मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग ८ - ग्वाल्हेर - सास बहु मंदिर आणि इतर वास्तू

गोपाचाल पर्वत म्हणजे ग्वाल्हेर शहराच्या मधोमध स्थित असलेला एक खडकाळ डोंगर. ग्वाल्हेरचा सुप्रसिद्ध किल्ला, त्यातले प्रेक्षणीय महाल, काही मंदिरे, आणि जैन शिल्पे याच डोंगरावर आहेत. मन मंदिर महाल आणि किल्ल्याचा मुख्य दरवाजा पाहून आम्ही आलो सास-बहु मंदिराकडे. नावावरून वाटेल हे मंदिर सासू-सुनेचे आहे की काय. पण प्रत्यक्षात हे नाव म्हणजे सहस्रबाहूचा अपभ्रंश आहे. मंदिराचा बराचसा भाग नष्ट झालेला आहे. शिल्लक अवशेष म्हणजे मंडपाचा भाग असावा. बाहेरून इतक्या सुबक दिसणाऱ्या मंदिराची आतली कलाकुसर किती विलक्षण असेल या उत्सुकतेने आम्ही आत शिरलो. मंदिराची शैली थोडीफार खजुराहोच्या शैलीशी मिळती-जुळती होती. खांबांवरचे नाजूक कोरीवकाम, मुखमंडपाची द्विस्तरीय रचना, आणि गोलाकार छत अगदीच अचंबित करणरे होते. कलत्या उन्हाची एक तिरीप कुठल्याशा झरोक्यातून आत रेंगाळत होती. पिवळ्या वालुकाश्मावरून परावर्तित झाल्याने तिथे छाया-प्रकाशाचा एक अद्भुत परिणाम घडून येत होता. मला तर कुठल्याशा वेगळ्याच जगात आल्यासारखे वाटत होते. गाभाऱ्याच्या द्वारावर अत्यंत नाजूक कोरीवकाम केलेले होते. तिथे बरेच फोटो काढले आणि बाहेर पडलो. शेजारीच दुसरे एक लहान मंदिर होते. हे मंदिर म्हणजे एका मोठ्या मंदिराचा मुखमंडप असावा. ग्वाल्हेर शहराच्या पार्श्वभूमीवर हे लहानसे सुबक मंदिर उठून दिसत होते. सूर्यास्ताची वेळ जवळ आली होती. त्यामुळे तिथे फार वेळ न घालवता आम्ही पुढे निघालो. 

सहस्रबाहू मंदिर 

सहस्रबाहू मंदिराच्या शेजारील लहान मंदिर 

मंदिरात रेंगाळणारी उन्हाची तिरीप 

तिथून पुढे आम्ही पोहोचलो ‘तेली का मंदिर’ या मंदिराकडे. हे मंदिर म्हणजे असाधारण वास्तुकलेचा नमुना आहे. उत्तर भारतीय नागरी आणि दक्षिण भारतीय द्राविडी वास्तुकलेचे मिश्रण यात मंदिरात दिसते. मंदिराची रचना इतर मंदिरांसारखी चौरसाकृती नसून आयताकृती आहे. मंदिराचे शिखर जवळपास ८० फूट उंच असून एखाद्या दाक्षिणात्य मंदिराच्या गोपुरासमान भासते. मंदिराचा बराचसा भाग ढासळलेला आहे. काही इतिहासकारांच्या मते इसवी सनाच्या आठव्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर म्हणजे गुप्तोत्तर कालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. आम्ही पोहोचलो तेव्हा मंदिर बंद व्हायची वेळ आली होती. दहा मिनिटात बाहेर येतो असे म्हणून आम्ही आत शिरलो. एकसलग उभट रचना असलेले हे मंदिर उत्तर भारतातल्या इतर मंदिरांपेक्षा निश्चितच वेगेळे भासत होते. मुखमंडप, अर्धमंडप गाभारा, असे कोणतेच भाग ओळखू येत नव्हते. भिंतींवर निव्वळ भौमितिक आकार आणि पानाफुलांची नक्षी होती. प्रवेशद्वाराजवळ दोन बाजूंना काही मूर्ती होत्या, पण त्यासुद्धा गंगा-जमुना किंवा जय-विजय यांच्या वाटत नव्हत्या. मंदिर नियमित पूजेत नसल्याने आतमध्ये फारशी स्वच्छता नव्हती. मग आम्ही बाहेरूनच एक प्रदक्षिणा घातली. कलत्या उन्हाच्या सोनेरी प्रकाशात मंदिराचे सौंदर्य अजूनच खुलून दिसत होते. थोडेफार फोटो काढून आम्ही तिथून बाहेर पडलो. 

तेली का मंदिर चा उत्तुंग कळस 
तेली का मंदिर ची असाधारण उभट रचना 

आशिषला किल्ल्यावरची एक खास जागा माहित होती जिथून सुंदर सूर्यास्त पाहता येतो. आम्ही लगेचच तिथे निघालो. ही जागा म्हणजे किल्याचा एक पडका बुरुज होता. आसपास फारसं कुणी नव्हतं. समोर अथांग पसरलेलं शहर दिसत होतं. बुरजाच्या दोन्ही बाजूंनी किल्ल्याची तटबंदी दिसत होती. इथून डोंगरकडा इतका तीव्र होता की या बाजूने कोणी चढाई करणं निव्वळ अशक्य. एका बाजूने सहस्ररश्मी लालबुंद होऊन डोंगराआड चालला होता. सारा आसमंत त्याच्या केशरी प्रभेने उजळला होता. नेमकी कॅमेऱ्याची बॅटरी संपलेली! मग फोनच्या कॅमेऱ्यावरच थोडेफार फोटो काढले. तसं म्हणायला सूर्यास्त ही तर रोजचीच बाब. पण तरीही प्रत्येक सूर्यास्त वेगळा असतो. सूर्याची छटा वेगळी असते. ढगांचे आकार वेगळे असतात. आकाशाचा रंग वेगळा असतो. त्यात विशिष्ट पार्श्वभूमीची सोबत असली की त्या सूर्यास्ताला एक वेगळेच रुपडे मिळते. मग कच्छच्या रणातला सूर्यास्त वेगळा नि कन्याकुमारीच्या भूशिरावरचा सूर्यास्त वेगळा. दिवस आणि रात्रीतले हे स्थित्यंतर जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातून पहावे. त्याला तिथल्या भूगोलाचे आणि संकृतीचे अलंकार जडलेले असतात. ग्वाल्हेरच्या किल्ल्यावरचा तो सूर्यास्तही असाच तिथल्या मातीत मळलेला होता. तिथल्या जाज्वल्य इतिहासाची गाथा मोठ्या आस्थेने सांगत होता. आम्ही शांतपणे आसमंताचे हळूहळू बदलत जाणारे रंग न्याहाळत बसलो होतो. आता हवेतला गारठा वाढू लागला होता. पूर्ण अंधार व्हायच्या आत शहर गाठावे म्हणून आम्ही तिथून निघालो. 

डोंगराआड जाणारा सूर्य 

अथांग पसरलेले ग्वाल्हेर शहर 

अजानबाहू तीर्थंकर 
आमचा पुढचा थांबा होता सिद्धाचल गुंफा. उर्वाई गेटच्या रस्त्यावर डोंगरकड्यात कोरलेल्या जैन लेण्यांचा हा एक समूह आहे. सातव्या ते पंधराव्या शतकांदरम्यान घडवल्या गेलेल्या या लेण्या म्हणजे २४ जैन तीर्थंकरांच्या मूर्ती आहेत. काही मूर्ती पद्मासनातल्या तर काही उभ्या आहेत. लेण्यांचा परिसर बराच मोठा होता. सूर्यास्त होऊन गेल्याने बहुतांश गुंफा बंद झालेल्या होत्या. सुरक्षारक्षकाला विनंती करून मी समोरच्याच मुख्य लेण्यांकडे निघालो. संधीप्रकाशात तीर्थंकरांच्या भावमुद्रा अजूनच गंभीर भासत होत्या. बऱ्याचशा मूर्तींचे विद्रुपीकरण करण्यात आले होते. मुघल सत्तेचा परिपाक, दुसरे काय! चेहरा विद्रूप झालेला असला तरी ते अनावृत्त अजानबाहू शरीर शांततेचा संदेश देत तसेच अनासक्त उभे होते. अशाच खडकाळ लेण्यांतून या तीर्थंकरांच्या अनुयायांनी त्यांचा संदेश देशभर नेला. कितीही वार झाले तरी नष्ट न होण्याचे सामर्थ्य त्या विचाराला या लेण्यांनी दिले. लेण्या पाहता पाहता इतिहासरंजनात गुंग झालेला मी आशिषच्या हाकेने भानावर आलो. अंधार आणि गारठा दोन्ही वाढत चालले होते. 

सिद्धाचल गुंफा 

पद्मासनस्थित तीर्थंकर 

आम्ही शहरात परत येऊन छान गरमागरम चहा घेतला. जरा तरतरी आली. आशिषला आता काही कामासाठी जायचे होते. त्याला अनेक धन्यवाद देऊन मी त्याचा निरोप घेतला. ग्वाल्हेरच्या मध्यवर्ती भागात गजक खरेदी करून मी हॉटेलवर परतलो. ग्वाल्हेरच्या वैभवशाली इतिहासाचे ओझरते दर्शन आणि आशिषची सोबत यांमुळे दिवस मस्त गेला होता. लवकरच जेवण आटोपले आणि झोपी गेलो.       

क्रमशः 

मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग ७ - ग्वाल्हेर - जय विलास महाल आणि ग्वाल्हेरचा किल्ला

ओरछाहून सकाळी लवकरच निघालो. तिथून झाशी साधारण १३ किमी आहे. अर्ध्या-पाउण तासातच झाशी रेल्वे स्थानकात पोहोचलो. इथून ग्वाल्हेरला जायला बऱ्याच गाड्या होत्या. तिकीट खिडकीवर आल्यावर कळलं की मुळातच लेट झालेली एक सुपरफास्ट एक्स्प्रेस लवकरच स्टेशनात शिरते आहे. मग लगेचच तिकीट काढलं. आधीच लेट झालेली ही गाडी अजून लेट न होवो असं म्हणून मी गाडीत चढलो. एखाद्या लांब पल्ल्याच्या गाडीच्या जनरल डब्यातून जायचा माझा पहिलाच अनुभव असावा कदाचित. बसायला जागा नव्हतीच. समोर एक तरुण बसला होता. माझ्या गळ्यातल्या कॅमेऱ्याकडे निरखून बघत होता. त्याने थोडंसं सरकून बसायला जागा करून दिली. मी सहज महणून त्याला विचारू लागलो, गाडी किती वाजता पोहोचेल, कायमच लेट असते का, वगैरे. मग ओळख-पाळख झाली. तर हा तरुण, आशिष, मुळचा ग्वाल्हेरचा. सध्या कुठल्याशा कंपनीत एच आर म्हणून काम करत होता. फोटोग्राफी करायचा थोडीफार. आवड-निवड जुळली की गप्पागोष्टी सुरु होतात. आमची तर लगेच मैत्रीही झाली. मी ग्वाल्हेरला खास फिरायला म्हणून आलो आहे याचे त्याला राहून राहून आश्चर्य वाटत होते. एकीकडे खास आपलं शहर बघायला कोणी मुंबईकडचा पाहुणा आला आहे याचा आनंदही होत होता. उत्साहात येऊन तो म्हणाला, “मैं आपको शहर घुमाउंगा!” मला तर अगदीच आनंद झाला. एखादं शहर बघायला स्थानिक माणसासारखी दुसरी कोणती सोबत नाही. त्यात आशिषसारखा आपल्या शहरावर मनापासून प्रेम करणारा कोणी असेल तर बातच न्यारी! मग आम्ही संपूर्ण दिवसाचा प्लॅन बनवला. तेवढ्यात ग्वाल्हेर आलंच.     

जय विलास महालाचे प्रवेशद्वार 

महालाचा प्रशस्त परिसर 

हॉटेल स्टेशनच्या जवळच होतं. मी चेक इन केलं, आंघोळ वगैरे उरकली, आणि जेवायला बाहेर पडलो. ऑर्डर दिली आणि गुगलवर सगळ्यात जवळ कोणती प्रेक्षणीय जागा आहे ते शोधू लागलो. ग्वाल्हेर हे मध्य भारतातलं एक महत्त्वाचं शहर. त्याचा इतिहास कित्येक शतके मागे जाणारा. त्यापैकी मध्ययुगातला तोमर राजवटीचा काळ म्हणजे ग्वाल्हेरच्या इतिहासातलं सुवर्णयुग. पुढे अठराव्या शतकात, पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर, महादजी शिंदे (आताचे नाव सिंदिया) या मराठा सरदाराने ग्वाल्हेरचे तख्त मिळवले. त्यानंतर भारत स्वतंत्र होईपर्यंत ग्वाल्हेर हे एक संस्थान म्हणून राहिले. १८५७ च्या उठावात ग्वाल्हेर हे महत्त्वाच्या घडामोडींचा केंद्रबिंदू होते. असा रंजक इतिहास लाभलेल्या या शहरात मन मंदिर महाल, ग्वाल्हेर किल्ला, गोपाचल पर्वत, सास-बहु मंदिर, जय विलास महाल, अशा अनेक प्रेक्षणीय वास्तू आहेत. त्यांपैकी जय विलास महाल माझ्या हॉटेलपासून जवळच होता. 

महालातील देवघर 
जेवण उरकलं आणि जय विलास महालाकडे निघालो. युरोपियन आणि भारतीय स्थापत्यशैलींचे उत्तम मिश्रण असलेला हा महाल जयाजीराव सिंदिया यांनी १८७४ मध्ये बांधला. महालाचा केवळ एक भाग वस्तूसंग्रहालय म्हणून पर्यटकांसाठी खुला ठेवण्यात आला आहे. इतर भागात अजूनही सिंदिया कुटुंबियांचे वास्तव्य आहे. तिकीट काढून मी आत शिरलो. मध्यभागी विस्तीर्ण बाग, त्यात एक कारंजे, चारही बाजूंनी सममितीत बांधलेली गोथिक शैलीतली पांढरी शुभ्र इमारत, सारे अगदी युरोपातल्या एखाद्या समर पॅलेससारखी भासत होती. सज्जे मात्र भारतीय शैलीत सुशोभित केलेले होते. अधूनमधून डोकावणारे घुमट खास मध्ययुगीन भारतीय शैलीचा आभास निर्माण करत होते. आतील दालनांत सिंदिया घराण्याचा इतिहास, त्यांच्या वापरातल्या वस्तू, त्यांचे दिवाणखाने, वगैरे गोष्टी सुबकतेने मांडल्या होत्या. त्या महालातले देवघर म्हणजे आपल्या टू-बी-एच-के फ्लॅट एवढं मोठं होतं! घराण्याची श्रीमंती आणि राजांची कलासक्तता त्यातून भरभरून दिसून येत होती. या महालातले सर्वात उल्लेखनीय दालन म्हणजे दरबार हॉल. हे दालन म्हणजे अक्षरशः भव्यदिव्य होतं. मोठाले डायनिंग टेबल, नाजूक कोरीवकाम केलेल्या खुर्च्या, छतावरची सुरेख सोनेरी चित्रे, आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मध्यभागी असलेले महाकाय झुंबर! मी पाचेक मिनिटं नुसता पाहतच राहिलो. काय श्रीमंती होती या देशात कधी काळी! मग उगीच वैभवशाली इतिहास आणि अस्वस्थ करणारे वर्तमान असे विचार मनात रुंजी घालू लागले. तेवढ्यात आशिषचा फोन आला. तो अर्ध्या तासात भेटणार होता महालाच्या बाहेर. मग थोडेफार फोटो काढून तिथून बाहेर पडलो. 

जय विलास महालातील दिवाणखाना 

दरबार दालनातील महाकाय झुंबर 

ठरल्याप्रमाणे आशिष त्याची स्कूटर घेऊन हजर होता. सुरुवातीलाच आम्ही गोपाचल पर्वतावरील ग्वाल्हेरच्या किल्ल्याकडे निघालो. हा किल्ला म्हणजे भारतातल्या काही सर्वात प्रेक्षणीय किल्ल्यांपैकी एक. मुघल सम्राट बाबरने म्हटल्याप्रमाणे हा किल्ला म्हणजे हिंदुस्तानातील किल्ल्यांच्या माळेतील एक मोती आहे! आम्ही स्कूटर पार्क केली आणि किल्ला भटकायला निघालो. किल्ल्याचा आवार प्रचंड मोठा होता. इथले प्रमुख आकर्षण म्हणजे मन मंदिर महाल. महालाचे नेटके बुरुज दुरूनच खुणावत होते. इथल्या भिंतीवर घडवलेले रंगीत नक्षीकाम आणि प्राण्या-पक्ष्यांच्या आकृती महालाचे वेगळेपण दर्शवत होत्या. आत शिरलो आणि एकापेक्षा एक सरस दालने दिसू लागली. मध्यवर्ती भागातले प्रांगण तर फारच सुंदर होते. प्रत्येक खांबावर आणि सज्ज्यावर नाजूक कोरीवकाम केलेले होते. महालातले गोल तळघर आणि तिथली ध्वनीक्षेपण यंत्रणा एकदमच इंटरेस्टिंग होती. 

मन मंदिर महालाचे बुरुज आणि तटबंदी 

भिंतींवरील सुरेख नक्षीकाम 

ग्वाल्हेरचे ट्रेड मार्क दृश्य 
महाल आतून फिरून झाल्यावर आम्ही बाहेरच्या व्यू पॉइंट वर आलो. इथून एका बाजूला अवघे ग्वाल्हेर शहर दिसत होते तर दुसऱ्या बाजूला मन मंदिर महालाची सुरेख तटबंदी. इथले दृश्य म्हणजे जणू ग्वाल्हेरचा ट्रेडमार्क! हलका वारा सुटला होता. दुपारची वेळ असली तरी इथे डोंगरावर गारठा जाणवत होता. आम्ही थोडा वेळ तिथे टेकलो. प्रकाश विरुध्द दिशेने होता. पण या जागी फोटो नाही काढून कसं चालेल? तिथून जवळच महालाचे मुख्य द्वार होते. याची रचना तर अफाट होती. दोन बाजूंनी उत्तुंग मनोरे, मधल्या भागात एक निरीक्षण सज्जा, कमानीच्या आकाराचा प्रचंड दरवाजा, आणि भिंतींवर रेखाटलेले सुरेख नक्षीकाम, सारेच अद्भुत होते. इथे थोडीफार फोटोग्राफी करून आम्ही किल्ल्याच्या इतर भागाकडे वळलो. मन मंदिर महालाच्या मागच्या बाजूला गुजरी महाल, कर्ण महाल, विक्रम महाल असे अजूनही काही महाल आहेत. यांपैकी काही महाल चांगल्या अवस्थेत आहेत तर काही अगदीच जीर्णावस्थेत. तिथे एक फेरफटका मारला आणि मंदिरांकडे वळलो. 

मन मंदिर महालातील नाजूक नक्षीकाम 

किल्ल्यावरचे इतर काही महाल 

किल्य्यावर येणारा मार्ग 

महाकाय प्रवेशद्वार  
क्रमशः 

मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग ६ - ओरछा - एक लपलेले स्थापत्यरत्न - उपभाग २

चतुर्भुज मंदिर हे राजा मधुकर शाह याने सोळाव्या शतकात बांधले. राम राजा मंदिरातली रामाची मूर्ती खरे तर इथे स्थापित व्हायची होती. मात्र ते काही होऊ शकले नाही. म्हणून आजमितीस इथे राधा-कृष्णाची मूर्ती स्थापित केलेली आहे. या मंदिराची रचना काहीशी एखाद्या चर्चसारखी आहे. प्रचंड उंच दालन, चार बाजूंनी चार उंच मनोरे, त्यावर चढायला गोल जिने, मध्यवर्ती भागात उंच सुशोभित खिडक्या, अशी रचना भारतातल्या इतर मंदिरांत सहसा आढळत नाही. या मंदिराचे चार मनोरे म्हणजे विष्णूचे चार हात अशी संकल्पना होती. या चार मनोऱ्यांपैकी एक मनोरा अपूर्ण आहे. असे म्हणतात, या मनोऱ्याचे बांधकाम सुरु असताना महाराणीच्या एका मुलाचा मृत्यू झाला. त्यामुळे बांधकाम अर्धवटच राहिले. एकंदरीत या मंदिराची रचना एकदमच वेगळी आहे. त्यामुळे स्थापत्यशास्त्राच्या दृष्टीने हे मंदिर म्हणजे एक विशेष औत्सुक्याचा विषय आहे. असो. 

चतुर्भुज मंदिराचे प्रवेशद्वार 
दमछाक करणाऱ्या पायऱ्या चढून आम्ही मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. कमळाच्या आकृतींनी सजवलेल्या प्रचंड द्वारातून आम्ही आत शिरलो. इथल्या भिंती स्थानिकांनी विद्रूप केल्या होत्या. ते बघून विषण्ण वाटले. तेवढ्यात एक पुजारी वजा गाईड धावत आला. गळ्यात कॅमेरे लटकवलेले दोन तरुण म्हणजे त्याला चार पैसे कमवायची नामी संधी वाटली असावी. गोल जिन्यावरून गच्चीपर्यंत नेतो असे म्हणून त्याने आम्हाला पटवले. आधी पाचशे म्हणत होता. शेवटी शंभर रुपये द्यायचे ठरले. मंदिरात फारशी गर्दी नव्हती. मंदिराच्या उंच दालनांमुळे हलका आवाजही घुमत होता. न हलणाऱ्या रामाच्या मूर्तीची कथा या गाईडकडून पुन्हा एकदा ऐकली. आम्ही मुळात उत्सुक होतो गच्चीवर जाण्यात. एका मनोऱ्याच्या जिन्यावरून आम्ही वर चढू लागलो. हे सगळे खरेच एखाद्या चर्चसारखे वाटत होते. मधल्या सज्ज्यावर चार बाजूंना चार सुशोभित गवाक्षे बांधली होती. त्यांपैकी एक गवाक्ष थेट राधा-कृष्णाच्या मूर्तीचे दर्शन घडवत होते. तिथून मग आम्ही गच्चीवर पोहोचलो. कुठलाच कठडा नसलेली ही गच्ची काहीशी असुरक्षितच होती. मात्र संपूर्ण शहराचा अप्रतिम देखावा इथून दिसत होता. विशेषतः समोरचा जहांगीर महाल अगदीच उठून दिसत होता. इथे एक मुख्य शिखर, एक उपशिखर, आणि त्याच्या पुढे मशीदीवर असतो तसा एक घुमट दिसत होता. मंदिराच्या स्थापत्यविशारदाने नक्की काय विचार करून अशी स्थापत्यघटकांची सरमिसळ केली असेल देव जाणे! पण त्यातून घडलेले स्थापत्यरत्न अद्भुत होते एवढे नक्की!

चतुर्भुज मंदिराच्या गच्चीवरील मनोरे 

चतुर्भुज मंदिराची गवाक्षे 
चतुर्भुज मंदिर पाहून आम्ही बाहेर पडलो तेव्हा दुपारचे दोन वाजत आले होते. मग आम्ही आधी जेवण करायचे ठरवले. विदेशी पर्यटकांच्या वर्दळीमुळे इथे काही उत्तम सेवा देणारी उपहारगृहे चालू झाली आहेत. आम्ही त्यांपैकीच एका ठिकाणी जेवण उरकले आणि लक्ष्मी-नारायण मंदिराकडे निघालो. हे मंदिर शहराच्या मध्यवर्ती भागापासून काहीसे दूरवर एका टेकडीवर होते. उन्हं बरीच तापली होती. हिवाळ्याचे दिवस असले तरी दुपारचं ऊन चांगलंच चटका देत होतं. अर्ध्या तासाच्या पायपिटीनंतर आम्ही मंदिराजवळ पोहोचलो. हे मंदिर म्हणजे स्थापत्यशैलीचा आणखीन एक वेगळा नमुना होतं. 


मंदिराची तटबंदी 
प्रथमदर्शनी तर ती वास्तू एक किल्लाच वाटत होती. चार बाजूंनी उंच संरक्षक भिंती, कोनांवर बुरुज, तटबंदीवर तोफांसाठी भोकं, असे एखाद्या भुईकोट किल्ल्यासारखे मंदिराचे रूप होते. मध्यभागी एक उंच मनोरा होता. हा मनोरा म्हणजेच मुख्य शिखर. मुख्य प्रवेशद्वारातून आम्ही आत शिरलो. गाभाऱ्याच्या चारही बाजूंनी विस्तृत आयताकृती दालने होती. त्यांच्या भिंतींवर आणि छतांवर सुरेख चित्रे काढलेली होती. यातील बरीचशी चित्रे रामचरितमानस या साहित्यकृतीवर बेतलेली होती. काही चित्रे राजामहाराजांची होती. एका बाजूने मुख्य मनोऱ्यावर जाणारा जिना होता. इथेही वर चढताना एखाद्या चर्चचा आभास होत होता. गच्चीवरून थोडेफार फोटो काढून आम्ही शहराकडे परत निघालो. 

दालनामधील सुरेख चित्रकला 

राजामहाराजांची चित्रे 
मंदिराचे मुख्य शिखर/मनोरा 

प्रियांकची जायची वेळ झाली होती. त्याच्यासोबत फिरताना वेळ मस्त गेला होता. त्याला फेसबुकवर अॅड करून त्याचा निरोप घेतला. साधारण साडेतीन वाजले होते. अजून नदीकाठच्या छत्र्या बघायच्या राहिल्या होत्या. पण दिवसभर फिरून फिरून पाय थकले होते. मग गेस्ट हाउसवर जाऊन थोडा वेळ विश्रांती घेतली आणि सूर्यास्ताच्या वेळी छत्र्या बघायला निघालो. या छत्र्या म्हणजे बुंदेला राजांच्या समाध्या होत. एकूण चौदा छत्र्या बेतवा नदीच्या काठाने बांधलेल्या आहेत. मी प्रवेशद्वारापाशी पोहोचलो तेव्हा पाच वाजत आले होते. सव्वापाचला तो परिसर बंद व्हायचा होता. तिथला सुरक्षारक्षक आत सोडायला तयारच होईना. मग गयावया करून फोटो काढून लगेच बाहेर येतो असे सांगून मी आत शिरलो. एक चौरसाकृती इमारत, चार कोनांवर चार लहान मनोरे, आणि मध्यभागी उंच असा मुख्य मनोरा, असे प्रत्येक छत्रीचे सर्वसाधारण स्वरूप होते. इथल्या स्थापत्यशैलीवर मुस्लीम शैलीचा जास्त प्रभाव जाणवत होता. संध्याकाळच्या सोनेरी उन्हात त्या छत्र्या चमकत होत्या. छत्रीच्या आत किंवा गच्चीवर जायला परवानगी नव्हती. तिथे दोन-चार फोटो काढतोय ना काढतोय तेवढ्यात सुरक्षारक्षक शिट्टी वाजवत आत येताना दिसला. माझा थोडासा हिरमोडच झाला. उगीच विश्रांती घ्यायला गेलो असं वाटलं. हिरमुसून मी बाहेर पडलो. बाजूलाच नदी वाहत होती. नदीवर सुंदर घाट बांधलेला होता. छत्र्यांचा परिसर आता बंद झालेला असला तरी बाहेरून सगळ्या छत्र्या पाहता येत होत्या. किंबहुना घाटावरूनच त्यांचे दृश्य अधिक सुंदर दिसत होते. मग काय, मी कॅमेरा काढला आणि सुटलो. अंधार पडेपर्यंत मनसोक्त फोटो काढले आणि शहराकडे यायला निघालो. येता येता रामराजाचे दर्शन घेतले आणि गेस्ट हाउसवर परतलो. 

ओरछा मधील छत्र्या 

सोनेरी उन्हात चमकणाऱ्या छत्र्या 

छत्र्यांच्या पार्श्वभूमीवरचा रम्य सूर्यास्त 


छत्री जितकी मोठी आणि सुशोभित तितके त्या राजाचे सामर्थ्य मोठे 

एकंदरीत आजचा दिवस मस्त गेला होता. ओरछा मधल्या वैशिष्ट्यपूर्ण स्थापत्यरत्नांचे दर्शन घडल्याने एक वेगळेच समाधान वाटत होते. आता पुढचा मुक्काम होता ग्वाल्हेर. सकाळी लवकरच निघायचे होते. म्हणून लवकर जेवण आटोपले आणि झोपी गेलो.   

क्रमशः 

मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग ५ - ओरछा - एक लपलेले स्थापत्यरत्न - उपभाग १

ओरछातला दिवस उजाडला तो मंदिरातल्या आरतीच्या आवाजाने. शहरातल्या राम राजा मंदिराच्या मागेच तर होतं गेस्ट हाउस. गेस्ट हाउस कसलं, घरच ते. घरातल्याच काही खोल्या हॉटेलच्या रूमसारख्या तयार केल्या होत्या. सुविधा तशा यथातथाच होत्या. पण घरमालक आणि त्याचे कुटुंबीय अगदी उत्तम पाहुणचार करत होते. उठायला तसा उशीरच झाला होता. पटकन आन्हिकं उरकली आणि नाश्ता करायला जवळच्या उपहारगृहावर गेलो. आलू पराठ्याची ऑर्डर दिली आणि बाहेर मांडलेल्या खुर्चीवर येऊन सुस्तावलो. सकाळची आरती करून बाहेर पडलेल्या भाविकांची रस्त्यावर वर्दळ दिसत होती. छोट्या-मोठ्या विक्रेत्यांचा बोहनीसाठी कोलाहल चालला होता. उन्हं वर आली होती तरी हवेत बऱ्यापैकी गारठा होता. अमूल बटरवर खरपूस भाजल्या जाणाऱ्या पराठ्याचा खमंग वास दरवळत होता. आता चांगलीच भूक लागली होती. 

गजबजलेला मंदिराचा परिसर 

तेवढ्यात कानावर काही मराठी शब्द पडले. समोरच बसलेला एक तरुण फोनवर मराठीतून बोलत होता. ओरछा मध्ये मराठी पर्यटक बघून जरा आश्चर्यच वाटले. तसा मराठी माणूस बराच फिरणारा असला तरी अशा ऑफ-बीट ठिकाणी तो सहसा दृष्टीस पडत नाही. असो. मी कुतूहलापोटी त्याच्याशी संवाद साधला. ओळख-पाळख झाली. तर हा तरुण, प्रियांक, होता मुळचा डोंबिवलीचा पण सध्या कॅनडामध्ये स्थायिक. इथे जवळच्या एका शहरात कुणाच्या लग्नाला आला होता. बरेच देश फिरलेला होता. प्रवासाची आवड, गळ्यात कॅमेरा, आणि मराठी कनेक्शन. त्यामुळे आमची लगेच गट्टी जमली. मग ओरछाची भटकंती एकत्रच करायची ठरवलं. समविचारी सहप्रवासी भेटल्याने मी खुश होतो. तेवढ्यात गरमागरम आलू पराठा हजर झाला. गप्पा मारता मारता नाश्ता उरकला आणि तिथल्या किल्ल्याकडे रवाना झालो. 


जहांगीर महालाचे प्रवेशद्वार 
ओरछा हे एक बेतवा नदीच्या काठावरचं एक लहानसं शहर. स्थानिक भाषेत त्याचा अर्थ होतो लपलेले. आणि खरंच हे एक लपलेलं स्थापत्यरत्न आहे. सोळाव्या शतकात रुद्रप्रताप या राजपूत राजाने हे शहर वसवले. तीन बाजूंनी विळखा घालणारी बेतवा नदी आणि एका बाजूने घनदाट अरण्य असे नैसर्गिक संरक्षण या शहराला होते. रुद्रप्रताप आणि त्याच्या वंशजांनी पुढची दोनेक शतके इथून बुंदेलखंडावर राज्य केले. त्यांना बुंदेला राजपूत असे संबोधतात. त्यांचे मुघलांशी संबंध कधी सलोख्याचे तर कधी शत्रुत्वाचे होते. दरम्यान त्यांनी या शहरात अनेक उत्तुंग इमारती बांधल्या. जहांगीर महाल, चतुर्भुज मंदिर, लक्ष्मी-नारायण मंदिर, आणि बेतवा नदीकाठावरच्या छत्र्या या त्यांपैकी काही महत्वाच्या इमारती होत. इथली स्थापत्यशैली म्हणजे मूळ भारतीय आणि मुघल शैलींचा मिलाफ समजली जाते. बुंदेला राजांच्या राजवटीत स्थानिक चित्रकलाही नावारूपास आली. त्याचे काही नमुने इथल्या महालांच्या भिंतींवर बघायला मिळतात. 


मोठ्या उत्सुकतेने आम्ही किल्ल्याच्या आवारात शिरलो. गर्दी फारशी नव्हतीच. तेवढ्यात एक जण गाईड हवा का म्हणून विचारायला आला. अशा फारशा परिचित नसलेल्या ठिकाणी माहितगार असावा म्हणून आम्ही त्याला सोबत घेतले. किल्ल्याचा आवार प्रशस्त होता. त्याची रचना थोडीफार फतेहपुर सिक्री येथील महालाशी मिळती-जुळती होती. इथे आनंद महाल, परवीन महाल, जहांगीर महाल, असे अनेक महाल आहेत. त्यांपैकी जहांगीर महाल हा त्याच्या स्थापत्यसौंदर्यासाठी सुप्रसिद्ध आहे. बुंदेला राजा बीर सिंग देव याचे मुघलांशी मैत्रीचे संबंध होते. विशेषतः जहांगीरशी त्याची खास मैत्री होती. जहांगीरच्या ओरछा भेटीसाठी त्याने हा खास महाल बांधला. पाच माजले आणि आठ सज्जे असलेला हा महाल म्हणजे खरोखरच एक आश्चर्य आहे. 




जहांगीर महालातली भित्तीचित्रे 
आमच्या गाईडने त्याची माहिती पूर्ण करून आम्हाला जहांगीर महालाच्या प्रवेशद्वाराशी आणून सोडले. मग मी आणि प्रियांक गप्पा मारता मारता महाल फिरू लागलो. महालाची प्रत्येक भिंत नक्षीकामाने सजवलेली होती. सज्ज्यांवरच्या कोपऱ्यांत छत्र्या बांधलेल्या होत्या.  तिसऱ्या मजल्यावर मुख्य दरबार होता. इथे छतावर सुरेख चित्रे साकारलेली होती. एका सज्ज्यावरून दुसऱ्या साज्ज्यावर जायला बांधेलेले चिंचोळे जिने चक्रावून टाकत होते. आम्ही अक्षरशः प्रत्येक मजल्यावर आणि प्रत्येक सज्ज्यावर जाऊन फोटो काढत होतो. सगळ्यात उंच जागेवरून संपूर्ण शहराचा वेधक नजारा दिसत होता. सगळे माजले बघून झाल्यावर आम्ही महालाच्या मध्यवर्ती भागात आलो. महालाचा संपूर्ण आवाका इथून लक्षात येत होता. प्रत्येक सज्ज्याच्या खालच्या बाजूने हत्तींच्या शिल्पाकृती घडवलेल्या होत्या. लाकडी दरवाजेही उत्तमोत्तम चित्रांनी सजवलेले होते. भारतीय आणि मुघल शैलीचं मिश्रण इथे प्रत्येक शिल्पाकृतीत दिसत होतं. दुपारचं प्रखर उन महालाच्या खिडक्यांतून झिरपत आत येत होतं. त्या कवडशांनी तिथल्या शिल्पाकृती अजूनच उठून दिसत होत्या. किती फोटो काढू किती नको असं झालं होतं. तासभर तिथे घालवून आम्ही तिथून बाहेर पडलो.

सज्ज्याखाली घडवलेल्या गजमूर्ती  

जहांगीर महालाची मागची बाजू 

महालाचा मध्यवर्ती भाग 

सर्वोच्च सज्ज्यावरून दिसणारे दृश्य 

रामराजा मंदिराचे प्रवेशद्वार 
किल्ल्याच्या बाहेरच होतं राम राजा मंदिर. हे मंदिर म्हणजे ओरछाचा मध्यवर्ती भाग. शहरातले जीवन या मंदिराच्या आसपास फिरते. असं म्हणतात की, ओरछाची राजकन्या गणेशा कुंवारी हिने अयोध्येहून रामाची मूर्ती इथे आणली. मोठे मंदिर बांधायची तिची इच्छा होती. मंदिर पूर्ण होतंय तोपर्यंत तिने तिच्या राहत्या महालातच मूर्ती स्थापित केली. एकदाचे मंदिर बांधून झाले, आणि मूर्तीची स्थापना तिथे करायचे ठरले. पण मूर्ती काही जागची हलेना! मग शेवटी त्या राहत्या महालालाच मंदिर घोषित करण्यात आले. त्यामुळे या मंदिराला ना कळस ना गाभारा. एखाद्या महालाचे असते तसे प्रवेशद्वार आणि अंतःपुरात रामाची मूर्ती. विशेष म्हणजे इथे रामाला गावाचा राजा म्हणून पुजले जाते. म्हणून नाव रामराजा. मंदिरात कसलासा उत्सव सुरु होता. त्यामुळे भाविकांची बरीच गर्दी होती. आम्ही नंतर सावकाश दर्शन घेऊ असा विचार करून चतुर्भुज मंदिराकडे वळलो.

क्रमशः