बतूरचा ट्रेक पूर्ण करून हॉस्टेलवर पोहचलो तेव्हा अकरा वाजले होते. प्रचंड थकवा वाटत होता. आणि झोपही येत होती. आज रात्री नऊचं परतीचं विमान होतं. कसा काय स्कूटर चालवत विमानतळ गाठणार मी? थोडी चिंता वाटत होती. एवढी दगदगीची रूपरेषा कशाला आखायची? मनात उगीच उलटसुलट विचार येत होते. हॉस्टेलच्या मॅनेजरला विचारलं थोडं उशिरा चेक आऊट केलं तर चालेल का? त्या रूमसाठी पुढचे काही बुकिंग नव्हते. मग तो म्हणाला ठीक आहे अजून दोन तास थांबू शकतोस. मी लगेच बेडवर आडवा झालो. मस्त तासभर झोप काढली. थोडं बरं वाटलं. दीडच्या सुमारास आंघोळ करून सामान बांधून तिथून निघालो. मधे कुठे जेवायला थांबावं लागू नये म्हणून इथेच थोडा फ्राइड राईस खाऊन घेतला. किंतामानीवरून विमानतळ हे अंतर होते साधारण ७० किमी. दोन तासांचा हिशोब ठेवला तरी चारपर्यन्त सहज विमानतळावर पोहोचता येणार होते. खरं तर या परतीच्या प्रवासात पुरा बेसाकीह हे एक प्रसिद्ध मंदिर बघायचा विचार होता. पण आता वेळ कमी होता. शिवाय या मंदिरात नेहमीच प्रचंड गर्दी असते म्हणे. त्यामुळे रांगेत उभं राहून तिकीट काढून आत जायचे, फिरायचे, फोटो काढायचे वगैरे गोष्टींसाठी अंगात अजिबात त्राण उरले नव्हते. मग तो विचार सोडून दिला. विमानतळाचे लोकेशन गुगलवर टाकले आणि निघालो.
ऊबुद ओलांडलं आणि जरा वेळ कॅफे मध्ये थांबलो. तीन वाजले होते. मस्त कॉफी आणि एक सँडविच मागवले. एकीकडे फोन चार्ज करायला लावला. गुगल वर दिशादर्शन चालू असते तेव्हा बॅटरी कशी संपते कळतच नाही. खाता खाता जेवढी शक्य होईल तेवढी बॅटरी चार्ज करून घेतली. मग पुढे निघालो. अपेक्षेनुसार चार वाजता कुटाला पोहोचलो. सहा वाजता विमानतळाजवळच्या पार्किंग लॉट मध्ये स्कूटर परत करायची होती. मग तसेच तिथून चेक इन करायचे होते. थोडक्यात अजून दोन तास वेळ होता. मग जवळच्या एका स्पामध्ये शिरलो. सात दिवसांच्या प्रवासाने आणि स्कूटर चालवण्याने अंग उबून आलं होतं. आता अनायासे थोडा वेळ मिळाला आहेच तर जरा रीलॅक्स करू. तासभर छान मसाज करून घेतला. मग एक गरमागरम चहा घेतला. पावणेसहा वाजलेच होते. स्कूटरच्या कंपनीचा ईमेल आला होताच. बाहेर पडलो आणि लक्षात आलं पेट्रोल भरायचं राहूनच गेलं! स्कूटर परत देताना टाकी पूर्ण भरून देणे अनिवार्य होते. अन्यथा डिपॉजिट मधून वजा केले जातील अशी अट होती. मग काय, निघालो पेट्रोल पंप शोधत. संध्याकाळची वेळ असल्याने रस्त्यावर ट्राफिक वाढलं होतं. पटकन गुगल वर पेट्रोल पंपही सापडेना. मग असाच निघालो मुख्य रस्त्यावरून. अर्धा तास फिरल्यावर शेवटी एकदाचा पेट्रोल पंप सापडला. मग पेट्रोल भरून विमानतळ गाठेपर्यन्त पवणेसात वाजले. स्कूटरच्या कंपनीचा माणूस बिचारा तिथेच उभा होता ताटकळत. त्याला सॉरी म्हणून स्कूटर परत केली आणि विमानतळाकडे निघालो.
चेक इन केलं आणि फूड कोर्टकडे वळलो. बोर्डिंगला अजून दोन तास होते. एक बियर मागवली आणि पीत बसलो. असंख्य फोटो काढलेले होते. ते एकीकडे बघत बसलो. शेजारी एक वयस्क बेल्जियन जोडपं बसलं होतं. माझा कॅमेरा बघून काका विचारू लागले कुठला आहे वगैरे. मग आमच्या गप्पा रंगल्या. काका कॅननचा एक अत्यंत महागडा कॅमेरा घेऊन फिरत होते. एकंदरीत फोटोग्राफी मध्ये बराच रस होता त्यांना. काका आणि काकू गेले दोन आठवडे बालीमध्ये फिरत होते. मी बघितली त्याच्या निम्मीदेखील ठिकाणं त्यांनी बघितली नव्हती. पण जिथे गेले होते तिथे त्यांनी मनसोक्त वेळ व्यतीत केला होता. युरोपियन लोकांची ही फिरण्याची तऱ्हा मला कायमच अचंबित करते. हे लोक फिरतात ते जग समरसून अनुभवण्यासाठी. उगीच पळापळ नाही. आणि ग्रुपने येऊन अंताक्षरी किंवा हाऊजी असला धांगडधिंगा नाही. आपलं आपण फिरायचं, स्थानिक लोकांची जीवनपद्धती बघायची, फोटो वगैरे काढायचे आणि एक समृद्ध अनुभव गाठीशी बांधून परत जायचं. मला कधी असं फिरायला जमेल का याचा विचार मी करू लागलो. पण लक्षात आलं की आपला पिंडच मुळी भटका आहे. एका जागी असे दोन-चार दिवस काही न करता घालवणं हे सर्वथा अशक्य आहे. असो. ज्याची त्याची फिरण्याची तऱ्हा न्यारी. मी काकांना विचारलं तुमचं इनस्टाग्राम किंवा फेसबुक वर प्रोफाइल आहे का. यावर ते हसायला लागले. या नव्या पिढीच्या गोष्टी काही जमत नाहीत आपल्याला असं सांगू लागले. मला एकदम आई-बाबांची आठवण झाली. देश कोणताही असो माणसं सारखीच असतात. झपाट्याने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाला मुठीत घेऊन जगभर संचार करणारी आमची पिढी आणि त्याच तंत्रज्ञानाच्या मागे न धावताही आयुष्यातले सगळे क्षण भरभरून जगणारी ही मागची पिढी. काय गंमत आहे नाही!
तेवढ्यात बोर्डिंग सुरू झाल्याची सूचना झाली. येतानाचं विमानही क्वालालंपूर मार्गे होतं. आणि क्वालालंपूरला सात तासांचा लेओवर होता! क्वालालंपूरला उतरलो तेव्हा स्थानिक वेळेनुसार रात्रीचे दोन वाजले होते. पुढचं विमान सकाळी आठ वाजता होतं. लाऊंज वगैरे मिळतेय का चौकशी केली. पण ते सगळंच आवाक्याबाहेर होतं. शेवटी असाच एका खुर्चीवर बसून झोपायचा प्रयत्न करू लागलो. विमान प्रवासातले हे असे प्रसंग सगळ्यात असह्य असतात. पण स्वस्तात प्रवास करायचा असेल तर हे सगळं सोसावं लागतच. असो. म्हणता म्हणता त्रिचीच्या विमानाची घोषणा झाली आणि मी एकदाचा विमानात बसलो. आपल्या देशात परत जातोय याचा आनंद होताच. यथावकाश विमान त्रिचीच्या धावपट्टीवर उतरलं. विमानतळाच्या बाहेर पडताना मन अगदी भरून आलं होतं. कसली adventurous ट्रीप होती ही! एकापेक्षा एक सुंदर बीचेस, त्याहून सुंदर मंदिरे, snorkeling चा थरार, मग ज्वालामुखीवर केलेली चढाई, सगळंच भारी होतं. शिवाय प्रवासात भेटलेली वेगवेगळी माणसं आणि त्यांचे जीवनानुभव! ठरवलेल्या जागांपैकी बहुतेक सगळ्या जागा बघून झाल्या होत्या. स्कूटरवर मनसोक्त हुंदडून झालं होतं. जगातली एक प्रसिद्ध जागा पुरेपूर अनुभवल्याचं समाधान वाटत होतं. अनुभवांची शिदोरी अजूनच परिपक्व झाली होती.
समाप्त
छान लिहिले आहेस . तुझे अनुभव पण भारी आहेत👌. बारीक निरीक्षण आणि पूर्णपणे समरस होऊन केलेलं लिखाण ,खूप छान.
ReplyDeleteधन्यवाद मामी! 🙏
Delete