काढून ठेवावी लागलेली खाऊची पाकीटंं आता परत मिळाली. सगळ्यांनी त्यावर एकच फडशा पाडला. थंडी-पावसाने आणि अथक पायपिटीने त्रस्त झालेल्या जिवाला ते पिवळे केळ्याचे चिप्स सुद्धा स्वर्गीय वाटत होते. कुद्रेमुखसारखे ट्रेक हे असे पाय जमिनीवर राखण्यास भाग पाडतात. आयुष्यातल्या छोट्यात छोट्या गोष्टीची किंमत दाखवून देतात. रौद्र निसर्गापुढे माणूस किती क्षुद्र आहे याची पदोपदी जाणीव करून देतात. असो.
खाली पोहोचल्याचा आनंदात आम्ही बागडत बागडत होम स्टे वर पोहोचलो. साधारण पाच वाजत आले होते. वेळेत ट्रेक पूर्ण केल्याचे समाधान वाटत होते. खोलीवर येऊन रेनकोट काढला आणि बघतो तर काय सगळा टी-शर्ट आणि विजार रक्ताने माखलेले!! जळूबाईने आपला डाव साधला होता. पोटावर एक-दोन नाही चांगले चार व्रण दिसत होते. आता ती जळूबाई सरपटत रेनकोट आणि शर्टच्या आत कशी काय पोहोचली हे एक कोडंच होतं. थोडं रक्त अजूनही येत होतंच. मग लगेच त्यावर डेटोलचा कापूस दाबून धरला. त्याशिवाय पायावरही काही ठिकाणी व्रण दिसत होते. ना कसली वेदना ना काही जळजळ. नुसते रक्ताने वाहणारे व्रण. सगळ्यांचीच अवस्था अशी झाली होती. कोणाला छातीवर, कोणाला पाठीवर, तर कोणाला मांडीवर, जिथे मिळेल तिथे जळूने चावा घेतला होता. होम स्टे वर अजून एक ग्रुप आला होता. त्यांना वर जायचे परवाने मिळाले नव्हते म्हणून ते होम स्टे वरच थांबले होते. उद्याच्या दिवशी लवकर नंबर लावून परवाने मिळवणार होते. जळूबाईंच्या हल्ल्याने आमची झालेली अवस्था बघून सगळे धास्तावले होते. आम्हीही त्यांना ट्रेकच्या गमतीजमती खुलवून सांगू लागलो. तेवढ्यात गरमागरम चहा आणि भजी आणली गेली. सगळ्यांनी त्यावर यथेच्छ ताव मारला. मग उगाच गप्पा मारत बसलो. फोनला नेटवर्क नव्हतंंच. त्यामुळे आमचं आपापसातलंं नेटवर्क जमण्यास मदत झाली. गप्पा मारता मारता जेवायची वेळ झाली. मग मस्तपैकी सांबार-भात आणि पापड खाऊन अजून जरा वेळ बोलत बसलो. तासाभरातच सगळे निद्रादेवीच्या अधीन झालो.
पहाटे पावसाच्या आवाजानेच जाग आली. हा पाऊस काही आमचा पिच्छा सोडणार नव्हता. शेवटी घाटातलाच पाऊस तो. आन्हिकं आणि नाश्ता उरकून आम्ही परतीच्या प्रवासासाठी सज्ज झालो. कळसापर्यंत सोडायला जाणाऱ्या जीपगाड्या तयारच होत्या. त्या चिखलाने भरलेल्या रस्त्यावरून आम्ही तासाभरात कळसाला येऊन पोहोचलो. तिथे आमची बस होतीच. घाटातून वाटवळणं घेत बस जसजशी पुढे जाऊ लागली तसे गार हवेवर सगळेच डुलक्या काढू लागले. मी मात्र लहान मुलासारखा टकामका घाटातले सृष्टीसौंदर्य न्याहाळत होतो. कर्नाटकातला हा भाग म्हणजे एक वेगळीच दुनिया होती. जागोजागी कॉफीचे मळे, त्यात मध्येच लावलेली सिल्व्हर ओकची गोंडस झाडे, ढगांत हरवलेले डोंगरमाथे, डोंगरांच्या बेचक्यांतून वाहणारे शुभ्र धुमाळ, सारेच विलोभनीय होते. मधेच एखादी पावसाची सर साऱ्या परिसराला झोडपून काढत होती. मग एखादा चुकार ढग भलताच खाली उतरून कॉफीच्या मळ्यांना गोंजारून जात होता. रविवार असल्याने अधून-मधून पर्यटकांच्या गाड्या दिसत होत्या. हा नितांतसुंदर प्रदेश हुडकायला परत एकदा इथे यायचं असं मी मनाशी ठरवून टाकलं.
म्हणता-म्हणता आम्ही बंगलोरला पोहोचलो. नव्याने दोस्ती झालेल्या सवंगड्यांचा निरोप घेतला आणि घराच्या दिशेने निघालो. बरीच वर्षं बकेट लिस्ट वर असलेलं एक ठिकाण पाहिल्याचं विशेष समाधान मनात दाटलं होतं.
अथांग हिरवळीने नटलेल्या त्या राजस टेकड्या न्याहाळत आम्ही कुद्रेमुख शिखराकडे चाललो होतो. पाऊस थांबला होता. पण त्या उंचीवर हवेनेच जणू पाण्याच्या सूक्ष्म थेंबांना तोलून धरले होते. वाऱ्यासोबत ते थेंब अंगावर आदळत होते, नाकातोंडात जात होते. खरंच कधी ढगांमधून विहरायला मिळालं तर असाच काहीसा अनुभव येईल कदाचित. एक तीव्र चढणीचा टप्पा पार करून वाट आता थोडी सपाट झाली. समोर दरीच्या काठाने बिलगून वाढलेलं एक झाड दिसत होतं. त्या गवताळ डोंगरमाथ्यावर तेवढं एकच झाड दिमाखात उभं होतं. जणू साऱ्या प्रदेशाची राखण करायची जबाबदारी त्या एकट्या झाडाला कुद्रेमुखच्या शिखराने दिली होती. या जागेस ओंतीमारा असे म्हणतात. याचा शब्दशः अर्थ होतो एकटे झाड. माथेरानच्या One-tree hill सारखीच ही जागा वाटत होती. झाडाच्या शेजारी कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानातल्या प्राणीसंपदेविषयी माहिती देणारा एक फलक लावला होता. तिथे आम्ही जरा वेळ विसावलो. थोडीफार खादाडी केली. फोटो-बिटो काढले आणि पुढे निघालो.
ओंतीमाराकडे जाणारी वाट
ओंतीमारा
आता पुन्हा एकदा चढण सुरु झाली. आता शिखराच्या मुख्य धारेवर आम्ही येऊन पोहोचलो होतो. चढाईचा मार्ग मागच्या बाजूने होता. त्यामुळे खालून दिसणारा (किंबहुना दिसू शकणारा) शिखराचा तो विशिष्ट आकार इथून नजरेस पडत नव्हता. समोर दिसत होती ती निव्वळ डोंगराच्या अंगाने वर-वर चढत जाणारी वाट. डोंगराच्या बेचक्यांमध्ये बांबू फोफावला होता. अधे-मधे रानफुलं दिसत होती. सोबतीला जळवा होत्याच. जसजसे वर चढत होतो तसा वाऱ्याचा वेग वाढत होता. एका मोठाल्या खडकापाशी ती वाट येऊन अडखळली. इथून डाव्या हाताने खडी चढण सुरु होत होती. घोंघावणारा वारा आता तोललेल्या थेंबांना बाणांसदृश अंगावर फेकून मारत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत आम्ही ती खडी चढण चढू लागलो. चांगलीच धाप लागत होती. त्यात सगळी वाट प्रचंड निसरडी झाली होती. टोचणाऱ्या पावसापेक्षा आता पुढे टाकलेलं पाउल एका जागी स्थिर राहतंय की नाही याची काळजी जास्त होती. आधीच एवढं अंतर चालून थकलेले पाय आता चढताना बोलू लागले होते. अजून ३ किमी अंतर बाकी होतं. ट्रेक लीडर सगळ्यांना प्रोत्साहित करत होता. पण कुद्रेमुख आता खरा इंगा दाखवत होतं. ग्रुपमधल्या दोघांनी तिथूनच माघार घेतली. ओंतीमारापाशी जाऊन थांबतो असं म्हणून ते तिथूनच मागे फिरले. आम्ही मात्र उरलीसुरली उमेद एकवटून वर चढू लागलो. म्हणता म्हणता ती खडी चढण संपली. शेवटचा गडी वर पोहोचला आणि आम्ही सगळ्यांनीच एकमेकांचं अभिनंदन केलं. शिखर अजून अर्धा किलोमीटर लांब होतं. पण वाट मात्र सपाट होती.
शिखरावर चढत जाणारी वाट
हळूहळू आम्ही शिखरापर्यंत पोहोचलो. कुद्रेमुखच्या सर्वोच्च जागेचा फलक तिथे लावलेला होता. या जागेवरून आजूबाजूला केवळ ढग दिसत होते. संपूर्ण व्हाईट-आउट! इथून कुद्रेमुखच्या गोलाकार टेकड्यांचे सुरेख दृश्य दिसते म्हणे. मात्र आज ढगांनी आमचे दृश्य अडवले होते. भर पावसाळ्यात अजून काय नशिबात असणार म्हणा. वाऱ्याच्या अंगातले थेंबांचे बाण आता मशीनगनमध्ये अपग्रेड झाले होते. शिखरावर पोहोचल्याचा आनंद होताच, मात्र तो तिथे थांबून साजरा करणं अशक्य होत होतं. आम्ही जमतील तसे फोटो काढले आणि खाली उतरायला सुरुवात केली. जिथून तीव्र उतार सुरु होत होता तिथे थांबलो आणि जेवणाच्या पिशव्या उघडल्या. सपाटून भूक लागली होती. कुठे बसावं तर आजूबाजूला चिखलाने माखलेला नुसता बोडका कातळ होता. मग उभ्या-उभ्याच खायला सुरुवात केली. त्या थंड ओल्या हवेत उभ्या-उभ्या लेमन राईसचे बकाणे भरण्यात काही वेगळीच मजा होती.
शिखरावर
जेवण उरकून उतरायला सुरुवात केली. चढताना दम खाणारी ती चढण आता उतरणे एक मोठे आव्हान होते. पावसाने वाट निसरडी झाली होती. त्यात डोंगरावरून खाली येणारे पाणी त्याच वाटेचा आधार घेऊन खाली वाहत होते. आम्ही कधी घसरत, कधी सरपटत, तर कधी बेडूकउड्या मारत खाली येत होतो. दोन हात आणि दोन पाय यांवर कसेही करून स्वतःला सावरून धरायचे एवढे एकच उद्दिष्ट होते समोर. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर एकदाचे त्या मोठ्या खडकापाशी येऊन पोहोचलो. ती वाट चढल्यावर झाला नसेल एवढा आनंद उतरल्यावर झाला! आता पुढची वाट तशी सोपीच होती. झपाझप ओंतीमाराजवळ येऊन पोहोचलो. क्षणभर विश्रांती घेऊन लगेच पुढे चालू लागलो. पाऊस थांबला होता. वाराही मंद वाहत होता. तितक्यात समोरच्या टेकडीमागून एक भलामोठा ढग पुढे येताना दृष्टीस पडला. आता पुन्हा पाऊस येणार की काय अशा विचारात असतानाच पाण्याचे टपोरे थेंब अंगावर पडू लागले. म्हणता म्हणता पावसाने रौद्र रूप धरण केले. जणू ढगफुटीच! एवढी वेगवेगळी पावसाची रूपं बघितली या ट्रेकमध्ये. आता हे एकच रुपडं राहिलं होतं जसं काही! आज निसर्गापुढे स्वतःला ओवाळून टाकलं आहे. होऊन जाऊ द्या!
टेकडीमागून रोरावत पुढे येणारा ढग
भारतीय उपखंडातला मान्सूनचा पाऊस म्हणजे एक रंगकर्मीच! जिथे जाईल तिथे वेगळं रुपडं घेऊन येईल. किनारपट्टीवर कोसळताना वादळी वारे सोबतीला घेऊन येईल. एकदा बरसू लागला की सात-आठ दिवस सतत बरसेल. मग अनिश्चित काळासाठी सुट्टीवर जाईल. दमट उष्म्याने जीव अगदी नकोसा करून टाकेल. मग सणावारांचे मुहूर्त गाठून धो-धो बरसेल. अगदी नवरात्रीचा प्रसाद घेतल्याशिवाय जागचा हलणार नाही. घाटातला पाऊस म्हणजे एक दीर्घकाव्य. तिथल्या डोंगररांगांशी त्याची खास दोस्ती. तिथे एकदा आवर्तला की चार-एक महिन्यांसाठी बाळंतपणाला माहेरी आलेल्या मुलीसारखा सुस्तावेल. कधी नुसतेच ढग, कधी भुरभूर, कधी रिमझिम, तर कधी मुसळधार अशा वेगवेगळ्या सर्गांमध्ये, छंदांमध्ये मनाला येईल तसा बरसत राहील. मग रानफुलं प्रसवून बागडत निघून जाईल. घाटमाथ्यासोबत मात्र त्याचा relationship status कायमच It’s complicated! असा. एक तर प्रदीर्घ काळ वाट बघायला लावील. किनारपट्टीवर एखाद-दोन पूर येऊन जातील पण इथे मात्र दोन-चार सरींच्या पुढे पर्जन्यमापकाचा आकडा जाणार नाही. मग एखाद्या उनाड दुपारी अधाशासारखा कोसळेल, सारं वातावरण गारेगार करेल, पाऊस आला असा खोटा दिलासा देईल, आणि पुन्हा दडी मारून बसेल. पावसा-पाण्याची तऱ्हाच न्यारी!
शोला प्रदेश
न संपणारी रानवाट
कुद्रेमुखच्या घाटातला तो पाउस कोणत्या सर्गात कोसळत होता देव जाणे! परतीची वाट अजूनच बिकट होत होती. आता कधी एकदा खाली पोहोचतोय असं वाटत होतं.
मुलोडी गावात चहा-नाश्ता उरकून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो. पाऊस अधून-मधून कोसळत होता. वातावरण कुंद होते. गार वाऱ्यावर हुडहुडी भरत होती. फार जास्त पाऊस लागू नये अशी अपेक्षा करत आम्ही हर हर महादेव म्हणून ट्रेकला सुरुवात केली. गावातून बाहेर पडताच मंद चढण सुरु झाली. आजूबाजूच्या डोंगरांवर नुसती खुरटी झुडूपं आणि गवत दिसत होते. उंच आणि घनदाट झाडं कधीच मागे पडली होती. आपण बऱ्यापैकी उंचीवर असल्याचं जाणवत होतं. तेवढ्यात वन विभागाची चेक पोस्ट दिसली. आम्ही पहाटे दिलेल्या ओळखपत्राच्या प्रती इथल्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. तो प्रत्येकाचं नाव घेऊन तीच वक्ती आहे की नाही हे तपासून बघत होता. शिवाय प्रत्येकाच्या बॅगेत किती प्लास्टिकच्या पिशव्या आहेत हेही तपासणं चाललं होतं. माणशी केवळ एकच पिशवी वर न्यायची परवानगी होती. त्यामुळे दुपारच्या जेवणाचं पाकीट वगळता इतर सगळं समान इथे काढून ठेवावं लागलं. तसा उपक्रम स्तुत्यच होता. कुद्रेमुखचा परिसर अति-संवेदनशील असल्याने वन विभाग इथल्या पर्यावरणाच्या बाबतीत बराच दक्ष होता. महाराष्ट्रातल्या वन विभागाला कधी जाग येणार देव जाणे. असो. सगळी तपासणी पूर्ण होतेय तेवढ्यात पावसाची एक जोरदार सर आली. वाऱ्याने थंडी वाजू लागली. आता सगळा ट्रेक या अशाच वातावरणात करायचा आहे याची मनोमन तयारी करत आम्ही पुढे निघालो.
वाटेतले रम्य दृश्य
वन विभागाची चेक पोस्ट
दरीत फोफावलेलं गच्च रान आणि माथ्यावरची खुरटी झुडपे
एका डोंगरधारेच्या अंगाने वर-खाली होत ती वाट हळूहळू कुद्रेमुखच्या शिखराच्या दिशेने जात होती. काही अंतर मोकळ्या गवताळ भागातून रेंगाळत ती वाट मध्येच डोंगराच्या बेचक्यात शिरत होती. डोंगराच्या बेचक्यांमध्ये घनदाट रान फोफावलं होतं. त्या रानात प्रवेश केला की वेगळ्याच विश्वात आल्यासारखं वाटे. भर दिवसा दाटून आलेला अंधार, पानांतून सळसळत वाहणारा वारा, वरून पावसाचे थेंब, आणि ते उबदार दमट वातावरण थोडा वेळ हवंहवंसं वाटे. मग त्या बेचक्यातून धोधो वाहणारा ओढा आडवा येई. आपल्या घुमणाऱ्या ध्रोन्कारात तो पावसाच्या आवाजावरही मात करे. त्या तांबुसराड पाण्यात झोकून द्यावंसं वाटे. मग अचानक ते दाटलेलं रान कोंदट आणि भयाण वाटू लागे. ओढा पार करून थोडं वर चढलं की वाट रानातून बाहेर येई. मग ती पुन्हा डोंगरधारेच्या अंगाने खुरट्या गवतातून सरपटत पुढे जाताना दिसे. त्यावरून तोल सावरत चालू लागताच वाऱ्यासोबत पाऊस सपासप अंगावर चालून येई. मग पुन्हा कधी बेचक्यातलं रान येतंय याची वाट बघत जीव पुढे चालू लागे.
बेचक्यातल्या कोंदट रानातून वाहणारा ओढा
रमतगमत, पावसाचा आनंद घेत आम्ही पुढे चाललो होतो. एक गोष्ट मात्र या आनंदात सतत व्यत्यय आणत होती. ती म्हणजे जळवा!! पश्चिम घाट म्हटलं म्हणजे जळवा आल्याच. त्यात कुद्रेमुखचं हे रान म्हणजे जळवांचं जणू माहेरच. इथे प्रत्येक पावलावर कुठेतरी जळू दिसत होती. आम्ही दर दहा पावलांवर अंगावर कुठे जळू चढलिये का ते बघत होतो. कोणाच्या अंगावर चढलेली दिसली तर लगेच सावध करत होतो. ट्रेक लीडर आमच्याकडे बघून हसत होता. म्हणत होता, पिऊ दे की थोडंफार रक्त. काही होत नाही. त्याचं म्हणणं खरंच होतं म्हणा. जळवांच्या चावण्याने कुठले रोग होत असल्याचे ऐकीवात नाही. शिवाय त्या दंशाने कसली विषबाधाही होत नाही. थोडंफार रक्त वाहतं एवढंच. तासभर जळू-दक्षता अभियान राबवल्यानंतर आम्ही शेवटी हार मानली. काय व्हायचंय ते होऊदेत. एकदा स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन केलं की त्याने देऊ केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत तशा स्वीकारायच्या.
वाटेतला फलक आणि समोर ढगांच्या दुलईत दडलेले कुद्रेमुख शिखर
वर-खाली होणारी ती वाट आता एका सपाट भागावर येऊन पोहोचली. इथे कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाचा एक फलक लावलेला होता. समोर ढगांनी व्यापलेला एक प्रचंड डोंगर दिसत होता. हेच कुद्रेमुख शिखर. त्या फलकावरच्या चित्रानुसार इथून कुद्रेमुख शिखराचा संपूर्ण व्यू दिसतो. मात्र आज ढगांच्या साम्राज्यामुळे तसा व्यू काही आमच्या नशिबात नव्हता. तिथे थोडे फोटो काढून आम्ही पुढे निघालो. पाऊस जरा ओसरला होता. वातावरण प्रसन्न वाटत होतं. थोडं अंतर पुढे जाताच तीव्र चढण सुरु झाली. वीसेक मिनिटांच्या चढाईनंतर एका उंच टेकडीवर वाट येऊन थबकली. इथून साऱ्या कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाचा रम्य परिसर दिसत होता. हिरवा मखमली शालू पांघरलेले डोंगर जणू ढगांशी हवा-पाण्याच्या गप्पा मारत होते. नजर जाईल तिथपर्यंत हिरव्यागार गोलाकार टेकड्या दिसत होत्या. महाराष्ट्रातला सह्याद्री आणि इथला सह्याद्री यांत हाच फरक आहे. अग्निजन्य खडकामुळे महाराष्ट्रातला सह्याद्री रांगडा वाटतो. बेलाग ताशीव कडे, माथ्यावरची बोडकी पठारे आणि पायथ्याशी बिलगलेली अरण्ये असे महाराष्ट्रातले त्याचे रूप. इथे कर्नाटकात मात्र तो काळासावळा खडक कुठे दिसत नाही. गोल-गोल टेकड्या एकमेकांच्या अंगावर चढत आभाळाला स्पर्श करू पाहतात. त्यांच्या उताराने गच्च रान पसरत जातं. मग एका उंचीनंतर मोठे वृक्ष तग धरू शकत नाहीत तिथपासून खुरट्या झुडपांचा आणि गवताचा प्रदेश सुरु होतो. हाच तो नानाविध प्रदेशनिष्ठ प्रजातींना आसरा देणारा शोला प्रदेश. भारतातली एक अद्वितीय परिसंस्था त्या ठिकाणी मी अनुभवत होतो.
हिरवा शालू नेसलेले डोंगर
शोला परिसंस्था
अजून जवळपास अर्धी चढाई बाकी होती. आम्ही पावलांचा वेग वाढवला.
गेले काही महिने चालू असलेली २०१८ च्या फुटबॉल विश्वचषकाची धामधूम अखेर संपली. फ्रान्सने चषक जिंकला आणि दर चार वर्षांनी येणारे एक आवर्तन संपले. त्यानिमित्ताने जर्मनीत असताना फुटबॉलबाबतच्या काही गमतीदार आठवणी जाग्या झाल्या. तसा माझा आणि फुटबॉलचा संबंध जवळपास नसल्यागत. माझं तसं कुठल्याच खेळाशी सख्य जमलं नाही. क्रिकेटशी तर छत्तीसचा आकडा. भारतात क्रिकेटच्या नावाखाली चाललेला हैदोस तर उबग आणतो अक्षरशः! भारतात असेपर्यंत फुटबॉलचे फारसे एक्स्पोजर नव्हते. २०११ मध्ये जर्मनीत आलो आणि अंगावर फुटबॉल जणू आदळू लागला. सतत कुठली ना कुठली स्पर्धा चालू असायची. खेळ असला की जर्मन लोक बारमध्ये मित्राचं कोंडाळं करून मोक्याची जागा पकडून बसणार, मोठा बियरचा टॉवर किंवा पिचर मागवणार, आणि मग खेळ बघत बियरचे घुटके घेत संपूर्ण संध्याकाळ घालवणार, हे नेहमीचं चित्र. आधीच फुटबॉलमध्ये रस नसणारा मी, ती गर्दी आणि वाढलेल्या बियरच्या किमती बघून खेळाच्या दिवशी कधी चुक्कूनसुद्धा बारमध्ये फिरकायचो नाही.
एके शनिवारी कुठल्याशा जर्मन संघाचा इतर कुठल्याशा लोकप्रिय संघाशी खेळ होता. सगळीकडे उत्साहाचं वातावरण होतं. सुपरमार्केट मधले बियरचे सेक्शन दुपारीच ओस पडलेले दिसत होते. बारवाल्यांची जय्यत तयारी सुरु होती. माझा तसा काहीच प्लॅन नव्हता. एखादा पिक्चर-बिक्चर बघायचा आणि झोपी जायचे असाच विचार चालू होता. तेवढ्यात एका मित्राचा फोन आला. त्याच्या कोणा मित्राने एका जवळच्या बारमध्ये दोघांची जागा आरक्षित केली होती. पण तो मित्र काही कारणास्तव येऊ शकणार नव्हता. म्हणून हा मला बोलवत होता. हा गडी म्हणजे फुटबॉलचा निस्सीम भक्त. तो एकवेळ जेवणखाण सोडेल पण खेळ चुकवणार नाही! माझ्या फुटबॉल “प्रेमा”बद्दल त्याला थोडीफार कल्पना होती. पण तोही त्या शहरात नवीनच असल्याने त्याची फारशी कोणाची ओळख नव्हती. एकसे भले दो म्हणून तो मला चल म्हणत होता. मी तर सुरुवातीला नाहीच म्हटले. पण तो अगदीच आग्रह करू लागल्यावर मी शेवटी तयार झालो. आजूबाजूला काही का चालेना, आपल्याला बियर पिण्याशी मतलब! ते उत्साहाने भारलेलं वातावरण अनुभवायची सुप्त इच्छाही होतीच. शेवटी जर्मन संस्कृतीचा हाही एक भागच नाही का! जवळच जायचे आहे, अगदीच वैताग आला तर कधीही घरी निघून येऊ, असा विचार करून मी बाहेर पडलो.
आयरिश हाउस ही बारची चेन खेळांच्या स्क्रीनिंगसाठी प्रसिद्ध. आम्हाला तशी कोपऱ्यातलीच जागा मिळाली होती. जेमतेम स्क्रीन दिसत होती. खेळ सुरु व्हायची वेळ झाली आणि सगळा बार तुडूंब भरला. मी नेहमीची बियर मागवली आणि शांतपणे घुटके घेत बसलो. स्क्रीनवर चाललेल्या खेळापेक्षा तिथे जमलेल्या लोकांचे आविर्भाव, त्यांचा प्रतिक्रिया, आरडाओरड हेच जास्त करमणुकीचं वाटत होतं. खेळाकडे माझं तसं लक्षच नव्हतं. स्क्रीनवर ०-० चा स्कोअर आणि राहिलेली पाचेक मिनिटे तेवढी दिसत होती. थोडक्यात, पुढच्या काही मिनिटात एखादा गोल झालाच तर तो निर्णायक ठरणार होता. आता गोल झालाच तर निदान तो कोणी केला हे माहित असावं म्हणून मी मित्राला विचारलं, हे लालवाले जर्मन आहेत की निळेवाले?? खेळाच्या या टप्प्यावर माझ्याकडून आलेला हा प्रश्न बघून मित्राने माझ्याकडे एक संमिश्र कटाक्ष टाकला. त्यात काहीसा विस्मय, थोडासा राग, आणि कुठेतरी तुच्छताही असावी कदाचित! मी फुटबॉल-अनभिज्ञ आहे हे त्याला माहित होते. पण माझी अनभिज्ञता, किंवा त्याहूनही बेपर्वाई, या पातळीची असेल असे कदाचित त्याला वाटले नसावे. तो काही बोलणार एवढ्यात समोर गोल झाला आणि सगळ्यांनी एकच चीत्कार केला. त्या काही सेकंदांत जर्मन खेळ जिंकले होते. तो ऐतिहासिक क्षण पहायचा चुकला म्हणून हा महाशय माझ्यावर असा काही भडकला की विचारू नका! आता त्या गोलचे सतराशे साठ रिप्ले का दाखवेना, त्याला त्या क्षणाची तोड नव्हती. मी तो भोळसट प्रश्न विचारून जणू त्याची संध्याकाळच खराब केली होती. शेवटी त्याच्यासाठी एक थंड बियर मागवली तेव्हाकुठे तो जरा शांत झाला. त्याच्यानंतर या मित्राने परत कधी मला फुटबॉल बघायला चल म्हणायची तसदी घेतलेली नाही!
तर असे हे माझे फुटबॉल-प्रेम! २०१४ साल उजाडले आणि फुटबॉल विश्वचषकाचे पडघम वाजू लागले. जर्मनीत तर जणू काही दिवाळसणच होता. असाच एके संध्याकाळी मी लॅबमधून घरी परतत होतो. साडेसात-आठची वेळ असेल. पण रस्त्यावर अगदी शुकशुकाट होता. कुठलातरी महत्वाचा सामना असावा. मधूनच आजूबाजूच्या घरांतून चीत्कार ऐकू येत होते. एरवीपेक्षा हे ओरडण्याचे प्रमाण जरा जास्तच वाटत होते. भलताच रंजक सामना चाललेला दिसतोय असं म्हणून मी नेहमीच्या तंद्रीत घरी पोहोचलो. आणि पाहतो तर काय, सगळे सहवासी मित्र आणि त्यांचे काही मित्र ख्रिसच्या खोलीवर जमले होते. नुसता गोंगाट चालू होता. आज बुधवारची कसली यांची पार्टी? मी सहज आत डोकावले. आणि सगळे एकदम ओरडले, “अरे! तू आहेस कुठे? हे बघ काय चाललंय?” “मी.. मी तर आत्ता कुठे लॅबमधून येतोय. का? झालं काय एवढं?” “अरे, जर्मनीने ब्राझीलवर ७-१ अशी मात केलीये! आहेस कुठे तू? एकामागोमाग एक ७ गोल!!” आता कुठे त्या घराघरातून ऐकू येणाऱ्या चीत्कारांचं रहस्य उलगडलं! ७ गोल म्हणजे कमालच झाली की! मग मी उगाचच तिथली एक बियर उचलली आणि त्या ७ गोलांच्या कथा ऐकत बसलो. मला याच्यात रस नाही हे सांगून उगाच त्यांचा मूड कशाला खराब करावा? एक गोष्ट मात्र कळून चुकली. फुटबॉलचा सामना बघताना जर्मन लोक त्यांच्या बेस्ट मूडमध्ये असतात. आणि बियरच्या अमलाखाली तुम्ही नक्की खेळ बघताय की नाही, तुम्हाला खेळ समजतो की नाही, याच्याशी त्यांना काही-एक देणं-घेणं नसतं. क्रिकेट बघणाऱ्या भारतीय लोकांसारखी आपल्यालाच खेळ कसा जास्त समजतो हे दाखवण्याची अहमहमिका त्यांच्यात नसते. त्यामुळे पुढच्या वेळी नुसत्या पार्टी मूडसाठी का होईना, सामना बघायचा निर्णय मी घेतला.
तशी संधी लवकरच आली. पुढच्याच आठवड्यात जर्मनी विरुद्ध अर्जेन्टिना असा अंतिम सामना होता. जर्मन लोकांत जणू उत्साहाचं वारं शिरलं होतं. सगळ्यांचे प्लॅन बनत होते. मीही एक भारतीय मित्र आणि त्याच्या ग्रुपसोबत जायचं ठरवलं. या वेळी बार माझ्या घरापासून तसा लांब होता. तसा मी कायम सायकलीने फिरायचो. पण आज अंतिम सामना म्हटल्यावर पोलीस बंदोबस्त असेल. मग बारमधून निघताना कोणी पकडलं तर? उगाच कशाला रिस्क? असा विचार करून मी सरळ ट्राममध्ये चढलो. यथावकाश सामना सुरु झाला. कितीतरी वेळ विशेष काही घडतच नव्हतं. नुसतीच टोलवाटोलवी चालू होती. वेळ संपत आली तरी एकही गोल नाही! लोकंही वैतागली होती. अखेर पेनल्टी शॉट मध्ये जर्मनीने एक गोल केला आणि एकच जल्लोष झाला! लोकं नक्की गात होती, ओरडत होती, की घोषणा देत होती, देव जाणे. पण जो काही गलका सुरु होता तसा गलका मी जर्मनीत आजतागायत कधी बघितला नव्हता. इथे फुटबॉलच्या सामन्यांच्या वेळी दंगली वगैरे होतात असं ऐकलं होतं. लोकं तोडफोड करतात, हाणामाऱ्या करतात, काय वाट्टेल ते करतात. आता कुठल्याही क्षणी यांचा हा हिस्टेरिया मर्यादेच्या माहेर जाऊ शकतो असं बघून आम्ही सगळ्यांनी तिथून काढता पाय घेतला. ग्रुपमधले काही जण अजून पुढे सेलिब्रेट करायला जाणार होते. मला आधीच त्या गर्दीचं आणि कोलाहलाचं अजीर्ण झालं होतं. मी आपला त्यांना बाय करून ट्रामच्या थांब्याकडे निघालो.
तिथे तर वेगळंच चित्र होतं. बिस्मार्कप्लात्झचा सगळा परिसर गर्दीने फुलून गेला होता. लोकं शेडवर, झाडांवर, पोलवर, कशाकशावर चढली होती. भर चौकात ट्राफिक रोखून धरलं होतं. जोरजोरात हॉर्न बडवणं चाललं होतं. मध्येच कोणी गर्दीतले १०-१२ लोक एकत्र येऊन गोल फेरा धरून नाचत होते. लोकांना जणू वेड लागलं होतं. एरवी अतिशय शांत आणि शिस्तप्रिय असणारे जर्मन आज तर अंगात आल्यासारखं वागत होते. आणि ट्राम किंवा बसचा काही पत्ताच नव्हता! रात्रीचे साडेबारा वाजत आले होते. नेहमीच्या वेळापत्रकानुसार इव्हाना एक ट्राम यायला हवी होती. इंडिकेटर वर तसं दिसतही होतं. पण सगळ्या ट्राम जागच्या जागीच थांबल्या होत्या. आता काय करावं? ज्या मित्रांसोबत सामना बघत होतो, ते अजून आसपासच असतील. एक-दोघांना फोन लावून पहिला. पण नेटवर्क व्यस्त! असंच मागे त्यांना शोधत जावं का? पण गर्दीने सगळे रस्ते चक्का-जाम झाले होते. हाऊप्टश्ट्रासंवर तर आत शिरायला सुद्धा वाव नव्हता. शिवाय ते कोणत्या बार मध्ये असतील याची काहीच कल्पना नव्हती. काश मी सायकल आणली असती. पोलीस तसेही सगळा नाच बघत उभे होते. असाच एक तास गेला. चालत घरी जावं का? साधारण साडेसहा किलोमीटर अंतर होतं. पण मधला एक रस्ता शेतातून जाणारा होता आणि त्यावर अजिबात दिवे नव्हते. आणि मधेच कुठे हुल्लडबाजी करणारे लोक असतील तर? अशा प्रसंगी रेसिस्ट हल्ले पण होत्तात म्हणे. कुठून बुद्धी झाली आणि फुटबॉलचा खेळ बघायला आलो! आपल्याला ना खेळात काही रस ना जर्मनीच्या विजयाचं काही कौतुक. आता ना धड खेळ बघणं होतंय ना घरी जाता येतंय! मी स्वतःवर कमालीचा वैतागलो होतो.
सव्वा वाजत आला तरी ट्रामचा काही पत्ता नव्हता. आणि आता तर इंडिकेटरवर सकाळची पहिली ट्राम दिसत होती! मी आजूबाजूच्या काही लोकांना विचारलं. बरेच जण माझ्यासारखेच ट्रामची वाट बघत उभे होते. कोणालाच कसलीच कल्पना नव्हती. शेवटी एक ट्रामच्या कंपनीचा माणूस दिसला. तो म्हणाला, दोन वाजता ट्राम येईल. अधिकृत व्यक्तीकडून काहीतरी उत्तर मिळाल्याचे बघून मी जरा निर्धास्त झालो. आता एवढा वेळ थांबलोच आहे तर अजून अर्धा-पाउण तास थांबू. एव्हाना गर्दी जरा कमी झाली होती. मी जवळच्या मॅकडोनाल्डमधून एक गरमागरम कॉफी घेतली आणि गंमत बघत उभा राहिलो. जर्मन समाजाचं ते रूप बघून मी काहीसा चक्रावलो होतो. तसं भारतात गणपती विसर्जनाच्या दिवशी किंवा दहीहंडीच्या दिवशी असंच काहीसं वातावरण असतं. लोकं सभ्यतेची, शिस्तीची सगळी बंधनं झुगारून देत रस्त्यावर नाचत असतात. हुल्लडबाजी सुरु असते. दंगली किंवा तोडफोड होत नाही म्हणा. पण त्याची कसर भरून काढायला अधूनमधून मोर्चे आणि निदर्शनं होत असतातच की. पण आपल्याकडे सणवार सतत सुरु असतात. त्यामुळे लोकांच्या अशा वागण्यात वेगळं काही जाणवत नाही. जर्मन समाज तसा थंडच. इथली सणाची व्याख्या म्हणजे आदल्या दिवशी रात्री बियर ढोसणं आणि पुढचा दिवस घरी झोपून काढणं! नाही म्हणायला कार्निवल वगैरे असतो थोडाफार वेगळ्या पद्धतीने साजरा होणारा. पण तिथेही रात्रभर पिणं असतंच. त्यामुळे हा फुटबॉल विजयाचा जल्लोष जरा वेगळा वाटत होता. शेवटी काय, समाजाने आखून दिलेली चौकट मोडून स्वैराचार करण्याची एक सुप्त उर्मी प्रत्येक समाजात असते. खेळ, सणवार, किंवा राजकारण म्हणजे केवळ निमित्तं असतात. ही निमित्तं निव्वळ काही काळापुरती ती चौकट मोडण्याची मुभा देतात. समाजाच्या मानसिक आरोग्यासाठी ते आवश्यकच नाही का? असो.
माझं कॉफी पिता-पिता चिंतन सुरु होतं. तेवढ्यात सव्वा-दोनला ट्राम आली आणि एकदाचा मी घरी पोहोचलो. दुसऱ्या दिवशी कळलं की फुटबॉलच्या महत्वाच्या सामान्यांच्या वेळी सार्वजनिक वाहतूक मुद्दाम बंद ठेवली जाते. जर तोडफोड झालीच तर नुकसान कमी करायला! मला बापड्याला हे कसं माहित असेल? माझ्या दोन-तास-बिस्मार्कप्लात्झ कथेवर सगळे मनसोक्त हसत होते!
हाफ मून बीचवरच्या विश्रांतीनंतर आम्ही पुढच्या बीचकडे निघालो. समोर अर्थातच एक टेकडी दिसत होती. ही आत्तापर्यंतची सगळ्यात उंच टेकडी असेल. वाटेने गर्द झाडी होती. चांगला तास लागला वर चढायला. आता पुढची वाट टेकडीच्या धारेने जात होती. डाव्या हाताला समुद्र गर्जत होता. उतारावर वाढलेली माडाची झाडं मोठ्या कसोशीने वाऱ्याशी झुंज देत उभी होती. थोड्या वेळातच वाट पुन्हा गर्द झाडीत शिरली. पानांच्या जाळीतून दुपारचं कडक उन हिरवं होऊन खाली झिरपत होती. लाल मातीतली पायवाट आणि ते हिरव्या छटेचं उन एक वेगळीच वातावरणनिर्मिती करीत होते. आता वाट उतरू लागली. हळूहळू झाडांची दाटी कमी होऊ लागली आणि समुद्र दिसू लागला. एका वळणावर आलो आणि समोर ॐ बीचचे नितांतसुंदर दृश्य नजरेस पडले. एकमेकास लागुन असलेल्या दोन अंतर्वक्र किनाऱ्यांमुळे या बीचला ओम बीच असे नाव पडले होते. दोन किनाऱ्यांच्या मधल्या भागात जमिनीचा एक लहानसा तुकडा समुद्रात शिरला होता. त्यावर एक लहानशी खडकाळ टेकडीही दिसत होती. इथे बरेच पर्यटक दिसत होते. ओम बीचचा हा “व्यू” बघण्यासाठी अनेक जण या वळणापर्यंत चढत येत होते. त्यामुळे तिथे काही लहान-सहान दुकानेही उगवली होती. गर्दी बघून आम्ही लगेचच तिथून काढता पाय घेतला.
टेकडीच्या धारेवरून जाणारी वाट
हिरवंं उन आणि लाल माती
ओम बीचचे रम्य दृश्य
ओम बीच तसा चालायला बराच मोठा होता. इथली वाळूही अगदी भुसभुशीत होती. ऊन मी म्हणत होतं. आता चालायचा अगदी कंटाळा आला होता. पण थोडेच अंतर राहिले होते. म्हणता म्हणता आम्ही कडले बीचवर पोहोचलो. हा गोकर्णमधला सगळ्यात गजबजलेला बीच. दुपारची वेळ असल्याने गर्दी तशी आटोक्यात होती. या बीचवर पोहण्यास असुरक्षित अशा काही जागा होत्या. तिथे तसे फलकही लावलेले होते. जागोजागी सुरक्षारक्षक लोकांवर नजर ठेवून होते. ती व्यवस्था बघून थोडेसे आश्चर्य तर वाटलेच पण समाधानही वाटले. भारतात कुठेतरी लोकांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था आहे हे बघून जरा बरं वाटलं. बीचवरच्याच एका हॉटेलवर आमची जेवणाची सोय होती. इथे दोन तासांचा ब्रेक होता. जेवणाची ऑर्डर देऊन आम्ही काही लोक पाण्यात खेळायला पळालो. दोन दिवसांचा शीण पाण्यात उतरल्यावर कुठच्या कुठे पळाला. लाटा उंच उसळत होत्या. दुपारच्या वेळचं ते समुद्राचं कोमट पाणी दुखऱ्या स्नायूंवर मायेचा हात फिरवत होतं. पाण्यात खेळता-खेळता तास कसा गेला कळलंच नाही. जेवण तयार झाल्याची हाक ऐकू आली आणि काहीशा अनिच्छेनेच पाण्याच्या बाहेर पडलो. आता सडकून भूक लागली होती. भरपेट जेवण झाले. काश एक छान डुलकी काढता आली असती! पण घड्याळाचा काटा पुढे सरकत होता.
कडले बीच
आता गोकर्णचा मुख्य किनारा पार करून थेट ट्रेन स्टेशनवर जायचे होते. दुपारचे चार वाजत आले होते. उन्हाची तीव्रता जरा कमी झाली होती. मुख्य किनाऱ्याच्या एका अंगाला एक लहानसे मंदिर होते. तिथून बीच आणि समोरचा समुद्र यांचे रम्य दृश्य दिसत होते. आम्ही तिथे थोडा वेळ विसावलो. ग्रुप फोटो वगैरे काढले आणि बीचवरून बाहेर पडलो. आता शहरातून काही अंतर चालत बस स्थानकावर जायचे होते. ट्रेक तर संपला होता. म्हटलं आता ते अवजड ट्रेकिंग शूज काढून साध्या चपला घालू. दोन मिनिटे थांबून बदलाबदली केली आणि शूज नुसते एका पिशवीत घालून पुढे चालू लागलो. थोडं अंतर जातोय तेवढ्यात लक्षात आलं, गळ्यातला कॅमेरा कुठंय?? जिथे शूज काढले तिथे राहिला की काय? दोन क्षण काही सुचेचना! लगेच ट्रेक लीडरला सांगून मी मागे पळालो. शूज काढले तिथे येऊन पोहोचलो. आसपासच्या लोकांना वेड्यासारखा विचरू लागलो, कोणी एक काळी बॅग बघितली का. भेळपुरीवाल्याला विचारलं, पाणीपुरीवाल्याला विचारलं, समोरच्या बाकावर बसलेल्या बायकांना विचारलं, चौकातल्या ट्राफिक पोलिसालाही विचारलं. काहीच धड उत्तर मिळेना. आता जर कोणी चोरलाच असेल तर असा कोणाला विचारून मिळायची शक्यता नाहीच! पोलिसात तक्रार करावी का? ट्रेनच्या वेळेआधी ते करून होईल? आणि तरीही मिळायची काय शक्यता? एक नाही हजार विचार डोक्यात थैमान घालू लागले. कॅमेरा हरवला आहे आहे सत्य अजूनही पचले नव्हते. तितक्यात फोन वाजला. ट्रेक लीडरचाच फोन होता. “तुझा कॅमेरा इथे आमच्याकडे आहे, लवकर पुढे ये!” ते शब्द ऐकून जीवात जीव आला. धावतच पुढे गेलो. माझा घामेजलेला चेहरा बघून सगळे हसत होते. ग्रुपमधल्याच एका मुलीने तिच्या मित्राचा कॅमेरा समजून माझा कॅमेरा उचलला होता! शूज बदलण्याच्या नादात त्याकडे माझे लक्षच गेले नाही. नेहमी असतो तसा कॅमेरा गळ्यात असेल असे समजून मी पुढे चालू लागलो होतो. नक्की काय घडले नि कसे घडले कोणास ठाऊक! पण त्या काही मिनिटांसाठी माझा जीव असा काही टांगणीला लागला होता की विचारू नका!
गोकर्ण मुख्य बीच
एकदाचे आम्ही स्टेशनवर पोहोचलो. गाडीत शिरताच जेवण वगैरे उरकले आणि सगळेच निद्रेच्या स्वाधीन झालो. खडकाळ टेकड्या, विस्तीर्ण किनारे, रम्य सूर्यास्त आणि त्याचसोबत न हरवलेला कॅमेरा यांमुळे हा बीच ट्रेक आठवणींच्या गाठोड्यात कायमचा बांधला गेला आहे.
लाटांच्या जोरदार आवाजाने जाग आली. तसा तो आवाज रात्रभर चालूच होता. पण पहाटे कदाचित भरती आली असावी. तशी उठायची घाई नव्हती. कालच्या पायपिटीने पाय ठणकत होते. अजून थोडा वेळ झोपावं वाटत होतं. पण एकदा लख्ख सूर्यप्रकाश बघितला की परत झोप येत नाही. मग एकदाचा उठलो. काही जण उठून सूर्योदय बघायला गेले होते ते परत येत होते. काहीशा ढगाळ वातावरणामुळे सूर्योदय काही पाहता आला नव्हता. ते नुसतेच पहाटेच्या मंद प्रकाशात फोटोग्राफी करून परत फिरले होते. तेवढ्यात नाश्ता आला. सगळ्यांचं खाऊन होतंय तोवर नऊ वाजले. मग आवरून आम्ही पुढच्या प्रवासाला लागलो.
तीव्र उताराची वाट
आजची वाट कालच्यापेक्षा कमी अंतराची होती. पण चढ-उतार जास्त होते. वेलेकन बीचला समांतर वाटेने आम्ही गोकर्णच्या दिशेने चालू लागलो. काल सूर्यास्ताच्या वेळी सूर्य ज्या टेकडीने झाकला होता ती आता समोर उभी ठाकली होती. आतापर्यंतच्या टेकड्यांच्या तुलनेत ही टेकडी बरीच उंच होती. वाटेने गच्च झाडी होती. त्यामुळे वातावरणात दमट उष्मा जाणवत होता. समुद्रावरचा वारा दूर कुठेतरी अडकून पडला होता. कपाळावर जमा होणारे घामाचे थेंब पुसत आम्ही वर चढत होतो. अर्ध्या तासातच माथ्यावर पोहोचलो. अगदी सह्याद्रीतल्या ट्रेकसारखं वाटत होतं. आजूबाजूला झाडी होती आणि समुद्राचा कुठे काही पत्ताच नव्हता! थोडा वेळ पुढे गेल्यावर काहीशी मोकळी जागा दिसली. तिथं पोहोचलो आणि दूरवर अडकून पडलेला वारा भपकन अंगावर आला. आधीच घामाने वैतागलेला जीव त्या वाऱ्याने जरा शांत झाला. खरी मजा तर पुढे होती. अजून काही अंतर गेलो आणि समोर हजर होता पॅरेडाईझ बीच! तसा बीचला काही आकार-उकार नव्हता. एका बाजूने काही खडक उगीच लोकलच्या दारात लोंबकळणाऱ्या टवाळ पोरांसारखे समुद्रात झुकले होते. अविरत आदळणाऱ्या लाटांची त्यांना नशा चढली असावी. खडकांच्या पलीकडे थोडीफार वाळू दिसत होती. हा गोकर्ण मधला एक अत्यंत रमणीय किनारा. शहरापासून तसा लांब असल्याने इथे फार लोक येत नाहीत. त्यामुळे तशी शांतता असते. शिवाय खडकांचे विलोभनीय भूदृष्य! म्हणूनच पॅरेडाईझ बीच म्हणत असावेत कदाचित. अतिशय तीव्र उताराची वाट उतरत आम्ही बीचवर पोहोचलो. त्या ओबडधोबड खडकांवर जरा वेळ विसावलो. बीचवर काही तुरळक पर्यटक होते. आम्हा ट्रेकर्सकडे विस्मित नजरेने बघत होते. हे कोण लोक, हे असे टेकडीवरून कसे काय इथे आले, आणि भर उन्हाचं बीचवर बियर पीत लोळायचं सोडून हे ट्रेकिंग कसले करतायत, असेच काहीसे प्रश्न त्यांच्या मनात येत असावेत. आम्ही उगीच त्यांना टाटा करून पुढे निघलो.
स्मॉल हेल बीच
आणखी एक खडकाळ टप्पा पार केला आणि पोहोचलो स्मॉल हेल बीचवर. हा बीच म्हणजे नावालाच बीच होता. खडकाळ टेकडीच्या मध्यात एका खोबणीत लहानसा वाळूचा किनारा तयार झाला होता, एवढाच काय तो बीच! आजूबाजूला शिंपल्यांचा सडा पडला होता. समुद्राचा आवाज घुमल्यासारखा वाटत होता. इथे एका कोपऱ्यात काही विदेशी नागरिक एक तंबू उभारून राहिले होते. कॅम्पिंगची जागा असावी ती अशी. तिथून आम्ही पुढच्या खडकाळ टेकडीवर चढलो. हा म्हणजे एक नुसता उंचवटा होता. मात्र तिथले दृश्य अफाट होते. तीनही बाजूंनी समुद्राच्या लाटा आजूबाजूला आदळत होत्या. भन्नाट वारा सुटला होता. टेकडीवरची लहान-मोठी झाडं-झुडूपं वाऱ्याच्या तालावर नाचत होती. दुपारचं टळटळीत ऊन त्या वाऱ्याने निष्प्रभ करून टाकलं होतं. तिथल्या खडकावर उभं राहून एक मोठ्ठी आरोळी मारावी असं वाटत होतं. जणू त्या जागेतच काहीशी नशा होती. एवढ्यात एक समुद्रगरुडाची जोडी समोरून विहरताना दिसली. त्या वाऱ्यावर त्यांनी आपले विशाल पंख मोठ्या ऐटीत पसरले होते. कुठल्या हालचालीची आवश्यकताच नव्हती मुळी. गरम हवेच्या झोतावर स्वतःला मोठ्या आत्मविश्वासात झोकून देत ती जोडी जणू हा समुद्राचा भाग आपलीच जहागिरी आहे अशा आविर्भावात वावरत होती. थोडा वेळ घिरट्या मारून ते पक्षी एका माडाच्या शेंड्यावर विसावले. समुद्र्गरुड एकदा जोडीदार मिळाला की त्याच्याचसोबत आयुष्यभर राहतात. त्यांचे घरटेही एकाच ठिकाणी असते वर्षानुवर्षे. एक क्षण हेवा वाटला त्या पक्ष्यांचा. अशा स्वर्गीय किनाऱ्यावर घरकुल होते त्यांचे. अवघा रत्नाकर म्हणजे त्यांचे अंगण. आणि उंच उडायला फार कष्ट करायचीही गरज नाही. वारा असतोच मदतीला. जन्म-मृत्यूचे चक्र खरेच अस्तित्वात असेल तर एखाद्या जन्मी समुद्रगरुड व्हायला नक्कीच आवडेल. असो.
ती खडकाळ टेकडी उतरून आम्ही पोहोचलो हाफ मून बीचवर. हाही एक लहानसा अंतर्वक्र किनारा होता. मात्र दोन बाजूंनी लहानशा टेकड्या समुद्रात घुसल्या होत्या. त्यामुळे तिथले भूदृष्य अगदी थायलंड किंवा हवाईसारखे वाटत होते. किनाऱ्याला लागून माडांची दाट झाडी होती. त्यात लहान-मोठ्या बीच हट्स दिसत होत्या. गोकर्णच्या पर्यटकप्रिय भागात आल्याची ती खूण होती. दुपारची वेळ असल्याने गर्दी तशी तुरळकच होती. आम्ही एका हटमध्ये थांबलो. उन्हात चालून घशाला कोरड पडली होती. मग शीतपेयांच्या बाटल्या रिचवल्या. थोड्या विश्रांतीनंतर पुढे निघालो. आजच्या दिवसाचा अर्धा प्रवास संपला होता. मात्र अजून गोकर्णमधले दोन मुख्य किनारे बघायचे बाकी होते. शिवाय संध्याकाळी वेळेत स्टेशनवरही पोहोचायचे होते. आम्ही पावलांचा वेग वाढवला.
बीच आणि टेकडी हा क्रम आता नित्याचाच झाला होता. एक बीच संपला की खडकाळ टेकडी येणार आणि ती उतरली की पुन्हा बीच हे आता सगळ्यांना पाठ झाले होते. पण त्या टेकड्यांमुळेच ट्रेकच्या मार्गात वैविध्य येत होतं. उंचीवरून बीच आणि आजूबाजूच्या परिसराचा रम्य देखावा दिसत होता. चढ-उतार करण्यात दमछाक होत होती तो भाग वेगळा. पण ट्रेकिंग म्हटलं की दमछाक आलीच. कडले बीचवरची फोटोग्राफी संपवून आम्ही पुढे निघालो होतो. पुढच्या टेकडीवर बऱ्यापैकी झाडं दिसत होती. झाडांतून वाट काढत आम्ही थोड्या मोकळ्या पठारावर आलो. इथून पुढे वाट एका कड्यावरून जात होती. डाव्या हाताला फेसाळलेला समुद्र कड्यावर आदळत होता. आता वाराही भन्नाट सुटला होता. समुद्राच्या त्या धीरगंभीर आवाजात आणि बेभान वाऱ्यात उन्हाची तीव्रता कमी भासत होती. थोडे अंतर गेलो आणि समोर अचानक तो कडा तुटल्यासारखा भासू लागला. वाट चुकलो की काय? पण पुढे जाताच लक्षात आलं की वाट उजवीकडे वळून खाली बीचवर उतरत होती. आणि समोर अत्यंत रम्य असा निर्वाणा बीच पहुडलेला होता. आतापर्यंत या ट्रेकमध्ये पाहिलेले बीच काहीसे अंतर्वक्र, मधेच खडकाळ असे होते. हा मात्र एकसलग, एका रेषेत पसरलेला वाळूचा किनारा होता. मध्ये कसलाच व्यत्यय नसल्याने समुद्राच्या लाटा संथपणे किनाऱ्यावर येऊन विसावत होत्या. समुद्रात दूर कुठेतरी एक पांढरी रेघ निर्माण होत होती आणि किनाऱ्याशी समांतर राहण्याचे वचन पाळत एका लयीत वाळूशी एकरूप होत होती. मग मागून लगेच दुसरी रेघ. त्याच्यामागून तिसरी. लाटांचा हा खेळ इथेच बसून बघत रहावा असे वाटत होते. तापत्या उन्हातून खडकाळ टेकड्यांवर केलेली पायपीट इथे सार्थकी लागल्यासारखी वाटत होती. बीचवर अक्षरशः कुणीच नव्हते. आमच्याच ग्रुपमधले पुढे गेलेले काही लोक दूरवर चालताना दिसत होते. त्यांची वाळूत उमटलेली पावलं एवढाच काय तो मानवी अस्तित्वाचा पुरावा त्या किनाऱ्यावर दिसत होता. आम्ही मागे राहिलेले काही जण तिथे बसून फोटो काढू लागलो. किती काढू तितके कमीच. शेवटी लीडर ओरडायला लागल्यावर आम्ही कॅमेरा आवरता घेतला.
कड्यावरून खाली उतरून आता आम्ही बीचवरून चालू लागलो. इथल्या मऊसूत वाळूत पाय रुतत होते. बूट काढून चालावे तर गरम वाळूत पाय पोळत होते. शेवटी आम्ही ओल्या वाळूवरून अनवाणी चालू लागलो. इथली ओळी वाळू ऊबदार लागत होती. मधेच एखादी खट्याळ लाट पायांवर येत होती. ओल्या वाळूवर खेकड्यांची घरटी दिसत होती. त्यातून अधूनमधून खेकडबाळे डोकावत होती. आम्ही जवळ गेलो की झपकन आपल्या इवल्याशा बिळात शिरत होती. त्यांच्या वाकड्या चालीने वाळूवर सुरेख नक्षी उमटलेली दिसत होती. आम्ही एका लयीत चाललो होतो. जणू काही आमची चाल लाटांच्या लयीशी एकरूप झाली होती. निर्वाणा बीच एकूण ४-५ किमी लांबीचा होता. त्यातले ३ किमी आम्हाला चालायचे होते. उन्हामुळे आणि वाळूमुळे सगळ्यांचाच वेग मंदावला होता. जवळचे पाणी संपले होते. घशाला कोरड पडली होती. आधीच टेकड्या चढून दुखावलेले पाय आता वाळूत चालून अजूनच बोलायला लागले होते. आता मात्र कधी एकदा वाळू संपतेय असं झालं होतं.
बीचवरची फोटोग्राफी (सौजन्य - प्रणीत धुरी)
शेवटी एकदाचा गावाकडे जाणारा रस्ता दिसला. आम्ही बीचवरून बाहेर पडून डांबरी रस्त्यावर आलो. तिथून अर्धा-एक किलोमीटरवर मुख्य रस्ता लागला. इथून बसने आम्ही अघनाशिनी जेट्टी पर्यंत जाणार होतो. बसची वाट बघत आम्ही तिथे रस्त्यातच बसकण मारली. नेहमीच्या गप्पा-टप्पा सुरु झाल्या. तेवढ्यात बस आलीच. वीसेक मिनिटात जेट्टी वर पोहोचलो. अघनाशिनी नदी इथे समुद्राला मिळते. तिचं विस्तीर्ण पात्र पार करायला तिथे नावांची सोय होती. आम्ही सगळे दाटीवाटीने नावेत बसलो. नावाड्याने मोटर चालू केली आणि सरसर पाणी कापत आमची नाव पुढे सरकू लागली. मावळतीकडे झुकलेल्या सूर्याचा सोनेरी प्रकाश फारच मोहक वाटत होता. पाणी तसे संथ होते. दूरवर गरजणाऱ्या समुद्राच्या लाटा दिसत होत्या. नदीच्या काठाने बगळ्यांच्या माळा पाण्याला समांतर उडत जाताना दिसत होत्या. सगळे घरट्यांकडे परतत असावेत. घारी अजूनही शेवटचा चान्स म्हणून मासे शोधण्यात गुंतल्या होत्या. तेवढ्यात आमची नाव तडाडी जेट्टीवर लागली. हे कदाचित स्थानिक मच्छीमारांचे मोठे बंदर असावे. दिवस मावळायला आल्याने सगळ्यांचीच आवरा-आवर सुरु होती. त्या कोलाहलातून आम्ही लगबगीने बाहेर पडलो आणि बेलेकन बीचची वाट धरली.
नावेतून नदी पर करताना (सौजन्य - देवेंद्र देशमुख)
आता शरीर अगदीच थकले होते. अजून किती चालायचं असा प्रश्न हळूच कोणीतरी ट्रेकलीडरला विचारताना दिसत होतं. जणू काही त्या प्रश्नाचं वेगळं उत्तर मिळणार आहे! हा रस्ता काहीशा उंचीवरून नदीला समांतर जात होता. इथून नदीतल्या नावांची ये-जा दिसत होती. उजव्या हाताला लहानशी टेकडी होती. तिला वळसा घालून उजवीकडे वळून रस्ता बेलेकन बीचवर उतरत होता. तेवढ्यात समोर एक लहानसे मंदिर दिसले. मंदिरातून कानडी भक्तीसंगीताच्या सुरावटी ऐकू येत होत्या. काही स्थानिक बायका शुचिर्भूत होऊन मंदिरात दर्शनासाठी आल्या होत्या. खालून वाहणारी नदी, पलीकडचा गरजणारा समुद्र, मंद वाहणारा वारा, अस्ताला जाणाऱ्या सूर्याने केशरी-गुलाबी रंगात रंगवलेले आकाश, आणि मंदिरात लागलेले ते मधुर भक्तीसंगीत. नाटकातल्या कलाकारांनी एकत्र येऊन मंचावर एखादे दृश्य साकारावे आणि प्रत्येकाने आपल्या अदाकारीने ते दृश्य खुलवावे तसे निसर्गातले ते एकक त्या भूदृश्याला आपापला रंग बहाल करत होते. त्याक्षणी इतकं प्रसन्न वाटलं की शरीराचा थकवा जणू त्या रंगांमध्ये विरघळून गेला असावा. उजवीकडे वळण घेऊन खाली उतरलो तर आणखी एक अप्रतिम दृश्य स्वागताला हजर होते. दोन बाजूंना टेकड्या आणि मध्ये एक लहानसा अंतर्वक्र बीच दिसत होता. हाच होता वेलेकन बीच. याच बीचवर आमची कॅम्पसाईट होती. बीच तसा खडकाळच होता. दूरवर गरजणाऱ्या लाटा किनाऱ्यावर येईपर्यंत लिंबू-टिंबू होत होत्या. टेकड्यांच्या मागे लपलेला सहस्ररश्मी आपल्या सोनेरी किरणांनी साऱ्या भूदृष्याला वेगळाच उठाव देत होता. त्याच्या सोनेरी प्रकाशात लाटा चमकत होत्या. क्षीण आवाजात ऐकू येणारे मंदिरातले भक्तीसंगीत याही दृश्याची सोबत करत होते. तिथे थोडा वेळ फोटो काढून आम्ही पुढे निघालो.
वेलेकन बीच आणि रम्य सूर्यास्त
रस्त्याच्या कडेने काही हॉटेल्स दिसत होती. त्यांनी पक्क्या खोल्यांच्या बाजूने अगदी बीचवर काही झोपड्या उभारल्या होत्या. पर्यटनाची ही नवी कल्पना इथे चांगलाच जोम धरत होती. आमची कॅम्पसाईट सुद्धा अशीच एका छोटेखानी हॉटेलने उपलब्ध करून दिली होती. कॅम्पसाईटवर पोहोचल्याबरोबर चहा आणि भजी स्वागताला हजर होती. भूक तर लागलीच होती. दिवसभर उन्हात चालल्याने डोकं अगदी सुन्न झालं होतं. गरम चहाने जरा तरतरी आली. मग गप्पागोष्टी आणि कॅम्पिंग गेम्स सुरु झाले. यथावकाश जेवण आले. एव्हाना गार वारा सुटला होता. आकाशात विखुरलेले असंख्य तारे जणू एकमेकांशी प्रकाशाची स्पर्धा करत होते. आता मात्र झोप अनावर होत होती. उबदार स्लीपिंग बॅगेत स्वतःला गुर्फुटून घेत एकदाचे झोपी गेलो.
कुमटा गावातल्या कुमटा बीचवरून आम्ही ट्रेकला सुरुवात केली.
साडेअकरा वाजले होते. मध्यान्हीचं उन तळपत होतं. समुद्रावरचा वाराही निपचित पडला
होता. बाजूच्या कोळीवाड्यात खारवलेले मासे सुकायला ठेवले होते. त्याचा वास काहीसा
अस्वस्थ करत होता. आम्ही किनाऱ्याला समांतर रस्त्याने पुढे चाललो होतो. थोड्या
वेळाने एक चढण घेऊन वाट लहानशा टेकाडावर येऊन पोहोचली. इथून कुमटा गाव फारच सुंदर
दिसत होते. इथे काही बसायला बाकं आणि पार्किंगची जागा होती. कदाचित स्थानिक
लोकांची संध्याकाळी फिरायला येण्याची जागा असावी. आसपास थोडा कचरा आणि फुटलेल्या
बियरच्या बाटल्या दिसत होत्या. सुंदर जागेचं वाट्टोळं कसं करायचं हे भारतीय लोकांकडून
शिकावं. असो. तिथे थोडे फोटो काढून आम्ही पुढे निघालो.
वन्नळी बीच
ते टेकाड उतरून आम्ही आता वन्नळी बीचवर पोहोचलो. हा एक
लहानसा अंतर्वक्र किनारा. बाजूला थोडीफार कोळ्यांची वस्ती होती. दुपारची वेळ
असल्याने बहुतांश बोटी किनाऱ्यावरच नांगरलेल्या होत्या. एका ओळीत नांगरलेल्या बोटी
आणि संथ लयीत वाळूवर येणाऱ्या लाटा सुरेख वातावरणनिर्मिती करत होत्या. किनाऱ्यावर
फारच उन लागत होते म्हणून आम्ही बाजूच्या रस्त्याने चालू लागलो. इथे नारळांच्या
झाडांनी थोडी सावली धरली होती. खरेतर ही आमच्या दुपारच्या जेवणाची जागा होती.
जवळच्या हॉटेलमधला एक जण बिर्याणीचे पार्सल घेऊन येणार होता. त्याची वाट बघत आम्ही
एका सावलीच्या जागी थांबलो. फोटोग्राफर मंडळी आपल्या कामाला लागली. काही जण
ट्रेकिंगमधले खेळ खेळू लागले. उरलेले आम्ही काही लोक गप्पा मारत बसलो. आमचा मोठा
ग्रुप बघून कुठूनतरी एक कुल्फीवाला सायकलीची रिंग वाजवत तिथे आला. आधीच एवढं उन, त्यात समोर आलेली कुल्फी. सगळ्यांनी त्या कुल्फीवाल्यासमोर
एकच गर्दी केली. अक्षरशः पाच मिनिटात त्याच्याकडच्या सगळ्या कुल्फ्या संपल्या!
तेवढ्यात जेवणाची पार्सल्स घेऊन हॉटेलवाला माणूस आला. इतका भरपेट नाश्ता, त्यात उन्हामुळे सारखं प्यायलं जाणारं पाणी, आणि आता खाल्लेली कुल्फी,
यांमुळे कोणालाच भूक नव्हती. मग आम्ही पुढच्या बीचवर जेवायचा निर्णय घेतला आणि
पार्सल घेऊन पुढे निघालो.
लाटांमध्ये व्यत्यय आणणारे खडक
वन्नळी बीच संपला तशी वाट पुन्हा टेकाडावर चढू लागली. ही
टेकडी जरा उंच आणि खडकाळ होती. उन्हात तेवढं अंतर चढणंही अवघड वाटत होतं. एकदाचे
आम्ही वर पोहोचलो. सावलीच्या जागी जरा विसावलो. चढणीमुळे काही जण मागे पडले होते.
त्यांची वाट बघत सगळे जण थांबलो होतो. समुद्रावरच्या दमट हवेची झुळूक सुखावह वाटत
होती. छान डुलकी लागेल असे वाटत असताना अचानक एक जण ओरडला, डॉल्फिन!! खरंच समोर पाण्यात डॉल्फिन उड्या मारताना दिसत
होते. त्यांचे त्रिकोणी पंख आणि टोकेरी शेपट्या पाण्याबाहेर येताना दिसत होत्या.
बराच मोठा कळप असावा कदाचित. एकाने दुर्बीण आणली होती. त्यातून मग सगळे एक-एक करत
डॉल्फिन पाहू लागले. त्या जलचरांची ती क्रीडा फारच मोहक वाटत होती. तेवढ्यात मागे
पडलेले लोक तिथवर येऊन पोहोचले. एक-दोन जणांचे उन्हामुळे अगदीच अवसान गळाले होते.
ते मागे फिरायची भाषा करत होते. मग ग्रुप लीडरने त्यांना समजावून पुढे चालण्यास
प्रवृत्त केले. डॉल्फिन बघून त्यांचा मूडही जरा बरा झाला. एकदाचे सगळे जण पुढच्या
वाटेला लागलो.
टेकाडावर बसून डॉल्फिन दर्शन
टेकडीवरून खाली उतरणारी वाट थोडी अवघड होती. मोठाले खडक
विखुरलेले दिसत होते. त्यावरून माकडउड्या मारत आम्ही खाली उतरत होतो. पुढच्या
टप्प्यात तर वाट पाण्याच्या अगदी जवळून जात होती. तोल सांभाळत आम्ही त्या डेंजर
झोनमधून बाहेर आलो. आता सगळ्यांचा जठराग्नी पेटला होता. मग तिथेच एका सपाट खडकावर
सगळे जण बसलो आणि जेवणाची पार्सल्स उघडली. तासभर जेवण अधिक विश्रांती घेऊन आम्ही
पुढे निघालो. पुढचा बीच होता कडले बीच. हा बीच अगदीच शांत होता. आधीच्या बीचवर
दिसणारी कोळ्यांची वस्ती इथे दिसत नव्हती. शिवाय बोटीही दिसत नव्हत्या. लाटा
संथपणे वाळू भिजवत होत्या. मधेच काही खडक लाटांची लय बिघडवायचा प्रयत्न करत होते.
पण त्या लहानशा व्यत्ययाचा त्या दर्याला काहीएक फरक पडत नव्हता. उष्ण हवेच्या
झोतांवर घारी पंख पसरून घिरट्या घालत होत्या. शांतता बघून आम्ही तिथे ग्रुप फोटो
काढायला सुरुवात केली. यात बराच वेळ जातोय हे बघून ग्रुप लीडर घाई करू लागला. मग
सगळे हळू-हळू पुढे जायला निघाले.