नयनरम्य बाली – भाग ७ – बालीतील मंदिरांचे स्थापत्यसौंदर्य Beautiful Bali – Part 7 – Architectural beauty of Balinese temples

रिज  वॉक आणि राइस टेरेस यांनी माझ्या ऊबुदच्या स्थलदर्शनाची सुरुवात झाली होती. पैकी राइस टेरेसने काहीसा अपेक्षाभंगच केला होता. आता आसपासची काही मंदिरे बघायची होती. एव्हाना दुपारचा एक वाजत आला होता. चांगलीच भूक लागली होती. वाटेत कुठेतरी थांबू असा विचार करत हळू हळू स्कूटर चालवत होतो. एवढ्यात एक भलेमोठे भाताचे शेत दृष्टीस पडले. इथे काही उतारावरची खाचा पाडलेली जमीन नव्हती. पण तरीही सर्वदूर पसरलेला पोपटी रंग फारच आल्हाददायक वाटत होता. फोटो काढूया असं म्हणून मी स्कूटर जरा बाजूला घेतली. तेवढ्यात बाजूच्या उपहारगृहातली तरुणी आत चला असा आग्रह करत बाहेर आली. एकंदरीत बरं दिसत होतं हॉटेल. मग मी थेट आत शिरलो. भाताचे शेत दिसेल अशी मोक्याची जागा निवडली आणि निवांत बसलो. दुर्भाग्याने इथल्या मेनूकार्डवर फार काही शाकाहारी पदार्थ नव्हते. मग तिथल्या वेटरलाच विचारलं, लगेच काय मिळेल. गाडो-गाडो हा इंडोनेशियन पदार्थ जवळपास तयारच होता. हा पदार्थ म्हणजे मोड आलेली कडधान्ये, तोफू, सलाडची पाने, आणि उकडलेल्या भाजांचे मिश्रण असते. इंडोनेशियन शाकाहारी जेवणात हा पदार्थ लोकप्रिय आहे. समोरचे हिरवेगार शेत बघत बघत जेवण केले आणि पुढच्या जागेचा रस्ता नकाशावर शोधू लागलो.  

हिरवीगार भातशेती 

गाडो-गाडो 

आता वेळ आली होती मंदिरदर्शनाची. बाली जितकं समुद्रकिनार्‍यांसाठी प्रसिद्ध आहे तितकंच इथल्या मंदिरांसाठी प्रसिद्ध आहे. इथली मंदिरे भारतातल्या मंदिरांपेक्षा एकदम वेगळी असतात. मंडप, गाभारा, कळस, मूर्ती असं काहीच त्यांत नसतं. असते ते एक मोठे प्रांगण. हे प्रांगण तीन भागांत विभागलेले असते, ज्यांना मंडल म्हणतात. त्यांपैकी बाहेरचा भाग म्हणजे निष्टा मंडल किंवा जाबा. हा भाग कमी पवित्र मानला जातो. या भागात बाले कुलकुल म्हटले जाणारे ढोल लटकवलेले मनोरे असतात. हा ढोल वाजवून गावकर्‍यांना घोषणा करण्यासाठी एकत्र बोलावले जाते. या भागाचे प्रवेशद्वार हे कमान असलेले असते आणि बाहेर दोन द्वारपाल असतात. त्यापुढे असते मद्य मंडल किंवा जाबा तेंगाह. या भागाचे प्रवेशद्वार विभाजित असते आणि त्यावर कमान नसते. याला कांडी बेंतार असे म्हटले जाते. बालीमध्ये सर्वत्र दिसणारा हा स्थापत्यघटक म्हणजे दुभंगलेला मेरू पर्वत आहे. स्थानिक पुराणानुसार शंकराने मेरू पर्वत भारतातून बालीमध्ये आणला आणि दोन भागांत विभागला. हे दोन भाग सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जेचे प्रतिनिधित्व करतात. त्यांच्यात कायम संतुलन असावे असा संदेश देतात. मद्य मंडलात काही ढोल असलेले मनोरे तर काही मंडप असतात. सगळ्यात आतमध्ये असते उतमा मंडल किंवा जेरोअन. हे सगळ्यात पवित्र मंडल समजले जाते. यात पूर्वजांचे प्रतिनिधित्व करणारे मनोरे असतात. मंदिरात सर्वत्र आढळणारा स्थापत्यघटक म्हणजे पद्मासन. बहुतेक सगळ्या हिंदू देवता इथल्या धर्मात पूजनीय असल्या तरी हा धर्म एकेश्वरवादी आहे. यांचा ईश्वर, ज्याला सांग हयांग विधी वासा म्हटले जाते, तो निर्गुण व निराकार आहे. त्याला कोणत्याही मूर्तीतून व्यक्त करता येत नाही. म्हणून दगडातून घडवलेले एक आसन, ज्याला पद्मासन म्हणतात, सर्वत्र उभारले जाते. असे मानले जाते की प्रार्थनेच्या वेळी विधी वासा या आसनावर अवतरतो व स्थानापन्न होतो. सोळाव्या शतकातील एक धर्मगुरू दांग हयांग निरर्था यांनी मांडलेल्या तत्वज्ञानावर ही मंदिर रचना आधारित आहे. एकंदरीत भारतातील हिंदू घटकांचा प्रभाव असलेली पण स्थानिक श्रद्धास्थानांचा अंतर्भाव करणारी इथली मंदिररचना फारच इंट्रेस्टिंग आहे.

माझ्या रूपरेषेतले पहिले मंदिर होते गुनुंग कावी सेबतू. हे मंदिर एका लहानशा टेकडीच्या बाजूला होते. फारसे प्रसिद्ध नसल्याने इथे गर्दी नव्हती. सगळा परिसर अतिशय रम्य वाटत होता. सारोंग गुंडाळून मी आत गेलो. एका बाजूला एका तळ्याच्या मध्यात वीणावादन करणार्‍या सरस्वतीची शुभ्र पांढरी मूर्ती होती. मूर्तीची प्रमाणबद्धता, अलंकार, चेहर्‍यावरचे पवित्र भाव, सारेच अद्भुत होते. त्या रम्य वातावरणात ती सुंदर मूर्ती इतकी लोभस वाटत होती की मी तिथेच बराच वेळ फोटो काढत बसलो. मग मंदिराचे इतर काही भाग बघितले. दुसर्‍या टोकाला अजून एक तळे होते. त्याच्या काठाशी सजवलेले पद्मासन होते. मागे असलेल्या हिरव्यागार झाडीच्या पार्श्वभूमीवर ते पद्मासन फारच विलोभनीय वाटत होते. मंदिराच्या उतमा मंडलात पर्यटकांना प्रवेश नव्हता. मग मी तिथे थोडेफार अजून फोटो काढून पुढच्या मंदिराकडे वळलो.

तळ्याच्या मध्यात असलेली सरस्वतीची मूर्ती 

मंदिरातील कुंड 

मंदिराचा रम्य परिसर 

पद्मासन 

सरस्वतीच्या चेहऱ्यावरचे भाव 

पुढचे मंदिर होते पुरा तीर्था एमपुल. Holy Spring Water Temple या नावाने हे मंदिर पर्यटकांत प्रसिद्ध आहे. अपेक्षेप्रमाणे इथे बर्‍यापैकी गर्दी होती. जवळच्या एका झर्‍याचे पाणी इथे एका कुंडातून सदासर्वकाळ वाहत असते. त्याखाली आंघोळ करून मग आत प्रार्थनेसाठी जायचे असा रिवाज आहे. बघतो तर कुंडात आंघोळ करायला ही मोठी रांग. शिवाय स्वतःच्या वस्तू ठेवायला लॉकरची वेगळी रक्कम. मी तो विचार सोडून दिला आणि सारोंग गुंडाळून थेट मंदिरात शिरलो. हे मंदिर तसे प्रशस्त होते. पाण्याचे कुंड अपेक्षेपेक्षा फारच स्वछ दिसत होते. लोकही शिस्तीत उभे होते. काश भारतात कधी असे चित्र बघायला मिळेल. मंदिरातले एक द्वार फारच सुंदररित्या सुशोभित केले होते. इथे सेलफी काढायला लोकांची रांग लागली होती. उतमा मंडलात प्रवेश नव्हताच. पण आतमध्ये पारंपरिक पोषाखातील काही स्थानिक लोक प्रार्थना करत होते. एक पुजारी त्यांना संबोधित करत होता. उदबत्त्यांचा सुगंध सर्वत्र दरवळत होता. प्रत्येकाने आपापले कनांग सारी पूजेकरता आणले होते. कुठलाही गोंगाट नाही, घंटांचा खणखणाट नाही, ढकलाढकली नाही. केवळ शांतपणे केली जाणारी प्रार्थना. त्यांचे विधी आणि रिवाज बघत मी थोडा वेळ थांबलो. फार छान वाटलं.  

कुंडात आंघोळ करणारे पर्यटक 

जवळचे दुसरे कुंड 

प्रार्थना करणारे स्थानिक लोक 

पुढचं मंदिर होतं पुरा गुनुंग कावी. हे मंदिर अकराव्या शतकात बांधलेल्या छेदाष्म थडग्यांसाठी प्रसिद्ध आहे. उदयान साम्राज्यातील राजा अनक वांगसु याच्या राण्या आणि संतती यांच्यासाठी असलेली ही थडगी पेरकसान नदीच्या दोन बाजूंनी असलेल्या डोंगरांत कोरलेली आहेत. मंदिराच्या बाहेर स्कूटर लावली तेव्हा ढग दाटून आले होते. मंदिर नदीच्या खोर्‍यात होते. बर्‍याच पायर्‍या खाली उतरून जायचे होते. मी खाली उतरु लागलो आणि तेवढ्यात बारीक पावसाला सुरुवात झाली. पायर्‍या संपल्या आणि समोर एक भाताचे शेत दिसू लागले. दाटून आलेले ढग, भुभुरणारा पाऊस, लांबून येणारा नदीच्या प्रवाहाचा आवाज, हिरवीगार भातशेती, सारेच विलोभनीय होते. तिथून पुढे अजून काही पायर्‍या उतरून थडग्यांच्या परिसरात पोहोचलो. उंच ताशीव कड्यांमध्ये गुहा कोरून त्यात मंदिराच्या कळसासारखी शिल्पे कोरली होती. ते बघून मला अजिंठा-वेरूळची लेणी आठवली. किंबहुना जॉर्डन मधील पेट्रा येथील थडगी या थडग्यांशी अधिक मिळतीजुळती होती. समोर नदीचा प्रवाह खळाळत होता. काठाने उंच आणि दाट झाडं होती. एखाद्या घनदाट अरण्यात यावं आणि समोर एखाद्या पुरातन स्मारकाचे अवशेष सापडावेत तसं वाटत होतं. तिथे थोडेफार फोटो काढले आणि मागे वळलो.

दरीतली भातशेती 

दाट झाडीतून वाहणारी नदी आणि मागची मंदिरे 

छेदाष्म थडगी 

पावसाळी वातावरणात तिथे गूढ वाटत होते 

हिरवीगार दरी 

आता आजचे शेवटचे मंदिर होते गोवा गजह मंदिर. उघडं तोंड असलेल्या आकाराच्या गुहेसाठी हे मंदिर पर्यटकांत प्रसिद्ध आहे. मंदिराचा परिसर बराच मोठा होता. तिकीट काढून आणि सारोंग गुंडाळून मी आत शिरलो. डाव्या हाताला गुहा होती. फोटोत दिसते त्यापेक्षा ही गुहा लहानच होती. वाकून मी आत शिरलो. उदबत्त्यांचा धूर पसरला होता. आतली उष्णता, आर्द्रता, आणि धूर यांमुळे घुसमटायला होत होतं. गुहेत एका बाजूला गणपतीची मूर्ती होती तर एका बाजूला शिवलिंग होते. आत काही फार वेळ थांबता येत नव्हतं. मी लगेचच बाहेर आलो. बाहेरचे मंदिर काहीसे इतर मंदिरांसारखेच होते. वेगवेगळ्या प्रकारचे मनोरे आणि पद्मासन दिसत होते. इथले अजून एक वैशिष्ट्य म्हणजे भलेमोठे पाण्याचे कुंड. यात सात देवतांच्या मूर्ती आहेत. या मूर्ती गंगा, यमुना, सरस्वती, नर्मदा, सिंधु आणि कावेरी अशा भारतातल्या सात नद्यांचे प्रतिनिधित्व करतात. पलीकडे एक वाट एका दरीत उतरताना दिसत होती. तिथे काही बौद्ध स्तूप आणि लहान मंदिरे होती. तिथे थोडीफार फोटोग्राफी करून मी बाहेर पडलो.

आज दिवसभर चांगलीच तंगडतोड झाली होती. त्यामुळे आता जीव थकला होता. मी लगेच होमस्टेवर परतलो. एव्हाना सात वाजलेच होते. थोडा वेळ विश्रांती घेऊन जेवायला बाहेर पडलो. ऊबुद मधला मुख्य बाजार रस्ता हाकेच्या अंतरावर होता. तिथे थोडा वेळ फेरफटका मारून मोक्षा कॅफे नावच्या प्रसिद्ध उपहारगृहात जेवायला गेलो. आतला अॅम्बियन्स छानच होता. बसायला बैठक आणि चौरंगासारखे टेबल होते. मुख्य म्हणजे हे उपहारगृह संपूर्ण वीगन होते. भारताबाहेर अशी जागा सापडणे आधीच मुश्किल. इथे तर स्थानिक आणि पाश्चात्त्य अशा वेगवेगळ्या संपूर्ण शाकाहारी पदार्थांची रेलचेल होती. मग त्यातला बालीनीज करी हा पदार्थ मागवला. ही करी तशी थाई करीसारखीच होती. पण मसाले काहीसे वेगळे होते. मनसोक्त जेवून मग मुक्कामाच्या ठिकाणी परतलो. उद्या चेक आऊट करायचे होते. मग सामान बांधून ठेवून झोपी गेलो.

गोवा गजह मंदिरातील कुंड आणि नद्यांच्या मूर्ती 

मंदिरातील प्रसिद्ध गुहा 

गुहेतील गणपतीची मूर्ती 

गुहेतील शिवलिंगे 

दरीत उतरणारी वाट 

क्रमशः 

नयनरम्य बाली – भाग ६ – मुक्काम पोस्ट ऊबुद Beautiful Bali - Part 6 - In Ubud

नुसा लेंबोंगानची सहल आटोपून मी सनूर पोर्टवर पोहोचलो तेव्हा साधारण सहा वाजले होते. आता कुटामधल्या हॉस्टेलवर जाऊन बॅग घ्यायची होती आणि ऊबुदला जायचे होते. मग लगेचच स्कूटर चालू केली आणि हॉस्टेलच्या दिशेने निघालो. सकाळी मोकळा दिसलेला हा रस्ता आता मात्र वाहनांनी खचाखच भरला होता. अक्षरशः बंगलोर किंवा मुंबईची आठवण व्हावी एवढं ट्रॅफिक होतं. आधीच स्नोर्केलिंगमुळे थकलो होतो. त्यात या ट्रॅफिकने जीव नकोसा केला होता. अखेरीस इंच इंच लढवत दीड तासाने मी हॉस्टेलवर पोहोचलो. रिसेप्शनवर विक्टरच होता. मला इथून ऊबुदला जायचे आहे असं समजताच त्याने मला अजून एका तासाने निघण्याचा सल्ला दिला. बाहेर ट्रॅफिक किती होतं ते मी अनुभवलं होतंच. तशीही मला थोडी विश्रांती हवी होती. मग मी तिथून बॅग उचलली आणि जवळच्या उपहारगृहात जेवायला गेलो. आज परत भात आणि भाज्या खायची इच्छा नव्हती. मग एक पिझ्झा मागवला. जेवण होईपर्यंत नऊ वाजलेच. गुगलवर ट्रॅफिक बघितले. विक्टर म्हणाला तसे एव्हाना ट्रॅफिक कमी झाले होते. मग सुसाट निघालो ऊबुदच्या दिशेने. खरे तर ऊबुदचा रस्ता सनूर पोर्टवरूनच जात होता. किंबहुना सनूर पोर्ट ऊबुद आणि कुटाच्या बरोब्बर अर्ध्या अंतरावर होते. सकाळीच बॅग घेऊन निघालो असतो तर एवढा हेलपाटा पडला नसता. आणि पोर्टवर बोट कंपनीच्या ऑफिसमध्ये बॅग पण ठेवता आली असती. थोडा प्लॅन चुकलाच. असो. 

ऊबुद मधील वैशिष्ट्यपूर्ण राईस टेरेस 

ऊबुद म्हणजे बालीची सांस्कृतिक राजधानी. बालीच्या मध्यवर्ती भागात काहीशा डोंगराळ भागात वसलेले हे शहर इथल्या योग प्रशिक्षण केंद्रांसाठी आणि वीगन खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर इथली काही प्रसिद्ध मंदिरे, भातशेती, पुरातन राजवाडे आणि वस्तुसंग्रहालये या शहराच्या सौंदर्यात भर घालतात. या जागेचा इतिहास अगदी आठव्या शतकापर्यंत जातो. त्या काळी जावा बेटावरून ऋषि मार्कंडेय इथे आले आणि इथल्या दोन नद्यांच्या संगमाजवळ त्यांनी ध्यानधारणा केली. पुढे त्यांनी त्या जागी गुनुंग लेबाह या मंदिराची स्थापना केली. तेव्हापासून या जागेला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. इथल्या परिसरात अनेक औषधी वनस्पती सापडत. स्थानिक भाषेत उबद म्हणजे औषध. म्हणूनच या जागेला ऊबुद असे नाव मिळाले. पुढच्या चारशे वर्षांत इथे अनेक मंदिरे आणि धार्मिक शिक्षण देणार्‍या संस्था बांधल्या गेल्या. त्यामुळे या जागेचे महत्त्व उत्तरोत्तर वाढतच गेले. चौदाव्या शतकात माजापहीत साम्राज्याखाली आल्यानंतर इथली संस्कृती बहरत गेली. त्या काळात रूढ झालेल्या चालीरीती आजही इथल्या समाजात दिसतात. साधारण विसाव्या शतकात बालीमधले पर्यटन वाढू लागले. ऊबुदचे सांस्कृतिक महत्त्व आणि आजूबाजूचे निसर्गसौंदर्य यांमुळे ही जागा लवकरच एक लोकप्रिय पर्यटनस्थळ बनली. 

ऊबुदमध्ये माझा दोन रात्री मुक्काम होता. इथे एक होमस्टे बुक केला होता. पोहोचेपर्यंत साडेदहा वाजले होते. होमस्टेचे यजमान कुटुंब झोपायच्या तयारीत होते. यजमान बाई अगदीच प्रेमळ होत्या. एवढा उशीर झाला होता तरी त्यांनी यथोचित आगत-स्वागत केले. दिवसभरच्या दगदगीने मी पार थकलो होतो. चेक इन करून लगेच झोपी गेलो. सकाळी जरा उशीराच उठलो. आज तसेही इथले आसपासचे स्थलदर्शन करायचे होते. यजमान बाई नाश्ता बनवत होत्या तोपर्यंत मी जरा घर आणि आजूबाजूचा परिसर पहायला निघालो. अगदी टिपिकल बालीनीज पद्धतीचे घर होते. घराच्या प्रांगणातच एक लहानसे मंदिर होते. आपल्याकडे जुन्या वाड्यांत जसे मोठे देव्हारे असतात तसाच काहीसा प्रकार वाटत होता. बालीमधल्या प्रत्येक घरात असे एक मंदिर असते. असे म्हणतात की बालीमध्ये घरे कमी आणि मंदिरे जास्त आहेत. मंदिराच्या पायरीवरच एका पानांच्या परडीवर फुले आणि उदबत्या ठेवलेल्या होत्या. याला कानांग सारी असे म्हणतात. आपण देवापुढे नैवेद्य ठेवतो तसे इथे मंदिराच्या किंवा घराच्या बाहेर कानांग सारी ठेवायची पद्धत आहे. घरातले मंदिर अगदी सुबक होते. प्रवेशद्वारावरच एक सुंदर गणपतीची मूर्ती होती. आतमध्ये बरेच मनोरे होते. प्रत्येकावर उतरती छपरे होती. मध्यभागी पद्मासन होते. सगळी रचना अत्यंत सुबक आणि नीटनेटकी होती. उदबत्त्यांचा सुगंध दरवळत होता. तेवढ्यात नाश्ता तयार असल्याचे बाईंनी सांगितले. काळा भात आणि त्यावर नारळ आणि गुळाचा पाक असा बेत होता. सोबत काही फळे होती. काळा भात बघून माझे जर्मनीत असतानाचे त्याबाबतीतले फसलेले प्रयोग आठवले. नक्की घशाखाली जाईल की नाही याची चिंता वाटू लागली. शेवटी सगळे विचार बाजूला सारून मी पहिला घास खाल्ला. आणि काय चव होती! काळ्या भाताचा सुगंध काहीसा वेगळाच होता. नारळ आणि गुळाच्या पाकामुळे थोडीफार नारळीभातासारखी चव वाटत होती. सगळा बेत मस्तच जमला होता. पोटभर नाश्ता करून मी स्थलदर्शनाला निघालो. 

घरासमोर ठेवलेले कनांग सारी 

यजमानांच्या घरात असलेले मंदिर आणि त्यातले मनोरे 

मंदिराच्या बाहेर असलेली गणपतीची मूर्ती 

ऊबुद म्हणजे निसर्ग आणि संस्कृती यांचे वैशिष्ट्यपूर्ण मिश्रण आहे. माझा पहिला थांबा होता कांपुहान रिज वॉक. हा एक जवळच्या टेकडीवर जाणारा छोटासा ट्रेल होता. चढून जायचे असल्याने ही जागा मी पहिली निवडली होती. टेकडीच्या पायथ्याशी मी स्कूटर लावली आणि वर चढू लागलो. तितक्यात एक सुंदरसे मंदिर दृष्टीस पडले. आजूबाजूची हिरवळ, खालून वाहणारा नदीचा प्रवाह, आणि मंदिरातली गूढ शांतता, सारेच रम्य वाटत होते. ट्रेल तसा सोपाच होता. अनेक पर्यटक तिथून जात होते. नशीबाने फार गर्दी नव्हती. थोड्याच वेळात टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. इथून शहराचा सुदूर परिसर दिसत होता. आजूबाजूची हिरवाई प्रसन्न वाटत होती. साधारण दोनेक किमी लांबीचा ट्रेल असेल. मी दुसर्‍या टोकापर्यंत पोहचलो. तिथे एक छोटासा कॅफे होता. तिथे बसून एक मस्त कॉफी मागवली. बरेच पर्यटक तिथूनच शहराच्या दुसर्‍या भागात जात होते. मी मात्र स्कूटर टेकडीच्या पायथ्याशी लावलेली असल्याने तिथून परत मागे वळलो. थोडेफार फोटो काढून खाली उतरलो. पुढचा थांबा होता तेगालांग राईस टेरेस. डोंगरउताराला चरे पाडून सपाट जमीन बनवून त्यावर केलेली भातशेती म्हणजे राईस टेरेस. आपल्याकडे उत्तराखंड किंवा हिमाचल प्रदेश या राज्यांत हा प्रकार आढळतो. बालीमधली ही अशा प्रकारची शेती कमालीची प्रसिद्ध आहे. नक्की त्यात काय विशेष आहे ते बघण्यास मी उत्सुक होतो. तिथवर पोहोचलो तर ही तोबा गर्दी! किती तरी वेळ पार्किंगला जागाच मिळेना. शेवटी एका दुकानदाराला जास्तीचे पैसे देऊन त्याच्या दुकानासमोर स्कूटर पार्क केली. राईस टेरेसचेही वेगळे तिकीट होते. एकदाचा आत शिरलो. समोर बघतो तर काय, एक लहानशी दरी होती आणि त्यात अधेमधे चरे पाडून भाताची रोपे लावली होती. मध्येमध्ये लाकडाच्या राहुटया उभारल्या होत्या. पर्यटक चिखलातून चालत होते आणि फोटो काढत होते. मधेच कुठे झोपाळे बांधले होते तर कुठे बदामाच्या आकाराचे प्रोप्स उभारून फोटो स्पॉट बनवले होते. नक्की शेत होते की सहलीची जागा हेच कळेना! आणि निदान दृश्य रम्य असावे तर तसेही काही खास नव्हते. आणि म्हणे वर्ल्ड हेरिटेज साइट! एकंदरीत ही जागा माझ्या खि फार पसंतीस पडली नाही. मी उपचारापुरते दोन-चार फोटो काढून तिथून बाहेर पडलो. 

टेकडीच्या पायथ्याचे मंदिर आणि वर जाणारी पायवाट 

रिज वॉक वरची हिरवाई  

कांपुहान रिज ट्रेल 

कॅफे कडे जाणारी वाट 

राईस टेरेस 


क्रमशः 

नयनरम्य बाली – भाग ५ – नुसा लेंबोंगान आणि स्नोर्केलिंगचा थरार Beautiful Bali - Part 5 - Nusa Lemongan and snorkeling adventure

जाग आली तेव्हा सव्वासात वाजले होते. मी ताडकन उठून बसलो. नुसा लेंबोंगानला जाणारी बोट नऊ वाजता सुटणार होती. मात्र त्यासाठी आठ वाजता सनूर पोर्टवर चेक इन करायचे होते. हॉस्टेल पासून तिथपर्यन्त अंतर होते १८ किमी! सत्यानाश! आता बोट सुटणार आपली! मी झटक्यात आवरलं आणि चेक आऊट केलं. बॅग तिथेच काउंटरवर ठेवली. ना चहा ना नाश्ता. तसाच स्कूटरवरुन सनूर च्या दिशेने निघालो. काल ज्या बाईशी बोलून बुकिंग केलं होतं तिला फोन करून मी सव्वाआठपर्यन्त येतोय असं सांगितलं. नशिबाने सकाळची वेळ असल्याने फार ट्रॅफिक नव्हतं. म्हणता म्हणता एकदाचा साडेआठला पोर्टवर पोहोचलो. चेक इन वगैरे केलं. मग तिथल्या वेटिंग रूम मध्ये बसायला गेलो. बघतो तर काय, तिथे दोन-चारच टाळकी दिसत होती. म्हणजे एवढी पळापळ करूनही मी लवकरच पोहोचलो होतो. असो. अजून बराच वेळ आहे असं बघून मी जवळच्या उपहारगृहात नाश्ता केला आणि परत बोट सुटायची वाट बघत वेटिंग रुममध्ये येऊन बसलो. अखेरीस साडेनऊ वाजता बोटीत चढायला सांगण्यात आले. इथे ना जेट्टी होती ना वर चढायला पायर्‍या. गुडघ्याएवढ्या पाण्यातून चालत जात तिथल्या माणसाचा हात धरून अक्षरशः बोटीत उडी मारायची होती. अर्धा तर इथेच भिजलो. उत्तम सुरुवात आहे असं म्हणत मी आत जाऊन बसलो. 

नुसा लेंबोंगानचा किनारा 

डेविल्स टियरच्या बाजूचा बीच  

बोट चांगलीच वेगवान होती. चहूबाजूंनी पाण्याचे तुषार उडवत लीलया पुढे चालली होती. अर्ध्या तासातच नुसा लेंबोंगान आले. इथून पुढे तुम्ही जे पॅकेज बुक केले असेल त्याप्रमाणे गाईड तुम्हाला घेऊन जात होते. मी नुसा लेंबोंगानवरचे स्थलदर्शन आणि स्नोर्केलिंग असं पॅकेज बुक केलं होतं. गम्मत म्हणजे हे पॅकेज बुक केलेला मी एकटाच होतो. थोडक्यात मला पर्सनल गाइडेड टूर मिळणार होती. अपेक्षेप्रमाणे गाईड स्कूटर घेऊन आला. त्याचं नाव होतं ली. ली हा तिथला स्थानिक होता. त्याच्याशी गप्पा मारता मारता आमची नुसा लेंबोंगान सहल सुरू झाली. पहिलेच स्थळ होते डेविल्स टियर. ही जागा नुसा दूआवरच्या वॉटरब्लो सारखी, मात्र त्यापेक्षा बरीच मोठी होती. अर्धवर्तुळाकृती खडकाळ किनारा होता. त्याखाली एक भलीमोठी गुहा होती. त्यावर समुद्राच्या लाता आदळून पाणी उंच उडत होतं. गरजणार्‍या दर्याचा आवाज सर्वत्र घुमत होता. लीच्या मते आज समुद्राला फारसा आवेग नव्हता. नाहीतर याहीपेक्षा पाणी उंच उडतं म्हणे. मला तर उडणार्‍या पाण्यापेक्षा तो खडकाळ किनारा आणि पाण्याचा गडद निळा रंग जास्त मोहक वाटत होता. तिथे थोडे फोटो काढल्यावर ली मला उजव्या बाजूने किनार्‍याच्या दुसर्‍या बाजूला घेऊन गेला. इथे कमालीची शांतता होती. तुरळक पर्यटक होते. किनार्‍यावर लहानमोठे खड्डे होते. त्यावर लाटा आदळून उंच उडत होत्या. वारा भन्नाट सुटला होता. इथे चिक्कार फोटो काढले. लीकडून स्वतःचे पण फोटो काढून घेतले. मग आम्ही स्कूटरवरून त्याच किनार्‍याच्या पुढच्या भागात गेलो. इथे सुंदर असा वाळूचा किनारा होता. असंख्य पर्यटक पाण्यात मस्ती मजा करत होते. किनार्‍याच्या वरच्या बाजूला एक छानसे रेस्तोरंट होते. तिथून किनार्‍याचे सुंदर दृश्य दिसत होते. एक कॉफी मागवली आणि थोडा वेळ किनार्‍यावर येणार्‍या लाटा बघत बसलो. 

डेविल्स टियरवर उसळणार्‍या लाटा  

समुद्राखालच्या गुहेतले गर्द निळे पाणी 

अर्धवर्तुळाकृती खडकाळ किनारा आणि त्यावर आदळणार्‍या लाटा 

आता वेळ आली होती स्नोर्केलिंगची. पहिल्यांदाच करणार होतो. नक्की प्रकार काय असतो याची थोडीफार कल्पना होती. पण पोहता येत नव्हते आणि पाण्याची थोडी भीतीही होती. तरीही पाण्याखालचे जग बघायला मिळणार म्हणून प्रचंड उत्सुकताही होती. थोड्याच वेळात आम्ही त्या जागी पोहोचलो. इथे किनार्‍यावरच्या एका रेस्तोरंटवर मला सोडून तीन वाजता घ्यायला येतो असे सांगून ली निघून गेला. रेस्तोरंटमध्ये तसं कुणीच नव्हतं. एकच गोरा मुलगा बसलेला दिसला. तोही स्नोर्केलिंगसाठीच आला होता. ओळख-पाळख झाली. हा होता जर्मनीचा वेलेण्टिन. मग त्याच्याशी जर्मन मध्ये गप्पा मारू लागलो. मला जर्मन येतं हे बघून तो तर एकदमच आश्चर्यचकित झाला. आमची चांगली गट्टी जमली. तेवढ्यात स्नोर्केलिंगचा गाईड आला. माझ्या सगळ्या वस्तू तिथल्या एका लॉकर मध्ये ठेवून फक्त स्विमिंगसूट घालून मी निघालो. वेलेण्टिन सोबत होताच. चला, सोबत कोणी तरी आहे, असं बघून मला जरा दिलासा वाटला. मग आम्ही तिघे एका लहानशा बोटीतून निघालो. सुरूवातीला केरळच्या बॅकवॉटरसारखा वाटणारा तो भाग अचानक खुल्या समुद्रात बदलला. पाणी शांतच होतं. जेमतेम वीसेक फूट खोली असेल. आणि इतकं नितळ होतं की इथूनच तळ दिसत होता. मग गाईडने आम्हाला स्नोर्केलिंगचे उपकरण दिले आणि म्हणाला मारा उड्या! आता मात्र माझी तंतरली. अरे तू गाईड आहेस, तू हे शिकवायला हवस, मी मनोमन म्हणत होतो. पण हे त्याला कसं सांगणार! शिवाय भाषेचा प्रश्नही होताच. इकडे वेलेण्टिन सगळा जामानिमा करून उडी मारायला तयार. एकंदरीत माझा चेहरा बघून त्या दोघांना कल्पना आली. मग वेलेण्टिनने मला सगळी प्रक्रिया समजावून सांगितली. त्याने आधी बर्‍याच वेळा स्नोर्केलिंग केले होते. ते उपकरण कसे नाकावर घट्ट लावायचे आणि कसा तोंडाने श्वास घ्यायचा हे त्याने नीट समजावले. आता प्रश्न होता पोहण्याचा. फ्लोटिंग जॅकेट तर घातले होतेच. त्यामुळे बुडण्याची शक्यता नव्हती. पण पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेलो तर? माझी ही अडचण समजून गाईडने एक प्लास्टिकची एक तरंगणारी चौकट दोरीला बांधून पाण्यात फेकली. म्हणाला याला पकडून पाण्यात बघत रहा. हळू हळू धीर करून मी पाण्यात उडी मारली. दोन्ही हातांनी त्या चौकटीला घट्ट पकडून चेहरा पाण्याखाली नेला. आणि काय ते दृश्य! रंगीबेरंगी प्रवाळ आणि त्यावर पोहणारे लहान-लहान मासे! त्यातले धमक पिवळ्या रंगाचे प्रवाळ तर फारच आकर्षक दिसत होते. त्यांचे आकार तर कित्ती वेगवेगळे! काही हातातल्या पंख्यासारखे, काही काटेरी झुडुपांसारखे, काही गोल स्पंजसारखे, तर काही वळवळणार्‍या सापासारखे. सगळे दृश्य अगदी डिस्कवरी चॅनेल वर दाखवतात तसे दिसत होते. काश माझ्याकडे गो-प्रो असता! 

स्नोर्केलिंगसाठी जाताना   

चौकटीला धरून स्नोर्केलिंग करताना  

गाईड बोट हळूहळू पुढे नेत होता. त्यामुळे मला थोड्याफार आजूबाजूच्या भागाचे दर्शन घडत होते. आता श्वास घ्यायची प्रक्रिया चांगली अंगवळणी पडली होती. पाण्यात पाय मारता पण येऊ लागले होते. सुंदर जलसृष्टीचे दर्शन घडत होते. तसे इथले बरेचसे प्रवाळ ब्लीच झालेले दिसत होते. माशांची संख्याही खूप जास्त नव्हती. पण जे काही जलजीवन दिसत होते ते अद्भुत होते. मधूनच वेलेण्टिन माशासारखा पोहत येत मी जीवंत आहे की नाही बघत होता. मला तर त्याची असूया वाटत होती. आणि एकीकडे आपल्याला पोहता येत नसल्याची लाजसुद्धा. पुढच्या वेळी पाण्याचे कुठले खेळ करायला यायचं तर पोहणं शिकूनच यायचं असा मनोमन निश्चय केला. तासभर स्नोर्केलिंग करून मी बोटीवर आलो. मग गाईडने बोट मागे वळवली. एवढा वेळ पाण्यात खेळून आता चांगलीच भूक लागली होती. रेस्तोरंटवर पोहोचलो तेव्हा जेवण तयारच होते. पटकन आवरले आणि बीचवरच्या आडव्या खुर्चीवर बसलो. आज गप्पा मारायला वेलेण्टिन सोबत होता. मग आमच्या वेगवेगळ्या विषयांवर गप्पा रंगल्या. जर्मनीतले आयुष्य आणि भारतातले आयुष्य, जगातली वेगवेगळी पर्यटनस्थळे आणि तिथली संस्कृती, असे बरेच विषय होते. एकंदरीत वेळ छान गेला. तेवढ्यात ली आलाच. मग वेलेण्टिनला बाय बाय करून मी लीसोबत परतीच्या वाटेवर निघालो. अधेमधे थांबून थोडेफार फोटो काढले. मग चार वाजताची बोट पकडून पुन्हा बालीला पोहोचलो.

बीचवरच्या खुर्चीवर बसून जेवणाची वाट बघताना 

फ्राइड नूडल्स 


क्रमशः 

नयनरम्य बाली – भाग ४ – ग्रीन बाउल बीच आणि नुसा दुआ Beautiful Bali - Part 4 - Green Bowl beach and Nusa Dua

बालीचा दक्षिण किनारा म्हणजे एकापेक्षा एक सरस अशा बीचेसची मेजवानी आहे. समुद्र आवडणार्‍या पर्यटकांसाठी हा भाग म्हणजे जणू स्वर्गच. काल उलूवातू आणि सुलूबान असे दोन क्लिफ बीच पहिले होते. पण तिथल्या गर्दीने सगळा विचका केला होता. मग आज ठरवलं आधी नीट होमवर्क करायचा आणि मग शांत आणि सुंदर समुद्रकिनारे हुडकायचे. ब्रेकफास्ट करता करता हॉस्टेलमधल्या काही पर्यटकांशी बोललो. बहुतेक सगळे सर्फिंग किंवा पार्टिंग करणारे होते. मला त्यांपैकी काहीच नको होते. मग रिसेप्शनवर असलेल्या व्हिक्टरशी गप्पा मारू लागलो. परवा रात्री अडीच वाजता यानेच माझे चेक इन केले होते. त्यामुळे त्याच्याशी एव्हाना चांगली ओळख झाली होती. मला नक्की कशा प्रकारचा बीच हवा आहे हे मी त्याला समजावून सांगितले. मग त्याने काही जागा सुचवल्या. स्थानिक लोकांशी गप्पा मारल्या की एखाद्या ठिकाणच्या अशा काही गोष्टी कळतात की त्या कुठल्याच टुरिस्ट गाईडमध्ये सापडणार नाहीत. दिवसभराची रूपरेषा ठरवली आणि बाइक चालू केली. वातावरण आजही छानच होते.

ग्रीन बाउल बीच 


पार्किंगच्या जागेवरून दिसणारा ग्रीन बाउल बीच 

काल पार्ककडे जायला जे वळण घेतले होते त्याच्या अलिकडचे वळण घेऊन मी ग्रीन बाउल बीचकडे निघालो. हा बीच म्हणजे बालीमधला एक सगळ्यात सुंदर पण काहीसा दुर्लक्षित बीच समजला जातो. हा रस्ता पार्कच्या मागच्या बाजूने जात होता. काल पाहिलेली ती भव्य मूर्ती इथून वेगळ्याच दृष्टिकोनातून दिसत होती. गरुडाच्या पंखांचा विस्तार इथून चांगलाच नजरेत भरत होता. एका ठिकाणी थांबून तिथले फोटो काढले. तासाभरात ग्रीन बाउल बीचवर पोहोचलो. हाही क्लिफ बीचच होता. मात्र क्लिफच्या खाली बर्‍यापैकी रुंद पुळण होती. स्कूटर पार्क करून मी पायर्‍यांनी खाली उतरायला लागलो. गर्द हिरव्या झाडीतून पायर्‍या खाली उतरत होत्या. हिरव्यागार डोंगरउतारामुळेच कदाचित या बीचला ग्रीन बाउल बीच म्हणत असावेत. लाटांचा आवाज घुमत होता. पायर्‍या संपत आल्या आणि समोर बघतो तर काय, वेगाने आदळणार्‍या लाटा आणि त्यांचे उंच उडणारे तुषार. बीच गेला कुठे? भरतीच्या पाण्याचा आवेग एवढा प्रचंड होता की पाण्याने सगळा बीचच गिळून टाकला होता. बरेचसे पर्यटक तिथेच हताशपणे पायर्‍यांवर उभे होते. काही जण तसेच माघारी वळत होते. तसे उजव्या बाजूने थोड्याफार उरल्यासुरल्या वाळूवर जाता येत होते. पण लाटा एवढ्या उंच होत्या की दोन सेकंदांत माणूस चिंब भिजून जाईल. पाहिल्याच बीचवर भिजायची बिलकुल इच्छा नव्हती. आता काय? माझी चांगलीच फजिती झाली होती. पण इथे आलोच आहे तर थोडा वेळ बसूया असं म्हणून मी तिथेच बसकण मारली. उसळणार्‍या लाटांचे फोटो काढू लागलो. जागा तर सुंदरच होती. निळ्या आणि हिरव्या रंगाच्या सार्‍या छटा तिथे एकवटल्या होत्या. डोंगरउतारावरच्या झाडांचा गर्द हिरवा रंग समुद्राने जणू उसना घेतला होता. समोरच्या खडकावर आदळून पाण्याचे तुषार सर्वत्र उडत होते. तिथे बसून मी अगणित फोटो काढले. कॅमेर्‍याची वेगवेगळी सेटिंग्स वापरुन पाहिली. शेवटी भूक लागल्याचे जाणवताच माघारी वळलो.

वेगळ्या दृष्टीकोनातून दिसणारी पार्कमधली मूर्ती  


भरतीच्या पाण्यात गायब झालेला बीच  

बेभान आदळणार्‍या लाटा 

पुढचा बीच होता पंडावा बीच. हा तसा मोठा आणि गर्दीचा बीच होता. पण इथे काहीतरी खायला मिळेल अशा आशेने मी तो निवडला होता. अर्ध्या तासातच तिथे पोहोचलो. रस्ता जिथून खाली बीचकडे वळत होता त्या वळणावर एक मस्त फोटो स्पॉट बांधला होता. तिथे जरा वेळ थांबलो. समोरचा अथांग समुद्र फारच सुंदर दिसत होता. थोडीफार गर्दी होती. पण अगदीच कोलाहल नव्हता. मग खाली उतरून बीचवर पोहोचलो. किनार्‍यालगत असंख्य हॉटेल्स होती. एका लहानशा हॉटेलमध्ये शिरलो आणि व्हेज नूडल्स मागवले. समोरचा समुद्र बघत जेवण केले आणि पुढच्या बीचकडे निघालो. हा पुढचा बीच म्हणजे एक लहानसा आडवाटेवरचा बीच होता. गुनुंग पयांग नावाचे एक लहानसे मंदिर होते. त्याच्या खाली काहीसा खडकाळ असा किनारा होता. इथे तर अक्षरशः कुणीच नव्हते. समुद्रही शांत दिसत होता. भरती असल्याने पुळण फारशी दिसत नव्हतीच. मात्र त्यावरून चालता येत होते. वारा मंद सुटला होता. इथे मी एका दगडावर शांतपणे बसलो. घरी एक व्हिडिओ कॉल केला. तिथली शांतता मनसोक्त अनुभवली आणि नुसा दुआच्या दिशेने निघालो.

पंडावा बीच 

पंडावा बीचकडे जाणारा रस्ता आणि समोर दिसणारा अथांग समुद्र 

पंडावा बीचवरचा फोटो स्पॉट 

अखेरीस सापडलेला शांत समुद्रकिनारा 

इथलं पानी कमालीचं शांत होतं 

नुसा दूआ म्हणजे बालीमधले पंचतारांकित रिसॉर्ट टाउन. ऐषारामी पर्यटकांसाठी बांधलेली जागा. इथला परिसर निश्चितच सुंदर होता. रुंद रस्ते, सुंदर बागा, प्रत्येक चौकात सुरक्षारक्षक असा चोख बंदोबस्त होता. मी इथे आलो होतो ते वॉटरब्लो नावाची जागा बघायला. इथे खडकांची नैसर्गिक रचना अशी काही बनली आहे की समुद्राचे पाणी वेगाने आदळते आणि खडकाला असलेल्या भोकांतून कारंज्यासारखे वर उसळते. आज भरतीचा दिवस असल्याने इथे पाण्याचा खेळ छान बघायला मिळेल अशा आशेने मी तिथवर पोहोचलो. खडकांची रचना अगदीच वैशिष्ट्यपूर्ण होती. सततच्या पाण्याच्या आघाताने त्या खडकावर सुरेख आकार बनले होते. आता उसळणारे पाणी कुठे दिसतेय ते शोधू लागलो. पण आजचा सगळा दिवसच फजितीचा होता. दुपारी नको तेवढा उसळणारा समुद्र आता काहीसा शांत झाला होता. कारंजं कसलं, पिचकारीतून पाणी उडवावं तसं अधूनमधून खडकातून पाणी वर उडत होतं. काय तरी नशीब माझं! जिथे शांत बीच हवा होता तिथे समुद्राच्या लाटांनी कहर केलेला. आणि जिथे उंच उसळणारे पाणी बघायला आलेलो तिथे जलाधिराज विश्राम अवस्थेत गेलेला. असो. भटकंती म्हटली की असे फजितीचे प्रसंग यायचेच. त्यातही एक वेगळी मजा असते.

पाण्याच्या आघाताने खाडकावर बनलेले सुरेख आकार 

उंच लाटांची नुसती प्रतिक्षाच 

हॉस्टेलवर परतलो तेव्हा जेमतेम साडेसहा वाजले होते. अजून सगळी संध्याकाळ बाकी होती. मग हॉस्टेलच्या मागच्या बीचवर गेलो. गुगलवर सर्च करून एक मस्त रेस्तोरंट शोधलं. एक बियर मागवली आणि बसलो. अंधार पडत आला होतं. जांभळ्या संधीप्रकाशात सारा परिसर रम्य वाटत होता. मग पाड थाई हा पदार्थ मागवला. हा पदार्थ मूळचा थाई असला तरी सगळ्या दक्षिण-पूर्व देशांत प्रसिद्ध आहे. जेवण संपवून मी कुटामधल्या मुख्य रस्त्यावर फेरफटका मारायला निघालो. उद्या बालीच्या जवळच असलेल्या नुसा लेंबोंगान या बेटावर जायचा बेत आखला होता. त्यासाठी एक टुर बूक करावी लागते. त्याची थोडीफार चौकशी केली. एकंदरीत व्हिक्टरने सांगितलेली कंपनीच सगळ्यात स्वस्त वाटत होती. मग मी त्यांना फोन करून उद्याचे बुकिंग करून टाकले. उद्या हॉस्टेलही सोडायचे होते. मग लगेच परत येऊन समान बांधून ठेवले आणि बेडवर आडवा झालो.                 

क्रमशः