नयनरम्य बाली - भाग ११ - अलविदा बाली Beautiful Bali - Part 11 - Goodbye Bali

बतूरचा ट्रेक पूर्ण करून हॉस्टेलवर पोहचलो तेव्हा अकरा वाजले होते.  प्रचंड थकवा वाटत होता. आणि झोपही येत होती. आज रात्री नऊचं परतीचं विमान होतं. कसा काय स्कूटर चालवत विमानतळ गाठणार मी? थोडी चिंता वाटत होती. एवढी दगदगीची रूपरेषा कशाला आखायची? मनात उगीच उलटसुलट विचार येत होते. हॉस्टेलच्या मॅनेजरला विचारलं थोडं उशिरा चेक आऊट केलं तर चालेल का? त्या रूमसाठी पुढचे काही बुकिंग नव्हते. मग तो म्हणाला ठीक आहे अजून दोन तास थांबू शकतोस. मी लगेच बेडवर आडवा झालो. मस्त तासभर झोप काढली. थोडं बरं वाटलं. दीडच्या सुमारास  आंघोळ करून सामान बांधून तिथून निघालो. मधे कुठे जेवायला थांबावं लागू नये म्हणून इथेच थोडा फ्राइड राईस खाऊन घेतला. किंतामानीवरून विमानतळ हे अंतर होते साधारण ७० किमी. दोन तासांचा हिशोब ठेवला तरी चारपर्यन्त सहज विमानतळावर पोहोचता येणार होते. खरं तर या परतीच्या प्रवासात पुरा बेसाकीह हे एक प्रसिद्ध मंदिर बघायचा विचार होता. पण आता वेळ कमी होता. शिवाय या मंदिरात नेहमीच प्रचंड गर्दी असते म्हणे. त्यामुळे रांगेत उभं राहून तिकीट काढून आत जायचे, फिरायचे, फोटो काढायचे वगैरे गोष्टींसाठी अंगात अजिबात त्राण उरले नव्हते. मग तो विचार सोडून दिला. विमानतळाचे लोकेशन गुगलवर टाकले आणि निघालो.  


वातावरण छान होते. मध्य बालीचा हा भाग थोडा उंचीवर असल्याने इथे हवा कायमच थोडी थंड असते. मंगळवार असल्याने आज स्थानिक पर्यटकांची फार गर्दी नव्हती. रस्ते मोकळेच होते. घाट ओलांडून ऊबुदच्या रस्त्याला लागलो. हा भाग म्हणजे बालीमधला  अॅ ग्रो टुरिझमसाठी प्रसिद्ध असलेला भाग. कोपी लेवाक नावाची एक अतिशय महाग पण प्रसिद्ध अशी कॉफी इथे बनते. एशियन पाम सिवेट म्हणजेच रानमांजराचा एक प्रकार. हे मांजर कॉफीची फळं खातं आणि न पचलेल्या बिया विष्ठेतून बाहेर टाकतं. याच बिया गोळा करून त्यापासून कॉफी बनवली जाते. याला एक वेगळीच अद्भुत चव असते म्हणे. मला तर ऐकूनच किळस वाटली. ही अशी कॉफी प्यायला जगभरातून पर्यटक येतात. आता तर हा प्रकार अत्यंत व्यावसायिक झाला आहे. रानमांजरांना पकडून पिंजऱ्यात ठेवलं जातं. मग त्यांना मुद्दामहून कॉफीची फळं खायला घातली जातात. मग त्यांची विष्ठा गोळा करून पुढची प्रक्रिया केली जाते. या कॉफीच्या एका कपाची किंमत $३५ ते $१०० असते म्हणे! काय तरी एकेक श्रीमंतांची थेरं! रस्त्यात अशी कॉफी विकणारी बरीच दुकानं दिसत होती. शिवाय मोठ-मोठी कॉफीची शेतंदेखील दिसत होती. एक तर कॉफी हे इथलं मूळचं झाड नाही. आणि कॉफीची फळं हा रानमांजरांचा मुख्य आहारही नाही. हा सगळाच प्रकार मला पर्यावरणदृष्ट्या चुकीचा वाटत होता. असो. त्याकडे दुर्लक्ष करून मी पुढे निघालो.  

ऊबुद ओलांडलं आणि जरा वेळ कॅफे मध्ये थांबलो. तीन वाजले होते. मस्त कॉफी आणि एक सँडविच मागवले. एकीकडे फोन चार्ज करायला लावला. गुगल वर दिशादर्शन चालू असते तेव्हा बॅटरी कशी संपते कळतच नाही. खाता खाता जेवढी शक्य होईल तेवढी बॅटरी चार्ज करून घेतली. मग पुढे निघालो. अपेक्षेनुसार चार वाजता कुटाला पोहोचलो. सहा वाजता विमानतळाजवळच्या पार्किंग लॉट मध्ये स्कूटर परत करायची होती. मग तसेच तिथून चेक इन करायचे होते. थोडक्यात अजून दोन तास वेळ होता. मग जवळच्या एका स्पामध्ये शिरलो. सात दिवसांच्या प्रवासाने आणि स्कूटर चालवण्याने अंग उबून आलं होतं. आता अनायासे थोडा वेळ मिळाला आहेच तर जरा रीलॅक्स करू. तासभर छान मसाज करून घेतला. मग एक गरमागरम चहा घेतला. पावणेसहा वाजलेच होते. स्कूटरच्या कंपनीचा ईमेल आला होताच. बाहेर पडलो आणि लक्षात आलं पेट्रोल भरायचं राहूनच गेलं! स्कूटर परत देताना टाकी पूर्ण भरून देणे अनिवार्य होते. अन्यथा डिपॉजिट मधून वजा केले जातील अशी अट होती. मग काय, निघालो पेट्रोल पंप शोधत. संध्याकाळची वेळ असल्याने रस्त्यावर ट्राफिक वाढलं होतं. पटकन गुगल वर पेट्रोल पंपही सापडेना. मग असाच निघालो मुख्य रस्त्यावरून. अर्धा तास फिरल्यावर शेवटी एकदाचा पेट्रोल पंप सापडला. मग पेट्रोल भरून विमानतळ गाठेपर्यन्त पवणेसात वाजले. स्कूटरच्या कंपनीचा माणूस बिचारा तिथेच उभा होता ताटकळत. त्याला सॉरी म्हणून स्कूटर परत केली आणि विमानतळाकडे निघालो.  

चेक इन केलं आणि फूड कोर्टकडे वळलो. बोर्डिंगला अजून दोन तास होते. एक बियर मागवली आणि पीत बसलो. असंख्य फोटो काढलेले होते. ते एकीकडे बघत बसलो. शेजारी एक वयस्क बेल्जियन जोडपं बसलं होतं. माझा कॅमेरा बघून काका विचारू लागले कुठला आहे वगैरे. मग आमच्या गप्पा रंगल्या. काका कॅननचा एक अत्यंत महागडा कॅमेरा घेऊन फिरत होते. एकंदरीत फोटोग्राफी मध्ये बराच रस होता त्यांना. काका आणि काकू गेले दोन आठवडे बालीमध्ये फिरत होते. मी बघितली त्याच्या निम्मीदेखील ठिकाणं त्यांनी बघितली नव्हती. पण जिथे गेले होते तिथे त्यांनी मनसोक्त वेळ व्यतीत केला होता. युरोपियन लोकांची ही फिरण्याची तऱ्हा मला कायमच अचंबित करते. हे लोक फिरतात ते जग समरसून अनुभवण्यासाठी.  उगीच पळापळ नाही. आणि ग्रुपने येऊन अंताक्षरी किंवा हाऊजी असला धांगडधिंगा नाही. आपलं आपण फिरायचं, स्थानिक लोकांची जीवनपद्धती बघायची, फोटो वगैरे काढायचे आणि एक समृद्ध अनुभव गाठीशी बांधून परत जायचं. मला कधी असं फिरायला जमेल का याचा विचार मी करू लागलो. पण लक्षात आलं की आपला पिंडच मुळी भटका आहे. एका जागी असे दोन-चार दिवस काही न करता घालवणं हे सर्वथा अशक्य आहे. असो. ज्याची त्याची फिरण्याची तऱ्हा न्यारी. मी काकांना विचारलं तुमचं इनस्टाग्राम  किंवा फेसबुक वर प्रोफाइल आहे का. यावर ते हसायला लागले. या नव्या पिढीच्या गोष्टी काही जमत नाहीत आपल्याला असं सांगू लागले. मला एकदम आई-बाबांची आठवण झाली. देश कोणताही असो माणसं सारखीच असतात. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला मुठीत घेऊन जगभर संचार करणारी आमची पिढी आणि त्याच तंत्रज्ञानाच्या मागे न धावताही आयुष्यातले सगळे क्षण भरभरून जगणारी ही मागची पिढी. काय गंमत आहे नाही!     

तेवढ्यात बोर्डिंग सुरू झाल्याची सूचना झाली. येतानाचं विमानही क्वालालंपूर मार्गे होतं. आणि क्वालालंपूरला सात तासांचा लेओवर होता! क्वालालंपूरला उतरलो तेव्हा स्थानिक वेळेनुसार रात्रीचे दोन वाजले होते. पुढचं विमान सकाळी आठ वाजता होतं. लाऊंज वगैरे मिळतेय का चौकशी केली. पण ते सगळंच आवाक्याबाहेर होतं. शेवटी असाच एका खुर्चीवर बसून झोपायचा प्रयत्न करू लागलो. विमान प्रवासातले हे असे प्रसंग सगळ्यात असह्य असतात. पण स्वस्तात प्रवास करायचा असेल तर हे सगळं सोसावं लागतच. असो. म्हणता म्हणता त्रिचीच्या विमानाची घोषणा झाली आणि मी एकदाचा विमानात बसलो. आपल्या देशात परत जातोय याचा आनंद होताच. यथावकाश विमान त्रिचीच्या धावपट्टीवर उतरलं. विमानतळाच्या  बाहेर पडताना मन अगदी भरून आलं होतं. कसली adventurous ट्रीप होती ही! एकापेक्षा एक सुंदर बीचेस, त्याहून सुंदर मंदिरे, snorkeling चा थरार, मग ज्वालामुखीवर केलेली चढाई, सगळंच भारी होतं. शिवाय प्रवासात भेटलेली वेगवेगळी माणसं आणि त्यांचे जीवनानुभव!  ठरवलेल्या जागांपैकी बहुतेक सगळ्या जागा बघून झाल्या होत्या. स्कूटरवर मनसोक्त हुंदडून झालं होतं. जगातली एक प्रसिद्ध जागा पुरेपूर अनुभवल्याचं समाधान वाटत होतं. अनुभवांची शिदोरी अजूनच परिपक्व झाली होती.    

समाप्त                                                                                 

नयनरम्य बाली - भाग १० - बतूर ज्वालामुखीवर आरोहण Beautiful Bali - Part 10 - Hike to Batur volcano

बालीचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथे असलेले ज्वालामुखी. एकंदरीत इंडोनेशियामध्ये १३९ ज्वालामुखी आहेत. हा सगळं देशच pacific ring of fire वर वसलेला आहे. त्यामुळे वरचेवर भूकंप, ज्वालामुखीचा उद्रेक या गोष्टी इथे सामान्य आहेत. बाली मध्ये एकूण चार  ज्वालामुखी आहेत. त्यांपैकी अगुंगचा उद्रेक २०१९ मध्ये झाला होता. आणि त्याचा उद्रेक हा अजूनही सुरू आहे. बतूर हादेखील जागृत ज्वालामुखी आहे. त्याचा शेवटचा उद्रेक २००० साली झाला होता. बाकीचे एक तर मृत आहेत किंवा अर्धमृत आहेत. किंतामानी हे गाव बतूरच्या caldera मध्येच वसले आहे. बतूरवर चढाई करण्यासाठीच मी इथे मुक्काम केला होता. बतूरवर चढाई ही बालीमधली एक अत्यंत लोकप्रिय गोष्ट आहे. असंख्य पर्यटक इथे सूर्योदय बघण्यासाठी रात्री चढाई करतात. त्यासाठी नियोजित गाइडेड ट्रेक असतात. असाच एक ट्रेक जॉइन करायचा माझा विचार होता. तशी आगाऊ सूचनादेखील मी हॉस्टेलला दिली होती.  

बतूर ज्वालामुखी 


कोणीतरी दार वाजवले आणि मी जागा झालो. हॉस्टेलवरचा कर्मचारी जेवण तयार आहे म्हणून सांगायला आला होता. मी एकदम भानावर आलो. दिवसभरच्या बाइक चालनाने मी प्रचंड थकलो होतो. पण भूकसुद्धा लागली होती. मग जेवायला बाहेर आलो. बाहेर हॉस्टेलमधल्या तरुणांचा एक ग्रुप जमला होता. एक जोडपं फ्रान्सचं होतं. एक मुलगी जर्मनीची तर एक बेल्जियमची होती. ओळखपाळख झाली. माझं तोडकंमोडकं जर्मन ऐकून सगळे एकदम इम्प्रेस झाले होते. माझी लगेचच सगळ्यांशी मैत्री झाली. आज रात्री  निघणार्‍या बतूर ट्रेकचं प्लॅनिंग सुरू होतं. आता मध्यरात्री उठून ट्रेकला जायचं अगदी जिवावर आलं होतं. मी तर जवळपास न जायचा निर्णयच घेतला होता. पण इथे जमलेला ग्रुप बघून माझा निर्णय बदलला. इथवर आलोच आहे तर करून येऊ ट्रेक. मी ट्रेकचे आगाऊ पैसे भरले आणि जेवण आटोपून परत रूमवर झोपायला गेलो. पण झोप काही येईना. फोनला नेटवर्क नव्हतच. उगीच सोबत आणलेलं पुस्तक चाळत बसलो. दहाच्या सुमारास थोडा वेळ आडवा झालो. जरा झोप लागतेय तेवढ्यात दारावर टकटक झालीच. रात्रीचे अडीच वाजले होते. ट्रेक सुरू करायची वेळ झाली होती. काल जमलेला सगळा ग्रुप आधीच आवरून तयार होता. वेळेच्या बाबतीत यूरोपियन लोकांचा काटेकोरपणा कौतुकास्पद असतो. थोडा चहा घेऊन आम्ही सगळे निघालो.  

गाडीने डोंगराच्या पायथ्याशी पोहोचलो. इथून ट्रेक सुरू होणार होता. हवा गार होती. आभाळात तार्‍यांचा खच पडला होता. ढग अजिबात दिसत नव्हते. म्हणजे आज सूर्योदय सुंदर दिसणार या कल्पनेने आम्ही अजून उत्साहात चढू लागलो.  ट्रेकचा मार्ग बारीक वाळूने भरलेला होता. त्यामुळे चढताना ग्रीप मिळत नव्हती. चढण फारशी तीव्र नसली तरी बारीक वाळूने चढण जास्त अवघड वाटत होती.  धापा टाकत आम्ही माथ्यावर पोहोचलो. इथे तर चक्क लाकडाचे बाक लावून स्टेडिअम सारखी बसायची व्यवस्था केली होती. इथे बसून सूर्योदय बघायचा? माझी जरा निराशाच झाली. पण आमचा गाईड म्हणाला, नाही, आपलं "पॅकेज" वेगळं आहे. आम्ही थोडे जास्त पैसे भरले असल्याने आम्हाला माथ्यावरच्या थोड्या अजून उंच असलेल्या भागावर जायला मिळणार होते. तिथे एक जण प्रत्येक ग्रुपचे कोणते पॅकेज आहे ते तपासत होता! या जागेचे झालेले कमालीचे व्यावसायीकरण  बघून मी अचंबित झालो! ग्रुप मधल्या एकाकडून हेदेखील ऐकलं की इथे स्थानिक लोक पर्यटकांना स्वतंत्र येऊच देत नाहीत. यायचं तर गाईड सोबतच नाहीतर नाही. सुरक्षेच्या दृष्टीने योग्यच आहे म्हणा. कारण ज्वालामुखीचा उद्रेक किंवा भूकंप कधीही होऊ शकतो. पण या गोष्टीत स्थानिक तरुणांचा रोजगार सुरक्षित करणे हीच बाब जास्त उठून दिसत होती. असो. आमच्या पॅकेज मध्ये ज्वालामुखीच्या एका बाजूने चढाई आणि दुसर्‍या बाजूने उतरणे आणि शिवाय नाश्ता हे सगळे अंतर्भूत होते. ठरल्याप्रमाणे आम्ही डोंगराच्या थोड्या वरच्या भागात जाऊन थांबलो. इथे फक्त आम्ही आणि अजून एक ग्रुप होता. आम्ही तसे लवकर पोहोचल्याने इथे तशी शांतता होती. पहाटेचे पाच वाजत आले होते. सूर्योदय व्हायला अजून तासभर अवकाश होता. तार्‍यांनी भरलेलं आकाश सुंदर दिसत होतं. मध्येच आकाशगंगेचा धूसर पट्टा दिसत होता. दूरवर किंतामानीतले दिवे लुकलुकताना दिसत होते. थंड वारा सुटला होता. मी ट्रायपोडवर  कॅमेरा लावला आणि आकाशाचे फोटो काढण्यात दंग झालो.  

तार्‍यांनी भरलेले आकाश आणि दरीत लुकलुकणारे दिवे 

सहा वाजत आले तसे पूर्व क्षितिज उजळू लागले 

अचानक वाहत आलेला ढगांचा लोट 


सहा वाजत आले तसे पूर्व क्षितिज उजळू लागले. आधी लाल, मग केशरी, गुलाबी, सोनेरी अशी रंगांची उधळण होऊ लागली. आता सूर्यबिंब लवकरच वर येणार म्हणून आम्ही उत्सुकतेने पूर्वेकडे बघत होतो. तेवढ्यात कुठून कोण जाणे एक ढगांचा प्रचंड लोट त्या डोंगरावर वाहत आला. अक्षरशः काही सेकंदांत त्या ढगाने अवघ्या डोंगराला कवेत घेतलं. हातातोंडाशी आलेला सूर्योदय त्या ढगाने एका क्षणात आमच्याकडून हिरावून घेतला. आम्ही सगळेच निराश झालो. अगदी काही मिनिटं आधी स्वच्छ असलेलं आकाश असं ढगांनी भरून जावं आणि ज्या जादुई क्षणासाठी इथवर आलो होतो तो असा निसटून जावा हे अगदीच निशाजनक होतं. पण शेवटी निसर्गच तो. त्याची तक्रार कोणापुढे करायची? असो. ज्या वेगाने तो ढग आला त्या वेगाने तो कदाचित निघूनही जाईल अशा अपेक्षेने आम्ही तिथेच थांबलो. वार्‍याने वाहणारे ढगांचे लोट त्या सोनेरी वातावरणात जादुई वाटत होते. थोड्याच वेळात सूर्यबिंब वर आले. त्याच्या प्रखर प्रभेने सारा आसमंत उजळला गेला. ढगांनी पूर्व दिशा रोखून ठेवली असली तरी पश्चिमेकडचे ढग मध्येच बाजूला जाऊन समोरच्या दरीचे दृश्य दाखवत होते. वारा भन्नाट सुटला होता. अंगात हुडहुडी भरत होती. थोड्या वेळाने तो ढगांचा आणि वार्‍याचा खेळ थांबला. थोडी उघडीप निर्माण झाली. एखादं लहान मूल इकडेतिकडे उद्या मारून, खेळून, मस्ती करून एकदाचं झोपी जावं तसं काहीतरी घडत होतं. आणि बघतो तर काय, खाली दरीत ढगांची मुलायम चादर पसरली होती. नुकताच पिंजलेला कापूस अलगद अंथरून ठेवावा तसे वाटत होते. वर स्वछ निळे आकाश दिसत होते. दूरवर अबंग आणि अगुंग या डोंगरांची त्रिकोणी शिखरे दिसत होती. ढग नसते तर समुद्रही दिसला असता. सारेच दृश्य अवर्णनीय होते. किती फोटो काढावेत किती नाही असं झालं होतं.  

सूर्य वर आला आणि सारे वातावरण सोनेरी झाले 

ढगांच्या दुलईतून डोकं वर काढणारी अबांग आणि अगुंग ची शिखरे  

मध्येच ढग बाजूला सरून दरीचे दर्शन घडवत होते 

इथे एक फोटो तर आवश्यकच होता!


तिथे मनसोक्त फोटो काढून आम्ही खाली उतरु लागलो. ही वाट सुद्धा निसरडीच होती. पण इथे बारीक वाळू पेक्षा चिखल जास्त होता. मुख्य शिखर पार करून आम्ही मधल्या सपाट भागावर पोहोचलो. इथे आणखी एक आश्चर्य आमची वाट बघत होतं. ते म्हणजे दगडातून येणारे वाफेचे फवारे. ज्वालामुखी जागृत असल्याची एक खूण. इथे कुठल्याही दगडाला हात लावला तरी गरम लागत होतं. आम्ही चिखल आणि गवत बघत चाललो होतो. मग मध्येच गाईड म्हणाला, चला नाश्ता करूया. इथे मध्येच नाश्ता? नुसती फळं आणि सुकामेवा खायचं की काय नाश्त्याला? पण इथेच तर गम्मत होती. आमच्या गाईडने गरम दगडाखाली खड्डा खणून त्यात अंडी आणि केळी घातली आणि वर फोईल पेपर लावून खड्डा बंद केला. ही होती आमची नैसर्गिक चूल! दहा मिनिटातच त्याने खड्डा उकरून अंडी आणि केळी बाहेर काढली. अंडी तर व्यवस्थित उकडली गेली होती. त्याला थोडासा गंधकयुक्त वास येत होता. आणि केळ्यांचा तर चक्क जॅम तयार झाला होता. तो जॅम ब्रेडवर लावून आम्ही खाऊ लागलो. समोर ढगांचा पाठशिवणीचा खेळ सुरूच होता. ज्वालामुखीच्या कुशीत बसून त्याच्याच उष्णतेवर शिजवलेला नाश्ता खाण्याचा अनुभव अगदी शब्दातीत होता. पेटपूजा करून आम्ही पुढे निघालो. उतरताना एका ठिकाणी समोरच्या दरीत नुसती ढगांची चादर दिसत होती. मी तिथे जरा वेळ थांबलो. आणि बघतो तर काय, माझी सावली त्या ढगांवर पडली होती आणि त्याभोवती गोलाकार इंद्रधनुष्य, ज्याला इंद्रवज्र म्हणतात, निर्माण झाले होते! जेव्हा आपण उंचीवरच्या ठिकाणी असतो, समोर ढग असतात, आणि मागून सूर्यप्रकाश असतो तेव्हा असे इंद्रवज्र दिसते म्हणतात. आपल्या हरिश्चंद्रगडाचा कोकणकडा इंद्रवज्रासाठी प्रसिद्ध आहे. इथेही तसाच योग जुळून आला होता. हे इंद्रवज्र म्हणजे आजच्या दिवसात दिसलेल्या निसर्गाच्या किमयेचा कळसाध्याय होता!  

इंद्रवज्र! 

खड्ड्यातली नैसर्गिक चूल 

उताराची रम्य वाट 


जसजसे खाली उतरू लागलो तसा उकाडा वाढू लागला. आता पुन्हा बारीक वाळूचा प्रदेश सुरू झाला होता. ढगांची चादर विरून गेली होती. स्वच्छ निळं आकाश दिसत होतं. बतूर ज्वालामुखीचा caldera सुस्पष्ट दिसत होता. काल रात्री ज्या तीव्र वळणाच्या घाटाने मी आलो होतो तो रस्ताही दिसत होता. थोडं पुढे जाताच बतूरची दोन उपविवरं दिसू लागली. त्यांपैकी एक हे २००० साली झालेल्या उद्रेकादरम्यान निर्माण झाले होते. तिथून प्रचंड वाफा येत होत्या. सगळीकडे गंधकाचा वास भरून राहिला होता. गंधकयुक्त पिवळी मातीही इकडेतिकडे पसरलेली दिसत होती. तिथे थोडेफार फोटो काढून आम्ही पुढे निघालो. आता उतार संपला आणि राखाडी वाळूचा सपाट भाग सुरू झाला. या मऊ वाळूतून चालणे जिकिरीचे होत होते. पाय थरथरत होते आणि झोपही येत होती. कधी एकदा हॉस्टेल वर पोहोचतोय असं झालं होतं. अखेरीस आम्ही मुख्य रस्त्यावर येऊन पोहोचलो. आमची गाडी उभीच होती. गाडीत बसून आम्ही एकदाचे हॉस्टेलवर पोहोचलो.  

ज्वालामुखीची उपविवरे आणि त्यातून येणार्‍या वाफा  

वाफांची ऊब घेताना ;)

विवरातले गंधकाचे थर 

राखाडी वाळूचे विस्तीर्ण मैदान 

क्रमशः 

नयनरम्य बाली - भाग ९ - किंतामानीची अंधारवाट Beautiful Bali - Part 9 - The dark road to Kintamani

सेकंपूलचा धबधबा बघून जेवण आटोपून मी लगबगीने किंतामानीकडे निघालो. अजून साधारण ६० किमी अंतर होते. साडेचार वाजत आले होते. अंधार व्हायच्या आत पोहोचेन की नाही याची धाकधूक वाटत होती. अंधारापेक्षा जास्त भीती मला फोनची बॅटरी संपायची वाटत होती. पॉवर बँक होती म्हणा. पण फोन बाइकवर लावलेला असताना चार्ज कसा करायचा ही अडचण होती. आजूबाजूच्या निसर्गाकडे मुश्किलीने दुर्लक्ष करत मी निघालो. रस्ता वळणा-वळणाचाच होता. बालीच्या मध्य भागातून मी आता उत्तर भागात चाललो होतो. बालीचा उत्तर भाग तसा पर्यटनापासून दूर आहे. इथली गावं त्यामानाने गरीब दिसत होती आणि रस्त्यांची अवस्था देखील यथातथाच होती. डोंगर उतरून मी उत्तर किनार्‍यावर असलेल्या एका गावात पोहोचलो. गावाच्या मध्यवर्ती भागात एक मोठा मासळी बाजार होता. बाजार बंद व्हायची वेळ झाली असावी. सगळीकडे एकच लगबग सुरू होती. मासळीचा वास सगळीकडे भरून राहिला होता. अगदी वर्सोव्याच्या कोळीवाड्यात असावं तसं वातावरण होतं. मी त्या गर्दीतून हळहळू वाट काढत पुढे जात होतो. आणि तिथले लोक हा कोण प्राणी इथे आला आहे अशा नजरेने माझ्याकडे बघत होते. परदेशी पर्यटक बालीच्या या भागात किती दुर्मिळ असावेत याची कल्पना मला आली. आपण नक्की बरोबर रस्त्यावर आहोत की नाही याची शंकाही येऊ लागली. मग एका ठिकाणी थांबलो आणि रस्त्यावरच्या एका माणसाला किंतामानीचा रस्ता विचारला. पण इथे लोकांना इंग्रजीचा काहीएक गंध नव्हता. मग आणखी चार जण माझ्याभोवती गोळा झाले. मी हरवलो आहे असा त्यांचा समज झाला आणि मग ते मला तोडक्या मोडक्या इंग्रजीत ऊबुद आणि कुटाचा रस्ता सांगू लागले. मग मी फोनवर किंतामानी टाइप करून दाखवले. मग त्यांच्या लक्षात आले मला कुठे जायचे आहे. तेवढ्यात एक तरुण कुठून तरी उगवला आणि त्याने समजेल अशा इंग्रजीत किंतामानीचा रस्ता सांगितला. खरं तर मी रस्ता चुकलोच होतो. वीसेक किमीचा फटका पडणार होता. आधीच उशीर झालेला. माझे टेंशन अजूनच वाढले. 

 
पुन्हा एकदा झाडीत वळलेला रस्ता 

कलत्या उन्हात चकाकणारी झाडे 

मी योग्य रस्त्यावर स्कूटर वळवली आणि वेग वाढवला. हा रस्ता उत्तर किनार्‍याला  स्पर्शून  पुन्हा मध्य भागातल्या डोंगराळ भागात वळत होता. हे म्हणजे दुष्काळात तेरावा महिना म्हणावं तसं झालं होतं. आधीच अंधार पडत आला होता आणि रस्ता अजून डोंगराळ आणि गर्द झाडीच्या भागात शिरत होता. शेवटी मी अंधाराची चिंता सोडून दिली. जे होईल ते होईल. Adventure नाही तर ट्रीप ची मजा कशी? बाप्पा मोरया म्हणत समोरच्या चढावर गाडी दामटली. रस्ता सुंदर होताच. मध्येच शेती, मध्येच जंगल, मध्येच तीव्र  उताराच्या  टेकड्या, आणि त्यात वसलेली चिमुकली गावं असे भूदृश्य होते. मी इकडेतिकडे बघत चाललो होतो. सूर्यास्त व्हायला थोडा वेळ होता. पण ऊन लाल-केशरी झाले होते. मध्येच एका गावात एक प्रशस्त आणि रेखीव मंदिर दिसलं. त्यातल्या उतरत्या  छपरांच्या मनोर्‍यांवर लाल-केशरी ऊन सांडलं होतं. मला थांबून फोटो काढायचा मोह आवरेना. तसंही अंग जरा आखडलंच होतं. मग तिथे थांबलो आणि एक-दोन फोटो काढले. थोडं स्ट्रेचिंग केलं. डोंगरमाथ्यावरच्या त्या गावात थंड हवेचे सुखद झोत येत होते. तो क्षण असाच फ्रीज व्हावा असं वाटत होतं. काहीतरी वेगळीच जादू होती त्या जागेत. फार वेळ रमलो तर इथेच अंधार व्हायचा असं म्हणून मी पुढे निघालो.

पाईन वृक्षांच्या रानात शिरलेला रस्ता 

रस्त्यात दिसलेले सुरेख मंदिर 

 
आता रस्ता अजूनच गर्द रानात शिरला. उंच आणि महाकाय असे पाईन वृक्ष दिसत होते. मध्येच ढगांचे लोट वाहताना दिसत होते. हवा अजूनच थंड झाली होती. आपण अजून उंचीवर चढत आहोत हे जाणवत होतं. एक वळण घेतलं आणि समोरचं दृश्य बघून मी हबकलोच. स्कूटर बाजूला लावली आणि रस्त्याच्या कडेला आलो. समोर विशाल दरी दिसत होती. आणि त्यात तीन त्रिकोणी डोंगर दिमाखात उभे दिसत होते. हेच ते तीन ज्वालामुखी - अगुंग, अबांग, आणि बतूर. अस्ताला जाणार्‍या सूर्याची प्रभा अवघ्या आसमंतात फोफावली होती. निळा, केशरी, लाल, राखाडी अशा काहीशा रंगांचे मिश्रण असावे तसे आकाश दिसत होते. थंड हवेचे लोट दरीतून उसळून वर झेपावत होते. समोरची दरी म्हणजे बतूर ज्वालामुखीचा caldera होता. उद्या याच ज्वालामुखीवर चढाई करायला जायचं होतं. इथे उभा राहून मी जणू काही त्या डोंगराला नमन करत होतो. चुकलेल्या रस्त्याने मला त्या अद्भुत जागी आणून ठेवलं होतं. आणि त्या डोंगरांचे मला दर्शन घडावे म्हणूनच जणू काही सूर्य क्षितिजावर रेंगाळला होता. माझ्या अंगावर शहारे उमटले. दिव्यत्वाची अनुभूती ती हीच का? ती कोणाला कशी आणि कोणत्या क्षणी येईल ते सांगता येत नाही म्हणतात. हे तसंच काहीतरी होतं बहुतेक. काही क्षण तर मला काय करावे सुचेना. तसाच डोळे मिटून शांत उभा राहिलो. ते दृश्य मनाच्या कॅमेरावर व्यवस्थित कोरून घेतलं. बाजूला एक लहानसे दुकान होते. तेही बंद होत आले होते. मी चटकन एक कॉफी घेतली आणि समोरचे दृश्य बघत पिऊ लागलो. एवढ्या प्रवासानंतर गरम कॉफी सुखद वाटत होती. तेवढ्यात अंधार झालाच.  

तीन ज्वालामुखींचे अद्भुत दर्शन 

अजून शेवटचे १५ किमी बाकी होते. आता थोडेच अंतर उरले आहे. अर्ध्या तासात हॉस्टेलवर पोहोचूच अशा विचारात मी स्कूटर चालू केली. रस्ता उताराचा होता. थोडीफार वस्ती दिसत होती. हवेतला गारठा वाढला होता. फोनची बॅटरी केवळ १०%  शिल्लक होती. एक वळण आले आणि अचानक तीव्र वळणांचा घाट सुरू झाला. मधूनच कुठे पुन्हा घाट सुरू झाला हे मला समजेना. मग लक्षात आले की आपण caldera मध्ये उतरत आहोत. किंतामानी हे गाव मुळात त्या caldera मध्येच वसलेलं होतं. बाईक बरीच वर्षं चालवत असलो तरी अंधारात चालवायचा तेवढा अनुभव नव्हता. शिवाय स्कूटरचा दिवा म्हणजे असून नसल्यासारखा. रस्त्याची अवस्था चांगली असली तरी वळणे तीव्र होती. पुढचे वळण कसे येणार आहे याचा अंदाज धड येत नव्हता. त्यात माझी बॅग स्कूटरवर दोन पायांच्या मध्ये ठेवलेली. ती पडेल की काय याचीही भीती वाटत होती. कधी एकदा हा घाट संपतोय आणि मी हॉस्टेलवर पोहोचतोय असं झालं होतं. नशिबाने थोड्या वेळात तो घाट संपला. अजूनही रस्ता सरळ नव्हताच. पण किमान तीव्र वळणे आणि उतार तरी संपले होते. हुश करून पुढे जाऊ लागलो. पुढून एक गाडी जात होती. तिच्याच मागे-मागे जात राहिलो. सगळा परिसर  निर्मनुष्य होता. वस्तीची कुठलीच चिन्हं  दिसत नव्हती. अशा परिसरात हॉस्टेल बांधले असेल? आपण बरोबर जातो आहोत ना? फोनची बॅटरी संपली तर काय करायचे? असे हजारो प्रश्न मनात पिंगा घालत होते. 

थोड्या वेळात आजूबाजूला काही घरं दिसू लागली. तसं सामसूमच होतं सगळं पण आजूबाजूला वस्ती आहे हे बघून जरा हायसं वाटलं. तेवढ्यात हॉस्टेलच्या नावाची पाटी दिसली. मुख्य रस्त्यावरून डावीकडे एक अरुंद वाट डोंगरावर चढत होती. मी स्कूटर आत दामटली. हा रस्ता कच्चा होता. नुसते दगड-धोंडे पसरवून ठेवले होते आणि त्यावर बारीक खडी टाकली होती. आपल्याकडे खड्डे बुजवण्याच्या नावाखाली करतात तसला जुगाड इथेही केलेला दिसत होता. त्यातून वाट काढत मी चढावावर गाडी रेटत होतो. आणि नेमकं एका वळणावर स्कूटरचं पुढचं चाक दोन दगडांच्या मध्ये अडकलं! कितीही जोर लावला तरी बाहेर निघेना! शेवटी उतरून गाडी नुसती बाहेर ओढायचा प्रयत्न करू लागलो. पण तेही जमेना. आधीच दिवसभराच्या दगदगीने दमलो होतो. आणि आता हॉस्टेल ढेंगभर अंतरावर असताना ही स्कूटर अशी अडकलेली. काय करावं काही सुचत नव्हतं. तेवढ्यात समोरून एक बाईक येताना दिसली. मला बघून बाईकवाला थांबला. मला मदतीची गरज आहे त्याच्या लक्षात आलं असावं. त्याने थांबून विचारपूस केली. इथे एक तरुण बर्‍यापैकी इंग्रजीत बोलतोय हे बघून मला हायसं वाटलं. मग आम्ही दोघांनी मिळून स्कूटरचं अडकलेलं चाक बाहेर काढलं. मी तर घामाघूम झालो होतो. आता पुढचं एवढसं अंतरही मी चालवू शकेन असं वाटत नव्हतं. मी त्याला  मला हॉस्टेल पर्यन्त सोडायची विनंती केली. मग मी मागे बसलो आणि त्याने त्या भयानक रस्त्यावरून मोठ्या शिताफीने मार्ग काढत मला हॉस्टेलवर आणून सोडलं. त्याचे किती आभार मानू किती नाही असं झालं होतं. तो तरुण माझ्या हॉस्टेलच्या समोरच असलेल्या एका होमस्टेचा मालक होता. उद्या सकाळी कॉफीला होमस्टे वर नक्की ये असं आग्रहाचं निमंत्रण देऊन तो निघून गेला.  

एकदाचं मी हॉस्टेलवर चेक इन केलं. इथे भाडं कमी असल्याने मी हॉस्टेल असलं तरी स्वतंत्र खोली बूक केली होती. सगळा परिसर अतिशय रम्य होता. मी खोलीत शिरलो, आंघोळ केली आणि बेडवर आडवा झालो. कसला adventurous दिवस होता याची उजळणी करता करता डोळा कधी लागला ते कळलंच नाही.  

क्रमशः