नयनरम्य बाली – भाग ८ – उलून दानू मंदिर आणि सेकंपुल धबधबा Beautiful Bali – Part 8 – Ulun Danu temple and Sekempul waterfall

सकाळी साडेसातलाच उठून तयार झालो. आज तसा लांबचा प्रवास होता. नाश्ता केला आणि स्कूटर चालू केली. ऊबुद मधला राजवाडा आणि मार्केट काल बघायचं राहून गेलं होतं. आणि ते नऊच्या पुढेच उघडणार होतं. मग तिथे जायचा विचार सोडून दिला आणि थेट उलून दानू मंदिराचे लोकेशन गूगल वर टाकले आणि निघालो. जसे ऊबुद मागे पडले तशी हिरवीगार भातशेती सर्वत्र दिसू लागली. मधेच घनदाट झाडी लागत होती. बालीचा हा मध्य भाग काहीसा उंचावर आहे. समुद्रापासून लांब असल्याने इथे हवा जरा थंड होती. अगदी तळकोकणातल्या गावांतून जावं तसं वाटत होतं. लाल माती तेवढी नव्हती. एकंदरीत बालीतल्या रस्त्यांवरून स्कूटरने फिरणे हा एक सुरेख अनुभव होता. तुळतुळीत काळे डांबर रास्ते, कुठेही खड्डे नाहीत, बाजूने पाणी वाहून जायला व्यवस्थित बांधलेले चर, बाजूने लावलेली फुलझाडे, रस्त्यावर लावलेले दिशादर्शक, सगळे काही पर्यटकस्नेही होते. शिवाय भारतासारखेच डाव्या बाजूने चालणारे ट्राफिक. त्यामुळे वेगळी व्यवस्था अंगवळणी पडून घ्यायचे कष्टही नाहीत. इंडोनेशिया तसा गरीब देश असूनही इथली स्वच्छता, नीटनेटकेपणा, आणि मुख्य म्हणजे सौन्दर्यदृष्टी कौतुकास्पद होती. मधे थोडा वेळ कॉफीसाठी थांबून मी साधारण दुपारी बाराच्या सुमारास उलून दानू ला पोहोचलो. 

रस्त्यावर दिसणारी भातशेती 

तळकोकणासारखे भूदृश्य 


उलून दानू म्हणजे बाली मधले एक सुप्रसिद्ध पर्यटनस्थळ. बेरातान सरोवराच्या काठाशी असलेल्या या मंदिराने देशोदेशीच्या पर्यटकांना भुरळ घातली आहे. किंबहुना हे मंदिर म्हणजे बालीची ओळख बनून राहिले आहे. सतराव्या शतकात बांधले गेलेले हे मंदिर पाण्याची देवता दानू हिच्यासाठी बांधले गेले आहे. इथे काही बौद्ध आणि हिंदू देवतांची पूजास्थाने आहेत. दुपारची वेळ असल्याने मंदिरात विशेष गर्दी नव्हती. मंदिराचा प्रशस्त परिसर उठून दिसत होता. इथेही मंदिराच्या आतल्या भागात जायला परवानगी नव्हतीच. आजूबाजूचा सगळा परिसर सुंदर फुलझाडांनी सुशोभित केलेला होता. तेवढ्यात दृष्टीस पडले ते मंदिराचे मुख्य आकर्षण – पाण्याच्या मधोमध असलेले उतरत्या छपरांचे दोन मनोरे. हे दोन मनोरे सरोवराच्या आत असलेल्या एक लहानशा बेटावर उभारले आहेत. बेटाचा पृष्ठभाग अगदी सपाट असल्याने हे मनोरे अक्षरशः पाण्यात तरंगत असल्यासारखे वाटतात. हे मनोरे शिव आणि पार्वती यांचे प्रतिनिधित्व करतात असे मानले जाते. समोरचे निळेशार सरोवर, त्यात उमटणार्‍या संथ लाटा, त्यामागच्या डोंगररांगा, आणि पाण्याच्या मधोमध असलेले दोन पवित्र मनोरे असा तो सगळा परिसर विलक्षण सुंदर दिसत होता. हवा आल्हाददायक होती. ऊन स्वच्छ होते. ढगांचे काही पुंजके समोरच्या डोंगरांना बिलगले होते. एखाद्या अद्भुतरम्य विश्वात आल्यासारखे वाटत होते. निसर्गसौन्दर्य आणि अध्यात्म यांची उत्तम सांगड घातलेली दिसत होती. थोडा वेळ तिथे आजूबाजूला फिरत राहिलो. असंख्य फोटो काढले. तिथून निघावेसेच वाटत नव्हते. पण पुढचा लांबचा पल्ला गाठायचा होता. शेवटी कॅमेरा बंद केला आणि तिथून बाहेर पडलो. 

तरंगते मनोरे आणि रम्य सरोवर 

उलून दानू चा रम्य परिसर 

निळेशार सरोवर, मागचे डोंगर, आणि त्यावर तरंगणारे ढगांचे पुंजके 

बेरातान सरोवरचा रम्य परिसर 

सेकेंपूल धबधब्याचं लोकेशन टाकलं आणि स्कूटर चालू केली. धबधबा बघून पुढे किंतामानीला पोहोचायचं होतं. मी थोडा वेग वाढवला. उलून दानू चे विशाल सरोवर मागे पडले आणि रस्ता थेट पाठीमागच्या डोंगरात शिरला. मस्त नागमोडी वळणांचा घाट सुरू झाला. रस्ता सुरेख तर होताच. पण आता आजूबाजूला हिरव्यागार झाडांची सोबत होती. भर पावसाळ्यात खंडाळ्याच्या घाटातून जावे तसे वाटत होते. हळूहळू लोकवस्ती विरळ होत चालली होती. जंगल घनदाट होत होते. सेकेंपूलकडे जाणारा हा मुख्य रस्ता नसावा कदाचित. कारण पर्यटकांच्या फारशा गाड्याही दिसत नव्हत्या. तेवढ्यात रस्त्यावर पाटी दिसली तिरता बुआना धबधबा. पाटीवरचे चित्र तर छानच दिसत होते. बघूया तरी काय आहे, असं म्हणून मी स्कूटर वळवली. थोडे अंतर आत जातोच तर एक चेक पोस्ट दिसले. तिथे काही स्थानिक तरुणांनी अडवले. सांगू लागले धबधब्याला जायचे असेल तर इथे एंट्री करा. मी गुमान थांबून एंट्री करू लागलो. मग तिथला एक जण सांगू लागला की पुढे जायला गाईड सोबत घेणे बंधनकारक आहे आणि ही सरकारी व्यवस्था आहे. मी पहिलं तर त्या कागदावर कुठेही सरकारी लोगो नव्हता. ना त्या तरूणांकडे कुठले ओळखपत्र होते. मला सगळं प्रकार संशयास्पद वाटू लागला. बाली मध्ये घडणार्‍या अशा फसवणुकीच्या प्रकाराविषयी मी आधी इंटरनेट वर वाचलं होतं. हा तसलाच काहीतरी प्रकार दिसतोय हे लक्षात येताच मी सरळ गाईड नको असे सांगून तिथून निघालो. मी निघतोय हे बघून तिथले तरुण म्हणायला लागले पुढे जाता येणार नाही, दंड भरावा लागेल, वगैरे. पण माझ्या समोरच दोन गाड्या यांच्या चेक पोस्ट ला न जुमानता सरळ पुढे निघून गेल्या. ते बघून मी सरळ त्यांच्याकडे दुर्लक्ष करून धबधब्याच्या दिशेने निघालो. नशीब लवकर सगळं लक्षात आलं. नाहीतर लुटलोच जाणार होतो. 

धबधब्याजवळची गर्द झाडी  

दरीत कोसळणारा धबधबा 

लयीत कोसळणारे पाणी आणि समोरचे कुंड मुख्य रस्त्यावरून थोडा बाजूला असलेला एक तीव्र उतार पार करून मी धबधब्याजवळ पोहोचलो. ही तर फक्त पार्किंगची जागा होती. धबधबा आणखी पुढे दरीत होता. इथे तर एकही गाडी दिसत नव्हती. आपण नक्की योग्य जागी आलोय की नाही आही शंका येऊ लागली. तेवढ्यात एक जोडपं दरीतून वर येताना दिसलं. त्यांनी सांगितलं की धबधबा साधारण दहा मिनिटांवर आहे. मग मी लगेचच खाली उतरू लागलो. दूरवरून पाण्याचा खळखळाट ऐकू येत होता. गर्द झाडीतून एक वळण घेतले आणि समोर पाहतो तर काय, दुधासारखे शुभ्र पाणी हिरव्यागार वनराईतून खालच्या कुंडात झेपावत होते. त्या ध्रोंकाराने सगळा आसमंत भरून राहिला होता. मुख्य म्हणजे तिथे कुणीच पर्यटक नव्हते. नुसता धबधबा आणि मी! हर्षोल्हासित होऊन मी पाण्याकडे धाव घेतली. धबधब्याच्या एका बाजूला बंधारा बांधून एक लहानसे कुंड तयार केले होते. जणू काही निसर्गाच्या कुशीतला स्विमिंग पूल! आता मात्र माला मोह आवरला नाही. बॅग एका बाजूला ठेवली, कपडे काढले, आणि सरळ कुंडात उतरलो. अहाहा काय थंडगार पाणी होतं! दिवसभरच्या स्कूटरचालनाचा शीण एका क्षणात नष्ट झाला. पाणी जेमतेम चार फूट खोल होतं. पुढे खोली जास्त असावी कदाचित. पण पोहता येत नसल्याने पुढे जायचा विचार सुद्धा केला नाही. नुसता गारेगार पाण्यात डुंबत समोरचा धबधबा आणि आजूबाजूचे रान न्याहाळत राहिलो. निसर्गाच्या सहवासातला तो एकांत म्हणजे एखाद्या थेरपी सारखा वाटत होता. किती वेळ गेला असेल कुणास ठाऊक. पाण्यात खेळून एकदम भुकेची जाणीव झाली तेव्हा भानावर आलो. बघतो तर अडीच वाजले होते. अजून सेकंपूल धबधबा बघायचा होता. शिवाय अंधार पडायच्या आत किंतामानी गाठायचे होते. लगेच पाण्याबाहेर पडलो आणि आवरून तिथून निघालो. 

कुंडात डुंबणे हा एक स्वर्गीय अनुभव होता 

तिथून पुढचा रस्ता म्हणजे निसर्गसौंदर्याची खाणच होती. हिरव्या रानाने गच्च भरलेले डोंगर, त्यांच्या माथ्यावर भुरभुरणारे ढग, आणि त्यातून चिरत जाणारा कुळकुळीत डांबररस्ता! मध्ये फोटो काढायला थांबायचा फार मोह होत होता. पण उशीर होईल म्हणून मोह आवरला आणि स्कूटर सरळ पुढे दामटवली. असंख्य वळणे पार करत शेवटी सेकेंपूल धबधब्याजवळ पोहोचलो. ही तशी प्रसिद्ध जागा होती. इथला परिसर बराच मोठा होता. इथे सरकारी नियोजन दिसत होते. गाडी पार्क केली आणि तिकीट काढायला गेलो. तिथली माहिती वाचून लक्षात आलं की हा धबधबा व्यवस्थित बघायचा असेल तर एक संपूर्ण दिवस हवा. साधारण सात तासांचा गाइडेड ट्रेक केला तर आजूबाजूच्या रानातून धबधब्याचे सगळे कंगोरे बघत फिरता येतं. आणि शेवटी एका कुंडात पोहता पण येतं. अर्थातच माझ्याकडे तेवढा वेळ नव्हता. आणि मनसोक्त कुंडात डुंबून आधीच झालं होतं. मग मी नुसता धबधबा लांबून बघता येईल अशा जागेपर्यंत जायचं तिकीट काढलं आणि निघालो. तिथे जायलाही अर्ध्या तासाची पायपीट होती. चालायला जिवावर आलं होतं. पण आता आलोच आहे इथवर तर निदान धबधब्याचं दर्शन तरी घेऊ असं म्हणून मी निघालो. पक्की बांधलेली ते पायवाट गर्द रानातून हळूहळू दरीत उतरत होती. वीसच मिनिटात एका व्यु पॉइंट वर पोहोचलो. आणि समोरचं दृश्य अचंबित करणारं होतं. एका प्रचंड डोंगराच्या खोबणीतून दोन शुभ्र धारा आवेगात खाली कोसळत होत्या. शिवाय अनेक उपाधारा इकडेतिकडे बागडत होत्या. पलीकडच्या डोंगरावरून आणखी एक प्रवाह खाली दरीत झेपावत होता. आजूबाजूच्या गच्च झाडीतून हिरवा रंग ओसंडून वाहत होता. ढगांच्या फटीतून वाट काढत उन्हाची एक तिरीप त्या प्रवाहांवर स्थिरावली होती. जणू काही डोंगराच्या रंगमंचावर एखादा एकपात्री प्रयोग सुरू होता आणि सूर्यनारायण त्याची प्रकाशयोजना हाताळत होता. सारेच अद्भुत होते. तिथूनच सात तासांच्या ट्रेकची वाट खाली उतरत होती. धबधब्याच्या पार खालच्या टोकाकडे जाऊन त्याच्या उंचीचा आणि सामर्थ्याचा वेध घेणे किती रोमांचक असेल याची कल्पना मी तिथे उभा राहून करत होतो. खाली जाता येणार नाही याची काहीशी हळहळही वाटत होती. मग तिथूनच भरपूर फोटो काढले आणि माघारी वळलो.


सेकेंपूल धबधब्याचा रम्य परिसर 

दरीत कोसळणारे दोन शुभ्र प्रवाह 

प्रवाहावर रेंगाळणारी उन्हाची तिरीप 


चार वाजत आले होते आणि मला जेवायची सुद्धा संधी मिळाली नव्हती. चांगलीच भूक लागली होती. मग तिकीट खिडकीच्या बाजूच्या एका लहानशा उपहारगृहात शिरलो आणि फ्राइड राईस मागवला. दोन घास घशाखाली गेल्यावर जरा बरं वाटलं. जेवण आटोपून पुन्हा स्कूटर चालू केली आणि किंतामानीकडे निघालो.

क्रमशः