विविधरंगी बस्तर - भाग ६ - कांगेर खोऱ्याचे अरण्यवैभव

तीरथगढ धबधब्यावरची ती रम्य पहाट अनुभवल्यानंतर कांगेर खोऱ्यात भटकायची उत्सुकता अजूनच ताणली गेली होती. आजवर पश्चिम घाटातली आणि हिमालयातली वने पाहिली होती. रणथंभोर आणि ताडोबाच्या निमित्ताने मध्य भारतातली पानझडी वनेदेखील अनुभवली होती. पण बस्तरमधले मिश्र पानझडी प्रकारचे वन कधी अनुभवले नव्हते. कांगेर खोरे हे ओदिशा आणि छत्तीसगढच्या सीमेलगत, जगदालपूरपासून २७ किमी अंतरावर स्थित आहे. साधारण ३०० ते ७०० मीटर उंचीच्या टेकड्यांनी वेढलेल्या या भागात विपुल वनसंपदा आहे. मध्य भारतातली शुष्क पानझडी वने आणि पूर्व भारतातली साग-साल वृक्षांनी नटलेली दमट पानझडी वने यांच्या मध्यभागात हे वन असल्याने येथे दोन्ही प्रकारची जैवविविधता आढळते. खरे तर भारतातल्या काही अस्पर्शित राहिलेल्या वनांपैकी हे एक वन मानले जाते. तीरथगढ धबधब्यासोबत इथल्या चुनखडकातल्या नैसर्गिक गुहा हे एक मुख्य आकर्षण आहे.      

भातशेतीच्या कडेने ट्रेकला सुरुवात 

हॉटेलवर आन्हिकं उरकून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो. बसने एका शेताजवळ आणून सोडलं आणि मग आमची वनभ्रमंती सुरु झाली. जीतने आम्हाला रस्ता दाखवायला स्थानिक तरुणांची एक टीमच तयार केली होती. आमच्या ग्रुपसोबत इतरही काही जण होते. साधारण ८-१० किमीचा रस्ता होता. भातशेतीच्या कडेकडेने आम्ही चालू लागलो. बाजूने एक ओहोळ गुणगुणत होता. वातावरण तसं स्वच्छ होतं. पावसाचे दिवस असल्याने थोडा दमटपणा हवेत होता. हळूहळू शेती मागे पडली आणि आम्ही रानात शिरलो. एव्हाना इवलासा वाटणारा तो ओहोळ आता एका खोडकर ओढ्यात रुपांतरीत झाला होता. हा ओढा वाट्टेल तसा खडकांना कापत नि धरणीला चिरत गर्द झाडीतून सुसाट वाहत चालला होता. आमची सारी भ्रमंती आता याच्याच साथीने होणार होती. वाट उताराची होती. दोन्ही बाजूंनी गच्च गवत वाढले होते. इथे जळवा नाहीत ना याची दोन-तीन वाटाड्यांकडून खातरजमा करून घेतली. मागच्या वेळचा तांबडी सुर्ला मधला अनुभव गाठीशी होताच. थोड्या वेळातच पाण्याचा आवाज वाढल्यासारखा वाटला. काही पावलं पुढे गेलो नी पाहतो तर काय, गर्द रानाच्या मधोमध एक निळा-सावळा डोह दिसत होता. आजूबाजूच्या खडकांवरून ओढ्याचे पाणी त्यात खिदळत उड्या घेत होते. काठाने वाढलेले प्रचंड वृक्ष आपल्या दाट पर्णसंभाराचे छत्र त्या डोहावर अलगद धरून उभे होते. काही वेगळीच गूढ शांतता तिथे भरून राहिली होती. ग्रुपमधले काही सेल्फी ट्रेकर्स तिथे नुसते फोटो काढण्यात आणि एकमेकांवर पाणी उडवण्यात मग्न झाले होते. त्यांच्या कलकलाटाचा वैताग येत होता. पण काय करणार, आपलेच दात नी आपलेच ओठ. मी त्यांच्याकडे दुर्लक्ष करून दोन क्षण माझ्या निसर्गाराधनेत मग्न झालो. काही फोटो काढून, आवाज करणाऱ्या लोकांपासून सुरक्षित अंतर ठेवून, पुढे निघालो. 

रानाच्या मध्यातला डोह 

गर्द वनराईतून खळाळत जाणारा ओढा 

रानातले एकलकोंडे वठलेले झाड 
पुढची वाट काहीशी सपाट होती. हाच ओढा वेगवेगळ्या रूपांत आम्हाला भेटत होता. कधी त्याच्या काठाने, कधी त्याला पार करत, कधी वर चढत, तर खाली उतरत आम्ही पुढे चाललो होतो. पावसाळ्याचे दिवस असल्याने रान अगदी तृप्त दिसत होतं. झाडांच्या पर्णसंभाराची गडद हिरवी छटा माथेरान-भीमाशंकरच्या सदाहरित वनांची आठवण करून देत होती. तर मधेच दिसणारी बांबूची बेटे पानझडी वनांचा आभास निर्माण करत होती. मधेच जमिनीचे काही सपाट तुकडे भाताच्या रोपांनी भरलेले दिसत होते. त्या रोपांची पोपटी छटा जणू तिथल्या भूदृश्याच्या रंगपेटीतला हरवलेला रंग भरून काढत होती. आता ओढ्याचे पात्र जरा मोठे झाल्यासारखे वाटत होते. एका ठिकाणी पाणी दहा-बारा फुटांवरून खाली कोसळत होते. जणू एक लहानसा धबधबाच! आतापर्यंत पाहिलेल्या धबधब्यांच्या तुलनेत हे कोसळणारे पाणी म्हणजे लिंबू-टिंबूच. मात्र तिथे दगडांची रचना मस्त बैठक मारून बसायला अगदी अनुकूल होती. आम्ही तिथेच बसकण मारली. ग्रुप फोटो वगैरे काढला, थोडीफार खादाडी केली, आणि मग पुढे निघालो. आता ट्रेक अंतिम टप्प्यात आला होता. अचानक तीव्र उतार सुरु झाला. म्हणता म्हणता आम्ही एका अरुंद घळीत येऊन पोहोचलो. ओढ्याचे पाणी इथून भरधाव वेगाने वाहत होते. त्याचा आवाज सर्वत्र घुमत होता. एका क्षणी वाटले, स्वार व्हावे या मुक्त प्रवाहावर, तो जिथे घेऊन जाईल तिथवर जावे. अगम्य प्रदेश बघावा. अनुभवांची पोतडी अजून श्रीमंत करावी. आणि मग परत नवा प्रवाह शोधावा! 

लिंबू-टिंबू धबधबा 

इतक्यात अंगावर दोन-चार थेंब पडल्यासारखे वाटले. वाटलं ओढ्याचंच पाणी आहे. पण तेवढ्यात वर ढगांची गर्दी झालेली दिसली. नशिबाने अजूनतरी आम्ही गुडघ्यांच्या वर कोरडे होतो. आणि आता ट्रेक जवळपास संपलाच असताना ओले होण्याची फारशी उत्सुकता नव्हती. शिवाय कॅमेरा सोबत होताच. मग लगबगीने त्या घळीतून वर आलो. काही पावलं चाललो काय नि एक ओळखीचा वाहनतळ दिसू लागला. हाच सकाळी पाहिलेला तीरथगढ धबधब्याच्या बाजूचा वाहनतळ! हात्तिच्या! एवढाच ट्रेक? दहा कसले जेमतेम पाच किमीसुद्धा अंतर भरले नसेल! मग जीत म्हणाला, लोकांना मुद्दाम वाढवून सांगावे लागते अंतर. त्यांना फेसबुकवर टाकायला सोपे जावे म्हणून! आता छत्तीसगढ मध्ये त्याला आमच्यासारखी सह्याद्रीतल्या गडवाटा तुडवणारी लोकं कुठे आलीत भेटायला! त्याच्या या तथाकथित दहा किमीच्या ट्रेकची खिल्ली उडवणारे आम्ही आणि सतरा वेळा घसरून पडलेले, कुठे-कुठे चिखल लागलाय ते पुनःपुन्हा बघणारे आणि कपाळावरचा घाम पुसणारे ग्रुपमधले इतर जण अशी आभासी वर्गवारी तिथे झाली होती. ट्रेक लहानसा असला तरी खोऱ्यातल्या रानाचे सुंदर दर्शन घडले होते. 

अरुंद घळीतला जोमात वाहणारा ओढा 

ओढ्याचे काहीसे शांत रूप 
हा बस्तरमधला शेवटचा दिवस होता. कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानात तशा बघण्यासारख्या अजून अनेक जागा आहेत. पाण्याच्या प्रवाहाने बनलेल्या नैसर्गिक गुहा त्यांपैकीच एक. मात्र पावसाळ्याच्या दिवसांत तिथे पाणी असल्याने जाणे शक्य नव्हते. त्याव्यतिरिक्त काही दुर्गम भागात जाणारे ट्रेक मार्गही आहेत. पण ही सहल तशी लहानच असल्याने हे सगळे काही बघता येणे शक्य नव्हते. पुढच्या वेळी जास्त वेळ काढून यायचे आणि रान यथेच्छ अनुभवायचे असे मनाशी ठरवून टाकले. जेवण करून आम्ही जगदालपूरला आलो. दशेराचे आणखी काही विधी चालू होते. ते बघण्यात संध्याकाळ घालवली. मग रात्रीचे जेवण उरकून रायपूरकडे रवाना झालो. बस्तरच्या या सहलीने आपल्या शेजारच्या राज्यातल्या एका विविधरंगी-विविधढंगी प्रदेशाचे दर्शन घडले घडवले होते. इथले धबधबे, समृद्ध वनसंपदा, आणि तितकेच समृद्ध लोकजीवन अनुभवायला मिळाले होते. अनुभवांच्या पोतडीत आणखी एक अत्तरकुपी दाखल झाली होती. तिच्या गंधतृप्तीने मुंबईच्या धकाधकीला सामोरं जायची नवी उर्जा मिळाली होती.  

समाप्त

विविधरंगी बस्तर - भाग ५ - तीरथगढ धबधब्यावरील रम्य पहाट

पहाटे साडेसहाला पक्ष्यांच्या किलबिलाटाने जाग आली. उठून बाहेर पाहतो तर काय, नजर जाईल तिथपर्यंत पसरलेली गर्द हिरवाई! रात्री इथे पोहोचलो तेव्हा अंधारात काहीच कळले नव्हते. आता दिवसाउजेडी लक्षात येत होते की आम्ही कांगेर घाटी राष्ट्रीय उद्यानाच्या आत आलो आहोत. नुकताच सूर्योदय झाला होता. कोवळ्या उन्हात गवतावरचे दवबिंदू चकाकत होते. वातावरण आल्हाददायक होते. तीरथगढ धबधबा तिथून अगदी हाकेच्या अंतरावर होता. जीत म्हणाला, चला सगळे धबधब्यावर जाऊ. आत्ता गर्दी अजिबात नसेल आणि मनसोक्त फोटो काढता येतील. काही जण अजून साखरझोपेत होते. ते उठायची वाट न पाहता आम्ही सात-आठ जण कॅमेरा घेऊन लगेचच जीतसोबत निघालो. पाचेक मिनिटांतच धबधब्याचा ध्रोंकार ऐकू येऊ लागला. त्या आवाजाने जणू वातावरणातच काहीशी उर्जा निर्माण केली होती. पर्यटन विभागाने धबधब्याच्या परिसराबाहेर एक तिकीट खिडकी आणि गेट उभारले होते. बाजूलाच वाहनतळ होता. आत्ता पहाटेच्या वेळी तिथे शुकशुकाट होता. आजूबाजूच्या लहान-सहान दुकानांतले लोक नुकतेच उठून धंद्याची तयारी करायला लागले होते. गेट उघडेच होते आणि तिकीट खिडकीवरही कोणीच नव्हते. आम्ही सरळ आत शिरलो. आता पाण्याचा आवाज चांगलाच तीव्र झाला होता. समोर खोल दरी असावी असे भासत होते. आम्ही धबधबा वरच्या अंगाने बघणार आहोत हे तेव्हा उमजले. 


आवेगात कोसळणारा तीरथगढ धबधबा 

थोडं पुढे गेलो आणि डाव्या अंगाने जोमात वाहत येणारा एक प्रवाह दिसला. त्याच्या पाण्याने आजूबाजूला बरीच डबकी तयार झाली होती. ती पार करून आम्ही दरीच्या जवळ गेलो. एकेका पावलागणिक धबधब्याचे टप्पे नजरेस पडू लागले. डावीकडून येणारा प्रवाह वेड्या आवेगात कड्यावरून खाली झेपावत होता. पांढऱ्या शुभ्र धुमाळांना कोवळ्या उन्हाने सोनेरी छटा बहाल केली होती. काही मिनिटांपुरती मिळालेली ती छटा वाहणारे पाणी मोठ्या दिमाखात मिरवत होते. पाण्याच्या वेगाने त्या उभ्या कड्याला पायऱ्या पडल्या होत्या. त्यांच्यावरून खेळत आणि उड्या मारत ते पाणी समोरच्या निमुळत्या दरीत कोसळत होते. तिथून पुढे वाटवळणे घेत तो प्रवाह दरीला चिरत पुढे जात होता. हीच कांगेर नदी आणि समोर दिसणारी दरी म्हणजे तिचे खोरे. दरीवर हलकेसे धुके पसरले होते. उगवत्या सूर्याची केशरी किरणे त्या धुक्याच्या दुलईला घालवण्याचा आटापिटा करीत होती. पण गजर बंद करून पाच मिनिटे अजून असं म्हणत झोपणाऱ्या आपल्या सगळ्यांसारखी ती दरीही जणू धुक्याची दुलई ओढून घेत होती. नदीच्या दोन्ही काठांनी गच्च रान भरले होते. धुक्याची दुलई धरून ठेवण्यात त्या वनराईचा हातखंडा होता. धबधबा वाहतच होता. दिवस असो वा रात्र, उन्हाळा असो वा हिवाळा, जोपर्यंत अंगात जोम आहे तोपर्यंत वाहायचे हा त्याचा स्थायीभाव. त्या निवांत भूदृश्यात खळखळणारा धबधबाच तेवढा गतिमान होता.

दरीवर पसरलेली धुक्याची दुलई 

मला तर किती फोटो काढू आणि किती नको असे झाले होते. थोडा वेळ कॅमेऱ्यासोबत खेळून मी बाजूच्या एका दगडावर विसावलो. समोरचे दृश्य नुसते निरखत राहिलो. उंचावरची जागा, वाहते पाणी, उगवता किंवा मावळता सूर्य, गर्द वनराई, या गोष्टींकडे मी साहजिकच आकर्षित होतो. मनाला एक वेगळीच शांतता मिळते. नेहमीच्या धकाधकीतला कोलाहल कुठेतरी गुडूप होतो. काहीशी वेगळीच उर्जा मिळाल्यासारखं वाटतं. माझी जणू ब्रह्मानंदी टाळी लागली होती. तेवढ्यात जीतने हाक मारली आणि माझी तंद्री भंगली. पावणेआठ वाजत आले होते. धबधबा अजून खालच्या बाजूने पहायचा बाकी होता. वरून इतके मोहक दिसलेले ते दृश्य आता खालच्या बाजूने कसे दिसेल याची उत्सुकता मनात दाटली होती. लगबगीने आम्ही तिथून निघालो. 


पायऱ्यांवरून दिसणारा धबधबा 

आम्ही आत शिरलो त्या गेटच्या उजव्या बाजूने एक वाट खाली उतरत होती. आम्ही तिथून खाली उतरू लागलो. उजव्या हाताला डोंगरकडा आणि डाव्या हाताला गर्द झाडीने व्यापलेली दरी अशी ती वाट होती. थोड्या अंतरातच पायऱ्या लागल्या. दरीत घुमणारा धबधब्याचा आवाज आता अजूनच तीव्र झाला होता. काही अंतरातच पायऱ्यांची ती वाट एका मोकळ्या बिंदूवर आली. इथून ती वाट यू-टर्न घेऊन आणखी खाली उतरत होती. त्या बिंदूवर येऊन पोहोचलो आणि धबधब्याचा तो प्रचंड ओघ नजरेच्या टप्प्यात आला. वरून दिसलेला पाण्याचा तो प्रवाह हाच का असा प्रश्न थोडा वेळ पडला. गुरुत्वाकर्षणाच्या बलाने त्या प्रवाहाचा आवेग कैक पटींनी वाढला होता. त्या चुनखडी खडकाला पडलेल्या पायऱ्या जणू त्या शुभ्र धुमाळांना खेळवत होत्या. तिथून काही फोटो काढून आम्ही अजून खाली उतरलो. 

आता आम्ही धबधब्याच्या बरोबर समोर आलो होतो. इथला खडकाळ परिसर अगदीच निसरडा झाला होता. लहान-मोठी पाण्याची डबकी तयार झाली होती. एक-दोन ठिकाणी दगडी पूल बांधून सरकारने पर्यटकांचे चालणे थोडे सोयीस्कर केले होते. आम्ही त्यावरून वाट काढून पुढे गेलो. इथे काही तुरळक गर्दी होती. काही लोक पाण्याच्या प्रवाहात बसून मस्त डुंबत होते. काही जण नुसतेच फोटो काढत होते. उजव्या हाताला एक लहानसा उंचवटा दिसत होता. धबधब्याचे पाणी त्याच्या दोन बाजूंनी वाहत होते. तिथून फोटो छान येईल म्हणून मी त्यावर चढलो. तशा वर जायला पायऱ्या वगैरे होत्या. पण सगळीच वाट फार निसरडी झाली होती. काळजीपूर्वक वर गेलो. वर एक लहानसे शिवमंदिर होते. त्याच लालसर दगडात बांधलेले ते मंदिर त्या भूदृश्यावर फारच उठून दिसत होते. समोरून वाहणारा धबधबा, आजूबाजूची गर्द वनराई, पाण्याच्या आवाजाने भारलेला आसमंत, अशा वातावरणात कोणाच्या मनात अध्यात्मिक भावना येणार नाहीत? मंदिर अगदी लहानसेच होते. नित्यपूजेत नव्हते तरी पिंडीवर दोन-चार फुले वाहिलेली दिसत होती. मंदिराच्या प्रांगणातून धबधब्याचा तो प्रवाह एखाद्या पांढऱ्या चादरीसारखा दिसत होता. दूरवर उजव्या कोपऱ्यात प्रवाहाची आणखी एक लपलेली धार दिसत होती. अगदी वरच्या टोकाला मुंगीएवढी माणसे खाली डोकावताना दिसत होती. हा तोच बिंदू जिथे काही वेळापूर्वी आम्ही बसलो होतो. थोडा वेळ तिथे फोटोग्राफी करून मी खाली उतरलो. 

शिवमंदिराच्या पार्श्वभूमीवर तीरथगढ धबधबा  

पाण्यात डुंबायचा मोह काही आवरत नव्हता. ग्रुपमधल्या न भिजणाऱ्या लोकांकडे कॅमेरा सुपूर्द करून मी आणखी ३-४ जणांसोबत सरळ एका दगडावर जाऊन बसलो. थंड पाणी अंगावरून गेले आणि एक सुखद शिरशिरी जाणवली. यासम अनुभूती जगात कोणती नसेल. सुरुवातीला कुडकुडणारे शरीर एकदा त्या तापमानाला सरावले की तिथून उठणे मुश्कील होऊन जाते. काही क्षण असाच पडून राहिलो. उगाच सोबतच्या लोकांसोबत मस्ती करायची बिलकुल इच्छा होत नव्हती. ते केवळ माझे आणि निसर्गाचे कनेक्शन होते! तेवढ्यात हातवारे करत बाहेर बोलावणारा जीत दिसला. पाण्याच्या आवाजापुढे त्याचा आवाज काय ऐकू येणार? रानातल्या ट्रेकला निघायचे होते म्हणून तो घाई करत होता. मी बापुडा काहीशा अनिच्छेनेच उठलो आणि सगळ्यांसोबत परत जायला निघालो. त्या दरीतल्या गर्द वनराईतून फिरण्याची ओढही मनाला लागली होती. नुकत्याच उघडलेल्या बाहेरच्या टपरीवर गरमागरम चहा घेऊन आम्ही हॉटेलवर परतलो. तीरथगढ धबधब्याने त्या दिवशीची सकाळ मनपटलावर कायमची कोरून ठेवली होती. 

पांढऱ्या भिंतीसम वाटणारा धबधबा 
       
        क्रमशः 

विविधरंगी बस्तर - भाग ४ - बस्तर दशेरा - एक अद्वितीय लोकोत्सव

अनवट निसर्गासोबत लोकजीवन नाही अनुभवले तर बस्तरची सहल अपूर्णच! त्यात दसऱ्याच्या सुमारास तुम्ही बस्तरमधे असाल तर दुधात साखर. बस्तरमधे साजरा केला जाणारा दसरा (बस्तर दशेरा) म्हणजे एक एकमेवाद्वितीय लोकोत्सव आहे. भारतात सर्वत्र दसऱ्याच्या उत्सवाला रामायणाचा संदर्भ आहे. रामाने रावणावर मिळवलेला विजय, सीतेची बंधनातून केलेली मुक्ती, आणि थोडक्यात चांगल्याचा वाईटावर झालेला विजय दसऱ्याच्या दिवशी साजरा केला जातो. बस्तर दशेरा मात्र संपूर्ण वेगळा आहे. रामाने वनवासातली दहा वर्षे दंडकारण्यात, म्हणजेच आजच्या बस्तरमधल्या रानात, व्यतित केली असली तरी इथल्या दसऱ्याच्या उत्सवाचा रामायणाशी काहीच संबंध नाही. या उत्सवाचे मूळ इथल्या इतिहासात आहे. या संपूर्ण प्रदेशावर काकतीय राजांचे राज्य होते. काकतीय राजे मूळचे तेलंगणातील वारंगळचे. दिल्लीच्या सुलतानशाहीने त्यांचा पाडाव केल्यानंतर तत्कालीन राजा आपल्या कुटुंबासोबत इ.स. १३२४ मध्ये दंडकारण्यात पळून आला. अत्यंत घनदाट आणि दुर्गम अरण्याने वेढलेल्या त्या प्रदेशात त्याने आपले राज्य स्थापले. सोबत त्याने आपली कुलदेवता आणली, तीच दांतेश्वरी. काकतेय राजांनी या दुर्गम प्रदेशावर १९४७ पर्यंत राज्य केले. या काळात राजांनी आणलेली वैदिक संस्कृती आणि स्थानिक आदिवासी संस्कृती यांचा सुंदर मिलाफ घडून आला. बस्तर दशेरा म्हणजे याचेच फलित होय.  

बस्तरच्या वेगवेगळ्या गावांतून जमलेले लोक आणि त्यांच्या ग्रामदेवता 

या उत्सवाची सुरुवात झाली १५ व्या शतकात, जेव्हा काकतीय राजे पुरुषोत्तम देव जगन्नाथपुरीहून रथावर आरूढ होण्याची दैवी परवानगी घेऊन बस्तरला आले. ती घटना साजरा करण्याची मग प्रथाच पडून गेली. अनेक स्थानिक परंपरा मग या उत्सवाशी जोडल्या गेल्या. हा उत्सव एकूण ७५ दिवस चालतो. श्रावण अमावास्येला, जिला हरियाली अमावस म्हणतात, या उत्सवाची सुरुवात होते. या दिवशी रथ बांधण्यासाठी रानातून लाकूड आणले जाते. या प्रथेला म्हणतात पटजत्रा. मग रथांचे बांधकाम, सजावट, वगैरे कामं वेगवेळ्या जमातींचे लोक करतात. उदाहरणार्थ, बेडा उमरगांव गावचे सुतार दुमजली रथ बांधतात तर कारंजी, केसरपाल, आणि सोनाबल गावचे लोक रथ ओढण्याचे दोरखंड वळतात. पोटनार गावचे मुंडा लोक लोकगीते गातात. या सगळ्या प्रथा गेली कित्येक शतके अखंडित सुरु आहेत. एकदा रथाचे बांधकाम झाले की नवरात्रीच्या सुमारास रथपरिक्रमा सुरु होते. पहिल्या दिवशी म्रिगन जमातीतल्या एका लहान मुलीला देवीस्वरूप मानून तिच्याकडून परिक्रमा सुरु  करण्याची आज्ञा घेतली जाते. या प्रथेला काछ्न गाडी म्हणतात. मग देवीची मूर्ती रथामध्ये बसवून रथ जातात. त्यादरम्यान आसपासच्या प्रदेशांतले असंख्य लोक त्यांच्या स्थानिक देवतांना घेऊन जगदालपूरला येतात. मुख्य रथांच्या आजूबाजूने आपल्या देवतांना फिरवतात. सारे वातावरण मांगल्याने आणि उत्साहाने भरलेले असते. प्रत्येक जमातीचा पारंपरिक पोशाख, त्यांच्या देवतांच्या विशिष्ट मूर्ती, त्यांचे लोकसंगीत या सगळ्याचे अनोखे प्रदर्शन या उत्सवात घडते.

पारंपरिक वाद्ये 

दुपारच्या पारंपरिक जेवणानंतर आम्ही आजूबाजूचे अजून दोन-तीन धबधबे बघितले आणि संध्याकाळी सातच्या सुमारास जगदालपूरला पोहोचलो. शहराच्या मध्यवर्ती भागात दांतेश्वरी मंदिर आहे. आम्ही आत जाऊन दर्शन घेऊन आलो. सगळा परिसर गर्दीने गजबजलेला होता. मंदिराच्या बाहेरील चौकात  एक फुलांच्या माळांनी सजवलेला भलामोठा दुमजली रथ उभा होता. रथावर शिरोभागी देवीची मूर्ती स्थानापन्न केली होती. रथाची रचना साधीच होती. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे रथाच्या रचनेत कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला नव्हता. केवळ लाकडाने बांधलेला तो प्रचंड रथ ओढण्याचे काम मारिया जमातीतले जवळपास ४०० लोक अत्यंत भक्तिभावाने करत होते. एकदा ओढायला सुरुवात केली की काही मीटर अंतर रथ पुढे जाई आणि थांबे. मग माणसे बदलली जात. मग पुन्हा हाईसा म्हणत ओढायला सुरुवात. त्याशिवाय आजूबाजूच्या गावांतून आलेले लोक त्यांच्या ग्रामदेवतांना लहान पालख्यांवर बसवून फिरवत होते. या पालख्या अत्यंत वेगात पळवल्या जातात. त्यांना पळवणारे कुठल्याशा धुंदीत असतात. या पालखीच्या खालून जाणे भाग्याचे मानले जाते. वेगात पाळणाऱ्या पालख्या, त्यांच्या खालून जायचा प्रयत्न करणे स्थानिक तरुण, त्या चढाओढीत होणारी पडापड, असे सगळेच दृश्य गमतीशीर होते. पालख्यांच्या मार्गापासून दूर राहण्याचा सल्ला आम्हाला जीतने आधीच दिला होता. पालखीचा दांडा फारच जोरात लागतो म्हणे. आम्ही बापुडे सुरक्षित अंतर ठेवून तो सारा सोहळा पाहत होतो आणि फोटो काढत होतो.

स्थानिक ग्रामदेवतांच्या पालख्या 
फुलांच्या माळांनी सजवलेला रथ 

दोनेक तास रथसोहळा पाहिल्यानंतर आम्ही जेवायला निघालो. उपहारगृह तसे शहराच्या मध्यवर्ती जागेपासून लांब होते. तिथे आमचे आरक्षण आधीच केलेले होते. यथावकाश जेवण उरकून आम्ही बाहेर पडलो. शहराच्या मध्यवर्ती भागाकडे आलो आणि बघतो तर काय, सगळीकडे वीज गेलेली, दुकाने बंद केलेली, आणि जणू सगळे शहर रस्त्यावर लोटलेले! हा प्रकार काय आहे हे कळेचना. इतक्यात समोरून मघाशी पाहिलेला तो महाकाय रथ अत्यंत वेगात पुढे येताना दिसला. सुमारे हजार-एक जण तो रथ अक्षरशः पळवत होते. आजूबाजूचे लोक चित्कारत त्यांना प्रोत्साहन देत होते. एवढ्या अंधारात कसे काय पळवत असतील देव जाणे! आम्ही सगळे स्तिमित होऊन तो प्रकार पाहत होतो. मग जीत म्हणाला, हा रथ चोरीला जातो आहे! त्याची कथा सुद्धा गमतीदार होती. जेव्हा हा उत्सव पहिल्यांदा साजरा केला गेला तेव्हा प्रत्येक जमातीला काही ना काही काम मिळाले. पण माडिया जमातीला काहीच काम मिळाले नाही. म्हणून त्यांनी एका रात्री देवीचा रथच चोरून नेला. अखेर खुद्द राजाला त्यांच्याकडे जाऊन रथ परत करण्याची विनंती करावी लागली. बऱ्याच वाटाघाटीनंतर राजाला त्या जमातीच्या मागण्या पूर्ण कराव्या लागल्या आणि मगच रथ मंदिरात परत आला. आता ही घटनाही परंपरेचा एक भाग बनली आहे. रथ चोरीला जाताना मुद्दामहून सगळ्या शहरातले दिवे घालवले जातात. सगळे व्यवसाय-धंदे बंद केले जातात. सारे शहर रथ चोरीला जाताना बघते आणि ‘चोरांना’ प्रोत्साहनही देते! 

अंधारात रथ ओढणारे लोक 

उत्सवाची सांगता ‘मुरीया दरबार’ ने होते. यात राजा सगळ्या जमातींच्या नेत्यांना भेटतो, त्यांच्या मागण्या ऐकतो आणि काही पूर्णही करतो. आजही हा परंपरागत दरबार भरतो. राजाच्या जागी छत्तीसगढचा मुख्यमंत्री लोकांच्या मागण्यांचे निराकरण करतो. परंपरेला मिळालेली ही आधुनिकतेची जोड प्रशंसनीयच म्हणायला हवी. 

थोडा वेळ शहरात घालवून आम्ही मुक्कामाच्या जागेकडे निघालो. आमचा मुक्काम तीरथगढ धबधब्याच्या जवळील सरकारी हॉटेलवर होता. आता झोप अनावर होत होती. हॉटेलवर पोहोचताच निद्राधीन झालो. 

क्रमशः