नयनरम्य बाली – भाग ३ – उलूवातूचा रम्य सूर्यास्त Beautiful Bali - Part 3 - The picturesque sunset of Uluwatu

गरुडा-विष्णु-कांचना पार्कमधून बाहेर पडलो आणि उलूवातूच्या दिशेने निघालो. आता चांगलीच भूक लागली होती. रस्त्यात बरीच उपहारगृहे दिसत होती. पण मनासारखे काही दिसत नव्हते. तेवढ्यात पाटी दिसली सुलूबान बीच अशी. मस्तपैकी बीचवर बसून जेवण करू असं म्हणून मी बीचकडे वळलो. हा बीच म्हणजे क्लिफ बीच होता. म्हणजे थेट समुद्रात उतरणारा डोंगरकडा आणि त्याखाली थोडीफार पुळण. खाली उतरायला पायर्‍या बांधलेल्या होत्या. पायर्‍यांच्या बाजूने कड्याला बिलगूनच असंख्य उपहारगृहे होती. दिसणारे दृश्य जितके सुंदर तितक्या पदार्थांच्या किमती जास्त असे गणित होते. इथल्या लाटा सर्फिंगसाठी अनुकूल होत्या. त्यामुळे सर्फिंगचे सामान विकणारी आणि सर्फिंग शिकवणारी बरीच दुकाने होती. आधी बीच बघून येऊ असे म्हणून मी पायर्‍या उतरू लागलो. वाट जरा निसरडीच होती. जसजसे खाली उतरू  लागलो तसा लाटांचा जोरदार आवाज येऊ लागला. दोन कड्यांचा मध्ये एक घळई निर्माण झाली होती. काहीसे गूढ वाटत होते. आजूबाजूला एक-दोन गुहा देखील होत्या. पुळण अगदीच अरुंद होती. लाटा वेगाने आदळत होत्या. किनारा बहुतांश खडकाळच होता. बसायला अशी जागा नव्हतीच. मग मी सरळ वर आलो आणि एका उपहारगृहात शिरलो. फ्राइड राईस मागवला आणि समोरचे दृश्य बघत बघत खाऊ लागलो. इंडोनेशिया मध्ये शाकाहारी जेवण मिळणे फार अवघड नाही. इथल्या जेवणात मोठ्या प्रमाणात भाज्या, भाताचे विविध प्रकार, नारळाचे दूध, वगैरे पदार्थ असतात. इंडोनेशियन जेवणाबद्दल पुढे सविस्तर लिहिनेच. जेवण आटोपून मी उलूवातूच्या प्रसिद्ध मंदिराकडे निघालो.


सुलूबानचा क्लिफ बीच

बीचकडे जाणार्‍या पायर्‍या 

बीचवर असलेली घळई 

सुलूबानचा खडकाळ किनारा 

एव्हाना चार वाजत आले होते. उन्हं कलू लागली होती. सूर्यास्ताच्या आधी मंदिर व्यवस्थित पाहता यावे म्हणून मी स्कूटरचा वेग वाढवला. तेवढ्यात मंदिराची पाटी दिसलीच. पार्किंगची जागा गाड्यांनी भरून गेली होती. एकंदरीत आत जत्रा असणार याचा अंदाज आला होता. मंदिराबाहेर भाड्याने मिळणारे सारोंग नेसून मी आत शिरलो. प्रत्यक्ष मंदिरात जाता येत नव्हतेच. पर्यटक मंदिराचे पावित्र्य नष्ट करतील म्हणून बाली मधल्या बर्‍याच मोठ्या मंदिरांत पर्यटकांना प्रवेश निषिद्ध आहे. बाली मधली मंदिरे म्हणजे एक मोकळे प्रांगण आणि त्यात उतरत्या छपरांचे मनोरे अशी रचना असते. तशीच इथेही होती. बाहेरून प्रांगणाच्या भिंतीवरचे कोरीवकाम आणि मनोर्‍यांची सुंदर रचना पाहता येत होती. पण उलूवातूचे मुख्य आकर्षण म्हणजे मंदिर नव्हतेच मुळी. ते होते त्या जागेचे सौंदर्य आणि तिथून दिसणारा सूर्यास्त. मंदिराच्या मागेच डोंगरकडा थेट समुद्रात कोसळत होता. जवळपास चार-पाचशे फूट असेल त्या डोंगरकडयाची उंची. खाली अथांग समुद्राच्या लाटा बेभान आदळत होत्या. मस्त वारा सुटला होता. आकाश सोनेरी-गुलाबी झाले होते. बालीच्या बेटाचा हा दक्षिणेतर भाग. हा तोच हिन्दी महासागर जो कधीतरी लहानपणी कन्याकुमारीला पाहिलेला. एखाद्या बालसवंगड्याची बर्‍याच वर्षांनी भेट व्हावी आणि ओळख पटल्यावर त्याच्याशी गळाभेट व्हावी तसं वाटत होतं. मंदिराच्या पाठीमागचा हा भाग गर्दीने खच्चून भरला होता. अर्धे तर भारतीयच दिसत होते. लाल टोप्या घातलेली मराठी मंडळीही दिसत होती. पलीकडच्या मोकळ्या भागात तिथे रोज सादर होणार्‍या रामायणावर आधारित शोची तयारी चालू होती. त्याची तिकिटे काढलेल्या लोकांनी आधीच तिकडे तोबा गर्दी केली होती. एवढ्या गर्दीने त्या सुंदर जागेचा पार विचका करून टाकला होता. मला तर तिथून निघून जावं असं वाटू लागलं होतं. तेवढ्यात लक्ष गेलं मागच्या बाजूने डोंगरकड्यालगत बांधलेल्या पायवाटेकडे. तिथे जरा कमी गर्दी दिसत होती.


उलूवातूचा डोंगरकडा आणि त्याच्या अंगाने जाणारी पायवाट  

मंदिराच्या मागे झालेली पर्यटकांची गर्दी 

मंदिराचे प्रवेशद्वार

मी सरळ त्या पायवाटेवरून चालू लागलो. थोड्या अंतरावरच एक बसायची जागा होती. इथून सूर्य अगदी समोर दिसत होता. लांबवर उलुवातूचे डोंगरकड्याच्या टोकावर असलेले मंदिर दिसत होते. गर्दी त्यामानाने कमी होती. मी तिथेच बसकण मारली आणि फोटो काढू लागलो. कलत्या सूर्याच्या प्रकाशात तो डोंगरकडा, खालचा समुद्र, फेसाळत्या लाटा, आणि लांबवरचे मंदिर, सारेच विलक्षण दिसत होते. सूर्यबिंब आता लाल-केशरी झाले होते. पाहता पाहता क्षितिजावरच्या धुरकट हवेने त्या केशरी गोळ्याला कवेत घेतले आणि अक्षरशः क्षणार्धात सगळा खेळ संपला! समुद्रात बुडणार्‍या सूर्याला बघायला आलेल्या सगळ्याच पर्यटकांचा हिरमोड झाला होता. निसर्गाच्या खेळापुढे आम्हा पर्यटकांच्या इच्छेची काय तमा? नाही म्हणायला थोडाफार केशरी प्रकाश उरला होता. थोडे अजून फोटो काढून मी तिथून निघालो. पायवाटेवर माकडांनी उच्छाद मांडला होता. कोणाचे खाऊचे पुडे, कोणाचे चष्मे, कोणाच्या बाटल्या, माकडं बिनधास्त ओढून घेऊन जात होती. आणि गोर्‍या पर्यटकांना त्याचे अगदी कौतुक! त्या सगळ्या कोलाहलातून वाट काढत आणि माकडांपासून सुरक्षित अंतर ठेवून मी पार्किंगच्या जागेकडे पोहोचलो. अंधार भराभर पडत होता. मी स्कूटर चालू केली आणि परतीचा रस्ता धरला.    


दूरवर दिसणारे मंदिर आणि अथांग समुद्र 

तुलेनेने कमी असलेली गर्दी 

म्हणता म्हणता नाहीसा झालेला सूर्य 

क्रमशः 

नयनरम्य बाली – भाग २ – गरुडा-विष्णु-कांचना पार्क Beautiful Bali - Part 2 - Garuda-Visnu-Kencana Park

माझं हॉस्टेल बालीच्या कुटा भागात होतं. हा भाग पार्टिंग आणि नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे. आजचा अर्धा दिवस तसाही गेलाच होता. मग आज जवळच असलेले बालीच्या दक्षिण भागातले समुद्रकिनारे, गरुडा-विष्णु-कांचना पार्क, आणि उलूवातूचे प्रसिद्ध मंदिर बघायचे ठरवले. निघे निघे पर्यन्त बारा वाजलेच. स्कूटर छानच पळत होती. मुख्य म्हणजे स्कूटरच्या हॅंडलवर फोनहोल्डर दिलेला होता. त्याला प्लॅस्टिकचे कवरही होते. ही एक फारच मस्त सोय होती. गुगल नकाशावर जिंबरान बीचचे लोकेशन टाकले आणि स्कूटर चालू केली. आठवड्यातला मधला वार असल्याने रस्त्यावर फार गर्दी नव्हती. स्वच्छ ऊन पडलं होतं. हवा तशी गरम होती पण उकाडा जाणवत नव्हता. मुंबईत डिसेंबर महिन्यात असते तसे वातावरण होते. अर्ध्या तासातच जिंबरान बीच वर पोहोचलो. दक्षिण बालीमधला हा एक महत्वाचा बीच. प्रशस्त अर्धवर्तुळाकृती किनारा, एकापुढे एक उपहारगृहे आणि त्यांचा आडव्या खुर्च्या, त्यावर बसून खान-पानाचा आनंद घेणारे पर्यटक, आणि समोर पसरलेला विशाल निळा-हिरवा समुद्र. इतकं स्वछ पाणी युरोपनंतर इथेच बघत होतो. लाटा बेभान उसळत होत्या. भरतीची वेळ असावी. दूरवर लहान-मोठ्या टेकड्या दिसत होत्या. एका टेकडीवर गरुडावर स्वार झालेली विष्णूची मूर्ती दिसत होती. ही मूर्ती नुकत्याच बांधलेल्या गरुडा-विष्णु-कांचना पार्कमधली होती. आज बघायच्या ठरवलेल्या जागांमध्ये हे पार्क होतेच. इथून दिसत असलेली ती सुंदर मूर्ती बघून माझी पार्क बद्दलची उत्सुकता अजूनच ताणली गेली. जिंबरानची भेट आटोपती घेत मी गरुडा-विष्णु-कांचना पार्ककडे निघालो.

जिंबरानचा समुद्रकिनारा आणि दूरवर दिसणारी विष्णूची मूर्ती

विष्णूची पूजेत असलेली अर्धमूर्ती

हे पार्क एका टेकडीवर असल्याने रस्ता तसा चढणीचा होता. एक मोठे वळण घेतले आणि पार्कच्या भव्य प्रवेशद्वारातून आत शिरलो. प्रशस्त पार्किंगची जागा, रुंद रस्ते, आजूबाजूला फुलवलेल्या बागा, असा रम्य परिसर होता. दुपारची उन्हाची वेळ होती. तरीही उष्मा फारसा जाणवत नव्हता. तिकीट जरा महागडेच होते. त्यासोबत एक सारोंग देण्यात आले होते. सारोंग म्हणजे इथली लुंगी. कोणत्याही देवळात जाताना इथे कमरेभोवती वस्त्र गुंडाळायची पद्धत आहे. त्यालाच सारोंग म्हणतात. दक्षिण भारतातल्या काही मंदिरांतही ही पद्धत आढळते. बालीमधल्या सगळ्या देवळांत असे सारोंग गुंडाळून जाणे अनिवार्य आहे. हे जरी पार्क असले तरी यातल्या काही मूर्ती प्रत्यक्ष पुजल्या जात होत्या. त्यामुळे केवळ त्या ठिकाणी सारोंग गुंडाळणे आवश्यक होते. कॅमेरा सरसावून मी आत शिरलो. सुरुवातीलाच एक प्रशस्त मैदान दिसले. त्याच्या चारी बाजूंनी ग्रॅनाइटचे उभे कापलेले कडे होते. या टेकडीवर असा खडक विपुल होता. त्यातूनच इथल्या प्रचंड मूर्ती घडवल्या होत्या. मैदानाच्या वरच्या बाजूला गरुडची मूर्ती होती. हा गरुड मोठ्या भक्तिभावाने मुख्य मूर्तीकडे बघताना दिसत होता. त्याच्याच दुसर्‍या बाजूला विष्णूची अर्धमूर्ती होती. ही मूर्ती प्रत्यक्ष पूजेत असल्याने इथे सारोंग गुंडाळणे आवश्यक होते. इथले वातावरण अगदी भारतातल्या देवळांत असते तसे होते. कलकलाट मात्र अजिबात नव्हता. उदबत्त्यांचा सुगंध प्रसन्न वाटत होता. दूरवर गरुडावर स्वार झालेल्या विष्णूची महाकाय मूर्ती दिसत होती. सगळी शिल्पे अत्यंत सुबक आणि रेखीव होती. निळ्याभोर आकाशाच्या पार्श्व्भूमीवर ते शिल्पसौंदर्य फारच मोहक वाटत होते. तिथे थोडेफार फोटो काढून मी मुख्य मूर्तीकडे निघालो. सुमारे 75 मीटर उंच आणि 65 मीटर रुंद अशी ही मूर्ती इंडोनेशियामधली सगळ्यात उंच मूर्ती आहे. ज्या इमारतीवर ही मूर्ती उभारली आहे तिची ऊंची पकडली तर एकूण ऊंची 122 मीटर भरते. समुद्र मंथनाच्या वेळी अमृत बाहेर पडले आणि ते घ्यायला गरुडावर स्वार होऊन विष्णु निघाला असा प्रसंग या मूर्तीतून साकारला गेला आहे. मूर्ती निश्चितच सुंदर होती. विष्णूच्या चेहर्‍यावरचे भाव, गरुडाचा आवेश, त्याच्या पंखांवरची पिसे, सारेच अप्रतिम होते. मूर्तीवर बसवलेले सोन्याचे तुकडे उन्हात चमकत होते. खालच्या इमारतीमध्ये एक भव्य संग्रहालय होते. त्याची गाइडेड टूर लवकरच निघणार होती. पण त्याचे जास्तीचे तिकीट बघून मी माघारी वळलो.

गरुडा-विष्णु-काञ्चना पार्कमधले ताशीव कडे    

मुख्य मूर्तीकडे बघणारी गरुडाची मूर्ती


गरुडावर स्वार असलेली विष्णूची मुख्य मूर्ती

पार्कच्या दुसर्‍या टोकाला एक आलीशान उपहारगृह होते. तिथून टेकडीखालचा रम्य परिसर दिसत होता. दूरवर निळा समुद्र शांत पहुडला होतापार्कच्या तिकीटावर इथे एक सरबत मोफत मिळणार होते. मी ते घेतले आणि जरा वेळ विसावलो. तेवढ्यात कुठूनतरी तालवाद्यांचे स्वर कानावर पडले. बाजूलाच एक लहानसे स्टेज होते आणि त्यावर लोकनृत्याचा कार्यक्रम सुरू  होता. पंधरा मिनिटांचा एक कार्यक्रम दर अर्ध्या तासाने होत होता. उत्सुकतेने मी बघायला गेलो. वाद्यांचे स्वर ऐकायला छान वाटत होते. तेवढ्यात पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या काही नर्तकी अवतरल्या. त्यांचे मुद्राविनेश थोडेफार भारतीय अभिजात नृत्यासारखे वाटत होते. मग काही प्राण्यांचे वेश घातलेले नर्तक अवतरले. हा प्रकार थोडाफार पूर्व आशियाई देशांसारखा वाटत होता. एकंदरीत भारतीय आणि पूर्व आशियाई संस्कृतींचा उत्तम संगम त्या कार्यक्रमात दिसून येत होता. मी थोडेफार फोटो काढले आणि पार्कमधून बाहेर पडलो.

पार्कमधले आलिशान उपहारगृह 

बालिनीज लोकनृत्य


प्राण्यांचे पोशाख घातलेले नर्तक

क्रमशः 

नयनरम्य बाली - भाग 1 - तोंडओळख आणि सहलीची सुरुवात Beautiful Bali - Part 1 - Introduction and the beginning of the trip

बाली – इंडोनेशिया या अगणित बेटांच्या देशातील एक लहानसे नयनरम्य बेट. तसं बाली पर्यटनाच्या नकाशावर जगप्रसिद्ध आहे. त्यामुळे फारशी ओळख करून द्यायची गरज नाही. पण उपचारापुरती या बेटाची काही वैशिष्ट्ये सांगतो. बेट असल्याने इथे सुंदर समुद्रकिनारे तर आहेतच, पण मध्यवर्ती भागात एक नव्हे तर तीन ज्वालामुखी आहेत. यांपैकी अगुंग आणि बतूर सक्रीय आहेत. बालीच्या आजूबाजूचा समुद्र हा सागरी जैव विविधतेने युक्त असून इथे अनेक प्रदेशनिष्ठ प्रजाती आढळतात. सगळ्यात उल्लेखनीय गोष्ट म्हणजे हिंदू परंपरा आणि चालीरीतींचा प्रभाव असलेला इथला समाज. बालीमध्ये पर्यटनाला साधारण १९६० च्या दशकात सुरुवात झाली. अल्पावधीतच हे लहानसे बेट आशिया खंडातले एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ बनले. सागरी क्रीडाप्रकार, ट्रेकिंग, किनाराभ्रमंती, पार्टिंग आणि नाईटलाईफ, किंवा अगदी कौटुंबिक सहल, असा कोणताही पर्यटन प्रकार बालीसाठी त्याज्य नाही. मग तुम्ही बॅकपॅकर असा किंवा हनिमूनर, बालीमध्ये तुमच्यासाठी काही ना काही आहेच. तर असे हे वैशिष्ट्यपूर्ण बेट माझ्या बकेटलिस्ट वर बऱ्याच वर्षांपासून होते. दक्षिण गोलार्धात असल्याने बालीमध्ये ऑक्टोबर ते फेब्रुवारी असा पावसाळा असतो. त्यामानाने मे ते सप्टेंबर वातावरण सौम्य आणि आल्हाददायक असते. त्यात जुलै आणि ऑगस्ट म्हणजे इथला पीक सिझन. या महिन्यांत युरोप मध्ये उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने तिथल्या पर्यटकांचा मोठा ओघ असतो. तसेच, ऑस्ट्रेलियामध्ये थंडीचे दिवस असल्याने तिथूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात किनारा पर्यटनासाठी येतात. त्यातल्या त्यात कमी गर्दीचा आणि कमी उन्हा-पावसाचा म्हणून मी जून महिना तिथे जायला निवडला. एयर एशिया त्रिचीवरून अगदीच स्वस्तात तिकिटे देत होती. म्हणजे, बंगलोर वरून जेवढे तिकीट होते त्याच्या अक्षरशः निम्म्या किमतीत त्रिचीहून तिकीट मिळत होते.  झटक्यात तिकीटं काढली आणि सहलीच्या दिवसाची वाट बघू लागलो.

एका दृष्टिक्षेपात बाली

त्रिचीवरुन सकाळी साडे नऊचे विमान होते. आदल्या दिवशी बंगलोरहून स्लीपर बसमध्ये बसलो. वेळापत्रकानुसार सकाळी सहा वाजता त्रिचीला पोहोचणे अपेक्षित होते. पण साडेसहा वाजत आले तरी बस अजून नमक्कललाही पोहोचली नव्हती. आता मात्र माझा जीव खालीवर होऊ लागला. विमान चुकते की काय अशी भीती वाटू लागली. एकदाची पावणे आठ वाजता बस त्रिचीला पोहोचली. मी लगबगीत खाली उतरलो आणि समोर दिसली त्या रिक्षात बसलो. चालकाला म्हटलं शक्य तितक्या लवकर विमानतळावर पोहोचव. नशिबाने त्रिचीचा विमानतळ शहराच्या जवळच होता. दहा मिनिटातच तिथे पोहोचलो. एकदाचं चेक इन केलं आणि सुटकेचा निश्वास टाकला. यथावकाश विमानाने उड्डाण केलं. थोडी उंची गाठताच कावेरीचं विशाल पात्रं, आजूबाजूची भातशेती, आणि श्रीरंगमच्या प्राचीन मंदिराची उत्तुंग गोपुरं दिसू लागली. या सगळ्या प्रदेशाला rice bowl of India असे म्हणतात. हा तोच प्रदेश जिथे चोळ राजांनी कित्येक शतके राज्य केले. तंजावर आणि श्रीरंगम सारखी मंदिरे बांधली. कावेरीच्या खोर्‍याचे विहंगम दृश्य पाहताना तिथला इतिहास डोळ्यांसमोर तरळत होता.    

त्रिची ते क्वालालांपूर आणि तिथून बाली असा एकूण 13 तासांचा प्रवास होता. विमानप्रवास म्हणजे एक दिव्यच असतं. त्यात एखाद्या ठिकाणी लांब ले-ओवर असेल तर अजूनच कंटाळा येतो. एकदाचा स्थानिक वेळेनुसार रात्री एक वाजता मी बालीच्या देनपसार विमानतळावर उतरलो. इमिग्रेशनला ही भली मोठी रांग. आधीच एवढा मोठा प्रवास. त्यात आदल्या रात्रीची बसमधली अपुरी झोप. कधी एकदा हॉस्टेल वर जाऊन अंग टेकतोय असं झालं होतं. तेवढ्यात काही मराठी शब्द कानावर पडले. पाहतो तर एक वयस्क जोडपं मागेच उभं होतं. काका-काकू मुंबईचेच होते. आठ दिवसांच्या बाली ट्रीपला आले होते. मग त्यांच्याशी गप्पा मारू लागलो. म्हणता म्हणता दोन  तासांची ती इमिग्रेशनची रांग संपली. काका-काकूंना बाय बाय करून मी विमानतळाच्या बाहेर पडलो. हॉस्टेल जवळच होतं. त्या परिसरचा ऑफलाइन नकाशा मी आधीच डाउनलोड करून ठेवला होता. बस किंवा टॅक्सी काही न बघता मी सरळ चालत सुटलो. परक्या देशात निर्जन रस्त्यावरून रात्री तीन वाजता चालताना जरा धाकधूक वाटत होती खरी. पण एवढ्याशा अंतरासाठी उगीच कशाला खर्च करा? मनाचा ठिय्या करून मी नकाशा बघत बघत चालू लागलो. वीसेक मिनिटातच हॉस्टेलची पाटी दिसली. चेक इन केलं आणि सरळ बेडवर आडवा झालो.  

सकाळी जाग आली तेव्हा साडेदहा वाजले होते. हॉस्टेलमधली ब्रेकफास्टची वेळ कधीच संपली होती. मग बाहेर पडलो आसपासचा परिसर बघायला. समुद्रकिनारा अक्षरशः ढेंगभर अंतरावर होता. काल रात्री सामसूम वाटलेला हा परिसर आता मात्र पर्यटकांनी फुलून गेला होता. मी एका लहानशा उपहारगृहात ब्रेकफास्ट केला, लोकल सिम कार्ड घेतले, आणि हॉस्टेलवर परतलो. बालीमध्ये फिरायला एक स्कूटर मी आधीच बुक करून ठेवली होती. ठरल्याप्रमाणे स्कूटरवाला हॉस्टेलवर हजर झाला. सगळी औपचारिकता पूर्ण करून मी स्कूटरचा ताबा घेतला. पाच मिनिटं शांतपणे बसून आज कुठे कुठे जायचे आहे त्याची एक रूपरेषा बनवली. मग सगळी तयारी करून हेलमेट चढवले आणि गणपती बाप्पा मोरया म्हणत स्कूटर चालू केली.            

क्रमशः