कुद्रेमुखची रानवाट - भाग ३ - शिखर आरोहण

अथांग हिरवळीने नटलेल्या त्या राजस टेकड्या न्याहाळत आम्ही कुद्रेमुख शिखराकडे चाललो होतो. पाऊस थांबला होता. पण त्या उंचीवर हवेनेच जणू पाण्याच्या सूक्ष्म थेंबांना तोलून धरले होते. वाऱ्यासोबत ते थेंब अंगावर आदळत होते, नाकातोंडात जात होते. खरंच कधी ढगांमधून विहरायला मिळालं तर असाच काहीसा अनुभव येईल कदाचित. एक तीव्र चढणीचा टप्पा पार करून वाट आता थोडी सपाट झाली. समोर दरीच्या काठाने बिलगून वाढलेलं एक झाड दिसत होतं. त्या गवताळ डोंगरमाथ्यावर तेवढं एकच झाड दिमाखात उभं होतं. जणू साऱ्या प्रदेशाची राखण करायची जबाबदारी त्या एकट्या झाडाला कुद्रेमुखच्या शिखराने दिली होती. या जागेस ओंतीमारा असे म्हणतात. याचा शब्दशः अर्थ होतो एकटे झाड. माथेरानच्या One-tree hill सारखीच ही जागा वाटत होती. झाडाच्या शेजारी कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानातल्या प्राणीसंपदेविषयी माहिती देणारा एक फलक लावला होता. तिथे आम्ही जरा वेळ विसावलो. थोडीफार खादाडी केली. फोटो-बिटो काढले आणि पुढे निघालो. 

ओंतीमाराकडे जाणारी वाट 

ओंतीमारा 

आता पुन्हा एकदा चढण सुरु झाली. आता शिखराच्या मुख्य धारेवर आम्ही येऊन पोहोचलो होतो. चढाईचा मार्ग मागच्या बाजूने होता. त्यामुळे खालून दिसणारा (किंबहुना दिसू शकणारा) शिखराचा तो विशिष्ट आकार इथून नजरेस पडत नव्हता. समोर दिसत होती ती निव्वळ डोंगराच्या अंगाने वर-वर चढत जाणारी वाट. डोंगराच्या बेचक्यांमध्ये बांबू फोफावला होता. अधे-मधे रानफुलं दिसत होती. सोबतीला जळवा होत्याच. जसजसे वर चढत होतो तसा वाऱ्याचा वेग वाढत होता. एका मोठाल्या खडकापाशी ती वाट येऊन अडखळली. इथून डाव्या हाताने खडी चढण सुरु होत होती. घोंघावणारा वारा आता तोललेल्या थेंबांना बाणांसदृश अंगावर फेकून मारत होता. त्याच्याकडे दुर्लक्ष करत आम्ही ती खडी चढण चढू लागलो. चांगलीच धाप लागत होती. त्यात सगळी वाट प्रचंड निसरडी झाली होती. टोचणाऱ्या पावसापेक्षा आता पुढे टाकलेलं पाउल एका जागी स्थिर राहतंय की नाही याची काळजी जास्त होती. आधीच एवढं अंतर चालून थकलेले पाय आता चढताना बोलू लागले होते. अजून ३ किमी अंतर बाकी होतं. ट्रेक लीडर सगळ्यांना प्रोत्साहित करत होता. पण कुद्रेमुख आता खरा इंगा दाखवत होतं. ग्रुपमधल्या दोघांनी तिथूनच माघार घेतली. ओंतीमारापाशी जाऊन थांबतो असं म्हणून ते तिथूनच मागे फिरले. आम्ही मात्र उरलीसुरली उमेद एकवटून वर चढू लागलो. म्हणता म्हणता ती खडी चढण संपली. शेवटचा गडी वर पोहोचला आणि आम्ही सगळ्यांनीच एकमेकांचं अभिनंदन केलं. शिखर अजून अर्धा किलोमीटर लांब होतं. पण वाट मात्र सपाट होती. 

शिखरावर चढत जाणारी वाट 

हळूहळू आम्ही शिखरापर्यंत पोहोचलो. कुद्रेमुखच्या सर्वोच्च जागेचा फलक तिथे लावलेला होता. या जागेवरून आजूबाजूला केवळ ढग दिसत होते. संपूर्ण व्हाईट-आउट! इथून कुद्रेमुखच्या गोलाकार टेकड्यांचे सुरेख दृश्य दिसते म्हणे. मात्र आज ढगांनी आमचे दृश्य अडवले होते. भर पावसाळ्यात अजून काय नशिबात असणार म्हणा. वाऱ्याच्या अंगातले थेंबांचे बाण आता मशीनगनमध्ये अपग्रेड झाले होते. शिखरावर पोहोचल्याचा आनंद होताच, मात्र तो तिथे थांबून साजरा करणं अशक्य होत होतं. आम्ही जमतील तसे फोटो काढले आणि खाली उतरायला सुरुवात केली. जिथून तीव्र उतार सुरु होत होता तिथे थांबलो आणि जेवणाच्या पिशव्या उघडल्या. सपाटून भूक लागली होती. कुठे बसावं तर आजूबाजूला चिखलाने माखलेला नुसता बोडका कातळ होता. मग उभ्या-उभ्याच खायला सुरुवात केली. त्या थंड ओल्या हवेत उभ्या-उभ्या लेमन राईसचे बकाणे भरण्यात काही वेगळीच मजा होती. 

शिखरावर 

जेवण उरकून उतरायला सुरुवात केली. चढताना दम खाणारी ती चढण आता उतरणे एक मोठे आव्हान होते. पावसाने वाट निसरडी झाली होती. त्यात डोंगरावरून खाली येणारे पाणी त्याच वाटेचा आधार घेऊन खाली वाहत होते. आम्ही कधी घसरत, कधी सरपटत, तर कधी बेडूकउड्या मारत खाली येत होतो. दोन हात आणि दोन पाय यांवर कसेही करून स्वतःला सावरून धरायचे एवढे एकच उद्दिष्ट होते समोर. तासाभराच्या अथक परिश्रमानंतर एकदाचे त्या मोठ्या खडकापाशी येऊन पोहोचलो. ती वाट चढल्यावर झाला नसेल एवढा आनंद उतरल्यावर झाला! आता पुढची वाट तशी सोपीच होती. झपाझप ओंतीमाराजवळ येऊन पोहोचलो. क्षणभर विश्रांती घेऊन लगेच पुढे चालू लागलो. पाऊस थांबला होता. वाराही मंद वाहत होता. तितक्यात समोरच्या टेकडीमागून एक भलामोठा ढग पुढे येताना दृष्टीस पडला. आता पुन्हा पाऊस येणार की काय अशा विचारात असतानाच पाण्याचे टपोरे थेंब अंगावर पडू लागले. म्हणता म्हणता पावसाने रौद्र रूप धरण केले. जणू ढगफुटीच! एवढी वेगवेगळी पावसाची रूपं बघितली या ट्रेकमध्ये. आता हे एकच रुपडं राहिलं होतं जसं काही! आज निसर्गापुढे स्वतःला ओवाळून टाकलं आहे. होऊन जाऊ द्या! 

टेकडीमागून रोरावत पुढे येणारा ढग 

भारतीय उपखंडातला मान्सूनचा पाऊस म्हणजे एक रंगकर्मीच! जिथे जाईल तिथे वेगळं रुपडं घेऊन येईल. किनारपट्टीवर कोसळताना वादळी वारे सोबतीला घेऊन येईल. एकदा बरसू लागला की सात-आठ दिवस सतत बरसेल. मग अनिश्चित काळासाठी सुट्टीवर जाईल. दमट उष्म्याने जीव अगदी नकोसा करून टाकेल. मग सणावारांचे मुहूर्त गाठून धो-धो बरसेल. अगदी नवरात्रीचा प्रसाद घेतल्याशिवाय जागचा हलणार नाही. घाटातला पाऊस म्हणजे एक दीर्घकाव्य. तिथल्या डोंगररांगांशी त्याची खास दोस्ती. तिथे एकदा आवर्तला की चार-एक महिन्यांसाठी बाळंतपणाला माहेरी आलेल्या मुलीसारखा सुस्तावेल. कधी नुसतेच ढग, कधी भुरभूर, कधी रिमझिम, तर कधी मुसळधार अशा वेगवेगळ्या सर्गांमध्ये, छंदांमध्ये मनाला येईल तसा बरसत राहील. मग रानफुलं प्रसवून बागडत निघून जाईल. घाटमाथ्यासोबत मात्र त्याचा relationship status कायमच It’s complicated! असा. एक तर प्रदीर्घ काळ वाट बघायला लावील. किनारपट्टीवर एखाद-दोन पूर येऊन जातील पण इथे मात्र दोन-चार सरींच्या पुढे पर्जन्यमापकाचा आकडा जाणार नाही. मग एखाद्या उनाड दुपारी अधाशासारखा कोसळेल, सारं वातावरण गारेगार करेल, पाऊस आला असा खोटा दिलासा देईल, आणि पुन्हा दडी मारून बसेल. पावसा-पाण्याची तऱ्हाच न्यारी!

शोला प्रदेश 

न संपणारी रानवाट 

कुद्रेमुखच्या घाटातला तो पाउस कोणत्या सर्गात कोसळत होता देव जाणे! परतीची वाट अजूनच बिकट होत होती. आता कधी एकदा खाली पोहोचतोय असं वाटत होतं.

क्रमशः 

कुद्रेमुखची रानवाट - भाग २ - शोला परिसंस्थेत प्रवेश

मुलोडी गावात चहा-नाश्ता उरकून आम्ही ट्रेकसाठी सज्ज झालो. पाऊस अधून-मधून कोसळत होता. वातावरण कुंद होते. गार वाऱ्यावर हुडहुडी भरत होती. फार जास्त पाऊस लागू नये अशी अपेक्षा करत आम्ही हर हर महादेव म्हणून ट्रेकला सुरुवात केली. गावातून बाहेर पडताच मंद चढण सुरु झाली. आजूबाजूच्या डोंगरांवर नुसती खुरटी झुडूपं आणि गवत दिसत होते. उंच आणि घनदाट झाडं कधीच मागे पडली होती. आपण बऱ्यापैकी उंचीवर असल्याचं जाणवत होतं. तेवढ्यात वन विभागाची चेक पोस्ट दिसली. आम्ही पहाटे दिलेल्या ओळखपत्राच्या प्रती इथल्या अधिकाऱ्यापर्यंत पोहोचल्या होत्या. तो प्रत्येकाचं नाव घेऊन तीच वक्ती आहे की नाही हे तपासून बघत होता. शिवाय प्रत्येकाच्या बॅगेत किती प्लास्टिकच्या पिशव्या आहेत हेही तपासणं चाललं होतं. माणशी केवळ एकच पिशवी वर न्यायची परवानगी होती. त्यामुळे दुपारच्या जेवणाचं पाकीट वगळता इतर सगळं समान इथे काढून ठेवावं लागलं. तसा उपक्रम स्तुत्यच होता. कुद्रेमुखचा परिसर अति-संवेदनशील असल्याने वन विभाग इथल्या पर्यावरणाच्या बाबतीत बराच दक्ष होता. महाराष्ट्रातल्या वन विभागाला कधी जाग येणार देव जाणे. असो. सगळी तपासणी पूर्ण होतेय तेवढ्यात पावसाची एक जोरदार सर आली. वाऱ्याने थंडी वाजू लागली. आता सगळा ट्रेक या अशाच वातावरणात करायचा आहे याची मनोमन तयारी करत आम्ही पुढे निघालो. 

वाटेतले रम्य दृश्य 

वन विभागाची चेक पोस्ट 


दरीत फोफावलेलं गच्च रान आणि माथ्यावरची खुरटी झुडपे 

एका डोंगरधारेच्या अंगाने वर-खाली होत ती वाट हळूहळू कुद्रेमुखच्या शिखराच्या दिशेने जात होती. काही अंतर मोकळ्या गवताळ भागातून रेंगाळत ती वाट मध्येच डोंगराच्या बेचक्यात शिरत होती. डोंगराच्या बेचक्यांमध्ये घनदाट रान फोफावलं होतं. त्या रानात प्रवेश केला की वेगळ्याच विश्वात आल्यासारखं वाटे. भर दिवसा दाटून आलेला अंधार, पानांतून सळसळत वाहणारा वारा, वरून पावसाचे थेंब, आणि ते उबदार दमट वातावरण थोडा वेळ हवंहवंसं वाटे. मग त्या बेचक्यातून धोधो वाहणारा ओढा आडवा येई. आपल्या घुमणाऱ्या ध्रोन्कारात तो पावसाच्या आवाजावरही मात करे. त्या तांबुसराड पाण्यात झोकून द्यावंसं वाटे. मग अचानक ते दाटलेलं रान कोंदट आणि भयाण वाटू लागे. ओढा पार करून थोडं वर चढलं की वाट रानातून बाहेर येई. मग ती पुन्हा डोंगरधारेच्या अंगाने खुरट्या गवतातून सरपटत पुढे जाताना दिसे. त्यावरून तोल सावरत चालू लागताच वाऱ्यासोबत पाऊस सपासप अंगावर चालून येई. मग पुन्हा कधी बेचक्यातलं रान येतंय याची वाट बघत जीव पुढे चालू लागे. 

बेचक्यातल्या कोंदट रानातून वाहणारा ओढा  

रमतगमत, पावसाचा आनंद घेत आम्ही पुढे चाललो होतो. एक गोष्ट मात्र या आनंदात सतत व्यत्यय आणत होती. ती म्हणजे जळवा!! पश्चिम घाट म्हटलं म्हणजे जळवा आल्याच. त्यात कुद्रेमुखचं हे रान म्हणजे जळवांचं जणू माहेरच. इथे प्रत्येक पावलावर कुठेतरी जळू दिसत होती. आम्ही दर दहा पावलांवर अंगावर कुठे जळू चढलिये का ते बघत होतो. कोणाच्या अंगावर चढलेली दिसली तर लगेच सावध करत होतो. ट्रेक लीडर आमच्याकडे बघून हसत होता. म्हणत होता, पिऊ दे की थोडंफार रक्त. काही होत नाही. त्याचं म्हणणं खरंच होतं म्हणा. जळवांच्या चावण्याने कुठले रोग होत असल्याचे ऐकीवात नाही. शिवाय त्या दंशाने कसली विषबाधाही होत नाही. थोडंफार रक्त वाहतं एवढंच. तासभर जळू-दक्षता अभियान राबवल्यानंतर आम्ही शेवटी हार मानली. काय व्हायचंय ते होऊदेत. एकदा स्वतःला निसर्गाच्या स्वाधीन केलं की त्याने देऊ केलेल्या सगळ्या गोष्टी आहेत तशा स्वीकारायच्या.  

वाटेतला फलक आणि समोर ढगांच्या दुलईत दडलेले कुद्रेमुख शिखर 

वर-खाली होणारी ती वाट आता एका सपाट भागावर येऊन पोहोचली. इथे कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाचा एक फलक लावलेला होता. समोर ढगांनी व्यापलेला एक प्रचंड डोंगर दिसत होता. हेच कुद्रेमुख शिखर. त्या फलकावरच्या चित्रानुसार इथून कुद्रेमुख शिखराचा संपूर्ण व्यू दिसतो. मात्र आज ढगांच्या साम्राज्यामुळे तसा व्यू काही आमच्या नशिबात नव्हता. तिथे थोडे फोटो काढून आम्ही पुढे निघालो. पाऊस जरा ओसरला होता. वातावरण प्रसन्न वाटत होतं. थोडं अंतर पुढे जाताच तीव्र चढण सुरु झाली. वीसेक मिनिटांच्या चढाईनंतर एका उंच टेकडीवर वाट येऊन थबकली. इथून साऱ्या कुद्रेमुख राष्ट्रीय उद्यानाचा रम्य परिसर दिसत होता. हिरवा मखमली शालू पांघरलेले डोंगर जणू ढगांशी हवा-पाण्याच्या गप्पा मारत होते. नजर जाईल तिथपर्यंत हिरव्यागार गोलाकार टेकड्या दिसत होत्या. महाराष्ट्रातला सह्याद्री आणि इथला सह्याद्री यांत हाच फरक आहे. अग्निजन्य खडकामुळे महाराष्ट्रातला सह्याद्री रांगडा वाटतो. बेलाग ताशीव कडे, माथ्यावरची बोडकी पठारे आणि पायथ्याशी बिलगलेली अरण्ये असे महाराष्ट्रातले त्याचे रूप. इथे कर्नाटकात मात्र तो काळासावळा खडक कुठे दिसत नाही. गोल-गोल टेकड्या एकमेकांच्या अंगावर चढत आभाळाला स्पर्श करू पाहतात. त्यांच्या उताराने गच्च रान पसरत जातं. मग एका उंचीनंतर मोठे वृक्ष तग धरू शकत नाहीत तिथपासून खुरट्या झुडपांचा आणि गवताचा प्रदेश सुरु होतो. हाच तो नानाविध प्रदेशनिष्ठ प्रजातींना आसरा देणारा शोला प्रदेश. भारतातली एक अद्वितीय परिसंस्था त्या ठिकाणी मी अनुभवत होतो. 

हिरवा शालू नेसलेले डोंगर 

शोला परिसंस्था 

अजून जवळपास अर्धी चढाई बाकी होती. आम्ही पावलांचा वेग वाढवला.

क्रमश: