मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग १० - पडावली आणि मितावली

ग्वाल्हेरच्या बाहेरील ऐतिहासिक स्थळभेटीतला माझा पुढचा थांबा होता गढी पडावली. हेही या परिसरातलं सुंदर मात्र काहीसं दुर्लक्षित ठिकाण. या ठिकाणी दहाव्या शतकात बांधलं गेलेलं एक भव्य शिवमंदिर होतं. मुस्लीम आक्रमकांनी ते पाडून टाकलं. मग तेराव्या शतकात जाट राजांनी मंदिराच्या अवशेषांभोवती तटबंदी उभारून एक किल्ला बांधला. हा किल्ला म्हणजेच गढी पडावली. बटेश्वर मंदिरसमूहापासून हाकेच्या अंतरावर ही गढी आहे. आजूबाजूचा परिसर ASI ने संरक्षित केलेला आहे. मी आत शिरलो तेव्हा दुपारचे बारा वाजत आले होते. वातावरण तसे थंडच होते. बटेश्वरच्या तुलनेत इथे बरीच गर्दी होती. परिसरात शिरताच दृष्टीस पडले गढीचे प्रशस्त प्रवेशद्वार. संपूर्ण इमारत वीसेक फूट उंच चौथऱ्यावर होती. वर चढायला रुंद पायऱ्या होत्या. एका बाजूला सिंह तर दुसऱ्या बाजूला सिंहीण अशा दोन महाकाय शिल्पाकृती होत्या. त्या शिल्पांमुळे त्या प्रवेशद्वाराला एक वेगळाच शाही थाट लाभला होता. असे म्हणतात की मूळ सिंहशिल्पे ग्वाल्हेरच्या वस्तूसंग्रहालयात आहेत. इथे ठेवलेली शिल्पे म्हणजे प्रतिकृती आहेत. काळाच्या एवढ्या आघातांनंतर मूळ शिल्पे कुठेतरी जपून ठेवलेली आहेत हे ऐकून मला जरा हायसं वाटलं. अनेक पर्यटक त्या शिल्पांच्या शेजारी सेल्फी काढत होते. 

गढी पडावलीचे भव्य प्रवेशद्वार आणि तेथील सिंहशिल्पे 

मुखमंडपाचे कोरीव स्तंभ 
पायऱ्या चढता चढता दम लागत होता. चौथराच इतका उंच तर मूळ मंदिर किती उंच असेल! वर पोहोचलो आणि दृष्टीस पडला आधीच्या मंदिराचा मुखमंडप. इथे आधी मंदिर होतं हे सांगणारा एवढाच काय तो पुरावा आज शिल्लक आहे. त्याची रचना बघून खजुराहोच्या मंदिरांची आठवण झाली. नाजूक कोरीवकामाने त्याचा इंच न इंच सजवलेला होता. आतील छतावरचे कोरीवकाम तर थक्कच करणारे होते. एका बाजूला गजलक्ष्मी, दुसरीकडे शिव-पार्वती, तर सर्व बाजूंनी खालच्या ओळीवर रामायणातले प्रसंग अत्यंत कुशलतेने कोरलेले होते. तो मंडप बघून मूळ मंदिर किती भव्य आणि रेखीव असेल याची कल्पना मी करत होतो. नुसत्या कल्पनेनेच अंगावर शहारे येत होते. त्या काळातले हे या प्रदेशातले सर्वांत मोठे मंदिरे असावे. आज जर ते अस्तित्वात असते तर दक्षिणेकडच्या अनेक विशाल मंदिरांना स्पर्धा निर्माण झाली असती. असो. मंडपाच्या पुढे निव्वळ एक चौथरा उरला होता. चोहो बाजूंनी तटबंदी दिसत होती. उजवीकडे जाटांनी बांधलेल्या महालाचे काही अवशेष दिसत होते. वर जाणारा जिना दिसत होता. मी सहज म्हणून वर चढलो. इथून संपूर्ण परिसर नजरेच्या एका टप्प्यात दिसत होता. आजूबाजूला वस्ती फारशी नव्हती. बहुतांश शेतजमीनच दिसत होती. जाटांनी किल्ला बांधायला हे ठिकाण का निवडले असेल याचा प्रश्न मला पडला होता. कदाचित एखाद्या महत्त्वाच्या दळणवळण मार्गावर हे ठिकाण पडत असावे. असो. तिथे थोडे फोटो काढून मी बाहेर पडलो. 

छतावर साकारलेले पुराणातले प्रसंग 

छतावरचे नाजूक कोरीवकाम 

किल्ल्याच्या गच्चीवरून दिसणारे दृश्य 

तिथून मी पोहोचलो मितावलीच्या चौसठ योगिनी मंदिराकडे. आपल्या संसद भवनाशी साधर्म्य साधणाऱ्या या मंदिराच्या गोलाकार रचनेमुळे असे म्हटले जाते की संसद भवनाच्या स्थापत्यविशारदाने या मंदिरापासून प्रेरणा घेतली. तर हे मंदिर बघण्यासाठी मी कमालीचा उत्सुक होतो. मितावली गावाच्या जवळ पोहोचलो तशी लहानशी टेकडी दिसू लागली. गाव तर अगदीच लहान होतं. गाव कसलं, लहानशी वस्तीच म्हणा. टेकडीखाली दोन-चारच गाड्या पार्क केलेल्या दिसत होत्या. रविवार असूनही इथे तुरळकच गर्दी होती. वर जायला पायऱ्या बांधलेल्या होत्या. मी वर चढू लागलो. आभाळ झाकोळून आलं होतं. पाऊस पडेल की काय असं वाटत होतं. दहा मिनिटातच मी वर पोहोचलो. समोरच गोलाकार आकारात बांधलेलं मंदिर दिसत होतं. अपेक्षेपेक्षा हे मंदिर लहानच वाटत होतं. त्याला ना कळस होता ना मंडप. आणि बाहेरील भिंतीवर काहीच विशेष कोरीवकाम नव्हते. एका बाजूला प्रवेशद्वार होते. तिथून मी आत शिरलो. आतले दृश्य मात्र थक्क करणारे होते. मधोमध गोलाकार गाभारा होता. त्यात एक शिवलिंग होते. त्याच्या बाजूने गोलाकार असा एक लहानसा मंडप होता. त्याचे खांब साधेच पण सुबक होते. त्याच्या बाजूने एक गोलाकार प्रांगण होते. बाहेरील भिंतीच्या आतल्या बाजूने पाच-सहा फूट उंच असा चौथरा होता. त्यावर एकसारखे असे चौसष्ठ कोनाडे होते. या कोनाड्यांत चौसष्ठ योगिनींच्या मूर्ती असत. मात्र सध्या तरी यांपैकी कोणतीही मूर्ती अस्तित्वात नाही. त्यांच्या जागी शिवलिंगे स्थापलेली आहेत. अनेक शिवलिंगे असल्यामुळे या मंदिरास इकत्तरसौ महादेव मंदिर असेही म्हणतत. एकंदरीत ही जागा एकदमच वेगळी होती. 

प्रथमदर्शनी अगदीच अनाकर्षक वाटणारे चौसठ योगिनी मंदिर 

आत शिरताच दिसणारा गोलाकार गाभारा 

चौसष्ठ कोनाडे 

हे मंदिर कच्छप राजा देवपाल याने अकराव्या शतकात बांधले. असे म्हणतात की त्या काळी सूर्याच्या अयन रेषेच्या आधाराने गणित आणि खगोलशास्त्राचे प्रशिक्षण देण्यासाठी या मंदिराच्या वास्तूचा प्रयोग केला जाई. त्या काळी तंत्र परंपरेचा मोठा प्रभाव होता. या परंपरेचे साधक चौसष्ठ योगिनींची पूजा करत. योगिनींची पूजा करणारा हा संप्रदाय कमालीच्या गुप्ततेत असे. आजच्या घडीला या परंपरेचे कोणी उपासक अस्तित्वात आहेत की नाही याची काहीच कल्पना नाही. त्यांचे विधी, पूजा-अर्चा इत्यादींविषयी बाहेरील माणसाला कोणती माहिती मिळणे दुरापास्त. त्यामुळे या मंदिराविषयीही फार काही माहिती उपलब्ध नाही. किंबहुना १९४० पर्यंत हे मंदिर गुलदस्त्यातच होते. एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात ग्वाल्हेर संस्थानात केल्या गेलेल्या अनेक शोध मोहिमांत कुठेच याचा उल्लेख सापडत नाही. संसद भावनाचे स्थापत्यकार एडविन लट्यंस आणि हर्बर्ट बेकर यांनी कधी इथे भेट दिल्याचाही पुरावा नाही. त्यामुळे संसद भवन या मंदिरावरून प्रेरणा घेऊन बांधले असल्याची कथा निव्वळ कल्पनाविलास ठरतो. असो. आतमध्ये थोडेफार फोटो काढून मी बाहेर पडलो. बाहेरच्या बाजूला एका लहानशा चौथऱ्यावर एक विष्णूचे मंदिर होते. इथून आजूबाजूचा सुंदर देखावा दिसत होता. जमिनीच्या लहानमोठ्या चौकोनी तुकड्यांत शेती डवरलेली दिसत होती. मी काही क्षण तिथे विसावलो. 

भव्य गोलाकार प्रांगण 

बाहेरचे लहानसे विष्णू मंदिर 

मध्य प्रदेशातल्या माझ्या सहलीचा हा शेवटचा थांबा होता. खजुराहोपासून सुरु झालेला हा प्रवास मितावलीला संपत होता. या सहलीत स्थापत्यकलेचा हात धरून जणू इतिहासाचीच मुशाफिरी मी केली होती. प्राचीन काळातली खजुराहोची मंदिरे, मग मध्ययुगात उभारले गेलेले ओरछातले महाल, ग्वाल्हेरमधला आधुनिक काळात पाश्चिमात्य आणि भारतीय शैलींचा मिलाफ घडवत बांधला गेलेला जय विलास महाल, आणि आता प्राचीन काळात बांधलेली, पण जमीनदोस्त झालेली, आणि आधुनिक तंत्रज्ञानाने पुन्हा उभारलेली बटेश्वरची मंदिरे. काळाचे एक आवर्तन पूर्ण झाल्यासारखे वाटले. माणसे मर्त्य असतात. पण कला अमर्त्य असते. श्रद्धा अमर्त्य असते. एखाद्या गोष्टीत जीव गुंतवून ती पूर्णत्वास नेणारी जिद्द अमर्त्य असते. अशा अमर्त्य विचारांचे मूर्त स्वरूपच मी या सहलीत अनुभवले होते. अनुभवांची पोतडी थोडी अजूनच श्रीमंत झाल्यासारखी वाटत होती. भरल्या मनाने मी त्या टेकडीवरून खाली उतरलो. वाटेत जेवण उरकून विमानतळाकडे रवाना झालो. मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात पुढच्या सहलीचे नियोजन सुरु झाले होतेच!

टेकडीवरून खाली डवरलेली शेते दिसत होती

समाप्त 

मध्य प्रदेशातली मुशाफिरी - भाग ९ - बटेश्वर मंदिर समूह

आज सहलीचा शेवटचा दिवस होता. आजचा दिवस ठरवला होता ग्वाल्हेरच्या उत्तरेकडील मोरेना जिल्ह्यातील बटेश्वर, गढी पडावली, आणि मितावली या ऐतिहासिक जागांसाठी. या सर्व जागा मुख्य गावांपासून दूर, आडवाटेवर आहेत. तिथे पोहोचायला कोणतीच सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नव्हती. शिवाय या जागा बघून थेट विमानतळावर जायचे होते. मग संपूर्ण दिवसभरासाठी एक टॅक्सी बुक केली. ठरल्याप्रमाणे साडेसात वाजता टॅक्सीवाला हॉटेलवर हजर झाला. चेक आउट करून मी निघालो. आज वातावरण जरा ढगाळ होते. पाऊस पडेल असे वाटत होते. मधूनच उन्हाची एखादी तिरीप झेपावत होती. गार वारा सुटला होता. रोड ट्रीप साठी एकदमच मस्त वातावरण होतं. चालकही गप्पिष्ट होता. इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही चाललो होतो. 

पुनर्स्थापित केलेली मंदिरे 

पहिला थांबा होता बटेश्वर मंदिर समूह. इथे साधारण सातव्या ते आठव्या शतकात गुर्जर प्रतिहार राजवटीत बांधली गेलेली सुमारे २०० मंदिरे आहेत. तेराव्या शतकात ही मंदिरे सम्पूर्ण जमीनदोस्त झाली. त्याचे कारण नक्की मुस्लीम आक्रमणे होते की भूकंप हे नक्की सांगता येत नाही. मात्र एकोणिसाव्या शतकात जेव्हा ही जागा पुन्हा निदर्शनास आली तेव्हा इथे दगडांचा नुसता ढिगारा होता. २००५ मध्ये के के मुहम्मद या ASI च्या अधिकाऱ्याने या मंदिरांची पुन्हा उभारणी करण्याचा विडा उचलला. तेव्हा हा सगळा भाग चंबळ खोऱ्यातील दरोडेखोरांच्या हातात होता. मुळातच हा भाग कित्येक दशकांपासून दरोडेखोरांसाठी कुप्रसिद्ध होता. मात्र मुहम्मद यांनी त्यांच्या म्होरक्याला हे समजावले की मंदिरे त्यांच्या पूर्वजांनी बांधलेली आहेत. मग तो पुनर्स्थापनेस मदत करण्यास राजी झाला. त्याच्या लोकांनी या कामात मदतही केली. पुढच्या काही वर्षांत मुहम्मद यांच्या चमूने एखादे प्रचंड जीग्सौ पझल सोडवावे तसे एक-एक दगड वेगळा काढून, त्याची मूळची जागा शोधून काढून, साधारण पन्नास-एक मंदिरे पुन्हा उभारली. हे सारे काम निश्चितच प्रशंसनीय होते. आज ही सारी मंदिरे गतवैभवाची साक्ष देत दिमाखात उभी आहेत. असा इतिहास बघता ही जागा पाहण्यास मी फारच उत्सुक होतो.

पुजारी काकांच्या झोपडीजवळून दिसणरे दृश्य 

मंदिराच्या कळसावर बसलेला मोर 
ग्वाल्हेरहून तासाभरात मी तिथे पोहोचलो. परिसरात फारसे कुणी पर्यटक नव्हते. त्यामुळे तिथे शांत आणि प्रसन्न वाटत होतं. वालुकाश्मात घडवलेली मंदिरे ढगांतून झिरपत येणाऱ्या प्रकाशात गूढ वाटत होती. मी कॅमेरा काढला आणि फोटो काढू लागलो. मंदिरांच्या आजूबाजूला असंख्य अवशेष विखुरलेले होते. कोणता भाग कुठे लावायचा हे कसे काय ठरवले असेल ASI च्या लोकांनी याच अचंब्यात मी इकडेतिकडे फिरत होतो. ही मंदिरे भारतात इतरत्र आढळणाऱ्या मंदिरांपेक्षा एकदम वेगळी आहेत. प्रत्येक मंदिर म्हणजे एखाद्या मोठ्या मंदिराची लहान आणि सोपी प्रतिकृती. एक चौरसाकृती चौथरा, त्यावर चार भिंती, वर कळस, आणि मध्यभागी देवाची मूर्ती. एकूण उंची केवळ १०-१२ फूट. बहुतांश मंदिरे शिवाची असून काही मंदिरे विष्णू आणि शक्तीची देखील आहेत. मंदिरांवर नटराज, सप्तमातृका, शिव-पार्वती विवाह, विष्णू दशावतार, मैथुनमग्न व्यक्ती, योद्धे, अशा अनेक आकृती कोरलेल्या आहेत. या समूहातले मुख्य मंदिर म्हणजे भूतेश्वर मंदिर. हे एक मोठे पंचरथ मंदिर आहे. जेव्हा सगळी मंदिरे उद्ध्वस्त झाली होती तेव्हा हे एकाच मंदिर थोडेफार बऱ्या अवस्थेत होते. त्याच्या नावावरूनच या समूहाला बटेश्वर किंवा बाटेसर म्हणतात. हे मंदिर इतर मंदिरांपेक्षा थोडे मोठे होते. मुख्य मंदिर आणि त्याची दहा उपमंदिरे अशी त्याची रचना होती. मंदिरांच्या मागेच एक लहानशी टेकडी होती. आजूबाजूला बरीच घनदाट झाडी होती. मध्येच मोराचे केकारव ऐकू येत होते. आवाजाचा मागोवा घेतला तर एका मंदिराच्या कळसावर पक्षिराज मोठ्या दिमाखात बसलेला दिसला. तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त करण्यात मी गुंगून गेलो. 


एकसारख्या पद्धतीने बांधलेली मंदिरे 
तेवढ्यात तिथल्या एका मंदिरातून एक वयस्क पुजारी बाहेर येताना दिसले. इथे पूजा-अर्चाही होते हे बघून मला आश्चर्य वाटलं. मी उगाच त्यांच्याशी गप्पा मारायला लागलो. हे पुजारी काका मंदिरांच्या परिसरातच एका झोपडीत रहात होते. मला मंदिरांच्या कथेत रस आहे हे पाहून त्यांनी त्यांच्या झोपडीतून एक जाडजूड अल्बम काढला. त्यात ASI ने केलेल्या कामाचा फोटोग्राफिक तपशील होता. मला तर खजिनाच हाती लागल्यासारखे झाले. बराच वेळ मी तो अल्बम चाळत बसलो. पुजारी काका तिथले बारीकसारीक किस्से ऐकवत होते. 

इतक्यात जवळच्या कुठल्याशा शाळेची मुलं एकदम गलका करत मंदिरांच्या आवारात शिरली. मंदिरांच्या भिंतींत त्यांचा आरडाओरडा, पकडापकडी वगैरे सुरु झालं. सोबत आलेले शिक्षक एका कोपऱ्यात बसून गप्पा मारत होते. मला ते सगळं दृश्य बघून अक्षरशः संताप आला. मुलंच ती. कुठेही गेली तरी खेळणारच. मग इतक्या लहान मुलांना अशा ठिकाणी आणावं तरी का? एखाद्या जागेचं पावित्र्य जपणं वगैरे समजण्याचं त्यांचं वय आहे का? पण मग त्यांना आपल्या वारशाची ओळख तरी कशी होणार? मुलांना हे सगळे समजावून सांगणे शिक्षकांचे काम नाही का? उगीच माझ्या डोक्यात विचारमंथन सुरु होतं. शेवटी एका शिक्षकाला मी जाऊन सुनावलं. बिचारा शिक्षक सगळ्या पोरांना गोळा करून निघून गेला. पुजारी काका नुसते माझ्याकडे बघत हसत होते. त्यांच्यासाठी हा रोजचाच प्रकार असेल म्हणा. मुलांना निदान दटावता तरी येतं. मोठी माणसं अशी वागत असतील तर काय करावे? असो. या सगळ्यात वेळ कसा गेला कळलेच नाही. खजुराहोपेक्षा जुनी असूनही या मंदिरांना तेवढी प्रसिद्धी लाभलेली नाही. स्थानिक पर्यटकांशिवाय इथे फारसं कुणी फिरकत नाही. निधीअभावी पुनर्स्थापनेचं काम रखडलेलं आहे. या जागेला पुढच्या काळात बरे दिवस यावेत अशी प्रार्थना करून, पुजारी काकांना थोडीफार दक्षिणा देऊन, आणि परिसरात अजून थोडी फोटोग्राफी करून मी तिथून निघालो.  

ढगाळ आकाशाच्या पार्श्वभूमीवर मंदिरे अजूनच सुंदर दैत होती 

क्रमशः